साधन मुक्तावलि - देवभक्त प्रणयकलह
’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.
पद.
॥ जय गोविंदा परमानंदा ऐक माझे बोल ॥ निर्गुणरूपें असतां तुझें कांहींच नव्हे मोल ॥
मग तूं माया धरुनि हातीं झालासी शबल ॥ नसतें देवपण अंगीं आणोनी चाळविसी केवळ ॥१॥
ऐसा लाघवी तूं रामा नको चाळऊं आम्हां ॥धृ०॥
नसतां तुज मज भेद देवा लटिलें जीवपण देसी ॥ आपुलें ठायीं थोरपण आणुनि आमुची सेवा घेसी ॥
नसति अविद्या पाठीं लाऊनि संसारीं गोंविसी ॥ नाना कर्में केलीं म्हणोनि आम्हां कां दंडीसी ॥२॥
मातें भावें भजिजे ऐसा उपदेश करिशी ॥ आपुल्या भक्तां तारीन म्हणोनि प्रताप बोलसी ॥
निंदक दुर्जन अभक्त त्यातें नरकीं तूं घालिसी ॥ आपुल्या स्वार्थालागुनि दुसर्यातें कां पीडिसि ॥३॥
आपुला महिमा वाढो म्हणोनी आम्हां भक्त केले ॥ लक्ष चौर्यांशी योनी देऊनी संसारीं गांजिलें ॥
भावें तूंतें न भजों म्हणोनि आकस आरंभिलें ॥ आतां देवा वैर येतां तुज मज नव्हे भलें ॥४॥
ऐसें तुज मज वरै जाणुनि गुरुसी शरण गेलों ॥ देव - भक्तपण कोणा कर्में पुसों जैं लागलों ॥
सद्नुरु म्हणती सर्वही मायिक निश्वय तुजप्रती बोलों ॥ सेव्यसेवकता येकचि अवघे गोष्टिसी पावलों ॥५॥
आतां सद्नुरुवचनें करुनि गिळिन देवपण ॥ भक्तपणावरी तुझे रागें घाळीन पाषाण ॥
जीवशिव - ऐक्य करुनि सुखेंच राहेन ॥ नामरूप तुज मज आहे त्यातें निर्दाळीन ॥६॥
ऐसे भक्त बोल ऐकुनी थोर वाटे चिंता ॥ विवेक - बळें करुनि बुडविलें देवपण आतां ॥
यालागीं भेणें भक्तजनासी ऐक्य करुनि तत्त्वतां ॥ एका जनार्दनी दर्शन द्यावें लागे त्वरिता ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : September 10, 2015
TOP