मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
वातचक्र

वातचक्र

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


पर्जन्याचे दिवस उलगले,
थंडीचेही बरेच गेले;
पिकें निघालीं; कारण नुरलें

सोसाटयानें वहावयाचें; म्हणूनि मरुद्‍गण खेळांत ---

मग्न होउनी चक्रावरती
आरोहुनि, सांप्रत हे जाती

गर गर गर गर भर भर एका निमिषामध्यें गगनांत !

धूलीचे कण असंख्य उठती,
पक्ष्यांचे पर तयांत मिळती,
गवताच्या त्या काडयाहि किती,

थंडीनें गळलेलीं पणें जीर्णें उडतीहि त्यांत;

सृष्टीचा हा जसा भोंवरा
फिरतो आहे पहा भरारां,

गर गर गर गर धरणीपासुनि चढत असे तो गगनांत !

वाग्देवी गे ! दे शब्दांतें
भोंवर्‍यांत या फेंकुनि, त्यांतें
जरा जाउं दे निजधामातें,

नरें मळविलें अहह ! तेज तें पूर्वीं होतें जें त्यांत !

म्हणुन शाप न आतां मारी,
आशीर्वचहि न आतां तारी,

तर गर गर गर त्यांस चढूं दे ताजें व्हाया स्वर्गांत

मोंहि कशाला येथ रहावें ?
काय असे ज्यां मीं चिकटावें ?
वाटे गिरक्या घेत मिळावें ---

या पवनाच्या चक्रीं, होउनि लीन सच्चिदानंदांत;

जगद्‍दुमाचें पिकलें पर्ण
गलित असें मी अगदीं जीर्ण;

तर भर भर भर उडूं द्या मला शब्दांसंगें स्वर्गांत !

१८९९

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP