॥ अथ शून्यविवरणप्रारंभ: ॥
श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
जें ब्रम्हाशून्य, भाविजे (१) ॥ तरी तें कल्पूनि, नांव दीजे (१) ॥
जें अपोआप, आपणा सुचे ॥ तें शून्य कैसे, म्हणावें ? ॥१॥
जो त्या शून्यातें, नीत जाणे ॥ तो विरुद्ध कांहीं, नचि म्हणे ॥
जें कांहींच नाहीं, ऐसे तेणें ॥ आपणा कैसें, जाणिलें ॥२॥
जयाच्या ठायीं, नसे द्दश्य ॥ द्दश्याशि द्दश्यत्वें, अद्दश्य (२) ॥
जयाचा तयाशींच, प्रकाश ॥ अनुभवें ब्रम्हा, कळतसे ॥३॥
कल्पित जडाकार, देखतां ॥ अंतरीं भासे, सत्यता (३) ॥
तरी तो जड अजड, तत्वता ॥ ऐसे जाणतां, स्फूर्तीच खुटे ॥४॥
अभावा परी ब्रम्हा भासे ॥ तरी अनुभवतें, उत्तम खासें (४) ॥
तया शून्य, म्हणतां, कैसे ? ॥ शून्याचाची, पसारा (१) ॥५॥
शून्याचें तरी, शून्यपण ॥ ज्ञानीच कल्पितो, आपण ॥
तोचि तेथें, होतो लीन ॥ गोडी लागतां, शून्यची ॥६॥
तेंचि शून्य, ना जाणिव ॥ तेंचि ना द्दश्य, ना नेणिव ॥
ज्ञप्तिमात्रेचि. केवळ भरिव ॥ ऐसेचि स्वयें, अनुभवतें ॥७॥
जें निरंतर असें, निर्मल ॥ ज्ञानघन असे तें, केवळ ॥
चिदानंदमय जें, अखिल (५) ॥ अगोचर सर्वांशीं ॥८॥
जेथें अद्दश्य, अशून्याकार ॥ ज्ञान खर्चिलें, जरी अपार ॥
तरी तें सूक्ष्माहूनी, सूक्ष्मतर ॥ अनुभव मात्र, देतसे ॥९॥
जें निष्कलंक, ज्ञानाकाश ॥ करी शून्या, काशाचा, र्हास ॥
होतां निजद्रष्टा, स्वयंप्रकाश ॥ अनुभव परमात्मा, तोचि असे ॥१०॥
तो निरालंब, केवळ साक्षी । असे निर्लेप, सर्व पक्षीं ॥
गुणावगुण, तया नसती ॥ ऐसा परमात्मा, तूंचि तूं ॥११॥
न लगे कोठेंहीं, जाणें येणें ॥ नलगे ब्रम्हांडीं, शोध करणें ॥
पिंडदेहीं, त्याचें राहणें ॥ तेथेंचि पहावें, तयाशीं ॥१२॥
सर्व साक्षित्वाचें, जें दीपन ॥ आत्मानंदाचें, असे स्थान ॥
सच्चिदानंदरूपी, जें निधान ॥ ऐसा ठेवा, देहांतची ॥१३॥
ऐसा परमात्मा, विलक्षण ॥ अज्ञानें न कळे, त्याचें लक्षण ॥
त्याचा महिमा, सुलक्षण ॥ म्हणूनचि त्याशीं, साधावे ॥१४॥
ब्रम्हा तत्वांश, अनुवादणें ॥ ऐकावा तो, शुद्धान्त:करणें ॥
नित्याभ्यासें, नीत चिंतिणें ॥ बाणावे ब्रम्हा, सर्वांगीं ॥१५॥
द्दष्टी ठेवोनी, निश्चल बैसे ॥ चित्त रमवावें, समरसे ॥
धरसोडीनें, तो , प्रकाशे ॥ प्रथमारंभीं, असाच कीं ॥१६॥
समाधी योग, हट्टादिक ॥ प्रपंचासक्ता, नसे ठीक ॥
निश्चयबळें, आत्मा एक ॥ साक्षात्कारें, खुलतसे ॥१७॥
देव मुक्ती, चारी जाण ॥ तीही प्राप्ती, परम कठिण ॥
त्याही चारी, वलांडून ॥ कैवल्यीं, पावणें दुर्घट ॥१८॥
ऐसा हव्यास, परमहंसा ॥ श्रम नोव्हे तो, ऐसा तैसा ॥
लाभ होणें, प्रारब्ध हिस्सा ॥ (तरी) यत्नें सिद्धी, होतसे ॥१९॥
यत्नाअंतीं, परमेश्वरू ॥ धरी हा निर्घार, साचारू ॥
जन्मोजन्मीं, यत्न करूं ॥ म्हणतां, सिद्धी होतसे ॥२०॥
इति श्रीपरमामृते मुकुंदराजविरचिते शून्यविवरणं नाम अष्टमं प्रकरणं संपूर्णम् ॥ श्रीब्रम्हार्पणमस्तु ॥