चाल : लावणी-मोत्याच्या झालरा
ॐ स्वस्ति श्रीगणेश नमिले निर्गुण गुणेश्वरा ।
बुद्धी मती अलौकिक लौकिक दे संपदा शाहिरा ॥
काव्यप्रतिभा लेखणी सहजि प्रसादे चालवावी ।
नवरस पूर्ण शाई करु कवना आटवावी ॥
विश्वमानवी हृदय कागदावरती लिहवावी ।
राष्ट्रपुरुषा कवनी अक्षरब्रह्म आकारावी ॥
चाल : ॐ नमो नमो श्रीगणा
उदोकार करु श्री अंबे । तू जगद्वन्दे शारदा तूचि जगदंबे ॥जी॥
मांडवी आख्यान सोहळा । सुकाळी फुलूं दे रसाळ शब्दांचा मळा ॥जी॥
चाल : वीरात वीर धुरंधर
समस्त कार्य धुरंधर । राजराजेश्वर ।
शौर्यसागर । प्रतापभास्कर । क्षत्रीय कुलावंतस कुलदीपका ।
सकल गुणनिधी धर्मरक्षका । गोब्राह्मण प्रतिपालका ।
मुजरा शिवशौर्य राष्ट्रतिलका ॥जी॥
चाल : धन्य धन्य भूपाल शिवाजी
शिवरवि उदयापूर्वी राष्ट्री तिमिर गुलामीची ।
अवनिये तिनशे शतकांची ॥जी॥
यावनी अवनी तेधवा परचक्र खिलजीचे ।
लुटिले शुभलेणें मायभूचे ॥जी॥
चाल : कटाव
हल्ले हल्ल्यावरी एल्गार हल्ले ।
बुरुज शौर्याचे ते ढासळले ।
किल्ले कोट गडगडू लागले ।
बुलंद गोपुरे तोल सोडिती ।
नगरधुळीला लोळण घेती ।
धैर्याचे मग बांधच फुटले ।
देशोधडीला कुटुंब लागले ॥
चाल : राग-कलिंगडा
कुंजर अश्व हरिली । उर्वी देवमूर्त भंगिली ॥
संपदा सर्वस्वीं लुटियेली । निराधार जन जाहली ॥
असह्य म्लेंच्छ अत्याचारी । चढे कळस वरचेवरी ॥
अमानुष कृत्य दुराचारी । किती वाचू पाढे दुःखकारी ॥
चाल : लावणी-मोत्याच्या झालरा
राज्य भौज्य साम्राज्य स्वराज्य स्वावश्य देशाचे ।
पारमेष्टय आतिष्टयहि गेली वैराज्य हिंदुंचे ॥
चाल : खुब हल्ले काश्मीरवरती
पांचशाही प्रस्थापिली भारतावरी । निझाम अमदानगरी ।
आदिल विजापुरी । बेरीदशाही बेदरी ।
इमादशाही वर्हाड प्रांताला । फारुखशाही खानदेशाला ।
मोगल बाच्छाई दिल्ली तक्ताला ॥जी॥
चाल : भारतखंड हे तुळजापुर
पाची राज्ये उदित पावली । उन्मत्त जाहली ।
भांडूं लागली । सत्ता अभिलाषी । उभयता द्वेषी ॥जी॥
चाल : धन्य धन्य भूपाल शिवाजी
सत्तापिपासु अनन्यचि घेती लचके तोडून ।
त्यांत निघे भारत भरडून ॥जी॥
उठे तेव्हां समर्थ गर्जू जय जय रघुवीर ।
घाली तुकयाची वाणी जागर ॥जी॥
पारतंत्र्य घनांबुदीं वाणी बिजली कडाडली ।
अस्मिता राष्ट्रीं जागविली ॥जी॥
चाल : लावणी-मोत्याच्या झालरा
निझामी सत्तांकित शहाजी राजे शौर्यरत्न ।
स्वातंत्र्यास्तव केला ठरला निष्फळ प्रयत्न ॥
याची समयी डोहाळे लागले श्रीमन्मातुश्रीला ।
पारतंत्र्य राखुंडी इच्छिते मन्मनी खायाला ॥
चाल : यशोदा म्हणे श्रीहरी
जिजाऊ, पुसे मैत्रिणी । सांगी डोहाळे साजनी ॥
अंतरा
डोहाळे सख्यानों पुरवा । गड कोटावरती फिरवा ।
तलवारी पाणी चढवा । शत्रूचा संहार उडवा ।
निर्वैर धरा करोनी । करी स्वराज्य स्थापनी ॥
चाल : वायु आले अंगन
उषगर्भी तेजस्वी राशी ॥ अहो ॥
नव रवी संधि प्रकाशी ॥अहो॥
चाल : मोत्याच्या झालरा
शुभमंगल सुवार्ता पूर्णघटी राजमंदिरांत ।
शहाजी राजे पुत्र जाहला या दिंडिरभुवनांत ॥
चाल : चला उठा घराकडे
शके पंधराशे एकावन्न । वद्य तृतीया मास फाल्गुन ॥
शुक्रवारी सुवर्णी दिना । हस्त नक्षत्र नभ अंगणा ॥
चाल : धन्य धन्य भूपाल शिवाजी
प्रभा रश्मिच्या पंथा गमनीं गुलाल उधळूनी ।
नभमुख उजळे आनंदानी ॥जी॥
चाल : लावणी-सुंदरा गे
मंजुळी ॥ मंगल सनई गुंजारव पावन ॥जी॥
स्पंदनी ॥ वार्ता जाहीर आणूरेणू मधून ॥जी॥
चाल : धन्य धन्य भूपाल
राजहौद्यावर साखरपानं वाटिती जनलोकीं ।
आकाशीं रवींदू अवलोकीं ॥जी॥
चाल : लावणी-मोत्याच्या झालरा
पाचारिले कुल पुरोहिता जातक वर्तविले ।
जन्मकुंडली मांडुनी यथार्थ शुभमती बोले ॥
चाल : कटाव
गुणराशी बाळ बहु गुणवंत । राजयोगी दयानिधी कुलवंत ॥
धर्म दानशील पुण्य-नीतिवंत । उतरील भूभार प्रतापवंत ।
परधर्म सहिष्णुही बलवंत ॥
चाल : हंसाची करील काय सांगा
होईल बाळ कृतांत काळ दुष्टांचा ।
धैर्यवंत निश्चयो मेरु अढळतेचा ॥
यशवंत निस्पृही स्पष्टवक्ता मार्तंड ।
सेनानायक लोका आधार-प्रचंड॥
चाल : लावणी-तुझे माझें नातें
राजमाता संतुष्ट अंतरीं ऐकुन जाहली ।
जरब्बाब भूषणा गौरवू विप्र प्रसन्निली ॥
मराठदेशा जासुद पाठविले सांडण्यावरी ।
सातपुडया सह्याद्री पश्चिमसागर ही सारी ॥
चाल : लावणी-सुंदरा, चटक लागली
घोडीमुठा ॥ कानंदी कोयना वेणा गुंजवनी ।
कृष्णा गोदा ॥ भीमा बेलवंडी पूर्णा इंद्रायणी ॥
गंगथडी ॥ कोकणी गोमंती भाषा नागपुरी ।
अहिराणी । आली पुणेरी आणि कारवारी ॥
चाल : कटाव
क्षीरसागर भागवत शितळे । गायकवाड देवकाते ढवळे ॥
धुमाळ थोरात पवार इंगळे । जगदळे जगताप खंडागळे ॥
चव्हाण राऊत फाळके पिंगळे ॥
चाल : लावणी-मोत्याच्या झालरा
अंगुडे टोपरे चांदवा आणिला आदरे शिंप्यानीं ।
चंदनाचा पाळणा आणिला कुशल सुतारांनी ।
सोनारें सोनसरी आणली या बिंदल्या घडवोनी ।
आहेरांनीं भांडार फुगे शिवनेरी सदनीं ॥
चाल : धन्य धन्य भूपाल
क्षात्रसूर्य तेजोरस घुटी पाजवू राजबाळा ।
न्हाऊ घातले काजळ डोळा ॥जी॥
राजुअंगी जरब्वाब अलंकृत केली विभूषण ।
उतरु ब्रह्मांड निंबलोण ॥जी॥
बाळा नाव देऊं शिवाजी आदिमाया हलविते ।
पाळणा सरस्वती गाते ॥जी॥
विश्वाच्या अणुरेणू घुमतो नाद एक स्वरे ।
स्वानंदू डोलते विश्व सारे ॥जी॥
चाल : पाळणा-पहिल्या मासी
पाचवी पूजूनी षष्ठी ही केली ।
बाळंतविडा देवी घेऊनी आली ॥
दैवी लेखा भाळी लिहुनी गेली ।
अलौकिक वैभव हे शक्तिशाली ॥जो बाळा जो ॥
चाल : परसरामाला
हलवा गे सयानु । शिवाजी बाळाला ॥
सह्याद्री सर्जाला । मराठी राज्याला ॥
गोविंद कुणी घ्या । गोपाळ कुणी घ्या ॥
भूपाळ कुणी घ्या । पाळणा झुलू द्या ॥
चाल : लावणी-मोत्याच्या झालरा
येळकोट बोलू खंडेराव मग भंडारा वाही ।
ठेवून कटी हात विठोबा ह्यो सोहळा पाही ॥
चाल : धन्य धन्य भूपाल
शुक्लेंदूपरी विकसित होये शिवबाळ राजे ।
जिजाऊ दुग्धामृत पाजे ॥जी॥
बाळलीला कौतुके तोषवी जिजाऊमातेस ।
बाळा मग जाहले षण्मास ॥जी॥
आले शहाजी शिवनेरीवर शिवबाळा मीलना ।
हृदय सुखाब्धी ये भरणा ॥जी॥
चाल : कटाव
द्रव्यसंपदा अपार वाटियेली ।
चाकरमानी ती सकळ तोषियेली ॥
बाळ बोले मुखी बोबडीया बोलू ।
आई गालीं हासे सकौतुके डोलू ॥
चिमणे पायीं रुणझुणती वाळे ।
सवे खेळण्या कुणबीयाची बाळे ॥
चाल : लावणी-मोत्याच्या झालरा
प्रथम जिजाऊ शिवरायाची पूज्य गुरु असती ।
बालसंगोपन करी मातुःश्री सुसंस्कारा ती ॥
चाल : लाल किल्ल्यांत रझवी
अनुपम्य शक्ती शौर्याची । खंबीर अलोट धैर्याची ॥
स्वराज्य प्रतिष्ठापनेची । प्रेरणा ही महाशक्तीची ॥
मार्गदर्शक राजनीतीई । राजमाता शिवबाळाची ॥जी॥
चाल : भारतखंड हे तुळजापूर
नीलकंठ देवब्राह्मण । मुहूर्त पाहून ।
अक्षर लेखन । शिवबा करविले ।
पुराण पढविले ॥जी॥
चाल : लावणी-मोत्याच्या झालरा
श्रुतिस्मृति रामायण महाभारतहि शिकती ।
प्रभाकर भटानें दिली उत्तम दंडनीती ॥
आकाशभैरव कल्पकौटिल्य अर्थशास्त्र गणिते ।
बृहत्संहिता होरा सामुद्रिक भाषा सुभाषिते ॥
चौदा विद्या चौसष्ट कला शिव आत्मसात आली ।
अश्वपरीक्षण अश्वआरोहण ही विद्या शिकली ॥
चाल : हा मर्द मावळा गडी
अश्वदळी आणि पायदळी । सैन्य रचना जानी त्रैफळी ।
तो, युद्धनीती गनिमी अकळी ॥
चाल : लावणी-झाडी आहे दाट
दादुजी कोंडदेव शिवनेरी व्यवहारी ।
थोर व्यवहारी । कार्यभार वाही चातुरी ॥जी॥
पुणें शहरांत लालमहाल घेती बांधुनी ।घेती बांधुनी।
शिवापूर ही वसवोनी ॥जी॥
चाल : धन्य धन्य भूपाल
शिवनेरी सोडू रहिवाशी शिव लालमहाला ।
वैभवें पुणें कळी फुलली ॥जी॥
पुणें सुपें कोंडाणा परगणा सुभा वतनदारी ।
स्वराज्य खेळ दरी डोंगरी ॥जी॥
चाल : लावणी-मोत्याच्या झालरा
समवयस्क सवंगडी समागमें मावळी पोरे ।
अश्व आरोहुनि दौडती ही दरीखोरे ॥
देशस्थिती ही आणली तेव्हां शिवरायीं ध्याना ।
गहिंवरलें तें हृदय शिवाचें ये आसूं नयना ॥
दुःख दैन्य दारिद्रय अवकळा कैसी मातृभूला ।
सांगी सांगी भूमाते औदास्य प्राप्त कैसे तुजला ॥
चाल : कटाव
घरादारावरी नांगर फिरले । निवार्यासी ना झोपदे उरले ॥
नेसावयासी ना वस्त्र राहिले । कित्येक भुकेनें मरुन पडले ॥
कोणी तया जाळिले ना पुरले ॥
चाल : प्रभु हा खेळ
भूमाते नाश देशाचा कोणी तो सांग केला गे ।
अंतरा
कित्येक यातिभ्रष्ट जाहले । किती सती शीलभ्रष्ट केले ।
कित्येक हरुनी नेले । कुणाच्या लेकीबाळी गे ॥
अंतरा
किती जीवा त्रासूं विष खाती । किती जीव देहा जाळुन घेती ।
किती जीव प्राण त्यागिती । अवस्था कोणी केली गे ॥
चाल : लावणी-मोत्याच्या झालरा
कोण दुष्ट पापिष्ट निर्दयी कुकर्मी चांडाळ ।
असो कसाही प्रबळ प्रचंड निर्दाळीन समूळ ॥
तुझी आण निश्चये करीन ती खंड खंड चूर्ण ।
तुझीया सेवेत आणीन स्वर्गीचे ते इंद्रासन ॥
चाल : हंसाची करील काय
शिव क्रोधानें पेटला प्रळैअगीन ।
अनिल वाटे मुठींत वायु धरुन ॥
स्वबळें ब्रह्मांडा आणि कक्षीं बांधुन।
गवसनी गगना येइल घालून ॥
धगधगणारा प्रळयाग्नी भक्षीन ।
खदखदणारा लाव्हारस प्राशीन ॥
चाल : लावणी-मोत्याच्या झालरा
शांत शांत हो भूमाता शिवबा शांतविती ।
पाहुन रुदरुप शिवबाचे त्या दिशा थरथरती ॥
त्रिकाल ध्यास शिवहृदी परदास्य हरणा ।
देश कार्यरत झाले शिवबा विसरु भूकतृष्णा ॥
देशभक्तीचे कंकण बांधुनी फिरतो देशांत ।
मराठ तितुका मिळविण्या शिव मावळ खोर्यांत ॥
चाल : धन्य धन्य भूपाल
इंद्र अंद्र गुंजन मावळ कधी नाणे मावळांत ।
हिंडे शिव हिरड कर्यात ॥जी॥
पौड भोसे भोर मुठे तसे वेलबंड खोरियांत ।
घोड जुन्नर भिमनेरांत ॥जी॥
कानंद खोर्यांत वक्तृत्वानें जन प्रभावित केला ।
स्वत्व जाणिवी जागवीला ॥जी॥
शिवरायाची गरुडभरारी घराघरामधुनी ।
फुंकी स्वातंत्र्य मंत्र कानीं ॥जी॥
चाल : लावणी-मोत्याच्या झालरा
कुठे खलबती कुठे मसलती ग्राम गृहांतून ।
तालिमखाने घुमूं लागले त्या तरुण मनांतून ॥
गंजलिया तलवारी पुनरपि तेज चढते ।
शिवप्रभावित वक्तृत्वे वीरबाहू फुरफुरते ॥
चाल : कटाव
बाजी पासलकर येसाजी कंक ।
शिवाजी इंगळे बाळाजी नाईक ॥
गोदाजी जगताप वाघ भिमाजी ।
तानाजी मालुसरे बंधू सूर्याजी ॥
चाल : लागला ध्यास
जन जोडी नाना यत्ने । देशसूत्रा गुंफी वीररत्नें ॥
ही भूमी शौर्य पिकवीते । म्हणू तुकया नांगरी शेते ॥
समर्थ शौर्यबीज पेरी । शिव शिंपी क्षात्र मेघसरी ॥
मराठ मावळ शिवारी । शौर्यपीक ये लहर्या मारी ॥
चाल : धन्य धन्य भूपाल
गांव गांव संघटित आणि करण्या राष्ट्रमुक्ती ।
देउनि वैरत्वा मूठमाती ॥जी॥
चाल : किल्ल्यांत रझवी
शत्रुमित्र आपुला परका । दगाबाज इमानी निका ॥
देशद्रोही कोण देशभक्त । सुजन दुर्जन जी विभक्त ॥
घे वेचुन साधुन ॥जी॥
चाल : लावणी-मोत्याच्या झालरा
स्नेह संपादन करु कुणा युक्तीने नमवी ।
कुणा समज दे कुणा धाक दे पेचामधी धरवी॥
अभय कुणा कलह लावू दुष्ट जेर करवी ।
परस्पर काटयांनीं काटा काढवी उपद्रवी ॥
दुर्जनासी दुर्जन शिवबा सुजना प्रेमळ ।
दुर्बलांचा कैवारी शिवबा काळाचा महाकाळ ॥
इति श्रीशिव जन्मसोहळा शुभं भवते ।
संपूर्णम् चौक प्रथम शिवगौरव विराजते ॥