चौक १, चाल : मिळवणी
चारी खंडांत झाले बहुवीर, पराक्रमी धीर, त्यांत रणशूर,
सर्वांहुनी श्रेष्ठ शिवाजी खास । षड्गुणैश्वर्य संपत्ती ज्यास ।
म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥ध्रु०॥
औदार्य आणि सत्कीर्ति, विज्ञानस्फूर्ती, वैराग्य वृत्ती,
गुण हे प्रभूवीण नसे कवणास ।
शिवाजीच्या ठायीं दिसती आपणास ।
म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥
सर्वदा जयाला यश, कधीं न अपयश,
सकळ जन खूष, कार्यामध्यें विघ्न नसे मुळीं ज्यास ।
दहशत पडली यवन राज्यास ।
म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥
प्रसन्नपूर्ण ज्यास लक्ष्मी, न पडे कधीं कमी,
पाहिजे तिथे भूमी, द्रव्य देउनि उभी साह्यास ।
दरिद्र दिसेनाचि पाहावयास । म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥
चाल
औदार्य विलक्षण जाण । त्याचें ऐकुनी घ्या अनुमान ॥
गुण चौथा उत्तम ज्ञान । त्यास म्हणती साधु विज्ञान ॥
वैराग्य पांचवें छान । सत्कीर्ति आली धावून ॥
चाल दुसरी
औदार्य ज्ञान लक्षण पहा शिवबास ।
वाटली मिठाई आग्र्यांत धनिक गरिबांस ।
अटकेंत असूनी ठकविलें औरंगजेबास ।
ऐकुनी सुज्ञजन म्हणती भले शाबास ।
ज्यानें आणून पोंचविलें मथुरेहुन सांभास ।
दिले लक्ष रुपये बक्षीस मुळारंभास ।
मोडते
काशी कृष्ण विसाजीपंतास, कितीक संतास,
साधु महंतास, देणग्या देउनि हारविला त्रास ।
षडगुणैश्वर्य संपत्ती ज्यास । म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥१॥
चौक २, चाल : मिळवणी
एकनिष्ठ सद्गुरु भक्ती, तशीच सुविरक्ति, चरणीं लोळे मुक्ती, गुरुदक्षणा मागतां ज्यास ।
राज्य अर्पिलें उदारपणें खास । म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥
कीर्तनांत असतां भले, यवन धांवले, कौतुक केले, देवानें दूर नेलें यवनास ।
त्यांत कितीकांचा जाहला नाश । म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥
काम क्रोधादिक सर्वथा, जिंकुनी स्वतः, परस्त्री माता, मानुनी पाळी नीतीधर्मास ।
शिक्षा देतसे दुष्ट कर्मास । म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥
चाल
कपटासी कपट लढवून । मारिला अफझुलखान ॥
हें यश नव्हे नव्हे सामान्य । युक्ती बुद्धि शाहाणपण धन्य ॥
शाहिस्त्याचें लाखभर सैन्य । त्यांत शिरुनी केलें महाविघ्न ॥
चाल दुसरी
लक्ष्मी, बुद्धि आणि तिसरी शरीर संपत्ति ।
तपोबळ चौथे त्यामुळें यशस्वी गती ।
छावणींत शत्रुच्या ठरवुनी लग्नतिथी ।
वरातींतुनी शिरतां मनांत नाहीं भिती ।
बोटें तोडून खानाची केली फटफजिती ।
मोडते
कल्पना अजब किती अशा, शत्रूची दशा,
केली दुर्दशा, वाचुनी पहा पहा इतिहास ।
षड्गुणैश्वर्य संपत्ति ज्यास । म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥२॥
चौक ३, चाल : मिळवणी
रामकृष्ण अवतार जसा, पुरातन ठसा,
शिवाजी तसा । कलींत गोब्राह्मण पालक खास ।
उज्ज्वल कीर्ति चारी मुलखास । म्हणुन अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥
भगवद्भक्तियुक्त मन स्थैर्य, तसेंच औदार्य, अचाट शौर्य, भारती वीर पाहतां ग्रंथांस ।
कृष्ण आणि शिवाजी एकच रास । म्हणुन अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥
दोघांची समान करणी, जन्म एक वर्णी, जगीं अवतरुनीं, दोघांनीं केला दुष्टांचा नाश ।
रक्षिले स्वधर्म आणि सुजनास । म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥
चाल
सद्गुरु सांदिपनी तिकडे । रामदास त्यापरी इकडे ॥
गर्गाचार्य पुरोहित तिकडे । गागाभट काशीकर इकडे ॥
मातृकूळ दोघांसी वांकडे । दर्शवी साम्य दोहीकडे ॥
चाल दुसरी
त्यानें काळयवन याने अफझुल वधिला रणीं ।
मृत गुरुपुत्र त्यानें आणून दिला तत्क्षणी ।
वाघिणीचें दूध यानें दिले गुरुलागुनी ।
त्याचा पुत्र सांब याचा संभाजी दुर्गुणी ।
त्यास उद्धव अक्रूर साह्य मनापासुनी ।
येसाजी तानाजी यास मिळाले बाळपणी ।
मोडते
श्रीकृष्ण श्यामल वर्ण, अवतारी पूर्ण, तसेच अवतीर्ण,
शिवाजी अंश शिवाचा खास ।
कृष्ण योगी हाहि योग्याचा दास ।
म्हणून अवतारी म्हणुं आम्ही त्यास ॥३॥
चौक ४, चाल : मिळवणी
दोघांच्या अखेरी पदा, आली आपदा, मोक्ष संपदा,
दोघांची मिळणी स्वयंब्रह्मास । आनंदात गेले निजधामास ।
म्हणून अवतारी म्हणू आम्ही त्यास ॥
श्रीकृष्ण गेल्यावर बली, सुटला कली,
तसेंच या स्थलीं, शिवाजी मागें पीडा सुजनास ।
दुजा नच भारतीं वीर तुलण्यास । म्हणुन अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥
भारती वीर निवडिले तीन, भीष्म आणि कर्ण, युद्धिष्ठिर जाण,
एक उणा गूण प्रत्येकास । शिवाजी त्रिगूण संपन्न खास ।
म्हणुन अवतारी म्हणूं आम्ही त्यास ।
चाल
भीष्मास भक्ति आणि शौर्य । परि मुळीं नसे औदार्य ॥
धर्मास भक्ति औदार्य । परि अंगीं नसे मुळीं शौर्य ॥
कर्णास शौर्य औदार्य । परी नसे भक्तिचें वीर्य ॥
चाल दुसरी
या त्रिगुण बळें परसत्ता लया घालविली ।
दोन तपांत अवघी पातशाही हालविली ।
तलवार भवनी रात्रंदिन झुलविली ।
आनंद भुवन महाराष्ट्र भूमि खुलविली ।
म्लेंछाची करुन दुर्दशा नरद भुलविली ।
आनंद भुवन महाराष्ट्र भूमि खुलविली ।
राजनिष्ठा प्रजा सोन्या मोत्यानें फुलविली ।
मोडते
यवनांची राक्षसी नीती, लुटली संपत्ती, पाहून अधोगती, दया उपजली शिवरायास ।
षड्गुणैश्वर्य संपत्ती ज्यास । म्हणुन अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥४॥
चौक ५, चाल : मिळवणी
सामर्थ्य लंकेमध्यें किती, परी रघुपती,
वान्नरा हातीं, घेतली जिंकुनी त्या रावणास ।
शिवाजीनें तसेंच केलें यवनास ।
म्हणुन अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥
अज्ञान गरिब मावळे, दिसती बावळे,
काळे सावळे, परी रणीं नायकती कवणास ।
रंकांचे राव केलें स्वजनास । म्हणून अवतारी म्हणूं आम्ही त्यास ॥
स्वराज्य स्थापुनी बेलाशक, आरंभिला शक, राज्य अभिषेक, करुनी तोषविले देवास ।
छत्रपती पद जोडिले नांवास । म्हणुन अवतारी म्हणुं आम्ही त्यास ॥
चाल
भाग्यवान भूपती शूर । दारिद्रय पळविलें दूर ॥
अष्टप्रधान मानकरी वीर । वेवस्था केली सुंदर ॥
सैन्यांत शुर भरपूर । नसे कोणी मनीं दिलगीर ॥
चाल दुसरी
राज्यारोहण प्रसंग सारांश सांगतो तुला ।
दीड कोटि होन खर्चिले सढळ हे तुला ।
गागा भटास पांच लक्ष दिले दक्षणा पांतुला ।
सोळा हजार होन भार आपुली सुवर्ण तुला ।
दान करतां कीर्ती गेली हिमाचळ सेतुला ।
रामभक्त पाहुन या मालोजीच्या नातुला ।
थरकांप दिल्ली विजापुरच्या राहू केतुला ।
मोडते
शिवचरित्रावर तुम्ही टिका, शब्दवाटिका,
गुरुकृपें टिका, साधिल्या रामचंद्र विप्रास ।
सुंदर ज्यांचें लाघवी प्रास, साखर जणूं लाविली गोक्षिप्रास ॥