प्रसंग सतरावा - अष्टदळ-झडती
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
महाराष्ट्र भाषा बोलणें बोली । सांगेन अंतरीची सखोली । विवंचना करूनि वेगळाली । श्रोती गुह्य ध्यावें ॥७६॥
आतां श्रोती दृढ धरावी क्षिती । बोलेन भेदाची युक्ती । ज्याकारणें साधक कष्टती । तें सांगतां जालों परियेसा ॥७७॥
पडजिभेचें अर्ध नळ । त्या बोलिजे अष्टदळ कमळ । तें अर्ध लोंबें अंतराळ । ऊर्ध्वं स्थळीं शिंपीपासी ॥७८॥
एका खांबावरी द्वारका । सिद्ध साधु त्यास म्हणती ऐका । हे गुह्य गुजाची टीका । सांगो आरंभिली ॥७९॥
आतां मनाचें उड्डाण परियेसा । दिलावरी बैसल्या आठवी जगदीशा । आणीक कांहीं विश्र्वासा । येवों नेदीच पैं ॥८०॥
दिलावरी मनाची अखंडता । तेथें अनाचार न घडे सर्वथा । बाष्कळ ऐकोनि वार्ता । कांटाळा वाटे ॥८१॥
जेव्हां मन बैसे फोपसीं । तेव्हां उच्चाटण करी परियेसी । स्थिर न राहे एके रहणीसी । चळबळ चंचळपणें ॥८२॥
मन काळजी बैसल्या उपरी । चिंता वाटतसे नानापरी । आपणास आपण फजित करी । नाना छंदें ॥८३॥
नाना छंदाचें विनोद भाव । कर्माकर्माची उमटे माव । अविद्येची उमटे ठेव । गुण काळजी बैसल्याचा ॥८४॥
जेव्हां मन तिळीवरी फिरे । तेव्हां काम वैराग्य संचरे । परद्वार प्रपंचासी झुरे । चेतनेसंगें ॥८५॥
जरी तिळीवरी मनाची अखंडता । तरी शरीराची होय वोरंगता । भावें ऐका उत्तम वार्ता । विश्र्वास धरूनियां ॥८६॥
जेव्हां पितांबरी बैसें मन । तेव्हां महा क्रोध चढे जाण । सकळ संचरे अवगुण । देहामध्ये ते अवसरी ॥८७॥
जरी पितांबरी मन अखंडपणें । तरी शीघ्र कोपे तामसपणें । खवळून ये जैसें सुनें । पाठी लागे भुंकी बडबडी ॥८८॥
जेव्हां हे मन चढे त्रिवेणीं । तेव्हां सहज समाधि बैसे लोचनीं । जिकडे पाहे तिकडे स्वरूपावांचुनी । दुजें आनु न भासे ॥८९॥
मग बाहिज अंतरीं निज । दिसे भासे ब्रह्मबीज । सहजी समाधि लागे सहज । चहूं अवस्थामध्यें ॥९०॥
या अष्टदळावेगळें ज्याचें मन । तो असे भ्रमिष्ठ पिसा व्याहन । अवगुण अविद्या अवलक्षण । सहज स्वभाव त्याचे ॥९१॥
त्या नांव वायफळ पिसा । श्रीहरि न ये त्याच्या विश्र्वासा । अपेशी जन्मला परियेसा । प्रळयेलागून ॥९२॥
ऐशी अष्टदळाची झडती । सांगितली विज्ञान व्यक्ती । त्याहूनि सांगतो उघड प्रचिति । परी संत कोपतील मातें ॥९३॥
ऐसें हे मन चंचळ दारुण । होतें अंहकाराचें प्रधान । तें धरिलें स्वयें पाताऊन । सद्गुरु कृपेनें ॥९४॥
Last Updated : November 11, 2016
TOP