मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि|

साधन मुक्तावलि - प्रकरण १४ वें

’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.


श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
गुरुचरण धरी, जीव प्राणे ॥ गुरुवचनीं, तत्पर राहणें ॥
न लाभे ब्रम्हा, तयावीणे ॥ तेंचि द्वार, सत्य कीं ॥१॥
गुरु शिष्य देह, दिसती भिन्न ॥ कृपा होतां, अविच्छिन्न ॥
गुरुचे गुण, शिष्यांगीं भरून ॥ आपणाहूनी, श्रेष्ठ इच्छी ॥२॥
गुरुकृपेनें, इच, ब्रम्हाप्राप्ती ॥ साक्षाकारेंचि होय, प्रदीप्ती ॥
प्रेमभावें होतसे, तृप्ती ॥ अनुभवें, महिमा, कळेल कीं ॥३॥
शेंदाडें पिकोनी, देठीं तुटती ॥ तैशीं सृष्टींत, भुतें उठती ॥
जीव देहीं, ऐसेच होती । तरीच त्राता, गुरुराज ॥४॥
ब्रम्हाचिकित्सा, श्रवण करी ॥ मननें निदिध्यासें, अंतरीं ॥
सदासर्वदा, लक्ष धरी ॥ परमात्म्याच्या, ठायीं तें ॥५॥
याविषयीं जो, महा आळशी ॥ तया प्राप्ती, होय कैशी ॥
सद्नुरूचा तो, उपदेशी  ॥ म्हणोचि नये, सर्वथा ॥६॥
प्रथमारंभीं, मूर्तिपूजन उपरांत धरावें, स्मरण - ध्यान ॥
सगुण मूर्तिचें, मानसें पूजन ॥ उपरांत जावें, निर्गुणपदीं ॥७॥
केशरी भात, उत्तम खरा ॥ परी साध्याविणें, तो न, खरा ॥
ऐशा पायरीनें, करी त्वरा ॥ अभ्यासें जाणे, ब्रम्हानुभव ॥८॥
मोक्षासाठीं, ज्ञान श्रेष्ठ ॥ संपादी ब्रम्हा, विद्या ज्येष्ठ ॥
राहूंच नये, कधींही कनिष्ठा ॥ हाची अंत, ज्ञानाचा ॥९॥
ऐसा क्रमावा, कर्ममार्ग ॥ अभ्यासें, तोच वाटे, सुमार्ग ॥
नचि धरावा, अन्य कुमार्ग ॥ आयुष्य वृथा, दवडूं नये ॥१०॥
मूर्ती कल्पितां साक्षात्कार ॥ होतसे सत्य हा, निर्धार ॥
केव्हां होईल तें, साचार ॥ सांगतांच येत नसे कीं ॥११॥
ज्ञानी चेष्टा, देव दाविती ॥ ऐशीच आहे, त्यांची रिती ॥
सांगावें हें तरी, कवणा किती ॥ अनुभवानुसार, कळेल कीं ॥१२॥
आवडत्या देवाचें, ध्यान धरी ॥ तया देखोनी, एकाग्र करी ॥
मानसे पुजेनें, उपचारी ॥ लक्ष, न, दवडी, दुसरीकडे ॥१३॥
ऐसें होतां, दिसें ध्यान ॥ धरसोडीचें तें, अपुरे जाण ॥
प्रारंभीं ऐसेंचि तें,  अधिष्ठान ॥ सर्वही योग्या होतसे ॥१४॥
अभ्यासानें, स्थिरता स्थिरतां ॥ ध्यानावधीची, वृद्धिंगता ॥
होता जाणा, अनुभवितां ॥ लक्ष न सुटे, साधकाचें ॥१५॥
ऐशा ध्यानीं, तंद्रा लागून ॥ सजीवत्व भासे, मूर्तींतून ॥
खुणा मुद्रा, संज्ञेकडून ॥ देवता हेतू, दर्शविते ॥१६॥
कोटि - यज्ञ - फल, निमिष ध्यानें ॥ ऐशी पुण्यराशी, अमुप होणें ॥
तदनंतर साक्षात्कार, होणें ॥ तो सुखानंद, स्वताशीं ॥१७॥
हें सौख्य तूंची अनुभवी ॥ गुप्त ठेवानंद, साठवी ॥
सत्पात्रतेनें, देवता आठवी ॥ साक्षात्कार, भराभर ॥१८॥
हा द्वैतानंद,  ज्याचा त्याशीं ॥ हें गुज न सांगे, कवणाशीं ॥
गुरु मित्र, यांच्या पाशीं ॥ तेंही क्वचितच, सांगावें, ॥१९॥
मूर्तांत अमूर्त, सगुणीं निर्गुण ॥ द्वैताद्वैत, एकचि गुण ॥
तरी भासताति, द्विगुणीं गुण ॥ ऐशी माया, तेथें असे ॥२०॥
द्वैतावांचुनी, प्रेम नाहीं ॥ हस्तपादादि, द्वैत पाही ॥
तरी एकच देह, लवलाही ॥ ऐसेच द्वैताचें, अद्वैत ॥२१॥
ऐशा भावें, भक्त देव ॥ द्वैत अद्वैत, स्वयमेव ॥
भिन्न भासे, वृथा सदैव ॥ तीच भ्रांती, टाकिजे ॥२२॥
भ्रांती जातां तो, तूं मीच ॥ नुरे तूं मी, एकटाच ॥
रहातो केवळ, ब्रम्हास्वरूपच ॥ तीच मुक्ती, सायुज्यता ॥२३॥
भजावे सगुण, निर्गुणाप्रती ॥ ऐसें पावावें, ब्रम्हीप्रती ॥
पापाची होय, समूळ निष्कृती ॥ ऐसा मार्ग मुक्तीचा ॥२४॥
हें ब्रम्हागौप्य, गुप्त ठेवणें ॥ स्वस्वभावें, करोनिया ॥२५॥
साक्षात्कार, उघडे करिशी ॥ अपात्न म्हणोनि, वृथा ठरशी ॥
उत्तम लाभ, बुडेल सर्वस्वीं ॥ हानी होईल, तत्काळ ॥२६॥
मंत्न तंत्न कारस्थान ॥ उघदे करतां, जातो मान ॥
न ठेवी हें जो, अनुसंधान ॥ पावे हानी, सर्वथा ॥२७॥
भोळ्या भाविकां, भजनपूजन ॥ ज्ञान्यासाठीं, आत्मज्ञान ॥
विज्ञान्यासाठीं, ब्रम्होपासन ॥ ऐशा उपासना, जाणिजे ॥२८॥
अपात्नाशीं, पात्र करितां ॥ गुरु शीणतो, सर्वथा ॥
कधीं यशाची, नसेच वार्ता ॥ ऐसा शिष्य, नसावा ॥२९॥
हें ब्रम्हागौप्य, मूढाशीं ॥ सांगू नको, अलभ्य त्याशीं ॥
गुज ऐकोनी, चाहाटळपणाशी ॥ वृथा मूर्ख, उवठूं नको ॥३०॥
ह्रदयान्तरीं हें, गुप्त राखी ॥ परमामृत हें, तूंचि चाखी ॥
न देई तुज कोणी, पालखी ॥ व्यर्थ कांसया, वटवटावें ॥३१॥
निर्गुण ब्रम्हाचें ज्ञान झालें ॥ त्या भावें सगुणीं, लक्ष ठेविलें ॥
तरी दोन्ही स्थानीं, पाउलें ॥ घसरोनि न पडती, सर्वथा ॥३२॥
ध्यान ध्याइजे, परम प्रीती ॥ तरच होईजे, भगवत् - प्राप्ती ॥
होतां होतां ज्ञानदीप्ती ॥ तेणें मोक्ष, सहजच कीं ॥३३॥
नित्य करावा, ऐसा नेम ॥ पडो न द्यावा, संसारभ्रम ॥
धरावा, आत्मानंदीं, क्रम ॥ ब्रम्हापदीं, पोंचावया ॥३४॥
ग्रंथ असे हा, परमामृत ॥ परमार्थाचें, सत्य कथित ॥
सावधानें, ठेवी चित्ता ॥ कैवल्यमुक्ती, मिळवावया ॥३५॥


इति श्रीपरमामृते मुकुंदराजविरचिते साक्षात्कारनिरूपणं नाम चतुर्दशं प्रकरणं संपूर्णम् ॥ श्रीब्रम्हार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP