श्रीगणेशाय नमः
वैशंपायना रायें विनविलें ॥ कीं मागां शांतिपर्वीचे भले ॥ राजधर्म निवेदिले ॥ संकलोनी ॥१॥
आतां तेथील आपद्धर्म ॥ मज सांगावे उत्तम ॥ तंव ऐकें ह्नणे सप्रेम ॥ वैशंपायन ॥२॥
भीष्मासि पुसे युधिष्ठिर ॥ कीं जो राजा क्षीण दीर्घसूत्र ॥ बंधूंच्या ठायीं निरंतर ॥ नाहीं सानुक्रोशता ॥३॥
परिशंकित वृत्ति भियें ॥ ज्याचें राज्यपुर भेदलें होय ॥ असंभवीमित्र पाहे ॥ निर्द्रव्य जो ॥४॥
भिन्नमंत्री भिन्नामात्य ॥ आणि परचक्रअभियात ॥ दुर्बळराज्य जाहलें बहुत ॥ तेणें काय करावें ॥५॥
यावरी भीष्म सांगे उपदेशु ॥ जरी बाह्यराजा विजीगिषु ॥ धर्मार्थकुशळ बहुवसु ॥ तरी शीघ्र संधी कीजे ॥६॥
जो पापेंकरुनि भारी ॥ आपुला निरोध करी ॥ तयासीही झडकरी ॥ कीजे संधी ॥७॥
अथवा राजधानी टाकोनी ॥ नातरी द्रव्यादि देवोनी ॥ आपत्ति टाळावी राजेनी ॥ प्राण आपुला वांचवावा ॥८॥
जिवंत असतां मागुतें ॥ द्रव्य जोडेल यथार्थे ॥ कोशबळ देवोनि पदार्थे ॥ आपत्ति तरिजे ॥९॥
परि अर्थानिमित्त ॥ आत्मा नेदावा सत्य ॥ कुटुंब संरक्षावें यथार्थ ॥ शक्य असतां ॥१०॥
तंव ह्नणे युधिष्ठिर ॥ ज्याचें कुपित अभ्यंतर ॥ बाह्यपीडित कोशमंत्र ॥ सूत्रक्षीणें काय कीजे ॥११॥
यावरी भीष्म ह्नणे पांडवा ॥ शीघ्र संधीचि अथवा ॥ पराक्रमहे करावा ॥ दैवप्राधान्य जाणोनी ॥१२॥
थोड्याही सैन्यें अनुरक्तें ॥ जिंकवेल महती सेनेतें ॥ झुंजीं मेलिया पावे स्वर्गातें ॥ वांचतां पृथ्वी भोगी ॥१३॥
जरी जाणें पडलें तरी बुद्धीं ॥ मृदु होवोनि सामवादीं ॥ मंत्रें विश्वासोनि वादी ॥ उल्लंघोनि जावें ॥१४॥
तंव धर्म ह्नणे सर्व जन ॥ धर्महीन जीवनाचोराधीन ॥ कुटुंब नटाकितां जीवन ॥ होय कवणे उपायें ॥ ॥१५॥
यावरी भीष्म बोले वचन ॥ अर्थ असाधुपासोन ॥ ज्ञानबळें घेवोन ॥ साधुतें द्यावा ॥१६॥
राज्यस्थिति न मोडतां ॥ घ्यावें अदत्तही ज्ञातां ॥ परि आपत्ति सर्वथा ॥ टाळावी जाण ॥१७॥
ज्ञानबळें कुंतीसुता ॥ निंदितही कर्म करितां ॥ बोल न लागे सर्वथा ॥ आपत्तिकाळीं ॥१८॥
ऋत्विज पुरोहित आचार्या ॥ यावरी दोष नघालावे वायां ॥ जेणें हित होय राज्या राया ॥ तेंचि करावें ॥१९॥
ग्राम्यलोक नेणते ॥ क्रोधें बोलती भलतें ॥ परि त्यांच्या घातपातातें ॥ नकरावेंची ॥२०॥
सभेमाजी तरी बरवे ॥ पुढिलांचे गुण घ्यावे ॥ परि निंदेतें न करावें ॥ सर्वथैव ॥२१॥
तिये निंदेकरोनी ॥ एक जाताति मरणीं ॥ एक अखंडित प्राणी ॥ जळतचि असती ॥२२॥
तेणें पापें करुनि बहुत ॥ होय पुत्रशोक नासे वित्त ॥ नरकपात पूर्वजांसहित ॥ होय शेवटीं ॥२३॥
जे दुष्टदांभीक अधम ॥ परनिंदा त्यांचा धर्म ॥ पापपुण्य हीनोत्तम ॥ नाहीं जयां ॥२४॥
जेणें करुनि सर्वार्थी ॥ बहुत जन साह्य होती ॥ तें करावें जाणतीं ॥ निरंतर ॥२५॥
तरी ऐकें गा पांडवा ॥ स्वराज्यपरराज्या पासावा ॥ कोशसंग्रह करावा ॥ सर्वोपायें ॥२६॥
संपूर्ण राजधर्ममूळ ॥ कोशचि जाणें केवळ ॥ कोशसंग्रहें प्रजादळ ॥ पाळण कीजे ॥२७॥
तो कोश शुद्धवृत्ति आघवा ॥ निंदितवृत्ति न करावा ॥ मध्यस्थवृत्तीं संग्रहावा ॥ जाणतेनें ॥२८॥
कोशावांचोनि बळ नाहीं ॥ बळावेगळें राज्य नाहीं ॥ राज्यावांचोनि श्री नाहीं ॥ श्रीविण कीर्ती दुर्मिळ ॥२९॥
ह्नणोनि कोश निरंतरी ॥ राज्य मित्र बळ वृद्धिकारी ॥ हीनकोशातें निर्धारी ॥ नमानिती लोक ॥३०॥
कोशें सत्कार पावती राये ॥ कोशें पाप गौप्य राहे ॥ उत्साहें परमवृद्धि होय ॥ सर्वपदार्थी ॥३१॥
अगा पूर्वी जे अपकृत ॥ सांगीतले असती अभक्त ॥ ते राजवृद्धितें बहुत ॥ इच्छित नाहीं ॥३२॥
तरी प्राप्तकाळातें मोहें ॥ राजा न जाणे तो लवलाहें ॥ आपत्ति पावे अर्थी इये ॥ ऐक इतिहास पुरातन ॥३३॥
कोणीयेक जळस्थान ॥ तेथें मत्स्य होते तीन ॥ दीर्घसूत्री दीर्घकाळज्ञ ॥ आणि उत्पन्नप्रतिभ पैं ॥३४॥
तें जळ स्त्रवतां दिसे ॥ मग दीर्घकाळज्ञ ह्नणतसे ॥ येथ मोठी आपत्ति असे ॥ अन्यत्र जावें निश्चयें ॥३५॥
ऐकोनि दीर्घसूत्री ह्नणे ॥ अहो त्वरा न करणें ॥ परि अनादरोनि तें बोलणें ॥ विचारिलें उभयतीं ॥३६॥
मग वाहत होतें नीर ॥ तेणें मार्गे दोघे शीघ्र ॥ जावोनियां राहिले थोर ॥ डोहामाजी ॥३७॥
इकडे मत्स्यजीवी येवोन ॥ मत्स्य धरी जाळें घालुन ॥ तैं दीर्घसूत्री बंधन ॥ पावला अकस्मात ॥३८॥
ऐसा दीर्घसूत्री तेवेळां ॥ जाळीं मरणातें पावला ॥ ह्नणोनि प्राप्तकाळीं भूपाळा ॥ स्थळ सोडावें अवश्य ॥३९॥
यावरी पुसे युधिष्ठिर ॥ अनेक शत्रू बलवत्तर ॥ त्यांहीं वेढिला नृपवर ॥ स्वयें असे येकला ॥४०॥
मग तेणें कैसें करावें ॥ तें मज यथार्थ सांगावें ॥ आणि तैसेचि निरुपावे ॥ अरि मित्र उदासीन ॥४१॥
मित्र अमित्रता पावे ॥ तेथ विग्रही कोणा करावें ॥ संधी कोणासि योजावे ॥ हेंही सांगा ॥४२॥
मग ह्नणे गंगानंदन ॥ देशकाळ सामर्थ्य पाहून ॥ संधिविग्रह आचरण ॥ स्वयें कीजे ॥४३॥
अगा किंबहुना आधीं ॥ अमित्रेंसीही करावा संधी ॥ समय जाणोनि स्वबुद्धीं ॥ वर्तावें रायें ॥४४॥
समयीं मित्रेंसि विरोधिजे ॥ अमित्रेंसीं संधी कीजे ॥ तेणें महत्फळ पाविजे ॥ ऐक इतिहास एतदर्थी ॥४५॥
कोणी येके अरण्यांत ॥ होता वटवृक्ष अद्भुत ॥ लताजाळीं परिवृत ॥ परिछिन्न पैं ॥४६॥
त्याचे मूळीं शतमुख ॥ महावारुळ होतें येक ॥ तेथें पलित नामें देख ॥ मूषक असे ॥४७॥
त्या वटडेगेंसि अवधारीं ॥ लोमश मार्जार निरंतरी ॥ असे पक्षिसंहारकारी ॥ शिरीं गृह करोनी ॥ ॥४८॥
आणि तिये वटवृक्षीं राती ॥ पारधी श्वापदें बांधिती ॥ त्यांसवें एके समयांतीं ॥ बांधवला तो मांजर ॥४९॥
तंव निर्भय जावोनि तेथें ॥ मूषक वृक्षीं वेंधला त्वरितें ॥ मांजरें मांस संग्रहिलें होतें ॥ तें भक्षिता जाहला ॥५०॥
इतुक्यांत तेथें मुंगुस येक ॥ उंदिराचा वैरी आणिक ॥ प्राप्त जाहला ऊर्ध्वमुख ॥ तो देखिला मूषकें ॥५१॥
मागिले भागीं दुसरा वैरी ॥ चंद्रनामा उलूक अवधारीं ॥ तो देखिला शाखेवरी ॥ उंदिरें तेणें ॥५२॥
एवं दोघां अरीं आतुडला ॥ महद्भयातें पावला ॥ मग विचार आरंभिला ॥ धैर्य धरोनी ॥५३॥
ह्नणे भूमिये नकुळ दिसे ॥ ऊर्ध्व तरी उलूक असे ॥ तिजा पाशसंक्षयीं विशेषें ॥ माजरु हा ममशत्रू ॥५४॥
एकादा भक्षील तिघांआंत ॥ मरण पावलें निभ्रांत ॥ तरी बुद्धि करुं येथ ॥ जीवनार्थी ॥५५॥
हा जीवितार्थी मांजरु ॥ संधीसि मान्य होईल निर्धारु ॥ तरी यासी संधी करुं ॥ कार्यकारणें ॥५६॥
शत्रु पंडित असावा ॥ मूर्ख वैरी नसावा ॥ ऐसा काळ विचारुनि बरवा ॥ संधिविग्रह कीजे ॥५७॥
मग विनयें मार्जारासी ॥ मूषक ह्नणे गा परियेसीं ॥ जरी तूं मातें न मारिसी ॥ तरी मी तुज वांचवीन ॥५८॥
न करीं चिंताउद्देश ॥ मी तुझे छेदीन पाश ॥ मग तुजमज विशेष ॥ परममैत्री ॥५९॥
ऐसा भाषाबंध केला ॥ सावधपणें विश्वास मानिला ॥ मग शरीराश्रयें राहिला ॥ माजराचेनी ॥६०॥
वर्ते मातापित्यांच्या परी ॥ त्या दोघांची परममैत्री ॥ नकुळ उलूक हें पाहोनि नेत्रीं ॥ स्वाश्रमीं गेले निराश ॥६१॥
यानंतरें पाश तेवेळां ॥ मार्जाराचे छेदूं लागला ॥ येरु ह्नणे गा कृपाळा ॥ त्वरा करीं आता तूं ॥६२॥
हें ऐकोनि मूषक ह्नणे ॥ बरवा समय पाहणें ॥ तदनुसार त्वरा करणें ॥ तवकार्याची ॥६३॥
अगा जेव्हां तो चांडाळ ॥ शस्त्रपाणी येथ येईल ॥ तेव्हांचि पाश शीघ्र सकळ ॥ छेदीन तुझे ॥६४॥
मग तूं वृक्षारोहण करीं ॥ मी जाईन स्वगृहामाझारी ॥ जें कार्य करावें चातुरीं ॥ तें सावशेष करावें ॥६५॥
श्लोक: ॥
न कश्चित् कस्यचिन्मित्रंन कश्चित्कस्यचित्सुहत् ॥
अर्थतस्तु निबध्यते मित्राणि रिपवस्तथा ॥१॥
अर्थैरर्था निबध्यंते गजैर्वनगजा इव ॥
न च कश्चित्कृते कार्ये कर्तारं समवेक्षते ॥
तस्मात् सर्वाणि कार्याणि सावशेषाणिकारयेत् ॥२॥
यावरी त्या चांडाळा देखोनी ॥ मार्जाराचे सर्व पाश छेदोनी ॥ मूषक गेला बिलस्थानीं ॥ माजरु वृक्षीं वेंधला ॥६६॥
पुढें पारधी गेलिया जाण ॥ माजरु मूषका बोलिला वचन ॥ अगा त्वां मज जीवदान ॥ दीधलें प्रसंगीं ॥६७॥
परि कांहीं न बोलतां मजसी ॥ तूं आपुले बिळीं गेलासी ॥ तरी होइजे उपकारासी ॥ केविं उत्तीर्ण ॥६८॥
आतां मित्रा अवधारीं ॥ तूं प्रधान होई माझ्या घरीं ॥ करीन पितयाच्या परी ॥ प्रतिपाळ तुझा ॥६९॥
तूं परम बुद्धिमंत ॥ अससी गा मूषका सत्य ॥ यावरी मूषक बोलत ॥ मार्जारासी ॥७०॥
अगा मैत्री ते अर्थकृत ॥ शत्रूचा होतो मित्र सत्य ॥ मित्राचाही शत्रु निभ्रांत ॥ प्रसंगवशें ॥७१॥
तरी मित्रा कवणे काळें ॥ काय होईल तें नकळे ॥ मग मूषक तिये वेळे ॥ बोले श्लोक ॥७२॥
श्लोक: ॥
अर्थयुक्तिमविज्ञाय यः प्रीतौ कुरुते मन: ॥ मित्रे वा यदि वा शत्रौ तस्यापि चलिता मति: ॥३॥
अर्थयुक्ता हि जायंते पिता माता सुतास्तथा ॥ मातुला भागिनेयाश्च तथा संबंधि बांधवाः ॥४॥
पुत्रं हि मातापितरौ त्यजत: पतिन प्रियं ॥ लोको रक्षति चात्मानं यस्यार्थस्तस्य सारता ॥५॥
ह्नणोनि कोणे एके कार्यार्थ ॥ तुज आह्मां जाहलें मित्रत्व ॥ तें कार्य जालिया यथार्थ ॥ स्वस्वभव न सांडिजे ॥७३॥
अत:पर तरी मी अन्न ॥ आणि तूं माझा भोक्ता जाण ॥ मी दुर्बळ तूं बळपूर्ण ॥ केवीं मैत्री तुजमज ॥७४॥
तुझें तरी कुटुंब सकळ ॥ स्वभावत: ममद्वेषशीळ ॥ आतां दुरोनीच बरें चिंतिजेल ॥ होय प्रत्युपकार हाची ॥७५॥
परि मी तुझी निर्वाण ॥ प्रत्यक्ष भेटी नघें जाण ॥ जें कार्य सांगसी तें दुरोन ॥ करीन मित्र ह्नणोनी ॥७६॥
लोमेश ह्नणे मित्रा जाण ॥ तुवां वांचविले ममप्राण ॥ तुजनिमित्त प्राणहीं वेंचीन ॥ विश्वासघात नकरीं बापा ॥७७॥
इत्यादि बोलिला नानावचनीं ॥ परि मूषक विश्वास न मानी ॥ ह्नणोनि गेला स्वस्थानीं ॥ मार्जार देखा ॥७८॥
तरी जाणोनि बुद्धिमंती ॥ वैरियासीही कार्याती ॥ मैत्रीनें साधिजे कार्यस्थिती ॥ परि विश्वास न मानाव ॥७९॥
तंव धर्म ह्नणे भीष्मदेवा ॥ शत्रूनें दाखवितां सद्भावा ॥ सर्वथा विश्वास न मानावा ॥ हें घडे केवीं ॥८०॥
भीष्म ह्नणे गा परियेस ॥ एतदर्थी पूर्वील इतिहास ॥ कोणीयेक होता नृपेश ॥ ब्रह्मदत्त नामें ॥८१॥
त्याच्या अंत:पुराआंत ॥ पूजना नामें पक्षिणी सत्य ॥ सर्वज्ञ असोनि काळ बहुत ॥ राहिली होती ॥८२॥
काहीं काळें तिये येक ॥ पुत्र जाहला सम्यक ॥ तंव तेचि काळीं बाळक ॥ प्रसवली राजकांता ॥८३॥
मग तीं कुमरें दोनी ॥ क्रीडा करिती एके स्थानीं ॥ ऐसेम असतां कोणैक दिनीं ॥ पक्षिणी गेली सिंधुतीरा ॥८४॥
तेथोनियं अमृततुल्यें ॥ पक्षिणीनें आणिलीं फळें ॥ तीं दोघांसि तिये वेळे ॥ जाहली देती ॥८५॥
तें अमृतफळ भक्षितां ॥ पुष्टि जाहली राजसुता ॥ येणेंपरी काळ वर्ततां ॥ गेले बहुत दिन ॥८६॥
एकदा ते पक्षिणी परियेस ॥ गेली असतां सिंधुतीरास ॥ राजपुत्र क्रीडावयास ॥ धायेसहित आला तेथें ॥८७॥
तो परमचपळ मानसीं ॥ एकांतीं क्रीडतां आवेशीं ॥ बाळक मारिलें परियेसीं ॥ पक्षिणीचें ॥८८॥
जंव पक्षिनी समुद्रींहुनी ॥ आली अमृतफळें घेवोनी ॥ तंव मृतबाळक नयनीं ॥ देखिलें आपुलें ॥८९॥
अंतरीं परम दुःख करोनी । ह्नणोंलागली ते पक्षिणी ॥ कीं उपकारही करोनि मनीं ॥ शत्रूचा विश्वास न धरावा ॥९०॥
असो होणार तें जाहलें आपण ॥ आतां दुःख निःकारण ॥ कार्यापुरतें सांत्वन ॥ करावें आपणेया ॥९१॥
तरी आतांहें फळ देवोन ॥ विश्वासघातीयाचें आपण ॥ वैर उत्तीर्ण होवोन ॥ जावें येथोनी ॥९२॥
मग फळ राजपुत्रा दीधलें ॥ ते वेळीं चरणनखीं वहिले ॥ दोनी नेत्र फोडोनि टाकिले ॥ गेली आकाशमार्गे ॥९३॥
तेथोनि बोलिली पक्षिणी ॥ कीं कृतापराधां निश्चयें करुनी ॥ शिक्षा पावती सर्व प्राणी ॥ हातावरी राजसुता ॥९४॥
नाहींतरी पुत्रपौत्रीं ॥ नांदणूक भलतिया परी ॥ ह्नणोनि कृतकर्मातें निर्धारी ॥ नाहीं क्षयो ॥९५॥
तंव जिये अंध पुत्रातें ॥ देखोनियां ब्रह्मदत्तें ॥ बोलता जाहला वचनातें ॥ पक्षिणीप्रती ॥९६॥
ह्नणे जें कृत प्रतिकृत ॥ तें तुल्य जाहलें निभ्रांत ॥ आतां तूं निःशंक राहें येथ ॥ गृहीं आमुच्या ॥ ॥९७॥
यावरी ह्नणे पक्षिणी ॥ एकदा अपराधातें करुनी ॥ मागुता तेथें विश्वास मनीं ॥ नधरावा जाणतेनें ॥९८॥
पुत्रपौत्र आणि प्रपौत्र ॥ पर्यत राया नटळे वैर ॥ अन्योन्यकृत वैराकार ॥ संधि नघडे मागुता ॥९९॥
परासि विश्वास पाडावा ॥ परि कदापि स्वस्वभावा ॥ विश्वास मनीं न धरावा ॥ कोणाचाही ॥१००॥
वैर पंचप्रकारज ॥ स्त्रीकृत आणि वस्तुज ॥ कार्यज तैसेंचि सापत्नज ॥ अपराधज पांचवें ॥१॥
हें पंचविध वैर पाहीं ॥ करितां उपकारसहस्त्रेंही ॥ राया नटळेचि काहीं ॥ अन्योन्यांसी ॥२॥
अग्निवत काष्ठाआंत ॥ तें राहोनियां गुप्त ॥ कार्य असे करित ॥ आपुले समयीं ॥३॥
मी तरी तुमच्या घरीं पाहें ॥ बहुतदिन राहिलियें ॥ परि आतां विश्वास नये ॥ अंतःकरणीं ॥४॥
तंव ह्नणितलें ब्रह्मदत्तें ॥ काळेंकरुनि वैर जातें ॥ येरी ह्नणे हें असे निरुतें ॥ परि ऐक ॥५॥
काळें वैर असे जात ॥ तरी कां झुंजती देवदैत्य ॥ आणि बुधजन रोगशमनार्थ ॥ भेषज सेविती कायहेतू ॥६॥
तस्मात् या वैरासि काहीं ॥ जगीं प्रतिकारचि नाहीं ॥ राया दुजें ऐकें सही ॥ ब्रह्मदत्ता ॥७॥
स्वपोषणार्थ कीं पुत्रार्थी ॥ प्राणी संग्रह करिताती ॥ तरी तीं उभयही भूपती ॥ अंतरलीं मज ॥८॥
तुज अंधपुत्र देखोनी ॥ नवें वैर प्रतिक्षणीं ॥ उपजत जाईल अंतःकरणीं ॥ दिवसानुदिवस ॥९॥
ऐसा उपदेश विशेषीं ॥ करोनियां ब्रह्मदत्तासी ॥ पक्षिणी गेली स्वेष्टदेशासी ॥ युधिष्ठिरा गा ॥११०॥
आतां धर्म पुसेल गंगासुता ॥ वैशंपायन सांगेल भारता ॥ ते ऐकावी अपूर्वकथा ॥ ह्नणे कवि मधुकर ॥११॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ त्रयोदशस्तबक मनोहरु ॥ ब्रह्मदत्तपक्षिणी संवादप्रकारु ॥ षष्ठाध्यायीं कथियेला ॥११२॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥