मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
दिवाळी

दिवाळी

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


( शार्दूलविक्रीडित )

विश्वेशें करुनी कृपा सकरुणें दुष्काळदैत्यावरी
पर्जन्यास्त्र नियोजुनी पळविलीं आहेत दुःखे दुरी;
आतां मंगल पातले दिवसही दीपोत्सवाचे भले,
गाणें सुस्वर पाहिजे तर तुवां हे शारदे ! गाइलें.

दीनें ज्यांविण वाटतात सुदिनें सार्‍याहि वर्षांतलीं,
नांवानें जरि दुर्दिनें, सुखद जीं होतीं पुढें चांगलीं;
तीं येऊन बरींच, वृष्टि करुनी त्यांहीं दिली भूवरी,
तेणें सांप्रत पाहतां दिसतसे सृष्टी अहा साजिरी.

सस्यांचा बरवा अनर्घ्य हिरवा शालु असे नेसली,
जाईची जुइची गळां धरितसे जी रम्य पुष्पावली
ती भालीं तिलकांकिता शशिमुखी आतां शरत्सुन्दरी,
माथां लेवुनि केवडा विचरते घेऊनि पद्यें करीं !

जो गोपाळ गमे प्रभातसमयीं गाई वनीं चारितां,
वाटे रव्युदयीं नदीवर मुनी अर्ध्यास जो अर्पितां,
जो भासे दिवसां कृषीवल शिरीं खोंवूनियां लोंबरें,
तो आतां ऋतु शारदीय बहुधा शेतांतुनी संचरे.

राजा जो धनधान्यदायक असे साचा कुबेरापरी,
त्या श्रीमंडित शारदीय ऋतुची राणी देवाळी खरी;
रूपैश्वर्यगुणाढय ती जवळ ये; द्याया तिला स्वागता
सारेही शुभ योजनांत गढले---कांहीं नुरे न्यूनता !

भिंती रंगविल्या नव्या फिरुनियां, केलीं नवीं आंगणें,
वीथी झाडुनि, रान काढुनि दिसे सर्वत्र केराविणें;
दारीं उंच दिले दिवे चढवुनी, हंडया घरीं लाविल्या,
लोकीं शक्त्यनुरूप आत्मसदनीं भूषा नव्या जोडिल्या.

बाजारांत जमाव फार मिळुनी गर्दी जडाली असे,
गन्ध्याला निजसंग्रहास निकितां विश्राम कांहीं नसे;
उंची कापड, दागिने सुबकही, मेवे, फटाके चिनी,
यांचा विक्रय होतसे घडकुनी वस्तू न चाले जुनी !

माहेराप्रत कन्यका स्मितमुखी उत्कण्ठिता पातल्या,
त्या मातापितरां सहर्ष दुहिता, भावां स्वसा भेटल्या;
आले साम्प्रत भेटण्यास वडिलां दूरस्थ ते पुत्रही,
सोहाळे श्वशुरालयीं अनुभवूं आले नवे जांवई !

बाळांहीं निजपुस्तकांस अवघ्या आहे दिलेली रजा;
कांहीं काढुनि खेळ नाचुनि मुलें तीं मारिताती मजा;
तों गेहामधुनी खमंग निघुनो ये वास; तेणें उगी
तीं होऊन, हळूच आंत शिरतो--” दे माउली बानगी !”

आतां भौमचतुर्दशी पुढलिया वारीं असे पातली,
तों रात्रीं निजतां बनो छबुकली मातेप्रती बोलली ---
“ माला आइ उथाव लौकर बलं, अंगास मी लाविन
दादाच्या, म्हनुनी गले ! उथव तूं हांका मला मालुन !”

सारेही पहिल्या दिनीं उठूनियां मोठया पहांटे जन
स्नानें मंगल लौकरी उरकिती सौगन्धिकें चचुंन;
ज्या ठायीं असती दिवाळसण ते, तेथून वाद्यें पहा
निद्रेंतून दिवाळिला उठविण्या तीं वाजताती अहा !

त्यांच्या मंजुरवें न जागृत झणीं होईल ती वाटलें,
यालागीं शिलगावुनीं जणुं गमे देती फटाके मुलें;
‘ ठो ठो ’ आणिक ’ फाड फाड ’ उठती तों नाद अभ्यंतरीं,
त्यांहीं सत्वर जाहली हंसत ती जागी दिवाळी पुरी !

रांगोळया रमणीय काढूनि पहा, त्या मांडल्या पंगती !
पक्वान्नें कदलीदलांवरि अहा ! नेत्रांस संपोषिती;
पाटांच्या मधुनी जलार्थ असती पात्रें रुप्याचीं, तिथें
नेसूनी जन मोलवान वसनें होतात कीं बैसते.

घेऊनी घृत, दुग्ध तें, विपुल ते गोधूमही, साखर
प्रेमानें महिलाजनीं बनविलीं खाद्यें किती सुन्दर;
त्यांची साम्प्रत रेलचेल अगदीं पात्रांत जी होतसे,
तुष्टी आणिक पुष्टि ती वितरुनी प्रीती दुणावीतसे.

रांगोळया दिसती प्रदोषसमयीं दारापुढें काढिल्या,
दीपांच्या सदनापुढें उजळुनी पंक्ती तशा लाविल्या;
त्यांच्या ज्योति असंख्य त्या बघुनियां वाटे असें अन्तरीं :---
तारा या गगनांतुनी उतरल्या कीं काय भूमीवर !

बाळें सर्व फटाकडया उडविती चित्तांत आनन्दुनी,
जाडे बारहि लाविती, धडधडां त्यांता उठे तो ध्वनी,
मोठे बाणहि, चन्द्रज्योति मधुनी, त्या फूलबाज्या, नळे,

दारूकाम असें अनेकविध तें दृष्टी पडे, लाविलें.
लक्ष्मीपूजन तें द्वितीय दिवशीं रात्रौ जधीं होससे.
सोनें आणि वह्या धनीजन तधीं मांडून अर्चीतसे,
साध्याला विसरून लोक धरितो भक्ती कसे साधनीं ---
ये हा आशय अर्थहीन कविच्या चित्तांत तें पाहुनी !

लक्ष्मीपूजन तें द्वितीय दिवशीं रात्रौ जधीं होससे,
सोनें आणि वह्या धनीजन तधीं मांडून अचींतसे,
साध्याला विसरून लोक धरिती भक्ती कसे साधनीं ---
ये हा आशय अर्थहीन कविच्या चित्तांत तें पाहुनी !

आतां भार नसे कुणास, पण तो शिंक्यास भारी असे,
हातां काम नसे, परन्तु पडतें तोंडास तें फारसें;
कोणा मार नसे, तरी पण शिरीं तो सोंगटयांच्या बसे;
कोणा त्रास नसे, परन्तु नयनां तो गागरें होतसे !

भ्राते ते भगिनीगृहाप्रत सुखें जाती बिजेचे दिनीं,
त्यांचा बेत सुरेख ठेवुनि तयां ओंवाळिती भामिनी,
तेही त्यांस उदार होउनि मनीं ओंवाळणी घालिती,
प्रेमग्रंथिस वाढर्य बंधुभगिनी या वासरीं आणिती

खाणें आणि पिणें, विनोद करणें, गाणेंहि वा खेळणें,
जैसें ज्यांस रुचेल त्यापरि तुम्हीं या उत्सवीं वागणें;
मी सन्ध्यासमयीं खूशाल गिरणातीरावरी बैसुनी
कालक्षेप करीन उन्मन असा वेडयापरी गाउनी !

भडगांव १९००

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP