धन्य धन्य छत्रपति वीर, रणी रणधीर,
घेऊन तलवार, देशधर्माची राखण्या शान,
केले मराठयांनी प्राण कुर्बान, ऐका शाहीर गातो गुणगान ॥
पैजेचा विडा उचलून, मोठया धैर्यानं, अफझुलखान निघाला,
शिवाजीस धरण्यास, खंदे लढवय्ये होते साहाय्यास,
सांगतो आता ऐका घडला इतिहास ॥
चाल
जोशात निघाला खान, सरदार विजापुरवाला ॥
शिवनेरीच्या शूर सिंहा, हो तय्यार झुंझायाला ॥
भिडवतो मराठी भाला, लाव त्या चंद्रकोरीला ॥
ही वार्ता पोहचविणारे, भगव्या वस्त्रे फिरणारे ।
शिष्य ते मठाचे प्यारे ।
चाल
ते घोषत होते मंत्र, जयजय रघुवीर समर्थ ॥
धिप्पाड उंच अफझुला, सांगे सर्वाला, धरिन शिवाजीला,
ताकद रेडयाची होती अंगात, नामी सरदार होते सैन्यात,
निघाला शिवाजीस धरण्यास सारा फौजफाटा घेऊन, खान निघाला ॥
बारा हजार होत घोडदळ, तोफा संगतिला ॥
उध्वस्त करित मुलुखाला, खान चालला ॥
हिंदूची देवळ त्यान घातली बघा मातीला ॥
तुळजापुरची आई भवानीही भरडी जात्याला ॥
किती केली हानी त्यान लुटलं बघा जनतेला ॥
बेअब्रू केली भगिनींची मुलुख जाळीला ॥
शिवाजीच्या स्वप्नी जाऊनी, भवानी मातेने, मोठया प्रेमान,
संकटाची सूचना दिली शिवबास, मस्तवाल रेडा सुटला मुलुखास
तय्यार हो राजा झुंज देण्यास ॥ भिडवतो मराठी भाला,
उलटया काळजाला, कळू दे खानाला, राजा मावळ्यांचा सदा तय्यार,
संधी अशी पुन्हा नाही येणार, धन्य शिवराय धन्य अवतार ॥
जमविले शूर सरदार, मावळे बहाद्दर, बर्च्छी तलवार,
व्हारे तय्यार घेऊन हातात, शिकवू रणी धडा मस्त खानास ।
राजा मावळ्यांचा सांगे सकलास ॥
प्रताप गडी खान पोहोचला, वार्ती शिवबाला ॥ खानाच सैन्य अगणीत
शिवा दचकला ॥ शक्तिपेक्षा युक्तिनींच, धडा शिकवू खानाला ॥
असा विचार केला शिवबान, सांगतो तुम्हाला ॥ निरोप घेऊन आला दूत,
भेटे शिवाजी राजाला ॥ शरण आला देईन जीवदान,
खान बोलला ॥ खान साहेब भ्यालो मी बघून, तुमच्या सैन्याला ॥
तुमचा प्रताप ऐकूनही घोर लागला चित्ताला ॥ कधी शक्ति कधी युक्तीन,
श्री शिवबान, वेळ पाहून, नमविले नामवंत सरदार,
निरोप काय धाडला सांगतो खानास, लक्ष देऊन ऐका कवनास ॥
किती करु शौर्य वर्णन, कीर्ति गुणगान, धर्माभिमान,
घडला इतिहास सांगतो सकळास,
भले भले धाडले धरण्या शिवबास, निराशाच आली सदा वाटयास ॥
पुन्हा नाही जाणार वाटेला, शिवा बोलला ॥ परत करिन तुमचा सारा मुलुख,
काबीज केला ॥ नाव ऐकुन तुमच बघा घाम सुटला अंगाला ॥
शरण आलो तुमच्या सार्या अटी, मान्य आम्हाला ॥
एक वेळ करा तुम्ही क्षमा, अज्ञ बालकाला ॥ भेटीसाठी याव मम हर्ष होइल चित्ताला ॥
चाल
शिवरायाचा निरोप घेऊन, दूत परत आला ॥
शरणांगतीची वार्ता ऐकूनी, खान खूष झाला ॥
दाढीवरती हात फिरवितो, मिशीवरती ताव ।
ऐरा गैरा नसे कुणी मी अफझुला नांव ॥
कसा दरारा दिसली कारे ताकद खानाची ।
फाटक्या सरशी दाविन वेडया वाटच स्वर्गाची ॥
येतो भेटीस खान पाठवी, निरोप शिवबाला ।
चाल
पुढच्या चौकी ऐका बंधूनो, प्रकार जो घडला ॥
अफझुलल्ल्याची भेट घेण्याला, माची वरती मांडव घातला,
आकाशी रंग मांडवाला वर तारका चंद्र दाविला झाल्लरी लावल्या बाजूला
हंडया, झुंबर जागो जागेला, आरसे टांगले खांबा खांबाला,
केळीचे खांब लावले महाद्वाराला, कारंजी जागो जागेला,
तोरणं लावली जागो जागेला, पताकानी महाल सजविला,
हार गुच्छे ठेवले बाजूला, गाद्या गिरद्या घातल्या बसण्याल,
लोड, तक्के, जागो-जागेला हत्ती, घोडे ठेवले शोभेला,
असं वाटलं जणूं आज स्वर्ग भूमिवर आला ॥
चाल
मांडव बघुनी खान मनामधे अति खूष झाला
शिवबा होता त्या खानाच बारस जेवलेला ॥
वरवर दिसला खान खूष झाला, पर आत होता भडकला,
द्वेष भरला रोमारोमाला, करकरा खातो दाताला,
आली संधी बदला घेण्याला, हा बार जर का फुकट गेला,
पुन्हा नाही घावणार हाताला, हे पक्क ठाऊक खानाला,
शिवबाचा काटा काढण्याचा, विचार त्यान केला ॥
चाल
शिवबाची गातो मी गाथा, नमवुन माथा, धन्य सर्वथा,
झुकविले जुलुमी शहा आणि खान, गर्वान जे झाले होते बेभान,
अजूनही गाती कवी गुणगान ॥
चाल
पायावरती मस्तक ठेवी, राजा जिजाईच्या
पाळ्यामुळ्या मी उखडुन फेकिन, आदिलशाहीच्या ॥
आशिर्वाद दे आई मजला जातो भेटीला
कडकडून मग मिठी मारते, जिजा शिवाजीला ॥
घळघळ घळघळ अश्रू वाहती, माता पुत्रांचे
शब्द तोकडे वर्णन करण्या अशा प्रसंगाचे ॥
जिजामाता सांगे शिवबाला, रहा होशियार ।
आशिर्वाद आईची कृपा सदा तुम्हावर ॥
सारे ठेवा मावळे रणवीर सज्ज तैयार ।
केव्हा होईल घात जिवाला, नाही कळणार ॥
अशी नामी संधी शिवबाळ, कधी न येणार ॥
चाल
देवीचं घेऊन दर्शन, श्रीशिबान, समय वळखून
केला भवानीचा धावा चित्तात, सांभाळी हा देह
धर्मकार्यास, अभय देवीन दिलं शिवबास ॥
शिवाजीचा सारा इतिहास, सांगतो आम्हास, सान थोरास,
देशधर्माचा ठेवा अभिमान, कुणि न जगी थोर कुणी ना सान
श्रेष्ठ मानवता धर्म जगी जाण ॥
चाल
भेट घेण्याला क्रूर खानाची, निघे मंडपात
प्रताप गडची माय भवानी हंसे मंदिरात ॥
जा बाळा जा यशस्वी होशील या शुभकार्यात
दुसर्यासाठी खड्डा खणतो, तोच पडे त्यात ॥
काळीज उलटे त्या खानाचे, डावही कपटाचा
वाग जशासी तसा जगी हा धर्म मराठयांचा ॥
दबकत दवकत सर्जा शिवाजी निघे मंडपात
चिलखत अंगी वाघनखे ती भवानी म्यान्यात ॥
चाल
धन्य धन्य शिवाजी थोर, शूर बाणेदार, झाला तय्यार,
खानाची रग जिरवायला, हिंदवी राज्य उभारणीला
मानाचा मुजरा शिवबाला ॥
खानाचा बघुन अवतार, झाला मनी गार, शिवाजी फार,
काळ प्रत्यक्ष दिसे नयनास, कसली भेट सुटला घाम अंगास, केलं
भवानीचे स्मरण समयास ॥
चाल
दृष्टादृष्ट होताच खानही, उठून उभा झाला
ये बाळा ये आज कडकडून भेटू दे मजला ॥
कवळ मारिता डाव वळखला, श्रीशिवरायानं
वाघनखांचा बसे तडाखा ओरडं कळवळून ॥
हिसक्यासरशी आला कोथळा बाहेर खानाचा
कृपा देवीची यशस्वी झाला पुत्र जिजाऊचा ॥
जाता जाता एक शिरावर, वार करी खान
सारे मावळे तुटून पडले, होऊन बेभान ॥.....
चाल
जिवा उडवी हात बंडाचा मुळापासून
आला होता वार करण्यास दात खाऊन ॥
धडापासून वेगळ केल शिर, संभाजी कावजीनं ॥
बुरुजात केल त्याच दफन, दोष विसरुन ॥
अफझुल्ला नांव बुरुजाला, दिल शिवबानं ॥
कबर बांधली किल्ल्यावर त्याची, शिवबानं छान ॥
हंडया झुंबर लावती बाजूला, उदबत्त्याचा वास दरवळला ॥
कुराणीची वचनं लाविली, आतल्या बाजुला ॥
उप्तन्न दिलं कबरीला , शत्रूचा मान राखला ॥
धन्य धन्य धन्य शिवराय धन्य जगी झाला ॥
शिवाजीची गाईली मी कीर्ति, अशीच दिनराती, द्यावी मज स्फूर्ती,
दैवत हे पूज्य भरतखंडास, मुजरा शाहिरी सान थोरांस ॥