मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|शिवाजी महाराज|
शिवराज्याभिषेक

शिवाजी महाराजांचा पोवाडा - शिवराज्याभिषेक

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.

शके पंधराशे शाहाण्णव सालीं, सुवेळा आली,

हिंदभू आलीं, तिलक शोभतो शिवराय खास,

पटाईत योद्धा महाराष्ट्रात, प्रल्हादराय नित्य दंग कवनांत ॥ध्रु०॥

चौक १

शिवराज राजकारणी, महाधोरणी, उडी घे रणीं,

करुनिया शत्रूंचा संहार, स्थापिलें राज्य महाराष्ट्रांत,

हिंदूचा वाली जन्मला ख्यात ॥

आकस्मात आली कल्पना, सुचेना मना, एक भावना,

शत्रूवरी पूर्ण कराया मात, राज्याभिषेक व्हावा आपणांस,

मान सन्मान सर्व जगतांत ॥

भले भले विद्वान आले, रण माजले, शेतकरी भले,

यांना कोठला राज्याधिकार, पुंड पाळेगार सारे ठरणार,

क्षत्रिया खरा खरा अधिकार ॥

गागाभट्ट काशी क्षेत्रीचे, विद्वान पट्टीचे, नाही लेचेपेचे,

षड्‌शास्त्रे तीं त्यांचे मुखांत, वेदशास्त्रांचा मोठा हव्यास,

न्यायनीतीत पूर्ण निष्णात ॥

चाल

गागाभट्ट आले पाहून, त्यांचा तो केला सन्मान ॥

शास्त्राधार सर्व पाहून, शास्त्रीजी बोले झटकन ॥

मराठयांस नाहीं अधिकार, छत्र हें शिरीं धरण्यास ॥

शास्त्रीजी देती वचन, मूळ मी तुमचे शोधीन ॥

चाल

आटोकाट यत्‍न तो केला त्यानं त्या वेळा ॥

शिसोदे कूळभूषण सूर्यवंशाला ॥

जन्मला शिवभूपाल याच वंशाला ॥

राज्याभिषेक करण्याचा बेत त्यांनीं ठरविला ॥

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिवार दिवस नेमिला ॥

काय वर्णूं भाग्य रायाचे धन्य सुवेळा ॥

हरकली जिजाई मोद मनीं मावेना ॥

पुत्र हा गुंडा नाचतो त्याच्या कीर्तीचा झेंडा ॥

गो-ब्राह्मण-पालक वंद्य देवदेवता ॥

चाल

शिवाजीनें तीं वस्त्रें चढविलीं स्वच्छ पांढरीं त्या वेळा ।

पुष्पमालाहि गळ्यामधे शुभ्र-अलंकार ते नाना ॥

सोन्याचा चौरंग करविला, कलशहि केला सोन्याचा ।

त्यावरी राजा-राणी बसले मागें संभाजी तो साचा ॥

अभिषेक होता, सर्जा चालला त्याच वेळेला सदरेला ।

सदर सजविली नाना प्रकारें तेंच सांगतों तुम्हांला ॥

चाल

भिंतीवरी चित्रें काढलीं हातीं आटोकाट,

वृक्षछाया घनदाट, काय वर्णावा थाट,

भरजरी छत शोभेला, शोभेला हो मोत्याच्या झालरी लोंबल्या ॥

डवणा, पाचू, मर्वा कुंडया होत्या लई दाट,

काश्मीरी गुलाब दाट, सुवास येतो घमघमाट,

पानविडे जागजागेला, जागेला हो गालिचे सर्व जमिनीला ॥

सुवर्णाचें तक्त केलें त्यानें मजेदार, बत्तीस मण त्याचा भार,

रत्‍नें जडलीं अनिवार, माणिक मोतीं पाचू चमकती,

चमकती हो आकाशीं तारे जणूं अती ॥

रत्‍नजडित सिंहासन त्या खांब आठ, छत्रचामर अफाट,

धार्मिक सारा थाट, व्याघ्रांबर त्यांत बसण्याला,

बसतांना हो आर्यांचा आचार आचरिला ॥

मृत्युलोकीं आला काय इंद्रदरबार, अष्ट प्रधान बाणेदार,

रणमस्त सरदार, इंद्रास शोभे देवगुरु हो तसा शिवाजीस भट गुरु ॥

सिंहासनीं बसविला शिव भूपाल, पुष्पवृष्टीची धमाल, केली सार्‍यांनीं

कमाल, पंचार्ती आली आर्तीला, आर्तीला हो वेद घोष त्याचे जोडीला ॥

वाद्यांचा गजर झाला सारा दणदणाट, तोफा सुटती आफाट, भयंकर गडगडाट,

क्षणो क्षणीं आवाज दणक्यांत, दणक्यानं हो किल्ल्यावरनं तोफा सुटतात ॥

भरी जरी राजमुगुट घेऊन हातांत, मध्यभागीं तो मध्यांत,

मोत्याचा तुरा त्यांत, गागाभट्ट चाले डौलानं, डौलानं हो शिवाजीचे मस्तकीं ठेवीत ॥

छत्रपति गर्जति लोक वारंवार (श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय), केला त्यांनीं जयजयकार,

वंदितो दरबार, दुमदुमे अवघी मेदिनी, मेदिनी हो तशी धन्य शिवजननी ॥

नाना वस्त्रें अलंकार दिले त्यानें दान, ज्याचा त्याचा ठेवून मान,

केला योग्य तो सन्मान, लाखों होन दिले विप्रांना, विप्रांना हो तसे दिले गोरगरिबांना ॥

पन्नास हजार विप्र आला होता आटोकाट पन्नास हजार इतर जात, भिक्षेकरी वेगळा त्यांत,

लाखावर लोक पंगतीला, पंगतीला हो होते दोन्ही वेळ जेवण्याला ॥

हत्तीवर अंबारी राजा झाला स्वार, मागेंपुढें घोडेस्वार, ललकारी चोपदार,

जरीपटका होता आघाडीला, आघाडीला हो तसा भगवा झेंडा जोडीला ॥

स्वारी चाले रस्त्यानं मंगलप्रभात, नारी होत्या त्या दारांत,

ओवाळीती आनंदांत, आनंद मावेना हृदयांत, हृदयांत हो आनंद सर्व जनतेंत ॥

चाल : मिळवणी

शिवसिंह झाला भूपाल । राज्य स्थापिल ।

बंड मोडिलं । यवनावर केली पूर्णपणे मात ।

गो-ब्राह्मण-पालक ख्यात । प्रल्हादराय नित्य दंग कवनांत ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 09, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP