॥ अथ अन्यपाखांडमतखंडनप्रारंभ: ॥
श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
सर्व जाणोवी, सर्व कीजे ॥ तत्त्व सर्वदा, अभ्यासिजे ॥
तेथें चित्तें करोनी, राहिजे ॥ बुडी देवोनी, सदोदित ॥१॥
अभ्यंतरीचें, तेंचि ज्ञान ॥ प्रशस्त बोलेन, तें साधन ॥
जेथें रंजले, योगीजन ॥ अक्षयानंदीं, निरंतर ॥२॥
जैसें सागरीचें, अमृत ॥ पय मंथूनि, जैसें नवनीत ॥
काढिलें तैसें, सर्वांत ॥ सार तेंची, सांगेन कीं ॥३॥
न लगे याहूनि कांहीं करणें ॥ नानापरिचीं, अभ्यासनें ॥
संकल्प, विकल्पात्मक, साधनें ॥ सर्वथैव, त्यागिजे ॥४॥
संकल्प - विकल्पी, द्वाड मतें ॥ नाना गोंधळें, कष्टचि तें ॥
महावाक्याचें, विवरण चित्तें ॥ अनुभविलें नाहीं, जोंवरी ॥५॥
जो, केवळ, निरुपाधि, स्वरूप ॥ अनुभव न कळे, आपोआप ॥
तोंवरि कष्टाचेंची, माप ॥ कवण्या प्रेमें, करावें, ॥६॥
व्रत तप नेमाच्या, सांकडीं ॥ मानवें गुंतलीं, बापुडीं ॥
तीं कैशी पावतील, पैलथडीं ॥ संसार, सागरोदकीं पै ॥७॥
पूजा, स्नानें, तीर्थें, दानें ॥ मंत्र, तंत्र, योग, हवनें ॥
तेणें तितुकेंचि, फळ भोगणें ॥ स्वर्गादिक, सर्वही ॥८॥
जप, तप आणि, अनुष्ठानें ॥ नाना परिंची, अन्य साधनें ॥
न मोक्ष विना, आत्मज्ञानें ॥ करोनि कर्में, सर्वदा ॥९॥
जोंवरि जीवेश्वर, उपाधी ॥ निरसुनि जाणिजे, ऐक्यसिद्धी ॥
भेद सांडुनी, शबल विरोधी ॥ तरी न प्रकाशे, शुद्ध तत्व ॥१०॥
त्वं पद तत्पदीधें, लक्षण ॥ शबल सांडोनी, परोक्षण ॥
जाणिल्यावांचुनी, परोक्ष ज्ञान ॥ तोंवरी मोक्ष, कैसा पै ॥११॥
जोंवरि तो एक, मी एक ॥ हा न तुटेचि, महत् भेदक ॥
तोंवरि न प्रकाशे, सम्यक ॥ परब्रम्हा, परमात्मा ॥१२॥
जोंवरि त्रिपद, शोध न घडे ॥ अर्ध मात्रेहूनी, न सांपडे ॥
क्षराक्षर निवाडा, नचि घडे ॥ परम पुरुषीं, तो अंध ॥१३॥
सच्चिदानंदाचें, विवरण ॥ जोंवरि नेणिजे, कार्य कारण ॥
न चि निवळे, शुद्धात्मज्ञान ॥ तोंवरि मोक्ष, कैसा पै ॥१४॥
सद्गुरुमुखें, वेदान्तश्रवण ॥ केला न घडे, त्याचें मनन ॥
तैसेंचि न केलें, निदिधासन ॥ तोंवरि मोक्ष, कैसा पै ॥१५॥
सांडोनि वेदान्त, सिद्धान्त ॥ जे का बोलती, पाखांडमत ॥
त्याची न ऐकावी, मात ॥ महावाक्यार्थीं, नानुभवी ॥१६॥
वेद बोलिले, सृष्टिक्रम ॥ पाहोनि ते ही, सकल धर्म ॥
वेदान्ताचें, गुप्त वर्म ॥ अनुभवावें तें, गुरुमुखें ॥१७॥
वेदान्ताचें, गुहय बोलणें ॥ सिद्धान्तींच जाणो जाणे ॥
त्याशींच तत्व, खुणा मिळणें ॥ ऐसेंचि ज्ञान, कैवल्याचें ॥१८॥
जिव शिव ईश्वराची, दोरणी ॥ अखंड अभेद, कडसणी ॥
तेंच तत्वज्ञान, निर्वाणी ॥ अद्वैत ब्रम्हा, पलीकडे ॥१९॥
अनुभवाविणें, नुसतें ब्रम्हा ॥ म्हणणें केवळ, शब्दीं ब्रम्हा ॥
मोक्षीं, परोक्ष ज्ञानें, जें ब्रम्हा ॥ तेंचि जाणा, कैवल्य ॥२०॥
इति श्रीपरमामृते, मुकुंदराजविरचिते, अन्यपाखांडमतखंडणं नाम, द्वितीयं प्रकरणं संपूर्ण ॥ श्रीब्रम्हार्पणमस्तु ॥