( खालच्या पद्यांत वर्णिलेली देवी ती कल्पकता होय. सर्व जग
आपल्या आहारनिद्रादि ठरीव व्यवसायांत निमग्न असतां ती एकांतांत बसून
भारत-रामायणासारखीं काव्यें लिहिते, शाकुंतल, हँम्लेट यांसारखीं नाटकें
रचिते, गुरुत्वाकर्षणासारखे गहन शास्त्रीय सिद्धांत सुचविते आणि
एडिसनच्या फोनोग्राफसारखीं यंत्रें तयार करिते, तेणेंकरून नवीन आयुःक्रम
पृथ्वीवर सुरू होतो, आणि स्वर्ग पृथ्वीला जवळ होतो, )
( शार्दूलविक्रीडित )
खा, पी, नीज, तसा उठूनि फिरुनी तें जा चिन्तित ---
आवर्तीं जग या ठरीव अपुल्या होतें हळू रांगत;
एका दुर्गम भूशिरावरि. परी देवी कुणी बैसली,
होती वस्त्र विणीत अद्भुत असें ती गात गीतें भलीं.
होते शोधक नेत्र, कर्णहि तिचे ते तीक्ष्ण भारी तसे,
होतें भाल विशाल देवगुरूनें पूजा करावी असें.
सूर्याचीं शशिचीं सुरम्य किरणें घेऊनि देदी सुधी
होती गोवित इंद्रचापहि तसें, त्या दिव्य वस्त्रामधी;
मेघांच्याहि छटा, तशीच कुटिला विद्युत् ,तसे ते ध्वनी
लाटा, पाउस, पक्षि ते धबधबे---य तें पटीं ती विणी;
तारांचें पडणें, तसें भटकणें केतुग्रहांचें, पहा
सारे सुन्दर, भव्य घेउनि तिनें तें वस्त्र केलें अहा !
आली भू कुतुलें तिथें तिस तिनें तें वस्त्र लेवीवलें;
तों त्या वृद्ध वसुंधरेवरि पहा ! तारुण्य ओथंबलें;
भूदेवी, मग ह्रष्ट होउनि मनीं, नाचावया लागली,
‘ आतां स्वर्ग मला स्वयेंच वरण्या येईल ! ’ हें बोलली.
१७ फेब्रुवारी १८९१