मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक १३|
स्तबक १३ - अध्याय ५

कथा कल्पतरू - स्तबक १३ - अध्याय ५

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मुनीसि ह्नणे जन्मेजयो ॥ सांगा पुढील कथान्वयो ॥ तंव बोलिला ऋषिरावो ॥ वैशंपायन ॥१॥

ह्नणे युधिष्ठिरें पुसिलें ॥ मग भीष्में निरुपिलें ॥ तें शांतिपर्वोक्त वहिलें ॥ ऐकें राजधर्मी ॥२॥

धर्म ह्नणे हो गंगानंदना ॥ सत्यासत्यविचारणा ॥ कवणे काळीं कवणा ॥ बोलावें सांगा ॥३॥

मग भीष्म असे सांगत ॥ मरणीं विवाहीं धर्मनिमित्त ॥ गाईरक्षणीं असत्य ॥ बोलिजे तें सत्यची ॥४॥

जेणें सत्यवचनें पाहीं ॥ दुसरेयाची हिंसा होई ॥ त्याहोनि दुजें असत्य नाहीं ॥ निरयदायक ॥५॥

पापियां धन देऊंनये ॥ तेणें पापवृद्धी होय ॥ पापिष्ठां तपहीनां रायें ॥ नरक्षिजे जवळी ॥६॥

त्यांच संसर्ग न करावा ॥ पापी अपकारीच सर्वा ॥ ह्नणोनि तो रायें वधावा ॥ तेथ दोष नाहीं ॥७॥

मायावीसीं मायें असावें ॥ साधूसि साधुत्वें वर्तावें ॥ जया ज्याप्रकारीं देखावें ॥ व्हावें तया त्याप्रकारीं ॥८॥

जे अदंभें धर्म करिती ॥ विषयासक्त न होती ॥ अतिथींची पूजा करिती ॥ अध्ययनशीळ ॥९॥

प्राणत्यागींही असत्य न वदती ॥ स्वदारसंतुष्ट अल्परती ॥ कदा संताप न पावती ॥ परस्त्री देखोनी ॥१०॥

पात्रापात्र विचारिती ॥ प्रजार्थचि मैथुनरती ॥ ते उत्तमलोक पावती ॥ वैकुंठादिक ॥११॥

अगा एवंविध जे जन ॥ जगीं वर्तती आपण ॥ ते सकळसंकटां पासोन ॥ तरती सुखें ॥१२॥

तंव धर्म ह्नणे प्रीतीं ॥ कैसी पात्रापात्रस्थिती ॥ ते सांगावी मजप्रती ॥ दृष्टांतवचनें ॥१३॥

गांगेय ह्नणे इये अर्थी ॥ कथा ऐकें येक निरुती ॥ ऋषि एक निर्जनवनांतीं ॥ होता तप करित ॥१४॥

त्याचा सद्भाव देखोनी ॥ सिंहव्याघ्रादि सर्व प्राणी ॥ त्यासवें सुखवार्त करोनी ॥ स्वस्थानीं जाती नित्यानें ॥१५॥

ऐसें देखोनि गांवातिलें ॥ कृशश्वान उताविळें ॥ भाव धरोनि राहिलें ॥ त्या ऋषीजवळी ॥१६॥

परि एकदा श्वाना तया ॥ वेऊळ आला दंशावया ॥ तो देखोनि ऋषिराया ॥ ह्नणितलें श्वानें ॥१७॥

कीं मज रक्षा जी मुनी ॥ मग ऋषीनें कृपा करोनी ॥ श्वानाचा वेऊळ तत्क्षणीं ॥ केला स्वतपोबळें ॥१८॥

मग तेथोनि वेऊळ गेला ॥ येरु निर्भयें राहूं लागला ॥ तंव व्याघ्र भक्षावया आला ॥ समयीं वेऊळासी ॥१९॥

भ्याला तया देखोनी ॥ ह्नणे मज राखा जी मुनी ॥ येरें सामर्थ्ये करोनी ॥ केला व्याघ्र ॥२०॥

पुढें कितियेका काळां ॥ तया माराया कुंजर आला ॥ येचि रीतीं शार्दूळ केला ॥ शेवटीं ऋषीनें ॥२१॥

मग प्राणियाचें हिंसन ॥ पाहिजे बहुत मांसाशन ॥ रक्तलोभें अकृतज्ञ ॥ मारुं लागला ऋषीतें ॥२२॥

यावरी ऋषीनें तपोबळें ॥ श्वानाचें श्वानचि केलें ॥ आश्रमा बाहेर काढिलें ॥ मारोनियं ॥२३॥

ह्नणोनि हीनोत्तमा जाणोनी ॥ रायें परीक्षा पाहोनी ॥ कुलीन श्रुतावृतज्ञानी ॥ कीजे सेवक ॥२४॥

हाचि पात्रापात्र विचार ॥ दुष्टांवरी करितां उपकार ॥ प्राप्त होय संकट थोर ॥ एखादिये वेळीं ॥२५॥

भीष्म ह्नणे पंडुनंदना ॥ ऐकें राजपुरुषलक्षणां ॥ राजा असावा प्रजापाळणा ॥ धर्मतत्पर ॥२६॥

धीर शुचि आणि तीक्ष्ण ॥ समयीं पुरुषार्थ करी जाण ॥ सांगीतलें ऐके वचन ॥ करी ऊहापोह ॥२७॥

दात प्रियभाषी प्रसन्नवदन ॥ धर्मात्मा कुळाचार संपन्न ॥ इत्यादि गुणलक्षणीं जाण ॥ असावा राजा ॥२८॥

तैसेचि मंत्री सज्ञान ॥ योद्धे परिवार प्रधान ॥ राज्यीं असतां सुलक्षण ॥ पावे वृद्धी ॥२९॥

दंडनीतीविण विशेषें ॥ राज्य अकिंचित्कर असे ॥ त्यादंडाचें रुप ऐसें ॥ सांगतो ऐक ॥३०॥

नीलोत्पलदलश्यामवर्ण ॥ चतुर्दष्ट्रभुज जाण ॥ अष्टपाद अनेकवदन ॥ शंखकर्ण ऊर्ध्वरोमा ॥३१॥

जटिल द्विजिव्ह ताम्रवक्त्र ॥ सिंहाचियेपरी शरीर ॥ सर्वायुधें धरी अव्यग्र ॥ येणें रुपें दंड हा ॥३२॥

तो तरी त्रैलोक्यांत ॥ स्वेच्छाचारें असे वर्तत ॥ देवतादिगुणत्रययुक्त ॥ भयंकर रुपें ॥३३॥

श्लोक: ॥

श्रीगर्भो विजय: शास्ता व्यवहारः प्रजागरः ॥ शास्त्रं ब्राह्मणमंतश्च सर्वशस्त्रभृतां वरः ॥१॥

ह्नणोनि येणेकरुनि पाहें ॥ वर्णाश्रममर्यादा राहे ॥ त्यावेगळें सर्व आहे ॥ शून्यवत ॥३४॥

तरी ऐसें हें जाणोन ॥ दंडें कीजे राज्यपाळण ॥ तयावेगळें होय पतन ॥ भूपाळासी ॥३५॥

पूर्वील इतिहास एतदर्थ ॥ राजा वसुहोम स्त्रीसहित ॥ गेला तप कराया वनांत ॥ मेरुपृष्ठीं ॥३६॥

तंव तेथें अकस्मात ॥ आला मांधाता नृपनाथ ॥ येरु तया पूजोनि पुसत ॥ दंडोत्पत्ती ॥३७॥

मांधातें वृत्तांत सांगीतला ॥ कीं ब्रह्मदेवें याग मांडिला ॥ तेथें ऋत्विज नाहीं भला ॥ आत्मतुल्य ॥३८॥

ह्नणोनि वर्षे सहस्त्र तेवेळां ॥ शिरीं सामर्थ्ये गर्भ धरिला ॥ त्याचा क्षुपऋषी जन्मला ॥ शिंकेपासोनी ॥३९॥

तया ऋत्विज असे केला ॥ विधीनें याग आरंभिला ॥ परि दंडाविण जाहला ॥ पापोद्भव ॥४०॥

मग तो शिवा शरण गेला ॥ शिवें आत्म्यापासोनि तेवेळां ॥ दंडपुरुष उत्पन्न केला ॥ तेणें मर्यादा राहिली ॥४१॥

तोचि दंड त्रिभुवनीं ॥ अष्टौलोकपाळां विभागोनी ॥ दीधला तेणें करुनी ॥ राहिली मर्योदा ॥४२॥

तेणें लोकस्थिती सकळ ॥ चाले ऐसा तो केवळ ॥ रुद्ररुपी सबळबळ ॥ दंड जाणीं ॥४३॥

धर्म अर्थ काम मोक्ष ॥ चारी पुरुषार्थ प्रत्यक्ष ॥ परि धर्माविरोधें विशेष ॥ असावे अर्थकाम ॥४४॥

धर्मविरोधें करुनी ॥ पतनीं पडे निश्चयें प्राणी ॥ त्याहूनि येरां तिघांचेनी ॥ नव्हती निवृत्ति मोक्ष ॥४५॥

जे धर्म सांगती सारतर ॥ त्यांतें मानावें निरंतर ॥ सर्वाचें मूळ धर्माचार ॥ तरी तो निश्चयें रक्षावा ॥४६॥

तो आचार कवणेरीतीं ॥ पाविजेतो इये अर्थी ॥ कथा सांगतों तुजप्रती ॥ एकी पुरातन ॥४७॥

एकदा प्रतर्दनें आचारशिळें ॥ इंद्राचें राज्य जिकिलें ॥ ह्नणोनि इंद्र दुःखें बोले ॥ बृहस्पतीसी ॥४८॥

कीं श्रेय आणि सुख वोजें ॥ कोणे उपायें पाविजे ॥ तंव गुरु ह्नणे ऐकिजे ॥ सुरेश्वरा गा ॥४९॥

मनीं इच्छितोसि श्रेयासी ॥ तरी तूं प्रल्हादासी पुशीं ॥ ऐकोनि इंद्र गेला त्यापाशीं ॥ तत्क्षणीं देखा ॥५०॥

ह्नणे प्रल्हादा तूं परियेस ॥ या त्रैलोक्यींच्या राज्यास ॥ कवणेपुण्यें पावलास ॥ तें सांगें मज ॥५१॥

येरु ह्नणे मी अखंडित ॥ वर्ते ब्राह्मणाचे आज्ञेंत ॥ तंव ह्नणे सुरनाथ ॥ प्रल्हादासी ॥५२॥

तुवां धरुनि कृपाळुत्व ॥ मज द्यावें आपुलें शीलत्व ॥ मग तेणें दीधलें शीलत्व ॥ तथास्तु ह्नणोनि ॥५३॥

तंव तद्देहापासोनि तेथ ॥ शील धर्म लक्ष्मी सत्य ॥ चारी निघालीं मूर्तिमंत ॥ तीं देखिली प्रल्हादें ॥५४॥

आपण निस्तेह्ज जाहला ॥ त्यांसी पुसों लागला ॥ तुह्मी कोठें जातां त्यावेळां ॥ बोलिलीं तियें ॥५५॥

तुवां आचार दीधला इंद्रातें ॥ तरी जेथ आचार तेथें ॥ राहणें असे आह्मांतें ॥ सार्वकाळ ॥५६॥

ऐसें ह्नणोनि तिघेंही ॥ गेली इंद्राचिये ठायीं ॥ तस्मात् आचाराहूनि काहीं ॥ नाहीं बरवें ॥५७॥

मागुती पुसे युधिष्ठिर ॥ कीं आशा आकाशाहूनि थोर ॥ तियेहूनि अतःपर ॥ मोठें नाहीं ॥५८॥

तरी हे उपजली कैसी ॥ तंव भीष्म ह्नणे धर्मासी ॥ सुमित्र ऋषभसंवादासी ॥ ऐकें एतदर्थी ॥५९॥

राजा सुमित्र मृगयेसी ॥ गेला होता येके दिवशीं ॥ विंधिता जाहला मृगासी ॥ बाणेंकरुनी ॥६०॥

मृग बाण घेवोनि पळाला ॥ तयापाठीं राव लागला ॥ नदी पर्वतांमाजी भ्रमला ॥ जाहला कष्टी ॥६१॥

तंव दोहोंकोशांचें मान ॥ टाकोनियां बाण ॥ अरण्यीं गेला पळोन ॥ मृगांमाजी ॥६२॥

राजा श्रांत असे जाहला ॥ ह्नणोनि ऋषभाश्रमीं पावला ॥ ऋषीनें आतिथ्यें पूजिला ॥ येरें कथिला वृत्तांत ॥६३॥

ह्नणे मी भग्नाश होउनी ॥ आलों असें तुमचे स्थानीं ॥ आतां आशा आकाश दोनी ॥ सांगा कवण थोर ॥६४॥

तंव ऋषि जाहला बोलता ॥ कीं मी पूर्वी तीर्थे फिरतां ॥ गेलों होतों नृपनाथा ॥ बद्रिकाश्रमीं ॥६५॥

तेथें तनुनामा ऋषिश्वर ॥ म्यां देखिला दुर्बळतर ॥ अंगुलीसमान सर्वत्र ॥ कृश अंग जयाचें ॥६६॥

तया विनयें प्रणाम केला ॥ कुशलप्रश्न आचरिला ॥ तंव रघुद्युम्न राजा आला ॥ पिता भूरिद्युम्नाचा ॥६७॥

तो पुत्रवियोगें मनीं ॥ ह्नणे कैं पुत्र देखेन नयनीं ॥ ह्नणोनि आलों आशा धरोनी ॥ तुह्माजवळी मुनीश्वरा ॥६८॥

ऋषि ह्नणे पूर्वी मातेंही जाण ॥ मुनीश्वरीं आशा लावून ॥ मनोभंग केला ह्नणोन ॥ जाहलों कष्टी ॥६९॥

मग म्यां विचारिलें अंतःकरणें ॥ आतां प्रतिग्रह न करणें ॥ ऐसा नियम करोनि मनें ॥ बैसलों आशा त्यजोनी ॥७०॥

तरी आशेहूनि कांहीं ॥ दुःसह दुःख जगीं नाहीं ॥ जो तिये सांडी सर्वही ॥ तो सुखिया होय ॥७१॥

मग तेणें स्वतपोबळें ॥ रायासि पुत्रदर्शन करविलें ॥ आपुलें दिव्यरुप दाविलें ॥ ज्ञानदृष्टीं ॥७२॥

ऐसा आशें कृश जाहला ॥ तिये टाकोनि दिव्यदेह पावला ॥ हें ऋषभऋषी सांगता जाहला ॥ सुमित्ररायासी ॥७३॥

ह्नणोनियां धर्मा पाहें ॥ निराश तोचि सुखिया होय ॥ आशेहूनि जगीं द्वितीय ॥ नाहीं दुःखतर ॥७४॥

धर्मे ऐकोनियां ऐसें ॥ मागुती भीष्माप्रति पुसे ॥ जो राजा मित्रहीन असे ॥ कुमित्रयुक्त ॥७५॥

क्षीणकोश बळहीन ॥ दुष्टअमात्य असून ॥ नाशूं पावे श्रेष्ठपण ॥ परचक्रामिघातें ॥ ॥७६॥

तो सुखिया होय कैसेनी ॥ हें सांगा कृपा करोनी ॥ तंव भीष्म ह्नणे चित्त देवोनी ॥ ऐकें पुण्यात्मया ॥७७॥

कोश बुद्धि आणि न्याय ॥ यांचेनि क्षयें सर्वक्षय ॥ तरी कोशबुद्धीची रायें ॥ वृद्धी कीजे ॥७८॥

सदा ऐकिल्या शास्त्रपुराण ॥ तेणें बुद्धि वाढे पूर्ण ॥ आणि मेळवावें धन ॥ नीतिदंडें ॥७९॥

धनें टळती आपत्ती ॥ धर्मार्थकाम साधती ॥ आपत्तिनिवारणार्थ निश्चिती ॥ संग्रहिजे धन ॥८०॥

ऐसें जाणोनियां राजें ॥ कोशबुद्धीतें संग्रहिजे ॥ तेणें सर्वनिवृत्ति पाविजे ॥ आपत्तीची ॥८१॥

युधिष्ठिरासि ह्नणे भीष्म ॥ हे सांगीतले राजधर्म ॥ सत्या सत्यादि उत्तम ॥ सर्वप्रश्नीं ॥८२॥

वैशंपायन ह्नणे जन्मेजया ॥ हें भीष्में कथिलें धर्मराया ॥ तें म्यां कथिलें संकलोनियां ॥ प्रसंगानुसार ॥८३॥

आणिक उपाख्यानें बहुवस ॥ राजनीती इतिहास ॥ परि शांतिपर्वी विशेष ॥ हेंचि पहिलें ॥८४॥

हे राजधर्म जाणिजे ॥ तैसियापरी वर्तिजे ॥ तरी सर्वश्रेय लाहिजे ॥ नीतिशास्त्रांचे ॥८५॥

आतां शांतिपर्वी आपद्धर्म ॥ युधिष्ठिरातें सांगेल भीष्म ॥ तेचि ऐकावें उत्तमं ॥ ह्नणे कवि मधुकर ॥८६॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ त्रयोदशस्तबक मनोहरु ॥ राजधर्मकथनप्रकारु ॥ पंचमाध्यायीं कथियेला ॥८७॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP