मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
मजुरावर उपासमारीची पाळी

मजुरावर उपासमारीची पाळी

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


श्लोक
धारेवरी जाउनि देवा पोंचला,
हा रंगही मावळतेस साजला,
सर्वत्र ही मौज पहा ! दिसे; परी
माझ्याच कां दुःख भरे बरें उरीं ? ॥१॥
सार्‍या दिनीं आजचिया नसे मुळीं
हातास माझ्या कवडीहि लाभली;
पोटा, करोनी मजुरीस मी भरीं;
कोणी दिलें आज न काम हो परी ! ॥२॥
हीं मन्दिरें हो खुलतात चांगलीं;
माझ्या वडींलींच न काय बांधिली ?
मी मात्र हो आज मरें भुकेमुळें;
श्रीमंत हे नाचति मन्दिरी भले ! ॥३॥
हेवा तयांचा मजला मुळीं नसे,
जाडी मला भाकर ती पुरे असे;
कष्टांत देवा मरण्यास तत्पर
कां मारिसी हाय ! भुकेमुळें तर ? ॥४॥
सर्वांस देवा ! बघतोसि सारखा,
होतोस कांरे गरिबांस पारखा ?
कांहींस सुग्रास सदन्न तूं दिलें,
साधी आम्हां भाकरही न कां मिळे ? ॥५॥
घेवोनि चारा आपुल्या पिलांप्रती
जाती अहा ! पक्षि सुखी घरीं किती;
बाळांस हें दावुनि कारभारिण
कैसें तयां देत असेल सांगुन ? - ॥६॥
“ पक्षी जसे हे घरट्यास चालती
घेवोनि चारा आपुल्या पिलांप्रती,
घेवोनि अन्ना, तुमचा तसा पिता
येई तो लौकरि हो रडूं नका ? ” ॥७॥
हे लाडके ! आणिक लाडक्यांनो !
दावूं तुम्हां तोंड कसें फिरोन ?
जन्मास मी काय म्हणोनि आलों ?
येतांच वा कां न मरोनि गेलों ? ॥८॥
७ जानेवारी, १८८९.

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP