श्रीगणेशाय नमः
श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
ओं नमः परमात्मने पुराणपुरुषाय परमकारुणिकाय सच्चिदानंदाय महापुरुषाय नमोनमः ॥
॥ श्लोकः ॥
यं ब्रह्मावरुणेंद्ररुमरुतः स्तुन्वंति दिव्यैः स्तवैर्वेदैः सांगप दक्रमोपनिषर्गायंति यं सामगाः ॥
ध्यानावस्थिततद्नतेन मनसा पश्यंति यं योगिनो यस्तांत न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः ॥१॥
जयजयाजी वेदसारा ॥ सगुणनिर्गुणपरात्परा ॥ अचलानंता अपरंपारा ॥ ज्ञानमूर्ती ॥१॥
तुझें करितां आराधन ॥ संतुष्ट होती स्वेष्टदेवगण ॥ आणि ग्रंथनिरुपण ॥ निर्विघ्न होय ॥२॥
त्या तुज करोनि नमस्कार ॥ बोलिजतों कथा सारतर ॥ जेणें श्रोतयां आनंद अपार ॥ पावे सुखशांती ॥३॥
मागां जाहला स्तबक द्वादश ॥ आतां त्रयोदशाचा सौरस ॥ शांतिपर्वकथा विशेष ॥ श्रोताजनीं आयकिजे ॥४॥
जन्मेजय राजा भारती ॥ वैशंपायन वेदमूर्ती ॥ या दोघांची सुखसंगती ॥ घडली येकीं ॥५॥
यावरी ह्नणे राजा भारत ॥ मुने तूं केवळ ज्ञानादित्य ॥ तवसंगतीनें जाहला अंत ॥ माझिये अज्ञातनतमाचा ॥६॥
कीं तूं पापघ्न गंगाओघ । दैवें जोडला तुझा संग ॥ जाहला सर्व दोषां भंग ॥ तुझेनि वाचारसें ॥७॥
मागां स्त्रीपर्वीची कथा ॥ आणिली माझिये हदयपंथा ॥ आतां शांतिपर्वीची व्यवस्था ॥ सांगें कृपा करोनी ॥८॥
मग ह्नणे वैशंपायन ॥ राया तूं श्रोतयांमाजी धन्य ॥ तरी ऐकें चित्त देवोन ॥ अपूर्व भारतामाजी ॥९॥
हें शांतिपर्व विचारितां ॥ वेदशास्त्रांची कल्पलता ॥ पुरवी सकळ मनोरथां ॥ होय दुःखनाश ॥१०॥
याचीं तीन स्थानें उत्तम ॥ राजधर्म आपद्धर्म ॥ तिसरें तें मोक्षधर्म ॥ संगम जाणों त्रिवेणींचा ॥११॥
हें त्रिभुवन कीं त्रिगुण ॥ त्रिमात्रा कीं त्रिमूर्ति जाण ॥ तिन्ही अंशविवरण ॥ महावाक्य हें ॥१२॥
क्रमेंचि सारासार प्रमाणीं ॥ तुज सांगेन उद्धरोनी ॥ जेवीं धर्मासि शांती भीष्माचेनी ॥ तैसी सिद्धी होय तूतें ॥१३॥
राया ऐकें सादर ॥ उदकदान केलियानंतर ॥ पांडव विदुर धृतराष्ट्र ॥ सहित सर्व स्त्रिया ॥१४॥
मास येक परियंत ॥ सूतक निवर्तूनि समस्त ॥ नगराबाहेर दुःखित ॥ राहिलीं देखा ॥१५॥
तेथ व्यासादि सकळ ऋषी ॥ सिद्ध ब्रह्मचारी परियेसीं ॥ ज्ञानीं धर्मदर्शनासी ॥ आले भागीरथीये ॥१६॥
त्यांहीं पांडवांची पूजा घेउनी ॥ धर्मा समजाऊं लागले मुनी ॥ जे तूं धर्ममार्गे करोनी ॥ युद्धीं शत्रु मारिलेसी ॥१७॥
वडिलाचें नांव राखिलें ॥ समग्र राज्य घेतलें ॥ बहुत बरवें जोडिलें ॥ अगा धर्मराया ॥१८॥
तंव बोलिला युधिष्ठिर ॥ कीं ज्ञाति सोइरे सहोदर ॥ यांचा करोनि संहार ॥ राज्यसुख कायसें ॥१९॥
अहो मज उदकदानसमयीं ॥ कुंती बोलिली लवलाहीं ॥ कीं कर्ण बंधु त्याचेंही ॥ करीं उदकदान ॥२०॥
आमुचा बंधु ह्नणोनि बहुत ॥ दुःख जाहलें हदयांत ॥ आणि बोलिला सूर्यसुत ॥ मातेप्रती ॥२१॥
ह्नणे मी जरी सख्य करुं ॥ तरी अवघड लोकाचारु ॥ ह्नणतील भ्याला कर्णवीरु ॥ अर्जुनासी ॥२२॥
तरी कृष्णार्जुना जिंकोन ॥ मग तयांसीं सख्य करीन ॥ तेव्हां कुंती बोलिली वचन ॥ युद्धीं रक्षणें पांडवां ॥२३॥
यावरी तो ह्नणे मातेसी ॥ पार्थावेगळें राखीन चौघांसी ॥ तूं पंचपुत्रा निश्चयेंसीं ॥ न करीं चिंता जननीये ॥२४॥
अर्जुनाचा जालिया घात ॥ पंचपुत्र कर्णासहित ॥ कर्ण मेलिया तरी सत्य ॥ अर्जुन पांचवा ॥२५॥
ऐसा कर्णाचा पूर्ववृत्तांत ॥ तो पडिलियावरी समस्त ॥ मज कुंतीनें केला श्रुत ॥ तैं बंधु हें समजलें ॥२६॥
तेव्हां नारद बोले वचन ॥ कीं कर्णार्जुनविरोधावांचून ॥ कुंतीपुत्र स्वर्गभुवन ॥ पाविजती केवीं ॥२७॥
ह्नणोनि कन्यागर्भ भला ॥ कर्ण सूर्यपुत्र जाहला ॥ धर्मा पूर्वील सांगतों तुजला ॥ ऐकें सावधान ॥२८॥
अर्जुनाची ब्रह्मास्त्रसार ॥ विद्या देखोनि अपरंपार ॥ एकांतीं ह्नणे कर्णवीर ॥ द्रोणगुरुसी ॥२९॥
कीं ब्रह्मास्त्रविद्या मातें ॥ स्वामी सांगाजी निरुतें ॥ सर्वशिष्य असती तुह्मातें ॥ समानचि कीं ॥३०॥
द्रोण ह्नणे ययाउपरी ॥ कीं ब्रह्मास्त्र द्विजासि अवधारीं ॥ अथवा तपस्वी क्षेत्री ॥ यासीचि फळे ॥३१॥
तूं प्रयत्न नको करुं ॥ ह्नणोनि अभिमानें सूर्यकुमरु ॥ वेष धरिता जाहला परिकरु ॥ ब्राह्मणाचा ॥३२॥
परशरामाजवळी गेला ॥ गुरुशुश्रूषें राहिला ॥ अस्त्रविद्या सर्व पावला ॥ परि प्रमाद घडला एक ॥३३॥
कर्ण येकदा धनुष्यपाणी ॥ गेला सिंधुतीरीं भ्रमणी ॥ तेथ होमधेनु देखिली नयनीं ॥ अग्निहोत्रियाची ॥३४॥
तिये विंधिलें अज्ञानें ॥ ह्नणोनि विप्रें शापिलें तेणें ॥ अधमा ज्याचेनि अभिमानें ॥ अस्त्रविद्या शिकलासी ॥३५॥
त्यासिं भिडतां संग्रामकाळीं ॥ रथचक्रें गिळील महीतळी ॥ शिर पाडील तिये वेळीं ॥ तोचि तुझें ॥३६॥
ऐसा दारुण शाप जाहला ॥ येरु रामाजवळी आला ॥ सर्व वृत्तांत सांगीतला ॥ तंव काय करी अविनाश ॥३७॥
त्याचें बाहुबळ आणि प्रीती ॥ जाणोनि संतोषला चित्तीं ॥ मग ब्रह्मास्त्रविद्यागती ॥ निरुपिली सांग ॥३८॥
पुढें कित्येका काळांतरीं ॥ कर्णाचिये मांडीवरी ॥ शिर ठेवोनि वनांतरी ॥ राम शयनीं रिघाला ॥३९॥
इतुकियांत कोणी येक ॥ कृमी रक्तमासभक्षक ॥ येवोनि झोंबला सम्यक ॥ कर्णमांडीसी ॥४०॥
निद्रा भंगेल गुरुची ॥ ह्नणोनि येरु न हालवीची ॥ कीटकें मांडी कोरोनि सवेंची ॥ कांटा शिरीं रोविला ॥४१॥
राम चडफडोनि उठिला ॥ पाहे तंव रक्तपूर चालिला ॥ उष्णरक्तस्पर्शे भ्याला ॥ परशराम ॥४२॥
आणि आठपाय महावक्त्र ॥ मेदमांसभक्षक भ्रमर ॥ ऐसा देखिला तंव शीघ्र ॥ तेणें प्राण सांडिला ॥४३॥
अंतरिक्ष करितां गमन ॥ राक्षस कृष्णांग मेघवाहन ॥ तेथोनि कर्णाप्रति वचन ॥ बोलता जाहला ॥४४॥
अगा तवप्रसादें निरुतें ॥ मी स्पर्शलों या रामातें ॥ तुवां सोडविलें मातें ॥ नरकापासोनी ॥४५॥
तरी तुज होवो कल्याण ॥ तंव बोलिला रेणुकानंदन ॥ तूं सांगरे कोणाचा कोण ॥ कां नरक पावलासी ॥४६॥
येरु ह्नणे मी दितिकुमर ॥ पूर्वील दंशनामा असुर ॥ म्यां हरिली कामपर ॥ कांता भृगूची ॥ ॥४७॥
तेणें शापिलें आवेशीं ॥ जे तूं मूत्रश्लेष्मविशेषीं ॥ माजी पडोनी अशन करिसी ॥ त्याचि नरकाचे ॥४८॥
अंतीं परशरामापासोनी ॥ मुक्त होसील पापयोनी ॥ तो उःशाप तुमचेनी ॥ जाहला आजी ॥४९॥
ऐसा उद्धरला दंशासुरु ॥ जेणें कोरिला कर्णऊरु ॥ परि ग्रंथांतरींचा विचारु ॥ इंद्र भ्रमररुपें ॥५०॥
यावरी राम ह्नणे कोपोनी ॥ हें साहस नव्हे क्षत्रियावांचोनी ॥ तूं मिथ्यावादी तरी निर्वाणीं ॥ न स्फुरे ब्रह्मास्त्र ॥५१॥
असो कर्ण तन्निमित्तें शापिला ॥ मग तो दुर्योधना भेटला ॥ त्याचेनि बळें पुरुषार्थ केला ॥ गांधारें सकळ ॥५२॥
कलिंगदेशींचा नृपवर ॥ चित्रांगद नामें परिकर ॥ त्याचिये घरीं स्वयंवर ॥ मांडलें कन्येचें ॥५३॥
सर्व मिळालीं भूपाळकुळें ॥ तेथ कर्णाभीष्माचेनि बळें ॥ कन्या हरोनि राजे जिंकिले ॥ दुर्योधनें सकळ ॥५४॥
कर्ण बलाढ्य जाणितला ॥ ह्नणोनि जरासंधें ते वेळां ॥ द्वंद्वयुद्धा पाचारिला ॥ दोघां जाहला धडधडाट ॥५५॥
तैं जरासंधाची देहसंधी ॥ कर्णे भेदूनि पाडिली युद्धीं ॥ मग काकुळती केली बुद्धी ॥ टाकोनि वैर ॥५६॥
अंगदेशींची राजधानी ॥ जिये नाम वंगमालिनी ॥ ते कर्णाप्रति देउनी ॥ निवारिलें वैर ॥५७॥
तैं पासोनि सूर्यपुत्र ॥ अंगवंगदेशींचा नृपवर ॥ राजा जाहला महाथोर ॥ दुर्योधनानुमतें ॥५८॥
तो महाउदार जाणोनी ॥ ब्राह्मणवेषें वज्रपाणी ॥ भिक्षा मागता जाहला येवोनी ॥ कवचकुंडलें ॥५९॥
तो विप्ररामाचे शापदानें ॥ आणि कुंतीचे वरदानें ॥ कर्ण महावीर अर्जुनें ॥ मारिला युद्धीं ॥६०॥
ऐसा कर्णाचा वृत्तांत ॥ नारदें धर्मासि केला श्रुत ॥ ह्नणे शोक सांडीं निश्चित ॥ धर्मराया ॥६१॥
तंव कुंती धर्मासि प्रबोधी ॥ कर्ण बंधु परि तुमचा विरोधी ॥ ह्नणोनि म्यां उपेक्षिली बुद्धी ॥ किमर्थ शोचितोसी ॥६२॥
तेव्हा धर्मे मातेसि शापिलें ॥ कीं स्त्रियांचा आशय नकळे ॥ ह्नणोनि आजिवरी वंचिलें ॥ तरी तें होवो विपरीत ॥६३॥
मग धर्म ह्नणे पार्थातें ॥ त्रैलोक्यराज्य नलगे मातें ॥ तेथें या वसुमतीचें निरुतें ॥ कोठें लागे ॥६४॥
आतां अरण्यांत जाऊन ॥ राहीन तीर्थयात्रा करुन ॥ करीन प्रायश्चित्त जाण ॥ ज्ञातिवधाचें ॥६५॥
हें पूर्वजांचें राज्य ॥ समर्पण केलें तुज ॥ तूं प्रतिपाळीं पृथ्वी सहज ॥ आपुली हे ॥६६॥
माखली गोत्रजांचे रक्तें ॥ ते वसुमती नलगे मातें ॥ मी आत्महित यथार्थे ॥ करीन आपुलें ॥६७॥
ऐसें बोलोनि तयेवेळां ॥ धर्मराय स्तब्ध जाहला ॥ तंव अर्जुन बोलूं लागला ॥ तयाप्रती ॥६८॥
अगा राज्यत्यागीं सकळिक ॥ निंदितील तुज लोक ॥ जे शोच्य पतित नपुंसक ॥ ते दरिद्री दीर्घसूत्री ॥६९॥
आणि अधर्मी ह्नणोनी ॥ संसर्ग न करितील कोणी ॥ राज्यें पुरुषार्थे साधती जाणीं ॥ धर्मार्थकाममोक्ष ॥७०॥
अर्था वेगळे सर्वत्र ॥ अमंगळ प्राणिमात्र ॥ ऐसें जाणोनि राज्यभार ॥ स्वीकारिला महतीं ॥७१॥
दिलीप आणि अंबरीष ॥ पृथुराय मांधाता देख ॥ हरिश्चंद्रादि अनेक ॥ राज्य करिते जाहले ॥७२॥
भीम ह्नणे क्षत्रियासि अंतीं ॥ राज्याविण अमंगळ ह्नणती ॥ तुज उभयलोक अंतरती ॥ राज्यत्यागें ॥७३॥
मग एक कथा धर्माप्रती ॥ पार्थे कथिली एतदर्थी ॥ कीं पूर्वी ऋषिपुत्र वनांतीं ॥ चारी होते ॥७४॥
ते आपुले तारुण्यपणी ॥ मातापितरांतें सांडोनी ॥ संन्यास घेत होते तंव वज्रपाणी ॥ आला पक्षिरुपें ॥७५॥
तो त्यां सांगता जाहला धर्म ॥ कीं वर्णीमाजी गृहस्थाश्रम ॥ सकळांहूनही उत्तम ॥ आचरणीय ॥७६॥
सर्व विफळ त्या वांचोन ॥ ऐसें ऐकोनि ते ब्राह्मण ॥ जाणोनि उभयलोकसाधन ॥ अवलंबिते जाहले ॥७७॥
यावरी नकुळसहदेव प्रीतीं ॥ बोलिले धर्मासि इये अर्थी ॥ कीं राज्य करितां पाविजती ॥ कीर्तिसंतोष ॥७८॥
आणि धर्म तीर्थ तप यज्ञ ॥ चारही पुरुषार्थ दान ॥ येणें साधती ह्नणोन ॥ करावें राज्य ॥७९॥
यावरी बोलिली द्रौपदी ॥ तुह्मी ह्नणतसा वनामधीं ॥ कीं राज्यपावलिया युद्धीं ॥ करीन यज्ञदान ॥८०॥
सर्वभोग भोगीन ॥ सोइरेयांचा प्रतिपाळ करीन ॥ तो सर्वमनोरथ जाण ॥ आतां व्यर्थ गेला ॥८१॥
राया नपुंसकासि पाहीं ॥ धराधनपुत्रभोग नाहीं ॥ ह्नणोनियां पुरुषार्थ सही ॥ करावाची ॥८२॥
क्षत्रिया आचरणीय उत्तम ॥ दंड हाचि नीतिधर्म ॥ तेणें होइजे पूर्णकाम ॥ भूमिभोग सर्वार्थीं ॥८३॥
होय प्रतिपाळ संतांचा ॥ आणि निग्रह असंतांचा ॥ पराजय परसैन्याचा ॥ राज्याचिपासोनी ॥८४॥
दंडें स्वर्गलोकीं गती ॥ अदंडें होय नरकप्राप्ती ॥ मग पार्थही दंडस्थिती ॥ बोलता जाहला ॥८५॥
अगा दंडावेगळा नृपवरा ॥ श्रेष्ठ धर्म नाहीं दुसरा ॥ दंडें जागृती आणि निद्रा ॥ प्रजारक्षण ॥८६॥
धर्मधनधान्यसुख ॥ चारीपुरुषार्थे संतोष ॥ ते पुरुषार्थ साधती सम्यक ॥ दंडेंकरुनी ॥८७॥
दंडें सर्वकार्ये सिद्धती ॥ दंडें मर्यादा धर्म नीती ॥ येरयेरांतें भक्षिती ॥ दंडावेगळे ॥८८॥
तो दंड करावा जाण ॥ पाहोनि देशकाळवर्तन ॥ अन्यथा करितां पतन ॥ होय नरकीं ॥८९॥
राया स्थावरजंगम जारज ॥ स्वेदज अंडज उद्भिज्ज ॥ य सर्वाचा धर्म सबीज ॥ दंडें राहिला असे ॥९०॥
दंडें ब्रह्मांडगोळ थांबला ॥ तस्मात् नीतीनें राज्य भूपाळा ॥ करणें याहूनि वेगळा ॥ दुजा धर्म नाहीं ॥९१॥
पार्थ ह्नणे गा भूपती ॥ इतिहास ऐकें इये अर्थी ॥ राज्य सांडोनि भिक्षावृत्ती ॥ धरिली जनकें एकदा ॥९२॥
त्यासी स्त्रियांहीं ह्नणितलें ॥ कीं राज्यदारापत्य सांडिलें ॥ धान्यमुष्टी मागतां जोडलें ॥ काय सांगा ॥९३॥
गृहस्थाश्रमीं तरी जाण ॥ साधती चारी आश्रमवर्ण ॥ कृमिकीटां अन्न जीवन ॥ असे साधत ॥९४॥
तंव धर्म बोलिला युक्तीं ॥ पार्था ऐसिया कर्मगती ॥ गमनागमनें न टळती ॥ भोगाभोग ॥९५॥
सर्व त्यागोनियां वनीं ॥ राहतां योगाभ्यासें करोनी ॥ मनोमळाचिये शोधनीं ॥ होय आत्मदर्शन ॥९६॥
तेथें संसाराची निवृत्ती ॥ ह्नणोनि राज्यभोग टाकिताती ॥ ते जाती वनाप्रती ॥ भले बुद्धिमंत ॥९७॥
ऐसा धर्मशब्द आयकिला ॥ मग कृष्णद्वैपायन बोलिला ॥ अगा यज्ञावेगळें भूपाळा ॥ नाहीं इंद्रपद ॥ ॥९८॥
आणि सायुज्यतादि मुक्ती ॥ त्याही यज्ञाविण नव्हती ॥ तो यज्ञ गा भूपती ॥ दंडें गृहस्थाधीन ॥९९॥
तस्मात् गृहस्थाश्रम ॥ आश्रमांत सर्वोत्तम ॥ हाचि बृहस्पतीनें धर्म ॥ सांगीतला इंद्रासी ॥१००॥
पूर्वी सुद्युम्न नृपमणी ॥ दंडधारणे करोनी ॥ स्वयें पावला स्वर्गभुवनीं ॥ क्षत्रियोत्तम जो ॥१॥
तंव धर्म ह्नणे हो मुनी ॥ तें मज सांगा सद्वचनीं ॥ व्यास ह्नणती चित्त देवोनी ॥ ऐकें सावध ॥२॥
शंख आणि दुजा लिखित ॥ होते बंधु अरण्यांत ॥ आश्रम करोनि दोंठायीं करित ॥ तपसाधना ॥३॥
ज्येष्ठबंधु शंख ऋषी ॥ तया लिखित आला भेटावयासी ॥ परि शंख गेलासे समिधांसी ॥ रिक्तगृह ॥४॥
लिखित क्षुधातुर जाहला ॥ आश्रमीं अमृततरु देखिला ॥ त्याची फळें भक्षूं लागला ॥ अमृतप्राय ॥५॥
शंख येवोनि कांहीं वेळें ॥ ह्नणे गा लिखिता हीं फळें ॥ तूं भक्षितोसि कोठिलें ॥ सांग वेगीं ॥६॥
येरु ह्नणे बंधो शंखा ॥ तुझिये आश्रमींचीं देखा ॥ ऐसें ऐकोनि त्या अबिवेका ॥ आला क्रोध ॥७॥
ह्नणे तूं तंव तस्कर ॥ तुज दंड पाहिजे थोर ॥ तरी आतां जाई शीघ्र ॥ सुद्युम्नरायापाशीं ॥८॥
निवेदीं अन्याय आपुला ॥ येरु रायाजवळी गेला ॥ सर्व वृत्तांत निवेदिला ॥ स्वागतपूर्वक ॥९॥
ह्नणे दीधलिया वेगळीं ॥ म्यां बंधूची फळें भक्षिली ॥ याचा दंड करीं ते वेळीं ॥ विचारिलें रायें ॥११०॥
त्याचे दोनी हात छेदिले ॥ येरें बंधूप्रति बिजे केलें ॥ तंव तेणें ह्नणितलें ॥ जाहली पातकनिष्कृती ॥११॥
आतां बाहुदानदीतीरीं ॥ जावोनि आराधना करीं ॥ मग तो तेथ झडकरी ॥ तप करिता जाहला ॥१२॥
तेणें बाहुदा प्रसन्न जाहली ॥ नूतन करकमळें दीधलीं ॥ सुद्युम्ना परमसिद्धि पावली ॥ तेणें दंडधर्मे ॥१३॥
धर्मराया यास्तव पाहीं ॥ दंडावांचोनि धर्म नाहीं ॥ आणिक राया हयग्रीवही ॥ पावला उत्तमगतीतें ॥१४॥
काळें दुःख काळें सुख ॥ सर्व कालकृत असे देख ॥ ऐसें जाणोनि भले पुरुष ॥ न टाकिती स्वधर्म ॥१५॥
काळ कर्मानुरुप अनंतु ॥ लोकां उपजवी संहारितु ॥ तरी अज्ञानदोषें राया तूं ॥ लिंपूं नको ॥१६॥
अज्ञान ममता सांडोन ॥ सुखी होसी राज्य भोगून ॥ अथवा अश्वमेध करुन ॥ तरसील सर्व ॥१७॥
कायवाड्मनें व्यापारें ॥ धर्म करोनि आर्जवें बरें ॥ अधर्म उपजे तें निर्धारें ॥ करुं नको ॥१८॥
ऐसा धर्मराय समस्तीं ॥ समजाविला नानोपपत्ती ॥ मग युधिष्ठिर तयांप्रती ॥ पुसता जाहला ॥१९॥
ह्नणे तुह्मी समस्तीं ॥ मज सांगा राजधर्मस्थिती ॥ जेणें राज्य करितां नपवती ॥ पराभव दोष ॥१२०॥
तंव ह्नणितलें व्यासें ॥ कीं भीष्मपितामह असे ॥ जो दिव्यज्ञानी विशेषें ॥ जाणे सर्वशास्त्र ॥२१॥
बृहस्पति शुक्र मुख्यकरोनी ॥ इंद्रादिदेवां आराधोनी ॥ जेणें अभ्यासिलें नित्यानी ॥ नीतिशास्त्र ॥२२॥
तो राजधर्म सांगेल ॥ तेणें प्रकारें वर्तसील ॥ तरी उभयलीकसिद्धि होईल ॥ न पापसी पराभवो ॥२३॥
हेंचि श्रीकृष्णें सांगीतलें ॥ तेणें धर्मचित्त संतोषले ॥ मग प्रवेश करिते जाहले ॥ हस्तनापुरीं ॥२४॥
व्यासादिक ऋषि मिळोन ॥ धृतराष्ट्रातें पुढें करुन ॥ सर्वस्त्रिया परिवार जन ॥ घेवोनि धर्म चालिला ॥२५॥
देव ब्राह्मणां पूजिलें ॥ धर्मासि रथीं बैसविलें ॥ भीमें अश्वदोरे धरिले ॥ अर्जुनें छत्र ॥२६॥
तेथ नकुळ चामरें वारी ॥ सहदेव विंजणा धरी ॥ सात्यकी विदुर श्रीहरी ॥ चालिले सपरिवार ॥२७॥
गजाश्व पायद रथ ॥ नगरीं प्रवेशलें समस्त ॥ तंव नगरलोक वाधावत ॥ नीराजना करोनी ॥२८॥
वाद्यघोष थोर लागला ॥ धर्म राजभुवनीं गेला ॥ तंव कन्यासमूह मीनला ॥ सुवर्णकुंभेसीं ॥२९॥
विप्रीं आशिर्वाद दीधले ॥ तेथ येक नवल जाहलें ॥ कर्णे सुखशब्द आयकिले ॥ अंतरस्थ ॥१३०॥
तेणें कर्ण संतोषला ॥ परि दुर्योधन दुःखें वाइला ॥ अंतरीं येवोनि लागला ॥ निंदा करुं ॥३१॥
तो हुकारें वेदध्वनीं ॥ दूरी केला ब्राह्मणजनी ॥ धर्म प्रवेशला गृहस्थानीं ॥ सुखोल्हासें ॥३२॥
मग तीर्थोदक आणोन ॥ व्यासादि ऋषि मुख्य मिळोन ॥ विध्युक्तप्रकारेंकरुन ॥ केला राज्याभिषेक ॥३३॥
सकळ त्रिभुवन आनंदलें ॥ धर्मा राज्यपदीं स्थापिलें ॥ ऐसे पांडव प्रतिपाळिले ॥ नारायणें ॥३४॥
यानंतरें अपूर्व कथा ॥ वैशंपायन सांगेल भारता ॥ ते ऐकावी समूळता ॥ ह्नणे मधुकरकवी ॥३५॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ त्रयोदशस्तबक मनोहरु ॥ धर्मराज्याभिषेक प्रकारु ॥ प्रथमाध्यायीं कथियेला ॥१३६॥
॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥