मजुरावर उपासमारीची पाळी
केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.
( इंद्रवंशा )
धारेवरी जाउनि देव पोंचला.
हा रंगही मावतेस साजला,
सर्वत्र ही मौज पहा ! दिसे; परी
माझ्याच कां दुःख भरे बरें उरीं ?
सार्या दिनीं आजचिया नसे मुळीं
हातास माझ्या कवडीहि लाभली;
पोटा, करोनी मजुरीस मी भरीं;
कोणीं दिलें आज न काम हो परी !
हीं मन्दिरें हो खुलतात चांगलीं;
माझ्या वडिलींच न काय बांधिलीं ?
मी मात्र हो आज मरें भुकेमुळें ;
श्रीमंत हे नाचति मन्दिरीं भले !
हेवा तयांचा मजला मुळीं नसे,
जाडी मला भाकर ती पुरे असे;
कष्टांत देवा ! मरण्यास तत्पर,
कां मारिसी हाय ! भुकेमुळें तर ?
( सर्वांस देवा ! बघतोसि सारखा,
होतोस कां रे गरिबांस पारखा ? )
कांहींस सुग्रास सदन्न तूं दिलें,
साधी अम्हां भाकरही न कां मिळे ?
घेवोनि चारा अपुल्या पिलांप्रती
जाती अहा ! पक्षि सुखी घरीं किती;
बाळांस हें दावुनि कारभारिण
कैसें तयां देत असेल सांगुत ?---
पक्षी जसे हे घरटयास चालती
घेवोनि चारा अपुल्या पिलांप्रति,
घेवोनि अन्ना, तुमचा तसा पिता
येईल तो लौकरि हो, रडूं नका !”
हे लाडके ! आणिक लाडक्यांनो !
दावूं तुम्हां तोंड कसें फिरोन ?
जन्मास मी काय म्हणोनि आलों ?
येतांच वा कां न मरोनि गेलों ?
जानेवारी १८८९
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP