थांब शाहीरा, थांब जरासा, सह्याद्रीची बघ शिखरे
समरभूमीची अमर कहाणी सांगतील तुज आर्तस्वरें ॥
जुलुमी सत्ता मारी लत्ता, नव्हते जनहित जनतेचे
वतनदार मातले, पातले, पारतंत्र्य परसत्तेचे ॥
स्वाभिमान जाऊनी लयाला, लाचारीचे ये जगणे
पदीं शृंखला परदास्याची अन्यायाला काय उणे ? ॥
ओस जाहली घरे राऊळे, भयकंपित थरकाप उडे
केवळ करीती काव---कावळे, भयाण कर्कश झोप उडे ॥
पडे धाड शत्रूंची अवचित, सुंदर ललना भ्रष्ट किती ?
सांगू जाहल्या अगणित युवती, परकियांच्या शेजवती ॥
वतनासाठी सौदे करीती, स्वाभिमान ना इभ्रतीचा
मर्द मावळा हतबल झाला, कलंक ठरला दौलतीचा ॥
नव्हता त्राता उरला होता, देव-धर्म-देशासाठी
कोण असा नरशार्दुल होता, तेव्हा जनतेच्या पाठी ?
अशाच समयीं रत्न जन्मले, तेज फाकले दाही दिशा
सन सोळाशे तीस वर्ष हे, जागी झाली अशी निशा ॥
कडाडूनी रणशिंग फुंकले, नौबत झडती, तोफ उडे
सह्य-गिरीचा अवखळ वारु, शत्रुवरती तुटुनी पडे ॥
गढी, दुर्ग, पेटली कपारी, खवळूनी उठली दरी-दरी
"सत्यान्वेषी" शाहीर शिंदे शिवरायांना धरी शिरी ॥