मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि|

साधन मुक्तावलि - प्रकरण १० वें

’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.


श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
अज्ञान म्हणजे, मी कोण ? ॥ कोठून आलों हें, अजाण ॥
कर्ता करविता, आहे कोण ! ॥ ऐशी शंका, नसे जया ॥१॥
आहार, निद्रा, भय, मैथून ॥ अन्य प्राणी, करती जाण ॥
तयासारिखें, आचरण ॥ ज्ञानी मानव, करतो कीं ॥२॥
प्रापंचिक शिक्षणें, शिकोनिया ॥ विदूष म्हणविती, अभिमानिया ॥
गर्व, घमेंडया, करोनिया ॥ जन्मा आले, तैसे मरती ॥३॥
देहदेहाचें, असे नातें ॥ जीवदेहाचें, अनातें ॥
जाता वेळीं, यमसदनातें ॥ माझे म्हणवुनी, त्यागी ती ॥४॥
सर्व विद्या, माजी श्रेष्ठ ॥ ब्रम्हाविद्या, असे ज्येष्ठ ॥
परंतु सारे सर्वदा, निचेष्ट ॥ प्रपंचामाजीं, आसक्त कीं ॥५॥
मिळाला जरी, अधिकार ॥ (तरी) चाळे करितीं, अपार ॥
अन्यातें पीडा, साचार । कर्तव्य हेंची, जाणती ॥६॥
भजनपूजनीं, कंटाळा ॥ कामादिकांचा, बहू चाळा ॥
तरी त्या ओंगळ, विटाळा ॥ माजी मिटक्या, मारिती ॥७॥
कांहींकांना, असे ज्ञान ॥ तरी तें नसे, सत्य ज्ञान ॥
सारे भ्रमिष्ट, अज्ञान ॥ कां न म्हणावें, संतांनीं ॥८॥
असो ऐशी ही, जगत् रिती ॥ मायामोह हा, कवण्या रिती ॥
न जाणण्याची, जोंवर त्थिती ॥ तोंवरि दोष, लावूं नये ॥९॥
जागे करुनी, समजाविलें ॥ तथापि लक्ष, नचि दिलें ॥
तरी त्यांनीं, अनहित केलें ॥ स्वयें कूपीं, पडोनिया ॥१०॥
कर्ममात्रांचे, बीजद्रुम ॥ उठवणें हेंचि, मोठें काम ॥
जीव अज्ञानें, बेफाम ॥ राहोनि फळें भोगिती ॥११॥
कर्मचक्रीं, भ्रमले जीव ॥ कदां न जाणती, सदाशीव ॥
प्रपंचाचा करोनि, व्यूहर ॥ जन्मोनि व्यर्थ, मरताति ॥१२॥
इतुकें तीक्ष्ण बोलणें पुरें ॥ लक्ष देतां, वृत्तीच मुरे ॥
ज्ञानी करावीं, पामरें ॥ हेंचि ब्रीद, संतांचें ॥१३॥
जाणिव नेणिव हें, जाणणें ॥ असत्  जड दु:ख, ओळखणें ॥
कार्यकारण, भावें पाहाणें ॥ अनंतर ब्रम्हा, चर्चा ॥१४॥
संतसंगती, सदगुरुकृपा ॥ प्राप्त होतां, जाणी पातका ॥
पश्चात्तापें, आचरी तपा  ॥ पुण्यरूपीं, होतसे ॥१५॥
ऐशी पात्रता, येता अंगीं ॥ अज्ञानातें. तोच भंगी ॥
परब्रम्हीं, येतां गुंगी ॥ जीवन्मुक्त होईल कीं ॥१६॥
आपण कोण हें, न जाणणें ॥ ऐसे तरी, आपण जाणणें ॥
ऐसें असतां, कांहीं न उमजणें ॥ हेंच अज्ञान, भ्रांतीनें ॥१७॥
अज्ञानाच्या, वृथाभासें ॥ ज्ञान नुपजे, ऐसे दिसे ॥
तरी तेंच ज्ञान, प्रकाशे ॥ विवेकीं, अनुभव, येतसे ॥१८॥
ज्ञान - अज्ञानाच्या, भावा ॥ दोन्हींच्याही, भेदप्रभावा ॥
विरुद्ध जाणण्यार्थ, निदिध्यास घ्यावा ॥ तेव्हांचि ज्ञान, लाभेल कीं ॥१९॥
मतिमंदच, अज्ञानी स्वयंभू ॥ ज्ञानाचे, नचि उठवी, तरंगु ॥
ब्राम्ही पाला, खावोनि भंगु ॥ होवोनि प्रज्ञा, वाढतसे ॥२०॥
ज्ञान्या संगती, अज्ञानी ॥ श्रवण - मननें, होय ज्ञानी ॥
होतां होतां, तोच ज्ञानी ॥ होवोनि पावे, ज्ञानातें ॥२१॥
जया प्रपंचीं, उत्तम ज्ञान ॥ त्याचें न राहे, अज्ञान ॥
ऐसा भरवसा, जाणून ॥ ब्रम्हाज्ञानार्थीं झटावें ॥२२॥
एकेक अज्ञान, सुटतसे ॥ तितुकेंचि ज्ञान होतसे ॥
क्रमाक्रमानें, हें घडतसे ॥ हाची अनुभव, ज्ञानाचा ॥२३॥
गुरुपदेशीं ठेवणें, लक्ष ॥ वर्जावें शिष्यें, भक्षाभक्ष ॥
सूक्ष्माहारें, लागे लक्ष॥ येई अनुभव, मूढाशीं ॥२४॥
उदकासारिखे, जग हें वाही ॥ प्रपंचाच्या, भारानें ॥२५॥
कर्मानुसार, बुद्धी असे ॥ म्हणोनि सत्कर्म, करा तैसे ॥
तया कधीं न लागे पिसे ॥ ज्ञानप्राप्तीकर्मांत ॥२६॥
चित्तशुद्धर्थ्य, कर्म कीजे ॥ तेंही सत्कृत्य, आचरिजे ॥
कर्म करतां, ज्ञान पाहिजे ॥ अंतीं मोक्ष, लाभेल कीं ॥२७॥
राहोनि स्वधर्मीं, कर्म कीजे ॥ तया शुद्धत्व, भाविजे ॥
ज्ञानप्राप्ती, सुगम होईजे ॥ वावडा न होय, ज्ञातींत ॥२८॥
धर्मकर्माचीं, भांडणें ॥ वृथा न करावीं, तंडणें ॥
नसे कांहीं, होणें जाणें ॥ व्यर्थ कासया, शीण हा ॥२९॥
पाखांड, वादातें, जाणुनी ॥ अलक्ष करावें, नेणुनी ॥
आस्तिक भावें, सदा वर्तोनी ॥ तरीच लाभेल, परमेश्वरू ॥३०॥
सद्‌गुरुचरणीं,  भाव ठेवी ॥ अज्ञान निरसुनी, ठाव घेई ॥
मुक्तिद्वारीं, पाय ठेवी ॥ परतोच नये, माघारी ॥३१॥
ऐशा निश्चयें, ज्ञान लाभे ॥ ज्ञाता होय तो, स्वभावें ॥
जाणील ब्रम्हा तो, स्वस्वभावें ॥ सत्फुर्ती दासी, होय कीं ॥३२॥
स्फुर्तीजवळी, ब्रम्हा असे ॥ तें न दिसतां भावतसें ॥
कळणें सांगणें, उरत नसे ॥ अनुभवें आनंद भोगावा ॥३३॥
जरी हें ज्ञान सांगितलें ॥ तरी तें पाहिजे, अभ्यासिलें ॥
श्रमावाचोनी, व्यर्थचि गेलें ॥ मग तें अज्ञान कायम ॥३४॥
ज्ञान हें विवेकें, अभ्यासुनी ॥ करिती सूक्ष्म, महामुनी ॥
हें महत् तत्त्व, जाणोनी ॥ आत्मानंद साधावा ॥३५॥
ब्रम्हा दिसावें, ऐसें म्हणणें ॥ घनानंद स्पष्ट, सांगणें ॥
अनुभवी आणा, हें म्हणणें ॥ अनुभव येतां, नुरेच कीं ॥३६॥
द्दश्य द्रष्टा, आणि दर्शन ॥ तिन्ही भावना, विलक्षण ॥
एकलेचि एक, आपण ॥ ज्ञप्तिमात्र, सत्य कीं ॥३७॥
द्दश्यदर्शन, जेथें हरपे ॥ तेथें द्रष्टा, उरे स्वरूपें ॥
अखंड आपण, आपणातें ॥ निरामयेंची. अनुभवी ॥३८॥
ब्रम्हानुभवा, परतें सुख ॥ नसे ब्रम्हांडीं, सर्व असुख ॥
यासाठींच, झटती चोख ॥ परमहंस, ज्ञाते कीं ॥३९॥
एवं अज्ञान, निरसुनी ॥ पाविजे ज्ञान, रिझोनी ॥
पावावें, अमृताच्या सेवनीं ॥ परमामृता, तुनी च कीं ॥४०॥



इति श्रीपरमामृते मुकुंदराजविरचिते अज्ञाननिरसनं नाम दशमं प्रकरणं संपूर्णम् ॥ श्रीब्रम्हार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP