॥ श्रीगणेशाय नमः ॥
देवव्रतासि ह्मणे धर्म ॥ जे ज्ञानयोग यमानियम ॥ त्यांचे सांगा फळ वर्म ॥ आणि भूतें कैसी जाणावीं ॥१॥
तंव ह्मणे मनूनें बृहस्पतीतें ॥ पुसिलें होतें याचि प्रश्नातें ॥ मग बृहस्पती तयातें ॥ सांगता जाहला ॥२॥
ह्मणे इष्ट आणि अनिष्ट ॥ सुख असुख प्रकट ॥ यांपासाव वियुक्त स्पष्ट ॥ तोचि ज्ञानयोग ॥३॥
वेदाध्ययनानंतरें प्रीतीं ॥ विहित कर्में कीजतीं ॥ तेणें कर्ममार्गें स्वर्गप्राप्ती ॥ हें वेदफळ ॥४॥
व्रतादिक आचरण कीजे ॥ तेणें भक्तिफळ पाविजे ॥ ऐसा ज्ञानयोग जाणिजे ॥ वेदव्रतनेमें ॥५॥
आतां अक्षरांपासोनी ॥ आकाश वायु वन्ही ॥ क्रमेंचि जळ मेदिनी ॥ जाहलीं असती ॥६॥
या पंचभुतां व्यतिरिक्त ॥ तो आत्मा जाण सत्य ॥ जो नव्हे उष्णशीत ॥ मृदुतीक्ष्णादी ॥७॥
व्यापक नित्य ओतप्रोत ॥ सर्वातर्यामी अखंडित ॥ ऐसा आत्मा बृहस्पतीकथित ॥ मनुप्रति संवादीं ॥८॥
यावरी युधिष्ठिर पुसत ॥ ब्रह्म आदि करोनि समस्त ॥ उप्तत्ति सांगा यथार्थ ॥ तंव ह्मणे भीष्म ॥९॥
स्वयंभु ब्रह्मा विख्यात ॥ त्याचे मानसपुत्र सात ॥ मरीचि अत्री अंगिरा पुलस्त्य ॥ पुलहक्रतु वसिष्ठ ॥१०॥
अत्रिवंशीं प्रधान ॥ प्राचीनबहीं एक जाण ॥ तयापासोनि दहा नंदन ॥ त्यांत दक्ष श्रेष्ठ ॥११॥
मरीचिपुत्र अरिष्टनेम ॥ तोचि कश्यप त्याचा अत्रिनाम ॥ तत्पुत्र सोम सोमाचा अर्यम ॥ त्याचा शशबिंदु ॥१२॥
त्यासी शतसहस्त्र पुत्र ॥ येथ नवतें पुराणांतर ॥ भग नावें दुसरा पुत्र कश्यपाचा ॥१३॥
शक अर्यमा ब्रह्मा मित्रावरूणु ॥ सविता विवस्वानु ॥ त्वष्टा पूषा इंद्र विष्णु ॥ हे द्दादशादित्य ॥१४॥
आठवा सूर्य ब्रह्मा अपर ॥ त्याचे पुत्र नासत्य दस्त्र ॥ आतां त्वष्ट्याचे कुमर ॥ ऐकें पृथकपणें ॥१५॥
विश्वरूप अजैकपात ॥ अहिर्बुध्न्य विरूपाक्ष रैवत ॥ हर बहुरूप अपराजित ॥ त्र्यंबक सुरेश्वर ॥१६॥
जयंत पिनाकी सावित्र ॥ ऐसे हे तेरा रुद्र ॥ आतां अष्टवसु समग्र ॥ ऐकें नावें ॥१७॥
ध्रुव अधुव आणि सोम ॥ आप अनळ नळ नाम ॥ प्रत्युष प्रभास हेमवर्म ॥ अष्टवसू हे ॥१८॥
हे मुख्य देव जाणावे ॥ प्रातःकाळीं स्मरण करावें ॥ आतां दिशाऋषी ऐकावे ॥ संक्षेपतः ॥१९॥
पवक्रीत रैभ्य अर्वावसु ॥ अजिष्ट कक्षीय अनळ परावसु ॥ आंगिरस ऋषि विशेषु ॥ हे प्राचीदिशे ॥२०॥
आत्रेय इध्मवाहन उन्मुच ॥ दृढव्रत आणि विमुच ॥ अगस्ति ऋषि प्रमुच ॥ हे दक्षिणदिशे ॥२१॥
ऋतग्रु कवि सारस्वत ॥ धौम्य परव्याम एकत ॥ द्वित आणि ऋषि त्रित ॥ हे पश्चिमेसी ॥२२॥
अत्रि वसिष्ठ कश्यप थोर ॥ गौतम भारद्दाज विश्वामित्र ॥ जामदग्न्यादि ऋषीश्ववर ॥ उत्तरदिशेसी ॥२३॥
जरीं यांचें स्मरण कीजे ॥ तरी सर्वपापें क्षालिजे ॥ हें ऐकोनि धर्मराजें ॥ पुसिलें भीष्मासी ॥२४॥
ह्मणे जी आतां मोक्षयोग ॥ तो मजप्रती सांगा सांग ॥ भीष्म ह्मणे येथ प्रसंग ॥ गुरुशिष्यसंवादीं ॥२५॥
कोणी येक गुरु होता ॥ तो प्रसन्न जाहला असतां ॥ शिष्य ह्मणे गुरुनाथा ॥ सांगा मोक्षमार्ग ॥२६॥
मग गुरु ह्मणे आपण ॥ शिष्या ऐकें सावधान ॥ या विश्वाचा आदिकारण ॥ वासुदेवो ॥२७॥
तो ज्ञानयज्ञमय सत्य ॥ तितिक्षापुरुष शाश्वत ॥ ऐसा जाणिजे कृष्ण अनंत ॥ तैंचि मोक्ष पाविजे ॥२८॥
हें कालचक्र आद्यंत ॥ भावाभावविरहित ॥ जग भ्रमे जयाआंत ॥ तें काळचक्र ॥२९॥
ऐसें ब्रह्मविद बोलती ॥ तज्ज्ञानें मोक्ष पाविजेती ॥ सृष्टींसंहार आणि स्थिती ॥ कर्ता देव येक ॥३०॥
ऐसियातें जे जाणती ॥ ते मोक्षाधिकारी सर्वार्थी ॥ ज्याचेनि प्रसादें युगांतीं ॥ ऋषी वेदांतें पावले ॥३१॥
आणि इतिहास पावले ऋषी ॥ भृगु पावला नीतिशास्त्रासी ॥ भारद्दाज धनुर्वेदासी ॥ पावला देखा ॥३२॥
हें सकळ ज्ञानविज्ञान ॥ नारायणापासोन ॥ पावले सकळ ऋषिगण ॥ आणि सुरअसुरही ॥३३॥
संसारदुःखभेषजही ॥ पावले साधन उपायीं ॥ जेवीं दीपापासोनि पाहीं ॥ योजिजें दीप ॥३४॥
पांचविषय षडिंद्रियें ॥ निवृत्ति कीजे उपायें ॥ ज्ञानें अविद्यानाश होय ॥ तेव्हां पाविजे मोक्षासी ॥३५॥
तंव धर्म ह्मणे भीष्मासी ॥ कर्म तरी या पुरुषासी ॥ शुभाशुभफळेसीं ॥ योजित असे ॥३६॥
पुरुष कर्ता आहे कीं नाहीं ॥ हें मज सांगावें सर्वही ॥ भीष्म ह्मणे ऐकें सही ॥ इंद्रप्रल्हादसंवाद ॥३७॥
जो समान मानी निंदास्तुती ॥ स्वपर नाहीं जया चित्तीं ॥ ऐसा प्रल्हाद तयाप्रती ॥ इंद्र पुसता जाहला ॥३८॥
ह्मणे पुरुष कर्ता की अकर्ता ॥ तंव प्रल्हाद जाहला बोलता ॥ कीं भूतांची प्रवृत्तिनिवृत्तता ॥ नकळे कोणासी ॥३९॥
मुक्तस्वभावी पुरुष जाणीं ॥ प्रवृत्तिनिवृत्ति प्रकृतिगुणीं ॥ पुरुषप्रयत्न नाहींच जाणीं ॥ कर्माचे प्रेरक ॥४०॥
स्वयें जरी कर्ता होय ॥ तरी आरब्धकर्म करीचि पाहें ॥ मी कर्ता ऐसें मानीं स्वयें ॥ तो मूर्ख बोलिजे ॥४१॥
जरी पुरुष कर्ता बोलिजे ॥ जरी इष्टप्राप्ती लाहिजे ॥ अनिष्टपरिहार पाहिजे ॥ ह्मणोनि कृतकर्मफळ असे ॥४२॥
केवीं पाविजे प्रज्ञाशांती ॥ ऐसें विचारी सुरपती ॥ प्रल्हाद ह्मणे तयाप्रती ॥ ऐकें इंद्रा ॥४३॥
आर्जवें आणि अप्रमादें ॥ वृद्धसेवनें गुरुप्रसादें ॥ पुरुष प्रज्ञा पावे बोधें ॥ शांति तेणेंची ॥४४॥
अथवा स्वभावें करोनी ॥ प्रज्ञाशांती पावे निर्वाणीं ॥ इंद्रे तोषला हे ऐकोनी ॥ इति प्रल्हादशक्रसंवाद ॥४५॥
तंव धर्म पुसे विनवुनी ॥ कीं कालकृतदोषें करोनी ॥ राजा पावे दुःखयोनी ॥ तें सांगिजे मज ॥४६॥
भीष्म ह्मणे इये अर्थीं ॥ इतिहास ऐकें प्रीतीं ॥ इंद्र जावोनि ब्रह्मयाप्रती ॥ पुसता जाहला ॥४७॥
कीं ज्या बळीचें द्रव्य पाहीं ॥ सरेना घेतां कहीं ॥ तो बळी काय करितो सही ॥ सांगा मज ॥४८॥
ब्रह्मा ह्मणे इंद्रातें ॥ एक शून्य घर असे निरुतें ॥ काळवशें करूनि तेथें ॥ खर जाहला असे ॥४९॥
यावरी ह्मणे देवेंदु ॥ तो मज भेटलिया खारू ॥ मारूं किंवा न मारूं ॥ सांगें बापा ॥५०॥
तंव ह्मणितले पितामहें ॥ तो वधावया योग्य नव्हें ॥ जरी भेटला तरी न्यायें ॥ पुसावें तयासी ॥५१॥
येरू ऐरावतीं वेधला ॥ भुतळीं विचरों लागला ॥ तंव खररूपें देखिला ॥ बळीरावो ॥५२॥
मग ह्मणे वज्रपाणी ॥ अरे बळी कोंडा भक्षूनी ॥ कां पावलासि खरयोनी ॥ हे अधमजाती ॥५३॥
लक्ष्मीहीन उपजलसी ॥ वैरीयां वश जाहलासी ॥ सर्वदैत्यपति होतासी ॥ देत अससी नानादानें ॥५४॥
तुझे घरीं गंधर्व पाहीं ॥ नाचत होते सर्वदाही ॥ ते तुझी समृद्धी काई ॥ जाहली सांग ॥५५॥
बळी ह्मणे इंद्राराया ॥ सर्वही काळकृतसमया ॥ शुभकाळ येईल तेव्हां अवघिया ॥ समृद्धि देखशील ॥५६॥
यावरी इंद्र ह्मणत ॥ तुज शोक कां नाहीं होत ॥ बळी ह्मणे देह नाशिवंत ॥ एतदर्थ शोक नाहीं ॥५७॥
अर्थानिमित्त कृपण ॥ दुःख पावती दारूण ॥ मी कर्ता मारीन जिंकीन ॥ हें मानी तो मूर्ख पैं ॥५८॥
कर्ता अन्याचि असे तत्वतां ॥ आणि हा काळ मजदेखतां ॥ भूतें संहरित नसता ॥ तरी हर्षामर्ष पावतों ॥५९॥
काळचि असे सर्वकर्ता ॥ हर्ता आणी दाता भोक्ता ॥ हीं रूपें हीनाधिक सर्वथा ॥ कळेंचि करोनी ॥६०॥
आतां इंद्रा तूंचि पाहीं ॥ जे बुद्धी बाळत्वाच्या ठायी ॥ ते तरी तुज आतां नाहीं ॥ काळेकरूनि विलक्षण ॥६१॥
ऐसें जंव बोलती दोनी ॥ तंव बळीशरीरापासोनी ॥ लक्ष्मी तिघाली तीतें देखोनी ॥ इंद्र विस्मित जाहला ॥६२॥
बळी प्रति ह्मणे शक्र ॥ हे कवण अतिसुंदर ॥ येरू ह्मणे याचें उत्तर ॥ हेचि देईल तुजलागी ॥६३॥
मग ह्मणे हो कोण तुह्मी ॥ श्री ह्मणे मी विभूतिलक्ष्मी ॥ इंद्र ह्मणे हा महाधर्मी ॥ का सांडिला बळि तुवां ॥६४॥
येरी ह्मणे दैवकृत ॥ सांडणे न सांडणें तत्प्रेरित ॥ परि सत्यदानपराक्रमव्रत ॥ तपादि जेथें ॥६५॥
तेथ माझा वास असे ॥ येणें विप्रनिंदा केली द्वेषें ॥ आणि उच्छिष्टघृत विशेषें ॥ स्पर्शिलें होतें ॥६६॥
या कारणास्तव बळीसी ॥ म्यां त्यागिलें आवेशीं ॥ तंव इंद्र ह्मणे तियेसी ॥ तुं कोठें राहसी स्थिरत्वें ॥६७॥
श्री ह्मणे गा अवधारीं ॥ जो ब्रह्मद्देष न करी ॥ मी तयाच्या मंदिरीं ॥ राहें अखंड ॥६८॥
यावरी अदृश्य जाहली येरी ॥ हा बळिशक्रसंवाद अवधारीं ॥ मग इंद्र चालिला अंतरीं ॥ सांडोनी बळीसी ॥६९॥
ऐसें जाणोनि खेद न कीजे ॥ हा बळिशक्रसंवाद बोलिजे ॥ तंव धर्म ह्मणे सांगिजे ॥ कांही अपूर्व मज ॥७०॥
मग भीष्म ह्मणे आइक ॥ इतिहास असे अलोलिक ॥ संवाद शक्रश्रीचा सम्यक ॥ मोक्षधर्मीं ॥७१॥
कवणी एके शुभवेळां ॥ नारद गंगाद्दारीं आला ॥ तंव इंद्रही पातला ॥ दोघीं स्नान सारिलें ॥७२॥
संध्यादिकर्में करोन ॥ बैसले असती दोघेजण ॥ तंव श्री देखिली दैदीप्यमान ॥ सूर्यमंडळासमीप ॥७३॥
तिये इंद्रे हात जोडोनी ॥ पुसिलें वंदन करोनी ॥ तुं कोण आलीस कोठोनी ॥ सांगें आह्मां ॥७४॥
श्री ह्मणे गा सर्वप्राणी ॥ मज इच्छिती नित्यानी ॥ मी उपजलें कमळस्थानीं ॥ माझी नामें अनंत ॥७५॥
पद्मा श्री भूती श्रद्धा ॥ पद्ममालिनी लक्ष्मी मेघा ॥ धृति सिद्धि स्वाहा स्वधा ॥ इयें नामें ॥७६॥
माझा निवास राज्यपराक्रमीं ॥ सेनाग्री आणि ध्वजीं धर्मी ॥ पांचांचिये हर्मीं ॥ असे जाण ॥७७॥
आणि जो विषयरहित ॥ सत्यवादी बुद्धीमंत ॥ दानशीळ ब्राह्मण्ययुक्त ॥ त्यांच्या गृह स्थैर्य मज ॥७८॥
शक्र ह्मणे दैत्यगृहीं ॥ वास किंनिमित्त पाहीं ॥ श्री ह्मणे स्वधर्मरक्षक सहीं ॥ ह्मणोनियां ॥७९॥
आणिक वासस्थानें ऐक ॥ धैर्यवंत ब्राह्मणपूजक ॥ आहिताग्नी अतिथीभजक ॥ स्वर्गमार्गजाणते ॥८०॥
यज्ञशीळ दानाध्ययन ॥ स्वगृहीं करी गुरुदेवपूजन ॥ जितक्रोध शास्त्राध्ययन ॥ अनसूंयक ॥८१॥
सुतभृत्य सचिवपालक वीर ॥ जितेंद्रिय संतृष्टचित्तधर ॥ जो स्वयें असे भक्तिपर ॥ तेथ वास माझा ॥८२॥
प्रियवादी आणि कृतज्ञ ॥ करी पर्वकाळीं स्नान ॥ आलंकृत सर्वगुण ॥ विहितकर्मकर्ता ॥८३॥
रात्रि दधिसक्तु न भक्षित ॥ ब्रह्मवादी द्यूतवर्जित ॥ दिवानिद्रा न करित ॥ तथा निजे अर्धरात्री ॥८४॥
कृपण अनाथ दुर्बळ ॥ यांचे पोषण प्रतिपाळ ॥ करी आर्ताचें सार्वकाळ ॥ प्रतिपाळण ॥८५॥
आणि द्दिजवृत्ति न छेदिती ॥ मातापित्यांची सेवा करिती ॥ सर्वभूतीं दया सर्वर्थी ॥ त्यांचे घरीं वास मज ॥८६॥
ऐसें लक्ष्मी बोलोनि तेथ ॥ स्वयें जाहली अंतर्गत ॥ मग इंद्र नारदासहित ॥ गेला स्वर्गलोकीं ॥८७॥
हें आख्यान ऐकती नर ॥ त्यांचे गृहीं निरंतर ॥ लक्ष्मी वास करी पवित्र ॥ होय सकळार्थसिद्दी ॥८८॥
ऐसा शांतिपर्वी अगाध ॥ मोक्षधर्मामाजी प्रसिद्ध ॥ इंद्रलक्ष्मीचा संवाद ॥ अतिपवित्रपणें ॥८९॥
निरूपणें यथार्थ करित ॥ ऐसें बोलिला देवव्रत ॥ तेंचि वैशंपायन सांगत ॥ जन्मेजयासी ॥९०॥
यानंतरें मोक्षधर्म ॥ धर्मरायासि सांगेल भीष्म ॥ ते ऐकावे सप्रेम ॥ ह्मणे मधुकरकवी ॥९१॥
इति श्रीकथाकल्पतरू ॥ त्रयोदशस्तबक मनोहरू ॥ इंद्रलक्ष्मीसंवादप्रकारू ॥ द्वादशाऽध्यायीं कथियेला ॥९२॥
॥ इति श्रीकथाकल्पतरौ त्रयोदशस्तबकः द्वादशोऽध्यायः समाप्तः ॥