॥ श्रीगणेशाय नमः ॥
रायासि ह्मणे वैशंपायन ॥ प्रल्हाद अजगराख्यान ऐकोन ॥ भीष्मासि पुसे कुंतीनंदन ॥ परमप्रीती करोनी ॥१॥
ह्मणे बांधव कर्म वित्त ॥ प्रज्ञा धैर्य ययाआंत ॥ सांगा पुरुषें कोणता पदार्थ ॥ अंगिकारावा ॥२॥
भीष्म ह्मणे धर्मा ऐक ॥ प्रज्ञा संग्रहावी देख ॥ जे असे प्रतिष्ठाकारक ॥ भूतमात्रां ॥३॥
प्रज्ञालाभे मोक्षसाधन ॥ प्रल्हादादि मंकी जाण ॥ तरले प्रज्ञेंचिकरोन ॥ तथा इंद्रकाश्यपसंवाद ॥४॥
कोणी एक वैश्य अज्ञाता ॥ आपुले रथातें धांवडितां ॥ काश्यपातें जाहला पाडिता ॥ ढका लाउनी ॥५॥
तेणें काश्यप दुःखी होवोन ॥ ह्मणे आतां त्यजावे प्राण ॥ ऐसा निश्चय करोन ॥ बैसला अपमानास्तव ॥६॥
मग इंद्र सृगालरूपें आला ॥ तयाप्रति बोलता जाहला ॥ कीं मनुष्यदेह भला ॥ इच्छिती सर्व प्राणी ॥७॥
त्यांत ब्राह्मण विशिष्ट देख ॥ यास्तव मरूं नको ऐक ॥ प्राणियांमाजी सम्यक ॥ जया हस्त तो उत्तम ॥८॥
पाणिलाभापरिस देख ॥ लाभ नाहीं आणिक ॥ अन्नवस्त्रें स्पर्शादिक ॥ हस्तें व्यापार घडताती ॥९॥
जे हस्तपादरहित ॥ ते वर्षातपशीतजनित ॥ दुःख भोगिताति बहुत ॥ धन्य मनुष्यजन्म तरी ॥१०॥
अगा तूं दैवेंकरूनी ॥ पावला नाहींस नीचयोनी ॥ मी हस्तरहित ह्मणवोनी ॥ हे मज प्राणी पीडिती ॥११॥
आणि ह्मणे आत्महत्याजनित ॥ हेंचि पाप असे बहुत ॥ तरी तूं प्राण नसांडीं व्यर्थ ॥ पापयोनी पावसी ॥१२॥
मीही पापेंचि करोनी ॥ पावलों हे सृगालयोनी ॥ कोणी सुखी आणि कोणी ॥ दुःखी असती ॥१३॥
हें काळपरत्वें जाण ॥ अखंड सुखी नाहीं कवण ॥ आधीं मनुष्यत्व इच्छोन ॥ मग द्रव्यार्थ चिंतिती ॥१४॥
मग राज्य मग इंद्रपद ॥ इच्छिताति भोग विविध ॥ तुझ्याठायीं असे प्रसिद्ध ॥ समूह सुखदुःखाचा ॥१५॥
सर्वदुःखाचें केवळ ॥ इंद्रियगण आहे मुळ ॥ तरी प्रज्ञेनें इंद्रियें सकळ ॥ वश करावीं ॥१६॥
क्रोध त्यजोनि शांत होई ॥ ऐसा बोधिला नानाउपायीं ॥ येरू ज्ञानदृष्टीं पाही ॥ तंव तो इंद्र प्रत्यक्ष ॥१७॥
मग आश्रमांत नेला ॥ पूजा करोनि पामकिला ॥ काश्यपें शोक सांडिला ॥ इंद्रोपदेशें ॥१८॥
यावरी धर्म ह्मणे स्वामी ॥ सागर आकाश पवन भूमी ॥ तेजादिकांतें निमीं ॥ ऐसा कवण ॥१९॥
कवण विभाग कैसे असती ॥ मेलियाचे जीव कोठें जाती ॥ तें सांगावें मजप्रती ॥ भीष्मदेवा ॥२०॥
मग भीष्म ह्मणे परियेसीं ॥ हा इतिहास कैलासीं ॥ भृगूनें पूर्वीं भारद्दाजासी ॥ कथिला असे ॥२१॥
भृगु ह्मणे ऐक अपूर्व ॥ एक मानसनांवें देव ॥ अनादि अभेद्य सर्व ॥ रहितजरामरण ॥२२॥
अक्षय अव्यय अव्यक्त ॥ त्यापासाव भूतें समस्त ॥ बोलिजे तो देव विख्यात ॥ महत्तत्त्व ॥२३॥
त्यापासाव अहंकार जाण ॥ अहंकारापासोनि गगन ॥ गगनापासाव पवन ॥ त्यापासोनि तेज ॥२४॥
तेजापासोनि जीवन ॥ जीवनाग्निसंयोगें जाण ॥ पृथ्वी जाहली निर्माण ॥ ऐसा प्रपंच बोलिजे ॥२५॥
मग तेणें करूनि केवळ ॥ आदिपुरुष निर्मित कमळ ॥ तेथ ब्रह्मा जाहला सकळ ॥ वेद तयापासोनी ॥२६॥
विराट्रुपी विष्णु जाणीं ॥ ज्याचें पर्वत अस्थिमणी ॥ मेदमांस ते मेदिनी ॥ समुद्र रुधिर ॥२७॥
वायु श्वास आकाश उदरा ॥ अग्नि तेज नद्या शिरा ॥ चंद्रसूर्य अवधारा ॥ नेत्र जयाचे ॥२८॥
ऊर्ध्वपोकळी शिर जाण ॥ अधःपाताळ ते चरण ॥ दशादिशा अष्ट प्रमाण ॥ हस्त जयाचे ॥२९॥
सर्वा अज्ञेय अनंत ॥ जयापासाव सिद्धि बहुत ॥ ह्मणोनि नाम असे अनंत ॥ विराटरूपा ॥३०॥
तंव भारद्वाज ह्मणे ॥ सांगा यांची मूळप्रमाणें ॥ मग भृगु ह्मणे परिसणें ॥ हें आकाश अनंत ॥३१॥
सिद्धसुरगणीं सेवित ॥ चंद्रसूर्य तारा समस्त ॥ जयाचा आदिअंत ॥ देखत नाहीं ॥३२॥
या पृथ्वीचिये अंतीं ॥ सप्तसमुद्र असती ॥ तये समुद्राचें अंतीं ॥ गाढांधकार ॥३३॥
तमापैलीकडे जळ ॥ जळातीं तेज केवळ ॥ अंधोदेशीं रसातळ ॥ उदक तयाखालीं ॥३४॥
उदकाखालीं पवन ॥ तदंतीं सर्वत्र गगन ॥ गगनांतर्बाह्य जीवन ॥ मिश्रित असे ॥३५॥
ऐसिआ सृष्टिरूपकमळांत ॥ बैसोनि विधी ब्रह्माडें रचित ॥ चालावया भूतप्रवर्त ॥ केलें प्रथम उदक ॥३६॥
एकदां ब्रह्मलोकीं समस्त ॥ महर्षि होते नांदत ॥ तंव तत्समयीं अद्भुत ॥ जाहली गगनवाणी ॥३७॥
त्या शब्दापासावा जीवन ॥ जीवनापासाव पवन ॥ पवनास्तव वन्हि जाण ॥ वन्हीपासोनि पृथ्वी ॥३८॥
ऐसीं पंचमहाभूतें ॥ तेथें प्रकटलीं अकस्मातें ॥ तंव भारद्दाज ह्मणे यांतें ॥ पंचमहाभूतें कां ह्मणती ॥३९॥
ऋषि ह्मणे अनंतभूतें असती ॥ त्यांची यांपासाव उप्तत्ती ॥ तीं सर्वभुतें बोलिजती ॥ हीं पंचमहाभूतें ॥४०॥
तंव भारद्वाज करी विनंती ॥ कीं स्थावरजंगमउप्तत्ती ॥ जंगामीं पंचभूतें असती ॥ स्थावरीं न देखिजे ॥४१॥
भृगु ह्मणे ऐक वचन ॥ वृक्ष यद्यपि असे घन ॥ तथापि अंतर्गत गगन ॥ असे व्याप्त ॥४२॥
पुष्पफळें म्लान होती ॥ ह्मणोनि स्पर्शेंद्रियस्थिती ॥ फलपातें शब्दोप्तती ॥ ह्मणोनि श्रोत्रयुक्त ॥४३॥
फल अधोदेशीं पडत ॥ अन्यत्र तरी नाहीं जात ॥ स्थावरासी यानिमित्त ॥ नेत्रही असती ॥४४॥
पुष्पें गंधयुक्तें विशेषें ॥ ह्मणोनि घ्राणही असे ॥ चरणीं उदकपान भासे ॥ ह्मणोनि रसना ॥४५॥
छिन्न केलिया प्ररोहत ॥ ह्मणोनि आत्मा वर्तत ॥ याकारणें स्थावरांत ॥ व्याप्त पंचभूतेंद्रियें ॥४६॥
भारद्दाज ह्मणे विशेषें ॥ वायु प्राणचेष्टा करीत असे ॥ शरीर चाले श्वासोश्वासें ॥ तरी जीव निरर्थक ॥४७॥
अग्नीकरोनि होतो पाक ॥ ह्मणोनि जीव निरर्थक ॥ मेलिया वायु नसतो प्रत्यक्ष ॥ जीव देखिजेचि ना ॥४८॥
तंव भृगु ह्मणे पाहीं ॥ जीव तरी नाशत नाहीं ॥ शरीरापासोनियां सही ॥ जातो शरीरांतरीं ॥४९॥
शरीराविण सर्वथा ॥ जीव न राहेचि तत्वता ॥ शरीरावांचोनि जीव नसतां ॥ दुर्ग्राह्य जाण ॥५०॥
अग्निनाश होतां सत्य ॥ शरीर होतें जीवरहित ॥ जीव देहांतरीं संचरत ॥ ह्मणोनि बोलिजे जीवात्मा ॥५१॥
तंव भारद्वाज करी विनंती ॥ अग्नि वायु जळ देहीं असती ॥ तियें प्रत्यक्ष दिसती ॥ जीव कैसा असे पां ॥५२॥
मांस शोणितादि समस्तां ॥ धातू भिद्यमान असतां ॥ न पाविजेचि सर्वथा ॥ जीवात्मा प्रकट ॥५३॥
भृगु ह्मणे जीव आहे ॥ तेणें सर्व ज्ञान होय ॥ सुखदुःखानुभव लाहे ॥ तोचि जीवात्मा ॥५४॥
आतां भारद्वाजा परियेसीं ॥ ब्रह्मा आत्मतेजोराशी ॥ पूर्वकाळीं ब्राह्मणासी ॥ स्त्रजिता जाहला ॥५५॥
मग सत्यधर्मपआचार ॥ शौचादि स्वर्गव्यवहार ॥ ऐसे निर्मिले समग्र ॥ स्वासामर्थ्यें ॥५६॥
देव गंधर्व राक्षस ॥ नाग पिशाचआणि मनुष्य ॥ मग निर्मिले सविशेष ॥ वर्ण चारी ॥५७॥
मागुतीं भारद्दाज पुसता होय ॥ कीं वर्णभेदीं कारण काय ॥ तें सांगावें लवलाहें ॥ मग भृगु बोलिला ॥५८॥
ह्मणे सर्व स्थावरजंगम ॥ हे ब्रह्मरूपचि सम ॥ विलक्षणकर्मेकरोनि उत्तम ॥ असे वर्णभेद ॥५९॥
षट्कर्मयुक्त ब्राह्मण ॥ शमदमादियुक्त जाण ॥ आणि क्षात्रवृत्ती निपुण ॥ क्षत्रिय बोलिजे ॥६०॥
संवग करी सामुग्री ॥ महर्घपणें विक्रय करी ॥ कृषि वाणिज्य व्यापारीं ॥ बोलिजे वैश्य ॥६१॥
करी सेवा सर्ववणीं ॥ तो शुद्र बोलिजे गुणी ॥ ऐसा वर्णभेदी जाणीं ॥ विस्तारिला चतुराननें ॥६२॥
ब्राह्मणें चारों आश्रम कीजे ॥ आश्रमोक्त आचार धरिजे ॥ शमादिकीं युक्त होइजे ॥ मग ब्रह्माप्राप्ती ॥६३॥
ऐसा भृगुशब्द ऐकिला ॥ भारद्वाज संतोषला ॥ हा इतिहास सांगीतला ॥ भीष्मदेवें ॥६४॥
तंव विनविलें कुंतीसुतें ॥ हें जग प्रळयीं कोणातें ॥ पावत असे तें सांगा मातें ॥ आणि अध्यात्म निरूपा ॥६५॥
यावरी भीष्म ह्मणे सविशेष ॥ जें अध्यात्म जाणोनि पुरुष ॥ सौख्य पावतो तें आइक ॥ संक्षेपवाक्यें ॥६६॥
प्रथमतः पंचभूतें ॥ स्त्रजिलीं श्री आदिनाथें ॥ मग अपरें समस्तें ॥ भूतें स्त्रजिलीं ॥६७॥
शब्दगुण आकाशीं ॥ स्पर्शगुण वायूसी ॥ रूप तेजीं परियेसीं ॥ जळीं रसगुण ॥६८॥
गंधगुण भूमिगत ॥ मग बुद्धी ऐसीं सात ॥ क्षेत्रज्ञ आठवा निभ्रांत ॥ प्रकृतिपुरुष ॥६९॥
मनःषष्ठादिइंद्रियगणीं ॥ शब्दादिगुण घेतो प्राणी ॥ तरी सर्वभुतीं जाणीं ॥ समता कीजे ॥७०॥
हा अध्यात्मयोग देख ॥ आतां ध्यानयोग आइक ॥ जेणेंकरोनि सविशेष ॥ योगी मुक्त होताती ॥७१॥
निर्द्दंद्द नित्यसत्वस्थ ॥ विविक्तज्ञानी नियमयुक्त ॥ असंगी सत्यवादी शांत ॥ व्हावें प्रथम ॥७२॥
मग सर्वेंद्रिये राधोनी ॥ परब्रह्मीं मन लावोनी ॥ ध्यानयोग पद्मासनीं ॥ निश्वळत्वें साधावा ॥७३॥
आणि हें जगत्र विशेषें ॥ जेथोनि उप्तन्न जाहलें असे ॥ तेथेंचि अंतीं प्रवेशे ॥ तें अव्यक्तपद जाण ॥७४॥
इये अध्यात्मध्यानयोगीं ॥ आणि उप्तत्तिलयप्रसंगीं ॥ कथा येक असे चांगी ॥ जापकाची ॥७५॥
तंव धर्म विनवी भावें ॥ जापकाचें चरित्र सांगावें ॥ मग बोलिलें भीष्मदेवें ॥ धर्माप्रती ॥७६॥
काळू नामें ब्राह्मण येक ॥ दुजा सूर्यात्मज इक्ष्वाक ॥ यांचा संवाद अलोलिक ॥ सांगत असें ॥७७॥
कवणी एक जापक ब्राह्मण ॥ सांगवेदज्ञ महा प्राज्ञ ॥ शांत शिक्षित तत्वज्ञ ॥ वेदशास्त्राथीं ॥७८॥
तो जप करी दृढव्रतीं ॥ तंव प्रकटली सरस्वती ॥ ते ह्मणे जापकाप्रती ॥ मागें वरदान ॥७९॥
परि जापक असे जपत ॥ अंतरीं जप नाहीं समाप्त ॥ ह्मणोनि न बोले ध्यानस्थ ॥ देवीप्रती ॥८०॥
मग जप समाप्त जाहला ॥ सरस्वतीसि नमस्कार केला ॥ स्तुति करूं प्रवर्तला ॥ नानापरी ॥८१॥
कृपेनें सरस्वती ह्मणे ॥ सुकृते कांहीं वर मागणें ॥ येरू ह्मणे मती देणें ॥ जपीं निरंतर ॥८२॥
आणीक मागणें नाहीं ॥ तंव देवी ह्मणे पाहीं ॥ उत्तमपद प्राप्ती सही ॥ होईल तूतें ॥८३॥
ऐसा वर होतां प्राप्त ॥ मग तो दिव्यवर्षशत ॥ जप करुनियां त्वरित ॥ प्रत्यक्ष केला श्राद्धदेवो ॥८४॥
धर्म ह्मणे गा जापका ॥ तुवां जिंकिलें सर्व लोकां ॥ आतां शरीरमोक्षीं सुखा ॥ पावशील ॥८५॥
यावरी ह्मणे द्दिजवर ॥ मज टाकणें नाहीं शरीर ॥ धर्म ह्मणे कलेवर ॥ टाकिलेंचि पाहिजे ॥८६॥
ऐकोनि ह्मणे ब्राह्मण ॥ शरीर असतां जप करीन ॥ धर्म ह्मणे हा मृत्यु जाण ॥ शरीरनाशक ॥८७॥
ह्मणोनि मृत्युकडे पाहिलें ॥ तंव तो मूर्तिमंत बोले ॥ तुझें जपफळ पूर्ण जाहलें ॥ ह्मणोनि मी पातलों ॥८८॥
आतां तुज मी नेईन ॥ मग ह्मणे तो ब्राह्मण ॥ मीचि पूर्वील काळ जाण ॥ अंतकर्ता ॥८९॥
मग केली मृत्युस्तुती ॥ तंव येवोनि इक्ष्वाकु भूपती ॥ पुसता जाहला दोहीप्रती ॥ स्वागतप्रश्न ॥९०॥
राजा ह्मणे उभयांकारणें ॥ मजप्रती काहीं मागणें ॥ तंव बोलिलें ब्राह्मणें ॥ मज इच्छा नाहीं ॥९१॥
तुवां द्यावें आणिकासी ॥ काहीं मागिजे मजचि पाशीं ॥ तें मी देईन निश्चयेंसीं ॥ तंव इक्ष्वाकु बोलिला ॥९२॥
ह्मणे मी क्षत्रियवंशज पाहीं ॥ दे हें वचन जाणत नाहीं ॥ मज युद्ध सांगें सही ॥ तंव ह्मणे ब्राह्मण ॥९३॥
आतां परस्परें नाहीं उत्तर ॥ यावरी ह्मणे नृपवर ॥ तुझिये जपाचें फळ समग्र ॥ देयीं मातें ॥९४॥
बहुत बरवें ह्मणे ब्राह्मण ॥ तंव बोलिला नृपनंदन ॥ तुजा होआवें कल्याण ॥ मी जात असें ॥९५॥
परि या जपाचें फळ सांगिजे ॥ ऐकोनि ह्मणितलें द्दिजें ॥ कीं मी जपाचें फळ वोजें ॥ जाणत नाहीं ॥९६॥
म्यां तुज दीधलें जयफळ ॥ हा वैवस्वत आणि काळ ॥ साक्षी असोत तंव भूपाळ ॥ बोलता जाहला ॥९७॥
ह्मणे जपफळाचें काहीं ॥ मजलागीं प्रयोजन नाहीं ॥ विप्र ह्मणे तुवां पाहीं ॥ दे ऐसें ह्मणितलें ॥९८॥
जे म्यां तुज दीधलें जाण ॥ तें अनृत न होय वचन ॥ अगा असत्यापरीस गहन ॥ पातक नाहीं ॥९९॥
तरी त्वां अंगिकार करावा ॥ कां जे मगितलें तुवां ॥ आतां ना ह्मणतां सद्भावा ॥ उच्चित नव्हे ॥१००॥
सत्येकरोनि प्राण्याप्रती ॥ जे श्रेष्ठ लोक पावती ॥ ते यज्ञदानादिकीं निश्चितीं ॥ न शकती पावों ॥१॥
सत्य एकाक्षर ब्रह्म जाण ॥ सत्य एकाक्षर तप पूर्ण ॥ सत्य एकाक्षर यज्ञ ॥ एकाक्षर श्रुतं ॥२॥
सत्य वेदीं जागृत सम ॥ सत्यें घडती तप धर्म ॥ वेदांअंगें वर्णाश्रम ॥ सत्यें करोनी ॥३॥
अग्नि वायु गभस्ती ॥ सत्यें गमन करिताती ॥ ह्मणोनि रक्षावें भूपती ॥ तुवां सत्य ॥४॥
जरी सत्य सांडिशील ॥ तरी अधःपात होईल ॥ येरू ह्मणे मी क्षत्रियकुळ ॥ माझें तप फळ तूं घेई ॥५॥
ऐसा उभयां वाद करितां ॥ वैवस्वत ह्मणे द्दिजसुता ॥ तुज दानफळ जाहलें आतां ॥ रावोही स्वफळ पावला ॥६॥
मग जाहली स्वर्गवाणी ॥ ह्मणे वाद न करा कोणी ॥ पावलेति तुह्मी दोनी ॥ फळें आपुलालीं ॥७॥
रावो ह्मणे नाहीं परियेसी ॥ स्वर्गफळेच्छा आह्मासी ॥ म्यां तप केलें तेंचि तुजसी ॥ देतों आतां ॥८॥
ब्राह्मण भोगो तपफळा ॥ तंव विप्र बोलता जाहला ॥ म्यां बाळपणीं कर पसरिला ॥ तितुकाचि पुरे ॥९॥
आतां प्रतिग्रह घेत नाहीं ॥ ऐसें बोलती दोघेही ॥ तंव विष्णुभक्त आले लाहीं ॥ विमानसहित ॥११०॥
ते परस्परां वारिते जाहले ॥ मग काळवैव स्वत बोलिले ॥ तुह्मी उत्तम स्थानें वहिले ॥ दोघे पावाल ॥११॥
मग उभे राहिले उभयतां ॥ भीष्म ह्मणे कुंतीसुता ॥ ऐसें जापकफळ वर्णितां ॥ ब्रह्मां अंत नपावे ॥१२॥
द्दिज देईन ह्मणे जपफळ ॥ तपदान करूं ह्मणे भूपाळ ॥ तंव तत्समयीं लोकपाळ ॥ सहितइंद्र ॥१३॥
साध्य विश्वेदेव मरुत ॥ नद्या समुद्र तीर्थे सहित ॥ तपें वेद नारद पर्वत ॥ विश्वावसु गंधर्वादी ॥१४॥
नाग सिद्ध यक्ष मुनी ॥ ब्रह्माविष्णु शूळपाणी ॥ नानावाद्ययुक्त येवोनी ॥ केला पुष्पवर्षाव ॥१५॥
इंद्र ह्मणे ब्राह्मणासी ॥ महाभागा परियेसीं ॥ त्वां पावावें स्वर्गासी ॥ तैसेंचि राया तुवां ॥१६॥
यावरी ते दोघेजण ॥ सकळ इंद्रियें निराधून ॥ ब्रह्मीं लावोनियां मन ॥ ध्यानस्थ राहिले ॥१७॥
तंव ताळूदेशींहूनि वहिलें ॥ अग्नितेज उप्तन्न जाहलें ॥ पाहोनि जयकार जाहले ॥ सुरवरांचे ॥१८॥
ब्राह्मणाचें तेज चालिलें ॥ ब्रह्मामध्यें प्रवेशलें ॥ ब्रह्मदेवें स्वागत वर्णिलें ॥ देवांप्रती ॥१९॥
ह्मणे जापकाचे फळवत् ॥ दुजें फळचि नाहीं सत्य ॥ ऐसें बोलती समस्त ॥ सुरवरादी ॥१२०॥
राजाचेंही तेज चालिलें ॥ ब्रह्मामध्यें प्रवेशलें ॥ देवीं आश्चर्य वर्णिलें ॥ मग गेले स्वस्थानीं ॥२१॥
हें जापकाख्यान भूपती ॥ जे सावधानें ऐकती ॥ त्यासी होय स्वर्गप्राप्ती ॥ ह्मणे कवि मधुकर ॥२२॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ त्रयोदशस्तबक मनोहरू ॥ जापकाख्यानप्रकारू ॥ एकादशाध्यायीं कथियेला ॥१२३॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ इति श्रीकथाकल्पतरौ त्रयोदशस्तबक एकादशोऽध्यायः समाप्तः ॥