॥ श्रीगणेशाय नमः ॥
मग ह्मणे जन्मेजयो ॥ सांगें अग्रकथान्वयो ॥ तंव बोलिला मुनिरावो ॥ ऐकें धर्मभीष्मसंवादु ॥१॥
धर्म ह्मणे गंगानंदना ॥ ब्रह्मस्थान काइसेन ॥ पाविजे तें कारण ॥ सांगा मज ॥२॥
भीष्म ह्मणे ब्रह्मस्थान ॥ तेंचि मो क्षधर्मे जाण ॥ लब्धाहारजितेंद्रियेंकरोन ॥ होय मोक्षाधिकारी ॥३॥
इये अर्थी प्रसिद्ध ॥ देवलजैगीषसंवाद ॥ ऐकें होवोनि सावध ॥ पंडुनंदना ॥४॥
देवल ह्मणे जैगीषी ॥ तुज वंदितां हर्षा नपवसी ॥ निंदितां नेघसी दुःखासी ॥ हें कारण सांगें ॥५॥
जैगीष ह्मणे ऐकें स्थिती ॥ जे मारणारातें मारूं न इच्छिती ॥ अप्राप्तशोक न करिती ॥ नाहीं गतशोक जयां ॥६॥
पूजकांतें पूजिती ॥ यांचकांतें यथाशक्ती ॥ संतोषित करिताती ॥ उपपत्ती सारिखे ॥७॥
क्रोधइंद्रियें जिंकिती ॥ मनसावाचा कर्में करिती ॥ दुःख कवणाचें नेघेती ॥ नाहीं परस्पर द्देष ॥८॥
जे सर्वत्र सुशांत ॥ क्रोधहर्षविनिर्मुक्त ॥ ज्यांसी नाहीं सखाआप्त ॥ जे कव्हणाचे नव्हती ॥९॥
आपण नव्हती मित्रशत्रु ॥ आपणासि नाहीं मित्रशत्रु ॥ तेचि मुक्त ऐकें पवित्रु ॥ कृष्णासुदेवसंवादु ॥१०॥
जें हें तुज म्यां सांगीतलें ॥ तेंचि कृष्णें पितया कथिलें ॥ पुनरुक्तीसि संकलिलें ॥ ह्मणे भीष्माचार्य ॥११॥
तंव विनवी कुंतीनंदन ॥ सर्वभूतांचें आद्यंत अवसान ॥ कर्म आणि काळप्रमाण ॥ प्रतियुगीं आयुष्य ॥१२॥
लोकतत्व संपूर्ण ॥ सर्वभूतोप्तात्ति निधन ॥ होत असे कोठोन ॥ तें सांगा मज ॥१३॥
भीष्म ह्मणे हेंचि व्यासें ॥ पुत्रासि सागीतलें असें ॥ शुकें पुसिलें सांग कैसें ॥ भूत कर्ता ब्राह्मणकृत्य ॥१४॥
व्यास ह्मणे आद्यंतरहित ॥ अज अजराव्यय अमूर्त ॥ अप्रतवर्य अविज्ञिय सत्य ॥ त्यांचे रूप काळ ऐसें ॥१५॥
कळा त्रिंशत काष्ठा सत्य ॥ काष्ठा त्रिशंत मुहूर्त ॥ त्रिंशतमुहूर्तीं अहोरात ॥ तिसांदिवशीं मास ॥१६॥
दोंमासी ऋतु जाण ॥ षट्मासीं उत्तरायण ॥ दोहों कारण ॥ अंतरात्मा वर्तमान ॥ क्षेत्रज्ञत्वें ॥१७॥
तो त्रिगुणां व्यतिरिक्त ॥ पुरुषशब्दवाच्या सत्य ॥ तया पासाव अव्यक्त ॥ महत्तत्व बोलिजे ॥१८॥
तया प्रकृतिकारण जाणीं ॥ तें प्रकृतिरूप आमुची जननी ॥ तो सदसदात्मक देव ह्मणोनी ॥ पूजिला जाण ॥१९॥
तोचि आत्मा सारतर ॥ त्याहुनि अधिक ना देवपितर ॥ त्या आत्म्याचें पूजन थोर ॥ करितों आह्मीं ॥२०॥
ब्रह्मादि प्रजापती समस्त ॥ त्यासीच पूजिती अखंडित ॥ ह्मणोनि इष्टगती पावताहेत ॥ त्याचेनि प्रसादें ॥२१॥
हें ऐकोनि नारद ॥ पावला थोर आल्हाद ॥ ह्मणे आपण सकळ वेद ॥ अध्ययन केले ॥२२॥
तपसमर्थता बहळ ॥ केली त्याचें हें फळ ॥ ह्मणोनि तुमचें दर्शन केवळ ॥ जाहले मज ॥२३॥
आतां आज्ञा होईल प्रीतीं ॥ तरी तुमची प्रकृती मूर्तीं ॥ पहावया शीघ्रगते ॥ जाईन देवा ॥२४॥
मग नारायणें आज्ञापिला ॥ येरू मेरूशिखरीं गेला ॥ तेथ ध्यानस्थ बैसता जाहला ॥ आसनावरी ॥२५॥
तंव मेरूचे वायव्यभागीं ॥ महसुंदर एक जंगी ॥ क्षीरब्धीचे उत्तरभागीं ॥ देखिलें श्र्वेतद्दीप ॥२६॥
मेरूहोनि सहस्त्र सोळा ॥ योजनें महाविशाळा ॥ रत्नमय अहळबहळा ॥ देखिलें नारदें ॥२७॥
माजी श्वेतपुरुष सुगंध ॥ निर्विकल्प निश्वळ शुद्ध ॥ पापकारियाम अबुद्ध ॥ दृश्य नाहीं ॥२८॥
मानापमानीं समान ॥ दिव्यदेहीं साठ दशन ॥ आठ दाढा आठरसन ॥ आवाळीं चाटित ॥२९॥
ऐशा महापुरुषा देखिलें ॥ तंव आडचि धर्मे पुसिलें ॥ कीं हें बरवें निरू पिलें ॥ गंगात्मजा ॥३०॥
तो अतींद्रिय निराहार ॥ परम सुगंध पवित्र ॥ पुरुष केवीं जाहला थोर ॥ त्याची गती कायसी ॥३१॥
हें ऐकोनि गंगासुत ॥ इतिहासाद्दारा उत्तर देत ॥ तो ऐकें वृत्तांत ॥ जन्मेजया ॥३२॥
पूर्वी प्रसिद्ध राजटिळका ॥ होता उपरिचरनामक ॥ समस्त पृथ्वीचा पालक ॥ पूण्यशीळ ॥३३॥
परमप्रताजी धर्मवंत ॥ नारायणाचा पूर्णभक्त ॥ जयासि मानी सुरनाथ ॥ आपणेया समान ॥३४॥
तो इंद्रार्धपलंगावरी ॥ निरंतरी निद्रा करी ॥ आणि बैसे. सभावसरीं ॥ अर्धासनीं इंद्राचे ॥३५॥
राज्य पाळितां तेणें कहीं ॥ अनृत वाक्य बोलिलें नाहीं ॥ आणि मन कदासमईही ॥ दुष्ट नव्हेची ॥३६॥
तेणें बृहस्पतीसि गुरु केलें ॥ नीतिशास्त्र अभ्यासिलें ॥ मग अश्वमेघा मांडिलें ॥ निर्मोनि सोळा ऋत्विज ॥३७॥
बृहस्पती तो आचार्य ॥ मुख्य केला ऋषिवर्य ॥ एकत द्दित त्रितय ॥ हे सदस्य तिन्ही ॥३८॥
धनुषाक्ष आणि रैभ्य ॥ अर्वावसु परावसु दाल्भ्य ॥ धर्मातिथी तांडगर्भ्य ॥ कपिल आणि वेदशिरा ॥३९॥
आद्यकच शालीहोत्र ॥ वितंड कण्व तैत्तीर ॥ सोळावा तो देवहोत्र ॥ हे ऋत्विज यज्ञीं ॥४०॥
पशुघात नाहीं तेथें ॥ ऐसा यज्ञ होतो त्रयपंथें ॥ तंव यज्ञभागाचें भोक्ते ॥ प्रत्यक्ष देव पातले ॥४१॥
घेती यज्ञभागा करणें ॥ परि विष्णूचा भाग विष्णुनें ॥ अलक्ष्यरीतीं घेतला तेणें ॥ रागेजला बृहस्पती ॥४२॥
कां जे प्रत्यक्ष येवोनि सही ॥ भाग घेतला कां नाहीं ॥ ह्मणोनि स्रुवा उगाविलालाहीं ॥ तंव उपरिचरें विनविलें ॥४३॥
ह्मणे स्वामी इये योगीं ॥ क्रोध उचित नव्हे यागीं ॥ तंव बोलिलें तिये प्रसंगीं ॥ एकत द्दित त्रितें ॥४४॥
मोक्षेच्छा उपजली आह्मासी ॥ तैं उत्तरदिशें तपासी ॥ जावोनि राहिलों आवेशीं ॥ वर्षें चारीसहस्त्र ॥४५॥
उभे राहोनि एकपादीं ॥ काष्ठवत जाहलों ध्यानबुद्धीं ॥ मेरूउत्तरे क्षीराब्धी ॥ जवळी देखा ॥४६॥
मनी असे चिंता ऐसी ॥ की कैं देखों नारायणासी ॥ मग व्रत संपतां आकाशीं ॥ जाहली वाणी ॥४७॥
जे तुह्मीं तप केलें थोर ॥ तरी क्षीरब्धिउत्तरतीर ॥ माजी श्वेतद्दीप नगर ॥ तेथ शीघ्र जावें ॥४८॥
चंद्रकांती अतींद्रिय विशेष ॥ तेथ आहे सुगंधि पुरुष ॥ माझा आत्मा तयास ॥ प्रकाशिला म्यां ॥४९॥
तेथ त्याचें दर्शन घ्यावे ॥ मग आह्मी गेलों सद्भावें ॥ पाहों लागलों तेज बरवें ॥ तंव दृष्टी कुंठली ॥५०॥
माजी सूर्य प्रकाशकनर ॥ अशोक अजर अमर ॥ त्याचा दिव्यामोद थोर ॥ एकाएकीं चालिला ॥५१॥
पूजाकाळीं पुष्पयुक्त ॥ वायु असे बहकत ॥ सकळही देव तेथ ॥ बद्धांजली तिष्ठती ॥५२॥
प्रत्यक्ष देखिलें अनंता ॥ आह्मीं विस्मय मानिला चित्ता ॥ यासी महोत्साहें पूजितां ॥ कैं न देखोंची ॥५३॥
तंव अशरीरिणी वाणी ॥ सांगती जाहली आह्मालागुनी ॥ कीं या श्वेतपुरुषा नयनीं ॥ देखिलें तुह्मीं ॥५४॥
यासी देखिलें ह्मणिजे ॥ देवोचि देखिला जाणिजे ॥ तरी आतां तुह्मी जाइजे ॥ स्वाश्रमासी ॥५५॥
पाठीं भक्ति करितां करितां ॥ दीर्घकाळें देखाल अनंता ॥ कृतयुग अति क्रमता ॥ वैवस्तमन्वंतरीं ॥५६॥
हे देववाणी ऐकोनी ॥ विचरत आलों इये स्थानीं ॥ ऐशाही असतां कष्टाचरणीं ॥ तया देवा नदेखवे ॥५७॥
तरी बृहस्पतें तूं कैसा ॥ साक्षांत देखों पाहसी परेशा ॥ कष्टसाध्य ह्मणोनि रोषा ॥ न करीं बापा ॥५८॥
तंव बृहस्पति उगा राहिला ॥ असो याग समाप्त जाहला ॥ परि रावो काळांतरीं गेला ॥ पाताळांत ॥५९॥
तेथ नारायण स्मरण कहीं ॥ तयाचें टळलेंचि नाहें ॥ तेणें प्रभावें मागुता पाहीं ॥ पावला परमगतीतें ॥६०॥
तंव धर्मे विनविला गंगासुत ॥ कीं उपरिचर विष्णुभक्त ॥ पुण्यात्मा तरी पाताळांत ॥ पडिला कां पां ॥६१॥
भीष्म ह्मणे एकदा पूर्वी ॥ विचार मांडिला ऋषिदेवीं ॥ ह्मणती आपण सद्भावीं ॥ करुं यज्ञ ॥६२॥
तंव ऋषी ह्मणती देवां ॥ कोणते द्रव्यें करावा ॥ देव ह्मणती वरवा ॥ अजा मेळउनी ॥६३॥
परंतु ऋषि ह्मणती सुरवरां ॥ औषधींचि करोनि बरा ॥ ऐसा कलहो परस्परां ॥ मांडला अपार ॥६४॥
तंव उपरिचर राजनंदन ॥ विमानीं जात होता बैसोन ॥ ऋषि ह्मणती तयालागोन ॥ पुसावें सवीं ॥६५॥
हा जाणोनि पुण्यनॄपती ॥ ह्मणोनि तया पुसिलें समस्तीं ॥ रावो पुसे तयांप्रती ॥ कोणाचा पक्ष कैसा ॥६६॥
देव ह्मणती आपण ॥ छागें कराया इच्छितों यज्ञ ॥ ऋषि ह्मणती औषधीं करून ॥ इच्छितों आह्मीं ॥६७॥
हें ऐकोनि तयेवेळां ॥ रायें देवांचा पक्ष धरिला ॥ तंव ब्राह्मणी शापिला ॥ पडें पाताळीं ह्मणोनी ॥६८॥
अगा अतःपर निरुती ॥ तुझी नव्हे विमानगती ॥ ऐसें ऐकोनि सुरपती ॥ मानसीं चिंता पावला ॥६९॥
ह्मणे रायासि आपणा निमित्त ॥ ब्रह्मशाप जाहला अद्भुत ॥ मग एक उपाय समर्थ ॥ सांगीतला तयासी ॥७०॥
कीं तुवां ईश्वरभजन ॥ राया न टाकावें जाण ॥ तेणें पावसील निर्वाण ॥ कैवल्यपद ॥७१॥
आणि भूमीवरी असतां ॥ याज्ञिकाहीं यजन करितां ॥ यज्ञीं वसुधारा होमितां ॥ ते तुज पावेल ॥७२॥
तेणें तुजसी केवळ ॥ आप्यायन सौख्य होईल ॥ क्षुधातृषा निवारेल ॥ कांति होईल उत्तमा ॥७३॥
ऐसें देव बोलोनी ॥ गेले आपुलाले स्थानीं ॥ मग पडीला तो नृपमणी ॥ भुमीवरी ॥७४॥
ईश्वरभजन प्रभावेंकरुनी ॥ देवें गरुड पाठवोनी ॥ काढोनियां विवरांतुनीं ॥ वैकुंठीं नेला ॥७५॥
आतां प्रस्तुत कथा अवधारीं ॥ नारद इकडे समयांतरीं ॥ गेला श्वेतद्देपामाझारीं ॥ नानाध्यानप्रयासे ॥७६॥
तेथें अनेकबाहूवदन ॥ अनेककांती अनेकचरण ॥ ऐसा दिव्यपुरुष देखोन ॥ स्तुति केली गद्ममय ॥७७॥
ययाउपरी परमेश्वर ॥ होवोनि प्रसादपुरःसर ॥ आपुला महिमा समग्र ॥ सांगता जाहला ॥७८॥
मग नारद भाग्यातें ॥ वर्णियेलें श्रीअनंतें ॥ ह्मणे एकताद्दितत्रितें ॥ केलें होतें आगमन ॥७९॥
त्यांहीं उग्रतप केलें ॥ परि त्यां दर्शन नाहीं जाहलें ॥ तें दर्शन तुज जाहलें ॥ एकांत भक्त ह्मणवोनी ॥८०॥
मग भविष्यकारण ॥ ह्मणे अवतार नरनारायण ॥ धर्मगृहीं चौघे नंदन ॥ होतील मत्स्वरूप ॥८१॥
अन्यथा नाहीं सद्भावी ॥ त्यांची आराधना करावी ॥ मग सृष्टीरचना आघवी ॥ सांगीतली नारदा ॥८२॥
वाराहादि समग्र ॥ वामनादिक अवतार ॥ कार्यभविष्य तदनंतर ॥ निरूपिलें परेशें ॥८३॥
हें सांगोनि जगज्जीवन ॥ स्वयें पावला अंतर्धान ॥ असो चालिला नरनारायण ॥ दर्शनाथीं नारद ॥८४॥
येवोनि बद्रिकाश्रमासी ॥ श्री नरनारायणऋषी ॥ देवांचा देव देखोनी त्यांसी ॥ वंदिले साष्टांगें ॥८५॥
मग केली नानास्तुती ॥ तंव नरनरायण प्रीतीं ॥ पूजा करोनि नारदाप्रती ॥ सुखगोष्टी करिते जाहले ॥८६॥
ह्मणती नारदा परियेसीं ॥ तूं श्वेतद्दीपीं गेला होतासी ॥ तेथ दर्शन जाहलें तुजसी ॥ परेशाचें ॥८७॥
तें देवदर्शन पाहीं ॥ देवां दानवां सर्वाहीं ॥ नानातपें व्रतेंही ॥ प्राप्त नव्हे ॥८८॥
तुं भाग्याचा एकांत भक्त ॥ ह्मणोनि दर्शन जाहलें प्राप्त ॥ हें ऐकोनि नारद मनांत ॥ विस्मित जाहला ॥८९॥
मग मानना करोनि थोर ॥ दिव्यवर्ष शतसहस्त्र ॥ त्यांचे आश्रमीं ब्रह्माकुमर ॥ राहता जाहला ॥९०॥
एकदां नारद तयांसि पुसत ॥ कीं मज एक संदेह वर्तत ॥ पितर पिंडसंज्ञा निभ्रांत ॥ पावले कैसे ॥९१॥
तंव नरनारायण ह्मणती ॥ दैत्यभारें पूर्वीं क्षिती ॥ रसातळा जात होती ॥ पापास्तव ॥९२॥
तैं देवें वराह होवोनी ॥ दांतें उद्दरोनि मेदिनी ॥ यथाप्रदेशीं नेवोनी ॥ ठेविली देखा ॥९३॥
स्वदेहींच्या ऊष्म्यापासोनी ॥ तीळ निर्माण करोनी ॥ कुशांवरी ते पिंड तीनी ॥ स्थापिले देवें ॥९५॥
ते हे पितर निश्चित ॥ वसु रुद्र आणि आदित्य ॥ पितृक्रमें यथार्थ ॥ जाण नारदा ॥९६॥
हें ऐकोनि ब्रह्मकुमर ॥ संतोष पावला अपार ॥ तंव ह्मणती नारायणनर ॥ ऐकें कथा दूसरीं ॥९७॥
देवें हयग्रीवरूप धरिलें ॥ तें वेदोद्धरण केलें ॥ तंव नारदे प्रश्निलें ॥ कैसा जाहला हयग्रीव ॥९८॥
मग नरनारायण ह्मणती ॥ पूर्वी महाप्रलयाचें अंती ॥ संपूर्णही भूतजाती ॥ पावलीं क्षय ॥९९॥
अंधकार जाहला सर्वां ॥ मागुती सृष्टीइच्छा देवा ॥ होवोनि महत्तत्वादि आघवा ॥ निर्मिला समूह ॥१००॥
मग ब्रह्मा जाहला उप्तन्न ॥ नाभिकमळापासोन ॥ तो सहस्त्रपत्रीं बैसोन ॥ मानसपुत्र निर्मिलें ॥१॥
मग नानालोक रचिले ॥ नानाभूतग्राम स्त्रजिले ॥ ब्रह्मा जन्मला जिये वेळे ॥ कमलपत्रीं ॥२॥
तेव्हां कृष्णरक्त दोनी ॥ बिंदु उद्भवले जीवनीं । तेचि मधुकैटभ दोने ॥ जाणिजे दैत्य ॥३॥
मधुकैटभ दोनी दैत्य ॥ हे विष्णुचे कर्णजात ॥ ऐसें पुराणांतरमत ॥ परि न मीळे भारतीं ॥४॥
ते उपजतांचि गदामुष्टी ॥ धाविन्नले ब्रह्मयापाठीं ॥ सांडिलें धावतां परमेष्ठीं ॥ मुर्खींहुनि चारी वेद ॥५॥
दैत्यी ते वेद हरोनी ॥ राहिले पृथ्वीतळीं जावोनी ॥ तेणें अंधकारप्राय होवोनी ॥ राहिला ब्रह्मा ॥६॥
मग धर्माधर्म कांहीं ॥ भासती ना कोणासिही ॥ विष्णु स्मरिला लवलाहीं ॥ विधीनें दुःखें तैं ॥७॥
ह्मणें तुझिये मानापासोन ॥ मी पहिला जाहलों उप्तन्न ॥ दृष्टी पाहतां मागुतेन ॥ दुजें जन्म जाहलें ॥८॥
तुसरे जन्म वचनमात्रें ॥ चौथें जाहलें क्षोत्रद्दारें ॥ पांचवें नासिकद्दारें खरें ॥ साहवें अंडज ॥९॥
हें सातवें पद्मापासोन ॥ जन्मोजन्मीं तुझा नंदन ॥ आतां दैत्यीं केलें वेदहरण ॥ आंधारलों सर्वार्थीं ॥११०॥
वेद हरिले ऐसें ऐकोनी ॥ देवें निद्रा सांडोनी ॥ हयशीर्ष तिये क्षणीं ॥ धरिलें रुप॥११॥
वेदांचें स्थान वहिलें ॥ अश्वाचें मस्तक धरिलें ॥ आतां विवरण ऐका भलें ॥ त्या मस्तकाचें ॥१२॥
मस्तक तेंचि ऊर्ध्वलोक ॥ सुर्यकिरण केश देख ॥ कर्ण तो पाताळलोक ॥ ललाट पृथ्वी ॥१३॥
गंगासरस्वती भ्रूवा जाण ॥ चंद्रसूर्य ते नयन ॥ संध्या नासिक प्रमाण ॥ ओंकार संस्कार ॥१४॥
विजू ते जिव्हा थोर ॥ दंत सोमप पितर ॥ गोलोक ब्रह्मलोक निर्धार ॥ ओष्ठ दोनी ॥१५॥
लक्ष्मी ते वाचा जाण ॥ ऐसें शुभ्र हृयशीर्ष निर्माण ॥ हें हयरूप धरोन ॥ देवें शब्द केला ॥१६॥
तो शब्द आइकोनी ॥ वेदपाताळीं ठेवोनी ॥ दैत्य धांवोनी आले दोनी ॥ तंव देव गेला पाताळा ॥१७॥
तेथोनि वेद उद्धरीले ॥ क्षीरब्धिउत्तरभागीं ठेविलें ॥ मग आपण धरियेलें ॥ पुर्वमूर्तींसी ॥१८॥
दैत्य इकडे तिकडे फिरती ॥ शिणले कांहींच नेणती ॥ पाताळीं जावोनि जंव पाहती ॥ तंव वेद नाहींत ॥१९॥
मागुते क्रोधें निघोनी ॥ क्षीरसमुद्रीं जावोनी ॥ विष्णु निद्रिस्थ देखोनी ॥ केलें जा गें ॥१२०॥
तैं युद्ध करोनि चक्रपाणे ॥ मधुकैटम मर्दिले दोनी ॥ मग ब्रह्मा संतृष्ट होवोनी ॥ रचिलें ब्रह्मांड ॥२१॥
ऐसें हयग्रीवें वहिलें ॥ वेदांचें उद्धरण केलें ॥ हें भारतोक्त कथिलें ॥ परि अनारिसें पुराणांतरीं ॥२२॥
ते प्रथमस्तबकीं कथा ॥ कथिली असे संक्षेपता ॥ ऋषीश्वरीं यज्ञ करितां ॥ कीं लाविलें हयशिर ॥२३॥
आतां असो हें वेदोद्धरण ॥ वेदमर्गें चालतां ब्राह्मण ॥ निग्रहानुग्रहीं संपूर्ण ॥ समर्थ जाहले ॥२४॥
ऐकें निग्रहस्वभाव ॥ अग्नीषोमात्कक विश्व ॥ परमेश्वरें स्त्रजिलें सर्व ॥ आद्य कालीं ॥२५॥
अग्नि ह्मणिजे ब्राह्मण ॥ सोमशब्दें क्षत्रिय जाण ॥ हे परस्परें आश्रयस्थान ॥ इयेअर्थीं इतिहास ॥२६॥
विश्वरूप पुत्र त्वष्ट्याचा ॥ तो भाचा होय दैत्यांचा ॥ आणि तोचि गुरु इंद्राचा ॥ विद्याविषयीं ॥२७॥
तो यागादिकीं देवांस ॥ भाग देतसे प्रत्यक्ष ॥ परि दैत्यांसि अप्रत्यक्ष ॥ करी भांगा ॥२८॥
तें कळलें दैत्यांसी ॥ कीं बळक्षीणा होतें आह्मासी ॥ मग प्रार्थोनि बहिणीसी ॥ ह्मणते जाहले ॥२९॥
त्वां सांगावें स्वपुत्रासी ॥ कीं प्रत्यक्षभाग देई आह्मासी ॥ जेणें करोनि दैत्यासीं ॥ होय वृद्धी ॥१३०॥
मग तियें नंदनवनीं ॥ विश्वरूपा सांपडवुनी ॥ ह्मणे पुत्रा तुझी निंद्य करणी ॥ मामेयां क्षय करितोसी ॥३१॥
या मातेचिये वचनें ॥ मातृपक्ष वृद्धी कारणें ॥ तप आरंभिलें तेणें ॥ ते कळलें इंद्रासी ॥३२॥
ह्मणोनि विघ्न कराया ॥ अप्सरा मोहनार्थ पाठविल्या ॥ येरू अप्सरां देखोनियां ॥ पावला मोह ॥३३॥
यावरी निघाल्या कामिनी ॥ तो ह्मणे वर मागा वचनीं ॥ येरीं ह्मणती इंद्रावांचोनी ॥ नाहीम वर इच्छित ॥३४॥
तेणें विश्वरूप कोपला ॥ इंद्र बळक्षयार्थ त्या वेळां ॥ जप करिता जाहला ॥ वेदमंत्रें ॥३५॥
मंत्रें त्रिशिरात्व पावला ॥ आणि देवेंद्र क्षीण जाहला ॥ तीनी मस्तकें तये वेळां ॥ त्या विश्वरूपासी ॥३६॥
जे वैदिक याग करित ॥ सोमपान तैं करित ॥ तें ता मुखें असे घेत ॥ आपुलिये ॥३७॥
देव यज्ञभागा वेगळे ॥ तेणें विश्वरूपें केले ॥ ह्मणोनि ब्रह्मया शरण गेले ॥ सकळ देव ॥३८॥
विधि ह्मणे दधीचि मुनी ॥ तप करितसे मेदिनीं ॥ त्यांच्या अस्थि मागोनी ॥ तेणें वज्रें मरेल हा ॥३९॥
मग देव दधीचीपाशीं ॥ जावोनि मागती अस्थीसी ॥ तेणें वज्रें त्रिशिरासी ॥ मारिलें इंद्रें ॥१४०॥
मस्तकें छेदिलीं तीनी ॥ तंव दैत्यांहीं तत्क्षणीं ॥ तयाचा देह मंथोनी ॥ जन्मविला वृत्तासुर ॥४१॥
तोही इंद्रें मारिला ॥ परि ब्रह्महत्येस्तव पळाला ॥ मानससरोवरीं लपाला ॥ पद्मिणीतंतुमाजी ॥४२॥
त्रैलोक्य धर्मभ्राष्ट जाहलें ॥ ह्मणोनि देवीं तिये वेळे ॥ इंद्रपदवरी स्थापिलें ॥ नहुषरायासी ॥४३॥
तेणें त्रैलोक्य भलें ॥ राजधर्में चालविलें ॥ मग कोणे येके वेळे ॥ ऐसें मनीं विचारी ॥४४॥
जरी इंद्राचे समस्त ॥ भोग आपण भोगिलेत ॥ परि एक राहिला मनोरथ ॥ शचीभोगाचा ॥४५॥
तो इंद्राणीसि ह्मणे आपण ॥ म्यां इंद्रपदीं बैसोन ॥ भोग भोगिले संपूर्ण ॥ सुरपतीचे ॥४६॥
तुं मज भोज देई वहिली ॥ तेणें इंद्राणी दुखवली ॥ चिंता करितां शुष्क जाहली ॥ येरें दुराग्रह धरियेला ॥४७॥
मग बृहस्पतिप्रती ॥ येवोनि शरण एकांतीं ॥ सांगीतलीं सकळ स्थिती ॥ नहुषरायाची ॥४८॥
गुरु ह्मणे इंद्राणिये ॥ उपश्रूति नामें देवता आहे ॥ तियेचें आराधन लाहें ॥ करावें तुवां ॥४९॥
तं सांगेल तें करीं ॥ मग आराधना करी येरी ॥ उपश्रुति तिये अवसरीं ॥ जाहली प्रसन्न ॥१५०॥
ह्मणे शुभांगी जें इच्छिसी ॥ तें मी करीन परियेसीं ॥ येरी ह्मणे इंद्रपतीसी ॥ दाखवीं माये ॥५१॥
मग तियें मानससरोवरीं ॥ कमाळिणीतंतुमाझारी ॥ इंद्र दाखविला नेत्रीं ॥ शचीलागीं ॥५२॥
येरें शची कृश देखोनी ॥ बोलिला दुःखी होवोनी ॥ ह्मणे कृश कां कामिनी ॥ जाहलीस ॥५३॥
तिये आपुला समग्र ॥ सांगीतला समाचार ॥ ऐकोनि ह्मणे सुनासीर ॥ न करीं चिंता ॥५४॥
त्यासी जावोनि ह्मणे झडकरीं ॥ इंद्र जिये वाहनावरी ॥ बैसला नसेल त्यावरी ॥ बैसोनि येई ॥५५॥
मग तुजप्रति येईन ॥ शची हरूषली ऐकोन ॥ तैसेंचि केलें येवोन ॥ गृहाप्रती ॥५६॥
तंव नहुषें ऋषि ब्राह्मण ॥ वाहनी जुंपोनि हाणी चरण ॥ तेथें वसिष्ठें शापोन ॥ शापिन्नला ऐसा ॥५७॥
कीं तुं पूडें पृथ्वीये ॥ वहुतकाळ सर्प होये ॥ तंव पडिला धरणीये ॥ होवोनि सर्प ॥५८॥
मग देवीं इंद्र आणिला ॥ राज्यपदीं स्थापिला ॥ ऐसा प्रभावो सांगीतला ॥ ब्राह्मणांचा ॥५९॥
हे दधीचीची कथा ॥ द्दितीयस्तबकीं असे आनवार्ता ॥ तेवीं नहुषाचींही कथा ॥ कथिली असे मागांची ॥१६०॥
परि प्रभावविशेषार्थ ॥ येथ कथिली संकलित ॥ ऐसें सामर्थ्य अद्भुत ॥ अनुष्ठानाचें ॥६१॥
तें वेदावेगळें नाहीं ॥ ऐसें अनंत सामर्थ्य पाहीं ॥ ते वेद जाणे सर्वही ॥ नारायणस्वरूप ॥६२॥
ब्राह्मणांचिये स्वभावें ॥ क्षत्रियें पालन करावें ॥ ब्राह्मणीं शुभ चिंतावें ॥ क्षत्रियांसी ॥६३॥
ऐसें नारदासी स्ववचनें ॥ निरुपिलें नरनारायणें ॥ तिंचि कथिलें तुजकारणें ॥ युधिष्ठिरा गा ॥६४॥
ऐसिया भीष्माक्तावरी ॥ युधिष्ठिर प्रश्न करी ॥ ते कथा असे पुढारी ॥ ह्मणे मधु ० ॥६५॥
इति श्रीक० त्रयो० नारदनारायणसंवादप्र ० ॥ एकविं० १६६
॥ इति श्रीकथाकल्पतरौ त्रयोदशस्तबक एकविंशोध्यायः समाप्तः ॥