मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि|

साधन मुक्तावलि - प्रकरण ५ वें

’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.


॥ अथ सूक्ष्म (लिंग) देहविवरणप्रारंभ: ॥
श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
द्दश्य देहाचा, चालक ॥ जया न जाणती, सकळिक ॥
देहामाजी, असा तो एक ॥ विस्मृत झाला, ज्याचा तो ॥१॥
त्रिगुण षड्रिपू, जीवसहित ॥ परमात्मा अंतरीं, असे स्थित ॥
विस्मृतीच होणें, अनुचित ॥ म्हणोनि भोग, भोगीतसे ॥२॥
द्दश्यांत अद्दश्य, लिंग देह ॥ संयोग वियोग, हाचि मोह ॥
व्यर्थ सारा, उहापोह ॥ जगत्‌कारणीं, कर्दमीं ॥३॥
देह जीवत्वीं, भिन्नत्व पाही ॥ देह बिर्‍हाडीं, तोचि राही ॥
वृथा मी माझें, असें पाही ॥ (हें) देह त्यागीं, कळतसें ॥४॥
ऐसा जाणा, लिंग देह ॥ न धरी कदापि, संदेह ॥
आत्मा लिंग देहीं, स्थीर ॥ तया मात्र, न सोडी ॥५॥
स्थूल देह हें, भोगस्थान ॥ कर्मचक्रीं, मानापमान ॥
देह धरोनी, सोडोन ॥ भोगार्थीं तो, हिंडतसे ॥६॥
कर्णेंद्रियांनीं, श्रवण करणें, ॥ त्वचेवाटें स्पर्श घेणें ॥
नेत्नद्वारें, सर्व पहाणें ॥ नाना सृष्टी, रूपातें ॥७॥
जिव्हे वाटें, रुची घेणें ॥ घ्राणद्वारें, परिमळणें ॥
वाचेनें ते, शब्दोच्चारणें ऽ ॥ ऐसा अनुभव, जीवाशीं ॥८॥
हस्तद्वारें, कर्में करणें ॥ पादद्वारें, नृत्य चालणें ॥
शिश्नद्वारें, रती भोगणें ॥ गुदें मल, विसर्जन ॥९॥
हया इंद्रियांतें, तूंति जाणी ॥ क्षेत्रक्षेत्रज्ञ, विलक्षणी ॥
हें नसे आत्म्याच्या, लक्षणीं ॥ एक साक्षित्वा, वांचोनी ॥१०॥
दीप प्रभेमाजीं, कांहीं ॥ आलें गेलें, लावलाही ॥
दीपाशीं विकार, नसे कांहीं ॥ व्यवहाराचा, साक्षी तो ॥११॥
तैसा आत्मा, साक्षी दारू ॥ देखोनि सर्वही, निर्विकारू ॥
नाहीं म्हणतां, आहे, साचारू ॥ हेंचि लक्षण, आत्म्याचें ॥१२॥
श्रवण, स्पर्शन, आणि दर्शन ॥ रुचिस्वाद, अवग्रहण ॥
सर्वही ज्ञात, इंद्रियेंकडून ॥ ऐसे विषय, भोगीतसे ॥१३॥
शब्द स्पर्श, रूप, रस, गंध ॥ पंच भूतांचे, धर्मसबंध ॥
पावे इंद्रियद्वारें, आनंद ॥ मलमैथुन, गुप्तेंद्रियें ॥१४॥
प्राणापान, व्यान, उदान ॥ समानादि स्थानें, संपूर्ण ॥
चालक प्रधान, प्राण पूर्ण ॥ तरी जाणता, तूंचि तूं ॥१५॥
अंत: करण, मनोबुद्धी ॥ चित्ताहंकार, पांचा भेदी ॥
स्फुतीं जाणशी, सर्वा आदि ॥ तरी आत्मा, पूर्वींचा ॥१६॥
अंत: करणीं, अत्यंत पूर ॥ पुरामाजी, मनतरंग ॥
तया निरसोनी, सत्वर ॥ जाणी शुद्धात्मा, तूंचि तूं ॥१७॥
आत्म्यालागीं, स्फुरण जहालें ॥ मागुती जाणणें, उठावलें ॥
तया म्हणोचि नये, पहिलें ॥ आत्मा पहिला, ऐताची ॥१८॥
अंत: करण, वृत्तिस्फुरण ॥ संकल्प विकल्प, तेंचि मन ॥
तीच निश्चिता, होता जाण ॥ बुद्धीच तिजला, म्हणावें ॥१९॥
निश्चित असावा, तोचि अर्थू ॥ तेथेंचि संधाना, त्मक हेतु ॥
तेंच चित्त, असें जाण तूं ॥ तत्प्रवृत्ती, अहंकार ॥२०॥
अंत: करण, पंचक स्फूर्ती ॥ तेथेंचि असे, स्वयंज्योती ॥
स्वानुभव ज्ञानी, स्वसंवेद्य मूर्ती ॥ ऐसा आणिजे, आत्मा तूं ॥२१॥
कापुसापासूनी, जैसा दोरा ॥ तोचि भासे, केवळ दुसरा ॥
तैसें मन बुद्धी, चिताहंकारा ॥ भिन्न भासती, स्वरूपाहूनी ॥२२॥
पीळ उकलितां, जैसा दोरा ॥ म्हणतां कापूस, तोचि खरा ॥
उकलितां, नुकलितां, दुसरा ॥ कापुसामाजीं, भेद नसे ॥२३॥
जैसा उदाकाचा, तरंगु ॥ भिन्न भासतो, वृथा रंगु ॥
विरालिया, होई भंगु ॥ उदकीं उदक, मिळतसे ॥२४॥
जैसे तरंग, आणि दोरा ॥ उकली पीळ, आणि वारा ॥
तैसा लिंगदेहाचा, उभारा ॥ गुण - माया, करीतसे ॥२५॥
उकलिया अथवा, मुरालिया ॥ पीळ वारा, जाईलया ॥
आत्मज्ञानें, तैशी माया ॥ मिथ्या भासी, वाटेल कीं ॥२६॥
तरंग जल दोरा, कापुस ॥ भ्रष्ट ज्ञानें, दुजे भासत ॥
परब्रम्हीं होतां, समरस ॥ अज्ञान हारपें, सत्वरी ॥२७॥
असो ही स्फूर्तीची, कल्पना ॥ ती अंत: करणीं, द्विधे मना ॥
तेथेंचि स्वप्नावस्था, जाणा ॥ होते नुसती, वासनामय ॥२८॥
मन प्रवर्ते, इंद्रियद्वारें ॥ वासना अभ्यंतरीं, ती विवरे ॥
स्वप्नावस्थेनें, करी घरें ॥ श्रवणें द्दष्टी, अभ्यासे ॥२९॥
तैजसाभिमानी, जो द्दश्य ॥ सर्वांच्याही, ओळखीस ॥
तोचि अंतस्थ, चिदाभास ॥ प्रतिबिंब, चैतन्य, ईशाचें ॥३०॥
आदित्य लोपतां, जैसा अग्नि ॥ तरी तो तदंशी, दिनमणी ॥
तैसा चैतन्यरूपीं, जो अंतरीं ॥ तोचि स्वयं, प्रकाशात्मा ॥३१॥
जरी नसे, जाणिव कांहीं ॥ तरी नचि स्फुरावें, कांहीं बाही ॥
चिदाभासें, आभ्यास पाही ॥ इंद्रियद्वारें, मायेमुळें ॥३२॥
तुझीच असे ही, जाणिव कळा ॥ घेवोनि हिंडशी, देहभोपळा ॥
तुझां तूंची, गोरा काळा ॥ ओळखूं जाणे, तुझाचि तूं ॥३३॥
तूंच स्फुरशी, तूंच जाणशी ॥ तूंच बोलशी, तूंच ऐकशी ॥
ऐशा विवेकें, तुला तूंची ॥ पहावे नित्य. सर्वदा ॥३४॥
विवेकें प्रकाशे, अंत:करण ॥ सर्वांतर्यामीं, असतें समान ॥
अभ्यासें, हें न वाटे, अप्रमान ॥ परदेहज्ञान, होतसे ॥३५॥
आत्मा सर्वत्र, तोच मीच ॥ देहभिन्नत्वें, वृथाभासच ॥
तो घटद्दष्टया, उंच निंच ॥ नसे कांहीं ज्ञान्याशीं ॥३६॥
आत्मा स्वतेजें, स्फुरतसे ॥ अजाण रहाणें, हेंच पिसें ॥
मायाभ्रांती, हीच असे ॥ तीच घालवा, सत्वरीं ॥३७॥
नेणिव सर्वथा, निरसुनी ॥ नाणिव धरावी, उल्हासुनी ॥
मग माया, वृथैव, भासुनी, ॥ आत्मज्ञान, लाभेल कीं ॥३८॥
जाणिव शक्ती, सत्य प्रभा ॥ असे आत्मा, स्वयंभू उभा ॥
दीप आपुलियेची, शोभा ॥ आपुला आपण, स्वयंज्योती ॥३९॥
मृगजल जैत्तें, वृथा भासन ॥ हें जाणोनि करावें, निरसन ॥
मग पहावें, आपुलें आपण ॥ हेंचि जाण, आत्मज्ञान ॥४०॥
मन रिझवी, आपुल्या ठायीं ॥ मीच आत्मा, ऐसें पाही ।
मग रूपीं, ऐक्य होतां ॥ (मग) नुरे कांहीं, तत्वचिंता ॥
दु:खाविणें, आनंद तत्वता ॥ ऐसा सिद्धान्त, आहे कीं ॥४२॥
निश्चयेंकरोनि, श्रम कीजे ॥ कैवल्य मुक्तीतें, पाविजे ॥
जग देह द्वैत, भावादि त्यागिजे ॥ गुरुपदेश, हाच कीं ॥४३॥
लिंगदेहाचें, विवरण ॥ (केवळ) गुरुकृपें, होते जाण ॥
तरी न लाभे, श्रमावीण ॥ आत्मा जरी, आहेस तूं ॥४४॥
लिंगदेहीं, आत्मा स्थित ॥ म्हणूनीच ज्ञान, व्यवस्थित ॥
तेथेंचि संपादी, अदभुत ॥ देहीं लक्ष, नकोरे ॥४५॥

इति श्रीपरमामृते मुकुंदराजविरचिते सूक्ष्मलिंगदेहविवरणं नाम पंचमं प्रकरणं संपूर्णम् ॥ श्रीब्रम्हार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP