मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि|

साधन मुक्तावलि - मुक्तस्थिति

’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.


वाणी सैर बडबडी । परी द्वैत झालें देशधडी ॥
वीट किंवा आवडी । दोनी नाहीं ॥१॥
बरें वाईट न म्हणे । सत्य मिथ्या उच्चारुं नेणे ॥
मुखा आलें तें बोलणें । हेंचि मौन ज्ञात्याचें ॥२॥
माझें गेलें मुखें वरळे । परी अंतरीं न कळवळे ॥
सूक्ष्म रूपें जो कां पिळे । देठ नाभीचा ॥३॥
ध्यानीं किंवा व्यवहारीं । किंवा सुषुप्तीं माझारीं ॥
वृत्तीचि असतां भलतीपरी । तरी निश्चय एकरुप ॥४॥
तो एकलाचि एकपणें वीण । सर्वीं सर्वात्मा सर्व विसरून ॥
जलतरंगेशीं चित्‌सागर पूर्ण । विलसतसे आपाआपणींया ॥५॥
तरंग उठतांही पाणी । निमतांहि जीवन जीवनीं ॥
तैसी वृत्तीची उभवणी । होतां जातां आपण ॥६॥
झालें समाधान बिघडेना । संशय कदाही अंतर स्पर्शेना ॥
ध्यान करितां त्रिपुटि उपजेना । हेचि चरम स्थिति ॥७॥
जरी प्राणांत केला अपकार । तरी दुष्ट न म्हणे हा नर ॥
अपकारीया करी उपकार ॥ प्रशांति प्रकार या नांव ॥८॥
जरी ठकुनि सर्वस्व नेलें । तरी क्षोभेना दोष - बळें ॥
तें जाण ब्रम्हार्पण झालें । येणें अंगा आलें प्रशांतत्व ॥९॥
स्वकर्म - धर्म - वर्णाचार । करितांही निज व्यवहार ॥
ज्यासी सर्व भूतिं मदाकार । तो भक्त साचार प्रिय माझा ॥१०॥
ज्यासी सर्व भूति बुद्धि समान । तेचि भक्ति तेंचि ज्ञान ॥
तेंचि स्वानंद - समाधान । सत्य सज्ञान मानिती  ॥११॥
असो भलतैसे व्यापार देहाचे । वर्तणें घडों शुभाशुभ कर्माचें ॥
परी  मी म्हणोनीया संघाचें । गुप्तही स्फुरण नसे ॥१२॥
असो इच्छितां कीं न इच्छितां । अथवा कर्में घडति परापेक्षता ॥
तीं सुखें घडोत देहासी आतां । ज्ञातया संबंध नाहीं ॥१३॥
देह मज वाणी भलतैशी । वावरितांही पूर्व कर्मासरिसी ॥
मी देह कीं कर्ता नुद्भवे मानसीं । हेचि मुक्त स्थिति ॥१४॥
सर्व भूतिं भगवद्भजन । ऐसें ज्यासी अखंड साधन ॥
त्या नराचा देहाभिभान । क्षणार्धें जाण स्वयें जाय ॥१५॥
क्रिया कांहीं न व्हावी । ऐसें ज्ञानिया वाहे जीवीं ॥
तरी अखंडैक रस चवी  । चाखिलीचि नाहीं ॥१६॥
जंव जंव उमठे भेदु । तंव तंव दुणावे अभेदु ॥
म्हणजे भेदाचे छंदें स्वादु । आपलाचि लाहे ॥१७॥
एवं आत्मविदासी जाण । कायसें क्रिया - उगेपणा ॥
स्वभावें समाचरण । तेंचि निकें ॥१८॥
क्रिया अथवा उणेपण । हें देहसंबंधीं भान ॥
तरी देहभानची आण । पडली तयासी ॥१९॥
म्हणोनी साधकांप्रती सांगितलें । कीं देहात्मवत् ब्रम्हात्मत्व झालें ॥
तयाचें वर्तणें अशुभ किंवा भलें । परी मुक्त नि:संशयें ॥२०॥
कोणताही भोगितां विषय । मी ऐसा नव्हे प्रत्यय ॥
आपण असंग हा निश्चय । सद्दढ झाला ॥२१॥
उठे किं निमे जरी संकल्प । परी नामरूप न स्फुरे कदा अल्प ॥
एकरूप ब्रम्हात्मा सच्चिद्रूप । भलतेही आवस्थे ॥२२॥
भूतिं भगवंत परिपूर्ण । ऐसें जाणोनी आपण ॥
भूतांसी लागे अतिदारूण । तें कठीण वचन बोलेना ॥२३॥
बहूत काय स्थिति बोलावी । मागील क्षणही नाठवी  ॥
पुढील क्षणाची उठाठेवी । सहसा नाहीं ॥२४॥
प्राप्त तितुकें करावें । अप्राप्त तें टाकावें ॥
भोगिलें तें न स्मरावें । होणार न चिंती ॥२५॥
अथवा गत गोष्टी बोलतो । पुढें अमुक करूं म्हणतो ॥
परी सुखदु:खें शिणेना तो । इतरा ऐसा ॥२६॥
अथवा अतीत अनागत । काय म्हणोनि कोणी पुसत ॥
तरी चिद्रूप समस्त । उत्तर दिलें ॥२७॥
असो ज्ञाता सर्व करिता । पापपुण्याची नसे चिंता ॥
बरे वाईट भोग येतां । भोगितो सुखें ॥२८॥
वृत्ति उठतांची चैतन्य खचित । त्यामाजीं विश्व हें उमटत ॥
परि तेंहि पाहे निश्चित । अस्तिभाति प्रियत्व ॥२९॥
वृत्तीचा उद्भव अथवा लय । होतांही आपण अद्वय ॥
जीवन्मुक्त नि:संशय । क्रिडे येणें रीतिं ॥३०॥
आकाश कोसळोनि पडे । धरणी रसातळीं दडे ॥
परी समाधान न मोडे । पुर्ण चिन्ह ज्ञात्याचें ॥३१॥
देह जाये अथवा राहे । सुख किंवा दु:ख साहे ॥
परी समाधाना भंग नव्हे । पूर्ण चिन्ह ज्ञात्याचें ॥३२॥
सकलही व्यवहारीं वर्ततां प्राक्तनानें । क्षणभरि भगवंतावीण जो अन्य नेणे ॥
विलसत ई मुनि जैसे ते शुकादि विदेही । सनक जनक तैसा शोभतो येथ हाही ॥३३॥
श्लोक ॥ कदाचित् सत्वस्थ: क्वचिदपि रजोवृत्तिषु गत:, तमोवृत्ति: क्वापि त्रितयरहित: क्वापि च पुन: ॥
कदाचित् संसारी श्रुतिपथविहारी क्वचिदहो, मुनिर्न व्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततम: ॥३४॥
आत्मानुसंधिगलिताखिलवासना यो, विस्मृत्यविश्वमखिलं स शरीरमेतत् ॥
खादन्‌ हसन भ्रमणमाकलयञ्च शेते, श्रीदेशिकेंद्रकरूणालयद्दष्टिद्दष्ट: ॥३५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP