मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि|

साधन मुक्तावलि - प्रकरण ३ रे

’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.


॥ अथ महावाक्यविवरणप्रारंभ: ॥
श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
करूनि आदिशक्तीचा, अंगिकारू ॥ करी जो उत्पत्त, स्थिति संहारू ॥
जो सर्वसाक्षी, सर्वेश्वरू ॥ तोचि शबल, बोलिजे ॥१॥
स्थूल द्दष्टीचें, जाणणें ॥ तितुकेंही तें, निरसणें ॥
उरे अद्दश्य, तें ओळखणें ॥ तोचि शुद्ध, परमात्मा ॥२॥
सर्वज्ञ आणि, सर्वेश्वरू ॥ ऐसा वेदशास्त्रीं, निर्धारू ॥
तोचि जाणिजे, परात्परु ॥ कैवल्य तोचि, ज्ञप्तिमात्र ॥३॥
अनंत शक्तीचा, जो द्रष्टा ॥ स्थान मान नसे, प्रतिष्ठा ॥
जो अपरिमिता, घनदाटा ॥ तोचि जाणा, परब्रम्हा ॥४॥
तया बोलिजे, शुद्धब्रम्हा ॥ विराट शबल, मिश्र ब्रम्हा ॥
ज्ञान घनानंद, शुद्धब्रम्हा ॥ तोचि जाणा,परमेश्वर ॥५॥
ब्रम्हांड हिरण्य, गर्भमाया ॥ याहूनि वेगळा, देहत्नया ॥
पुरुष प्रकृती, आदिमाया ॥ याहूनि विलक्षण, असे जो ॥६॥
उत्पत्ति स्थिति, आणि संहारु ॥ सर्वचि साक्षित्व, व्यवहारु ॥
इतुक्या अवस्थातीत, जो अपारू ॥ ऐसाचि स्वयें, असे जो ॥७॥
ब्रम्हा विष्णु आणि रुद्र ॥ चवथा त्यावरी, ईश्वर ॥
माया स्फुर्तीहुनी, वेगळा अपार ॥ परब्रम्हा, म्हणती जया ॥८॥
ऐशिया परी, नीट पाहतां ॥ निष्कर्दम जो, अविद्या. विरहिता ॥
सदांसर्वदां, कर्मातीता ॥ तोचि जाणा,परब्रम्हा ॥९॥
स्थूल सूक्ष्म देह, कारण ॥ चवथा असे, महाकारण ॥
जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती जाण ॥ तुरिया चवथी, असे कीं ॥१०॥
विश्व तैजस, सर्व प्राज्ञ ॥ प्रत्यगात्मा, तो सर्वज्ञ ॥
हे अभिमान, सर्वथा संज्ञ ॥ शबलार्थींच, जाणावे ॥११॥
हया इतुकियांचाही, जो द्रष्टा ॥ अलिप्त राहोनी, होती चेष्टा ॥
सर्वाधिष्ठान, दातृत्वप्रतिष्ठा ॥ ऐसेंचि लक्षण, जयाचें ॥१२॥
शबल केवल, वाच्य पक्ष ॥ शुद्धार्थीं ठेवावें, पूर्ण लक्ष्य ॥
लक्षीं ऐक्य, तेथेंचि मोक्ष ॥ जिव शिव सृष्टी, नुरेचि ॥१३॥
उभय नयनीं, एकद्दष्टी ॥ दोन्ही श्रवणीं, नादेष्टी ॥
ओष्ठ जुळती, अधर पुटीं ॥ द्वैताद्वैतीं, ऐक्यता ॥१४॥
ऐक्य अनैक्यार्थीं, विवरण ॥ करावें जीवेश्वर, निरसन ॥
शुद्ध लाभेल तेणेंचि करून ॥ अद्वैत मुक्ती, परब्रम्हीं ॥१५॥
जैसे महदाकाश, अखंड पूर्ण ॥ घटपटीं मात्न, दिसे तें भिन्न ॥
तयासारिखें, ज्ञान जाण ॥ परब्रम्हा, तसेंच कीं ॥१६॥
ते घटपट दोन्ही, भंगता ॥ ठायींचेचि ठायीं, तत्त्वैक्यता ॥
जिव शिव ईश्वर, निरसतां ॥ परब्रम्हा, एक असे ॥१७॥
जिव शिव जग व ईश्वर ॥ माया अविद्या, कर्दमाचर ॥
परब्रम्हीं नसे तें, साचार ॥ तेथेंचि रिझावें, आनंदीं ॥१८॥
कर्दमीं मायेशीं, पाहतां ॥ मन हें गोंधळतें सर्वथा ॥
नासकें टाकोनि, जाणी तत्त्वता ॥ अखंड सत्य, ब्रम्हास कीं ॥१९॥
ऐसे महावाक्यातें, विवरणें ॥ त्वं - पद ततपद, शोधणें ॥
आसीत पदीं, पावणें ॥ हाचि अंत ज्ञनाचा ॥२०॥
म्हणोनि सत्य, ज्ञानेविणि ॥ सर्व मतें, भेदक जाण ॥
मायिका सर्वथा, वृथा भासन ॥ त्यागावें तें, क्षणोक्षणीं ॥२१॥
मिथ्या माया, इंद्रधनु ॥ उपजे निपजे, असतां भानु ॥
लया पावे, सत्यचि मानू ॥ नको सृष्टी, ऐशीच ही ॥२२॥
खोटा नासका, वृथा भास ॥ मोहे होतो, परम त्रास ॥
ज्ञान्याविणें, सर्वत्नांस ॥ मोक्षसौख्य, कदा नसे ॥२३॥
माया ईश्वराशीं, मोहित ॥ करिते यत्नें, नित्य सतत ॥
साधुसंतांची ती, सवत ॥ म्हणोनि त्यांना, छळीतसे ॥२४॥
ज्ञानी वैगारी, तिला कुटी ॥ अज्ञानी धरितो, हनुवटी ॥
जया परब्रम्हा श्रीची टवटवटी ॥ तोचि जाय, परब्रम्हीं ॥२५॥
इति श्रीपरमामृते, मुकुंदराजविरचिते, महावाक्यविवरणं नाम, तृतीयं प्रकरणं संपूर्ण ॥ श्रीब्रम्हार्पणमस्तु ॥


References : N/A
Last Updated : September 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP