मुळामुठेच्या तीरावर
केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.
( चाल---हरिची भगिनी म्हणे सुभद्रा० )
तोः---
” मुळामुठेच्या हिरव्या सुन्दर या तीरावर, खिका अशी,
इकडे तिकडे स्फुंदत सुन्दरि ! वद मजला तूं कां फिरसी ?
क्षण पाण्यावर काय पाहसी ! काय अशी मुर्च्छित पडसी !
पुनरपि उठुनी वक्षःस्थल गे काय असें बडवुनि धैसी !
बससी-पडसी-उठसी ! क्षणभर वस्तीव वृष्टी देसी !
वस्त्र फाडिसी ! दुःखावेगें केशहि तोडूनियां घेसी !
हिंडत हिंडत सुटल्या केशीं फुलें गुंफिसी वनांतलीं !
तीरीं जाउनि त्यांच्या अंजलि सोडुनि देसी रडत जलीं !
काय असा तर घाला तुजवर पडला, मजला वद बाले !
जेणेंकरुनि स्थल हें तुजला रम्य असुनि शून्यचि झालें ! ”
तीः---
” रम्य तुझें हें तीर आणि हें पात्रहि होतें मुळामुठे !
रमणीयपणा पण तो आतां गेला सरिते ! सांग कुठें ?”
तोः---
” मुळामुठा ही आतां सुद्धां रम्य असे गे पहा पहा !
सुन्दरिच्या पण नेत्रजलांनो ! क्षणभर तुम्ही रहा रहा ! ”
तीः---
” नाहीं ! माझ्या नेत्रजलांनो ! अखण्ड येथें वहा वहा !
रमणीयपणा परलोकीं मग मन्नेत्रांनो ! पहा पहा ! ”
तोः---
” रमणीयपणा मनोहारिणी ! या लोकांतचि अजुनि असे !
तुझ्याबरोबर तो जाइल कीं काय, असें भय वाडतसे ! ”
तीः---
” रमणीयपणा स्वयें मूर्तिमान् मत्प्रियकर होता होता !--
नेला ! नेला ! तो या नदिनें ! हाय हाय ! आतां आतां !
तीरांवरि या तुझ्या एकदां दिसला जो, गे मुळामुठे !
रमणीयपणा हाय ! तो न दिसे आतां मुळीं कुठें !”
तोः---
” डोळे पुसुनी चल गे सुन्दरि ! पैल माझिया गांवाला !
संमति अपुली दे मजला तूं राणी माझी व्हायाला !
घरचा मोठा, लष्करांतही अधिकारी गे मी मोठा !
दास आणि दासींचा सजणें ! तुजला नाहीं गे तोटा !
सवाशेर सोन्यानें रमणी ! तुजला मढवुनि काडिन मी ! ---
पाणिदार त्या सवाशेर गे मोत्यांनीं तुज गुम्फिन मी ! ”
तीः---
” सोनें मोतीं प्रिय मज होतीं, किंवा होतीं वन्य फुलें,
तें मन्नाथा ! लग्नाआधीं तुला समजलें कशामुळें ?
उद्यां आमुचें लग्न जाहलें असतें--मग आम्ही दोघें
या तीरावर फिरलों असतों वन्यसुमें शोधित संगें !
तुम्हीं लवविल्या फांद्यांचीं मीं फुलें गडे असतीं खुडिलीं !---
त्यांची जाळी माझ्या अलकीं असती तुम्हीं गुम्फियली !
न कळे कैसें तुम्हांस कळलें आवडती मज वन्य फुलें !---
म्हणुनी येथें आलां त्यांला जमवाया मत्प्रीतिमुळें !
येथे आलां तर आलां ! पण त्या दरडीवर कां चढलां ?---
माझ्याकरितां पुष्पें खुडितां अहह ! घसरुनी मज मुकलां !
आलें ! आलें ! मीहि जिवलगा ! त्याच तरी या मागनिं ”
असें वदुनि ती चढुनि गेली त्या दरडीवर वेगनें !
तिनें जवळचीं फुलें तेथलीं बरींच भरभर हो खुडिलीं !
आणि सख्याच्या नांवें डोहीं खालीं सोडुनियां दिधलीं !
दिव्य अप्सरा भासुनि ती, तर तो विस्मरला भानाला !---
पण फार पुढें बघुनि वांकली; धांवुनि जवळी तो गेला !
पण... ! मित्रांतो ! पुढें कवीला कांहीं न सुचे सांगाया !
तुम्हिच विचार मुलामुठेला, जाल हवा जेव्हां खाया !
जुलै १८८७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP