॥ श्रीगणेशाय नमः ॥
वैशंपायना ह्मणे जन्मेजयो ॥ मुने तूं ज्ञानसागरींचा डोहो ॥ तरी सांगें कथान्वयो ॥ मोक्षधर्मीचा ॥१॥
मग ह्मणे वैशंपायन ॥ राया तूं श्रोतायांमाजी धन्य ॥ तरी ऐकें चित्त देवोन ॥ शांतिपर्वोक्त ॥२॥
भीष्माप्रति युधिष्ठीरें ॥ पुसिले मोक्षधर्म विस्तारें ॥ तें सांगतों सारोद्धारें ॥ पुण्ययशवर्धक ॥३॥
धर्म ह्मणे गंगासुता ॥ राजधर्म आपद्धर्म तत्वतां ॥ सांगीतले तरी आतां ॥ मोक्षाश्रमधर्म सांगिजे ॥४॥
ऐसें ऐकोनि ह्मणे भीष्म ॥ सर्वाश्रेष्ठ मोक्षधर्म ॥ ज्यापासाव उत्तम ॥ पाविजे फळ ॥५॥
तरी आत्ममोक्ष कारणें ॥ राया प्रयत्नचि करणें ॥ ययावरी धर्म ह्मणे ॥ पुसतों येक ॥६॥
पिता पुत्र धन कांता ॥ बंधु गोत्रजादि नासले असतां ॥ बुद्धी कैसी कीजे ज्ञाता ॥ जेणें शोक नासेल ॥७॥
मग भीष्म ह्मणे वहिलें ॥ जें नाशिवंत तें नासलें ॥ ऐसें जाणावें तिये वेळे ॥ हेंचि शोक नाशक ॥८॥
येणें परी नाशावा शेक ॥ इये अर्थीं सेनजित देख ॥ तयाप्रति ब्राह्मण येक ॥ बोलता जाहला ॥९॥
तो राजा पुत्रशोकें ॥ जाहला अति विकळ दुःखें ॥ मग ब्राह्मणें ज्ञान निकें ॥ उपदेशिलें तयासी ॥१०॥
अगा अशोच्यपदार्थाचा शोक ॥ तुं कां करितोसि अविवेक ॥ जेथोनि आलों सकळिक ॥ तेथेचि जाणें ॥११॥
सर्वही चराचर पाहें ॥ क्षणभंगुर शेवटीं जाय ॥ हा पसारा आपुला नोहे ॥ तया राज्यलक्ष्मी ॥१२॥
जैसा मी तैसाचि अन्य ॥ ऐसें मनीं विचारोन ॥ खेदहर्ष सांडोन ॥ राहिजे निस्पृह ॥१३॥
जेवीं काष्ठें समुद्री मिळती ॥ मागुतीं वेगळाळीं होती ॥ तेवीं भूतें संयोग पावती ॥ मागुता वियोग ॥१४॥
ह्मणोनि पुत्रादि ज्ञातिबांधव ॥ येथ नकरावा स्नेहभाव ॥ याचा नाश असे सर्व ॥ शेवटीलपणें ॥१५॥
प्रथम तरी नाश नव्हता ॥ तो नाश जाहला मागुता ॥ उप्तत्तिप्रळय व्यवस्था ॥ रात्रिदिनन्यायें ॥१६॥
सुखानंतर असे दुःख ॥ दुःखा अंती होय सुख ॥ सुखापासाव सुखदूःख ॥ पावलासि तूं ॥१७॥
मागुतेन पावसी सुख ॥ निरंतर नाहीं सुखदुःख ॥ हें शरीर आश्रयस्थानक ॥ दोहिंचें जाणीं ॥१८॥
पुत्र आणी दारा धनीं ॥ आसक्त होवोनियां प्राणी ॥ अंती क्केश पावतो मनीं ॥ मोहभावें ॥१९॥
पुत्रादिकांच्या नाशीं ॥ शोक पावतो अहर्निशीं ॥ परि हें सर्व प्राणियांसी ॥ होतें दैवास्तव ॥२०॥
शूर भीरू बुद्धीवंत ॥ धीर दुर्बळ बळवंत ॥ सुखदुःख होतें नेमस्त ॥ या समस्तांसिही ॥२१॥
तरी बुद्धी करोनी बरवें ॥ सुखचि ऐसें मानावें ॥ आणि विचारें सांडावें ॥ प्राप्त दुःख ॥२२॥
जे पुरुष बुद्धिरहित ॥ ते दुःख पावती अखंडित ॥ दुःखकारण यथार्थ ॥ आलस्य होय ॥२३॥
यास्तव आलस्य टाकोन ॥ सुखलागीं कराआ यत्न ॥ सुखदुःख प्रियाप्रिय पावोन ॥ सेवावें तैसेंची ॥२४॥
शोकस्थानें सहस्य सत्य ॥ आणि भयस्थानें शत ॥ मूर्खा प्राप्त होती संतत ॥ नव्हती पंडितासी ॥२५॥
जें सर्वकामसुख ॥ आणी जें दिव्यसुख देख ॥ याहूनही तृष्णाक्षयसुख ॥ श्रेष्ठ होय ॥२६॥
पूर्वदेहकृत कर्म जाण ॥ शुभ अथवा अशुभ प्रमाण ॥ तेंचि शूर मूढ प्राज्ञ ॥ यांतें प्राप्त होय ॥२७॥
तैसींच काळें करुनी ॥ प्रियें अप्रियें दोने ॥ सुखदुःखालागीं प्राणी ॥ होती प्राप्त ॥२८॥
यास्तव सर्वकाम अवधारीं ॥ निंदोनियां त्यजावे दूरी ॥ हा काम अनर्थकारी ॥ समस्तांसी ॥२९॥
कामसंहार जिये समयीं ॥ करितो प्राणिया सर्वही ॥ आत्मतत्त्व तिये समयीं ॥ पावत असे ॥३०॥
जिये विषयीं ममता थोरीं ॥ तोचि विषय होतो परितापकरी ॥ ह्मणोनि सर्व विषय दूरी ॥ त्यजावे ज्ञानबळें ॥३१॥
जेव्हां कामादिकां पासोनी ॥ भिन्न होतो भय पावोनी ॥ क्रोध मद मत्सर टाकोनी ॥ तेव्हां ब्रह्मीभूत होय ॥३२॥
सत्य अनृत भय अभय ॥ शोक आनंद प्रिय अप्रिय ॥ टाकोनियां शांत होय ॥ तेव्हां ब्रह्मीभूत होतो ॥३३॥
हे दुस्तज तृष्णा टाकिजे ॥ तरिचि निर्विकल्प सुख पाविजे ॥ इये अर्थी गाथा ऐकिजे ॥ पिंगलावेश्येची ॥३४॥
पिंगला नामें गणिका स्त्री ॥ कोणी नये तियेचे घरीं ॥ ह्मणोनि निर्वेद अंतरीं ॥ उपनला तीचिये ॥३५॥
ह्मणे धिक् जियाळें संसारीं ॥ मी अनेकपुरुषां बरोबरी ॥ द्रव्यार्थचि क्रीडा करीं ॥ कामवासनें ॥३६॥
तरी साडोनि कामवासना ॥ पति करूं जगज्जीवना ॥ मग त्याग करूनि अंगना ॥ जाहली विरक्त ॥३७॥
मग ते वनीं मज भेटली ॥ म्यां वैराग्यस्थिति पुसिला ॥ तेव्हां तियें सांगितली ॥ विस्तारोनी ॥३८॥
ह्मणे शोकें संतप्त होवोन ॥ मी निर्वेदातें पावोन ॥ विषयवासना त्यजोन ॥ पावलें सुख ॥३९॥
ऐसें ब्राह्मणें केलें निरुपण ॥ सांगीतलें पिंगलाख्यान ॥ तें सेनजितें परिसोन ॥ सांडिला शोक ॥४०॥
धर्मरायासि ह्मणे भीष्म ॥ ऐसे पवित्र मोक्षधर्म ॥ तुज सांगितले उत्तम ॥ सेनाजितगीतांतर्गत ॥४१॥
तंव धर्म ह्मणे गंगासुता ॥ हा काळ सर्वक्षयकर्ता ॥ ययामध्यें सुख तत्त्वतां ॥ केविं होय ॥४२॥
मग ह्मणे गंगानंदन ॥ इये अर्थीं पुरातन ॥ असे पितापुत्र संभाषण ॥ तें ऐकें आतां ॥४३॥
कवणी एक ब्राह्मण ॥ त्याचा पुत्र सज्ञान ॥ सर्वशास्त्रवेता होवोन ॥ पुसिलें पितयासी ॥४४॥
ह्मणे आयुष्य जातें क्षणीं ॥ तरी सुखप्राप्ती होय जेणेंकरूनी ॥ तें मज सांगा निर्वाणीं ॥ धर्माचरण ॥४५॥
यावरी पिता ह्मणे अवधारीं ॥ आधीं ब्रह्मचर्य आचरीं ॥ मग वेदाभ्यास करीं ॥ होई गृहस्थ ॥४६॥
पुत्र उपजर्वी सदाचारीं ॥ अग्निहोत्रादि कर्मे करीं ॥ यावरी जाई वनांतरी ॥ तेथें सुख पावसी ॥४७॥
परि पुत्रा ऐक विशेषें ॥ मॄत्यूनें लोक अभ्याहत असे ॥ आणि जरेनें तापित असे ॥ अहोरात्र ॥४८॥
प्रतिदिवशीं प्रमाण ॥ आयुष्य होत आहे क्षीण ॥ जैसा स्वल्पोदकीं मीन ॥ सुख नपवेची ॥४९॥
पुरुष सुख नपवे कहीं ॥ जिये दिनीं तपादि कांहीं ॥ केले नाहीं तो दिवसही ॥ वृथा गेला ॥५०॥
आणि तरी प्रतिदिवशी ॥ मृत्युसेना स्वयें बळेसीं ॥ ओढीत असे प्राणियासी ॥ ऐसें जाणीजे ॥५१॥
मृत्यु समीप जाणिजे ॥ तेणें तत्काळ सावध असिजे ॥ धर्मे कीर्तिसुख पाविजे ॥ इह परलोकीं ॥५२॥
पुत्रादिकांच्या ठायीं ॥ मोहें आसक्त न व्हावें कहीं ॥ मृत्यु समीपचि पाहीं ॥ सुप्त व्याघ्रवत ॥५३॥
जैसा पशूतें महाव्यघ्र ॥ ओढोनियां नेतो शीघ्र ॥ तैसा जीवातें महाक्रूर ॥ नेतो मृत्यु ॥५४॥
तरी सत्यव्रताचरण ॥ करी योग परायण ॥ शांतदांत निर्वाण ॥ तो तरे मृत्युसी ॥५५॥
मृत्यु आणि अमृत्य ॥ हे देहीं असतीं नांदत ॥ मोहें करोनि जाणीजे मृत्यु ॥ अमृत्यु सत्यें करोनी ॥५६॥
विद्येसमान सुख नाहीं ॥ विद्येसमान चक्षु नाहीं ॥ ह्मणोनि धनदान यांचें कहीं ॥ तुज प्रयोजन नसावें ॥५७॥
ऐसें पुत्रासि सांगोन ॥ पितयें तपार्थ सेविलें कानन ॥ तरी सुखाचे कारण ॥ निष्कामत्वची ॥५८॥
तंव धर्म करी विनवाणी ॥ कीं धनी आणि निर्धनी ॥ यांसी सुखदुःखें दोनी ॥ कैसीं होताती ॥५९॥
मग भीष्म ह्मणे इये अर्थी ॥ पूर्वी शम्याकें मजप्रती ॥ गाथा सांगीतली प्रीती ॥ ते अवधारिजे ॥६०॥
एक ब्राह्मण होता भला ॥ तो कुस्त्रीसंगें क्केशला ॥ मग अनुभवों लागला ॥ नानादुःखें ॥६१॥
एकदा तो ह्मणे स्वजीवा ॥ तपमार्ग असे बरवा ॥ सुखें तरी हर्षे न करावा ॥ दुःखें न मानावा क्केश ॥६२॥
हाताचें करूनियां उसें ॥ द्रव्यहीन निजत असे ॥ परि धनाढ्य व्याप्त असे ॥ क्रोधलाभें ॥६३॥
सदा असे दुःखयुक्त ॥ लक्ष्मीमोहें करुनि चित्त ॥ शेवटी होय अधःपात ॥ प्राणियासी ॥६४॥
यास्तव द्रव्यादिकांचा संग ॥ दुःख कारणचि अनेग ॥ मग करोनि सर्व त्याग ॥ जाहला अकिंचन ॥६५॥
भीष्म ह्मणे गा पांडवा ॥ यास्तव द्रव्यसंग टाकावा ॥ तंव धर्म ह्मणे भीष्मदेवा ॥ करितों विज्ञप्ती एकी ॥६६॥
धन तृष्णा बहुत ज्यासी ॥ कैसें सुख होईल त्यासी ॥ भीष्म ह्मणे तरी परियेसीं ॥ कुंतिकुमरा ॥६७॥
सर्वविषयीं समान शांती ॥ अनिंदा अनायास सर्वाथीं ॥ सत्यवाक्य निर्वेदमती ॥ हे पांच पदार्थ ॥६८॥
हे असतीं जयापाशीं ॥ सुख प्राप्त होय त्यासी ॥ इये अर्थीं परियेसी ॥ मंकी निर्वेदोक्त ॥६९॥
मंकी बहु धनाढ्य होता ॥ तें धन गेलें काळें करितां ॥ मग धनशेषें जाहला घेता ॥ वांसरूं येक ॥७०॥
तें घरीं होतें बांधिलें ॥ तंव उंट येक पळत आलें ॥ तेणें ओढोनियां नेलें ॥ मारिलें वत्स ॥७१॥
मग काहीं नाहीं निस्तरावया ॥ तैं परम क्केशी होवोनियां ॥ गृहत्याग करोनियां ॥ जाहला वीतरागी ॥७२॥
तो जनकसभेसि गेला ॥ तेथें शुकदेवो देखिला ॥ आणि जनसमूह मीनला ॥ असे बहुत ॥७३॥
तयांप्रति बोलिला देखा ॥ ह्मणे लोकहो आइका ॥ संग आणि विषय टाका ॥ सर्वोपभोगादी ॥७४॥
हे टाकितां मूळींहून ॥ शांति पावाल निर्वाण ॥ नातरी दुःखशोककारण ॥ हेंचि सकळार्थी ॥७५॥
पूर्वी जेजे जाहलें ॥ आणि पुढां होतील जेतुले ॥ कोणीही अंत नाहीं पावले ॥ विषयसुखाचा ॥७६॥
तृष्णा शोक श्रम विशेषें ॥ अखंड वृद्धीतें पावत असे ॥ धननाश हा भर्वेसेंक ॥ महद्दुःखकारण ॥७७॥
अर्थलोलुपता शोकायन ॥ यास्तव अखंड तृप्त असोन ॥ यथालब्ध द्रव्यें करोन ॥ सुखी रहावें ॥७८॥
कामलोभादि आघवे ॥ तृष्णाकार्पण्य टाकावें ॥ कामास्तक्त दुःख पावे ॥ एथ नाहीं संदेह ॥७९॥
गांगेय ह्मणे धर्मासी ॥ ऐसें मंकी जनकसभेसी ॥ निवेंदें बोलिला परियेसीं ॥ वैराग्यपर ॥८०॥
आणिक इतिहास इये अथीं ॥ एकदा नहुष रायाप्रती ॥ सांगीतला सवित्पत्तीं ॥ बोध्यऋषीश्वरें ॥८१॥
म्यांही शोक नाशावया ॥ सहा गुरु केले धर्मराया ॥ पिंगळा सर्प कुरर पक्षिया ॥ सारंग ईषका कुमारी ॥८२॥
तया साहींचा वृत्तांत ॥ चोवीसगुरु ओळिआंत ॥ सांगीतला असे साद्यंत ॥ पद्मपुराणीं ॥८३॥
ऐसी ऐकोनि मंकीगीता ॥ धर्म ह्मणे गंगासुता ॥ सांगें वित्तशोक प्राप्त असतां ॥ कोणे वृत्ती रहावें ॥८४॥
मग भीष्म ह्मणे प्रसिद्ध ॥ अजगरमुनि आणि प्रल्हाद ॥ यांचा ऐकें संवाद ॥ एतदर्थीं ॥८५॥
प्रल्हाद अजगरासि पुसत ॥ तूं स्वस्थ शक्त मृदुदांत ॥ अनसुयक सुष्टुभाषित ॥ बहुमान्य अससी ॥८६॥
परि यालोकीं विचरोनि सही ॥ धर्मार्थ अंगिकारित नाहीं ॥ आससी काम त्याजोनि सर्वही ॥ तरी तुझी वृत्ती सांगें ॥८७॥
तंव अजगर ह्मणे हीं भुतें ॥ उत्पत्तिस्थिती नाशवंते ॥ यातें पाहोनि हर्षखेदातें ॥ मी पावत नाहीं ॥८८॥
यांचा हाचि स्वभाव असे ॥ ऐसें जाणोनि विशेषें ॥ आणि चराचर विश्वसर्वाशें ॥ नाशिवंत ॥८९॥
सर्वसृष्टी नाशिवंत ॥ ऐसें जाणोनि राहिलों तटस्थ ॥ मोठा लहान ग्रास मिळत ॥ तैसाचि भक्षितों ॥९०॥
तो नमिळे तरी बहुतही ॥ उपवासचि करितों पाहीं ॥ कदाचित कण शुष्कही ॥ अथवा पिण्याक ॥९१॥
कदाचित स्वादु उष्णान्न ॥ करितों यथालब्ध भोजन ॥ कदाचित भूमिपलंग पाषाण ॥ निद्रा करितों यांवरी ॥९२॥
कदाचित उत्तम आसनें ॥ अथवा वनीं निद्रा करणें ॥ कदाचित पट्टकुळें परिधानें ॥ कदाचित चीरकौपीन ॥९३॥
ऐसा असें अयाचितवृत्तीं ॥ जिये समयीं ज्याची प्राप्ती ॥ तिये समयीं त्याची प्रीती ॥ भोगोनि असें ॥९४॥
हे अजगरवृत्ति जाण ॥ अंगिकारिली आपण ॥ ह्मणोनि सुखसमाधान ॥ पावत असें ॥९५॥
हें प्रल्हादा केलें निरुपणे ॥ पुढें भीष्म सांगेल अग्राख्यान ॥ तया श्रोतीं द्यावें अवधान ॥ ह्मणे मधुकरकवी ॥९६॥
इति श्रीकथाकल्पतरू ॥ त्रयोदशस्तबक मनोहरू ॥ नानाख्यानकप्रकरू ॥ दशमाध्यायीं कथियेला ॥९७॥
॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥
॥ इति श्रीकथाकल्पतरौ त्रयोदशस्तबक दशमोऽध्यायः समाप्तः ॥