धन्य धन्य जिजाऊ माता । त्यांची ही गीता ।
ऐकू जनहिता । विश्व प्रेमाची विमल मूर्ति ॥
मातृ देवता धन्य कीर्ती । पुण्यमय महाराष्ट्र धरती हां जी ॥१॥
पंधराशे अठ्ठण्णव साली । पौर्णिमा भली । पौषाची आली ।
जाधव घराण्यात धून घुमली ॥
’सिंदखेड राजा’ ग्रामी रमली । देव मंदिरे ही दुमदुमली हां जी ॥२॥
गगनास भिडे आनंद । ऐकू ये छंद । दिशाही धुंद । होवुनी गेल्या त्याच समयास ॥
शक्ति उतरली धर्म साह्यास । झाला संतोष सर्व हृदयास ॥जी॥३॥
(स्वगत : दिवसा मागून दिवस लोटले. जिजाऊ (राजकन्या) थोडया मोठया
झाल्या असतील आणि एक दिवस)
वेरुळकर मालोजी भोसले जहागीरदार
रंग पंचमी निमित्त आले जाणुनी परिवार ॥१॥
सुपुत्र त्यांचे नाम शहाजी सोबत दिलदार
सहज समोरी तिथे पातली जिजाऊ सुकुमार ॥२॥
मालोजीना जाधव म्हणती बघा सून तुमची
रंग उधळुनी करते चेष्टा अपुल्या नवर्याची ॥३॥
(आणि तोच शब्द नियतीने मालोजी राजांच्या पश्चात् खरा ठरवला.
जाधवराजांची कन्या महाराष्ट्राची राजमात होण्यासाठी बोहल्यावर चढली.)
नियतीने शब्द झेलला । खरा तो झाला ।
योगायोग आला । लग्न लागले मुहुर्तास ।
भूषण भोसले घराण्यास । पुणे प्रांतीय सूर्यवंशास ॥जी॥१॥
चालुनी सात पाऊले । भाग्य गृही आले । पुण्य उतरले ।
पाहुनी नवी सूनबाई ॥ कौतुक करती उमामाई । भेटली खरी अंबाबाई ॥२॥
घातला लग्न गोंधळ । उजळले स्थळ ।
गर्जे संबळ । स्वस्थता तरी मनी नव्हती ॥
प्रजाजन इथले हळहळती । दुष्ट येवुनी त्यांस पिडती ॥३॥
(स्वगत : असं काय घडलं होतं त्या वेळीं ?)
मंदिरे नष्ट ती झाली । व्याकुळता येथें आली ।
ना कोण कुणाचा वाली । आंदोळुन पृथ्वी गेली ।
पापी ते जाहले पुष्ट । देती ते कष्ट ।
संस्कृती नष्ट । ही जीर्ण अवस्था केली । तरु लता उन्मळून मेली ॥
चाल : १
त्या समई भयानक स्थिती । इतिहासा प्रति ।
वर्णिली इति । भूतळी कहर एक झाला ॥
सत्य सन्मार्ग तिथे हरला । पुण्य प्रेमाचा उदय विरला ॥१॥
उसळुनी क्रोध अंगात । राक्षसे घात ।
करती रस्त्यात । जगया नको जीवन करती ॥
भगिनी भ्रष्ट त्या कितीक मरती । प्रेत पाहुनी नयन भरती ॥२॥
येवुनी पूर्ण ही ग्लानी । झाली ती हानी ।
डाली अवनी । काम मोहाचा आला संचार ॥
नियतीने केला होता अविचार । कळेना कुणा धर्म सुविचार ॥जी॥
(सत्य हा सर्वाचा एकच धर्म आहे याच मताच्या आऊ साहेबा होत्या. आणि म्हणून....)
आऊ साहेबा जिजा माउली खर्या ’लोकमाता’
जन कल्याणा करीत होत्या हृदयातून चिन्ता ॥१॥
वाद तयांचा अखेर होता दुष्ट दुर्जनांसी (कारण) ?
कारण होत जगता यावे संत सज्जनांसी ॥२॥
(स्वगत : समृद्ध भारतावर परकीयांनी आक्रमण केलं,
प्रजेला लुटलं आणि त्यांची सेवा केली मात्र, आपल्याच लोकांनी.)
चाल : ४
इथे होते मराठी राजे गुलाम बनलेले । जी॥
संस्कृतीवान राष्ट्राचे तुकडे पडलेले । जी॥
शत्रूला मित्र ही होते फितूर झालेले । जी॥
स्वातंत्र्य सूर्य बुडविण्या नित्य टपलेले ॥जी॥
(स्वगत : या विकृतीच जिजाऊनी निरीक्षण केलं आणि ....)
पाहुनी ऐशी विकृती । सांगते सती ।
ऐका हो पती । अलंकार घडवा एक मजला ॥
करा स्वातंत्र्य हिन्द अबला । विनविते विनंतीने सुबला हा जी ॥१॥
ना तरी जीवन हे व्यर्थ । जळो हा स्वार्थ ।
ऐका परमार्थ । लोक हे करा संघटीत ॥
मारावी शत्रू संगे जीत । जन्म भूमिची ठेवा प्रीत ॥२॥
मी तुमची हृदय नायिका । खरी सेविका ।
गडबडू नका । प्रतिज्ञा हृदय जोडण्याची ॥
नाही कोणास मोडण्याची । सर्व बंधने तोडण्याची ॥३॥
(स्वगत : या स्वातंत्र्य संपन्न अलंकाराची मागणी करताच शहाजी राजे गडबडले---ते म्हणाले----)
चाल : ४
क्षणि सुन्न शहाजी झाले, बोलते काय ही राणी
का वेड हिला लागावे ? का स्थिती अशी दीनवाणी
काय ही सखीची प्रीत । उलट ही रीत । मारते जीत ।
हीज कसे कुणी समजावे । ही असे पूर्ण तर ज्ञानी ॥१॥
चाल १
(हिन्द भूमिवर स्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठी निसर्गाने अजून कुणी शक्तिशाली पुरुष निर्माण केलाच नव्हता आणि त्यामुळे जिजाऊंच स्वप्न शहाजी राजांकडून साकार होण्यासारखं नव्हतं. हे जिजाऊंनी जाणलं, आणि...)
घेउनी हाती तलवार । चमकती फार ।
जिजाऊ स्वार । होवूनी करु लागल्या संचार ॥
कराया दुष्टतेचा प्रतिकार । फुलविती युद्ध नीती अंगार ॥जी॥१॥
एकाग्र करुनिया मन । लाविती ध्यान ।
सोडती बाण । सामूहिक निष्ठा वाढण्याला ॥
कुलीन ललनाना रक्षिण्याला । क्रोध अन्याय मर्दिण्याला ॥हांजी॥२॥
रणचंडी सारखे रुप । पाहुनी पाप ।
भ्याले आपोआप ।:जिजाऊ म्हणती देश अमुचा ॥
धरा अभिमान थोर त्याचा । करावा पुकार स्वातंत्र्याचा ॥जी॥३॥
(स्वगत : जिजाऊ साहेबांनी युद्ध नीतीचे शिक्षण लहान वयातच जाणून घेतले. पण त्यांना आता हवे होते मनुष्य बळ. त्यासाठी तुळजा भवानीला, अंबा भगवतीला, काली मातेला आळवू लागल्या.)
ही पूर्ण तयारी झाली । परि बळ पाठीशी नाही
तूं धांवत अंबा बाई । संचार कराया येई
अंधार दाटला इथे । पुण्य घट रिते । जाहले जिथे ।
त्या इलाज अमुचा नाहीं । दे पाठींबा लवलाही ॥३॥
(जिजाऊंची प्रार्थना आत्मनिष्ठ होती. भगवतीने व्याकुळतेची प्रार्थना ऐकली
आणि कांही दिवसानंतर जिजाऊच्या पोटीं शिवनेरीवर हिंदवी स्थापण्यासाठीं राजे अवतरले त्यावेळीं)
धन्य तो किल्ला शिवनेरी । गजर एक करी । कल्पना खरी ।
सूर्य चमकला आज गगनात ॥ हास्य उमलले तसे भुवनात ।
सह्य हिमगिरी बोले कवनात जी ॥१॥
जागले गिरी डोंगर । देती ललकार ।
झाला अवतार । शिवाजी पुत्र थोर ठरला ॥
डाव मैदानी दुष्ट हरला । दया प्रेमाचा मार्ग धरला जी ॥२॥
भगवान बाळाजी । सुत । प्रथम भागात ।
आहे विनवीत । कृपा ही जिजामाउलीची ।
छत्रपती, संत, सज्जनांची । कल्पना महाराष्ट्र पथकाची ॥३॥