( शार्दूलविक्रीडित )
होतें अंगण गोमयें सकलही संमार्जिलें सुन्दर,
बालाकें अपुली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर;
तीची जी भगिनो अशी शुभमुखी दारीं अहा पातली,
रांगोळी मग त्या स्थळीं निजकरें घालावया लागली.
आधीं ते लिहिले तिनें रविशशी, नक्षत्रमाला तदा,
मध्यें स्वतिक रेखिलें, मग तिनें आलेखिलें गोष्पदां,
पद्यें, बिल्वदलें, फुलें, तुळसही चक्रादिकें आयुधें,
देवांचीं लिहिलीं; न तें वगळिलें जें चिन्ह लोकीं सुधें.
होती मंजुल गीत गात वदनीं अस्पष्ट कांहींतरी,
गेला दाटुनि शान्त तो रस अहा तेणें मदभ्यन्तरीं;
तीर्थे, देव, सती, मुनी, नरपती, देवी तशा पावना,
अन्तर्दृष्टिपुढू नियां सरकल्या, सन्तोष झाला मना !
चित्रें मीं अवलोकिलीं रुचिर जीं, काव्यें तशीं चांगलीं,
त्यांहीं देखिल न स्मरेच इतुकी मद्वुत्ति आनन्दली;
लीलेनें स्वकरें परन्तु चतुरे ! तूं काढिल्या आकृती,
त्या या पाहुनि रंगली अतिशयें आहे मदीया मति.
रांगोळींत तुझ्या विशेष गुण जो आयें ! मला वाटतो,
स्पष्टत्वें इतुक्या अशक्य मिळणें काव्यांत चित्रांत तो;
स्वर्भूसंग असा तयांत इतत्त्या अल्पावकाशीं नसे ---
कोणी दाखविला अजून, सुभगे ! जो साधिला तूं असे.
आदित्यादिक आकृती सुचविती दिव्यत्व तें उज्ज्वल,
तैसें स्वस्तिक सूचवी सफलता धर्मार्थंकामांतिल;
पावित्र्याप्रत गोष्पदें तुळसही, शोभेस हीं सारसें,
पुष्पें प्रीतिस, चक्र हें सुचवितें द्वारीं हरी या असे !
तत्त्वें मंगल सर्वही विरहती स्वर्गीं दूझ्या या, अये
आर्ये ! तूं उपचारिकाच गमसी देवी तयांची स्वयें;
नातें स्नेह निदान ओळख जरी येथें मला आणिती,
होतों मी तर पाद सेवुनि तुझें रम्य स्थळीं या कृती !
चित्तीं कल्मष ज्याचिया वसतसे ऐशा जनालागुनी
या चिन्हांतुनि हा निषेध निघतो आहे गमे मन्मनीं ---
“ जा मार्गें अपुल्या, न दृष्टि कर या द्वाराकडे वांकडी,
पापेच्छूवरि हें सुदर्शन पहा आणील कीं सांकडीं !”
“ आहे निर्मल काय अन्तर तुझें ? मांगल्य कीं जाणसी ?
लोकक्षोभजये उदात्त ह्रदयीं व्हायास का इच्छिसी ?
ये थेथें तर, या शुभाकृति मनीं घे साच अभ्यासुनी ”
आर्ये ! स्वागत हें निघें सरल या त्वल्लेखनापासुनी.
आध्याही विषयांत आशय कधीं मोठा किती आढळे,
नित्याच्या अवलोकनें जन परी होती पहा अंधळे !
रांगोळी बघुनी इतःपर तरी होणें तयीं शाहणे,
कोठें स्वर्गसमक्षता प्रगटते हें नेहमीं पाहणें !
१८ डिसेंबर १८९६