मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक १३|
स्तबक १३ - अध्याय ३१

कथा कल्पतरू - स्तबक १३ - अध्याय ३१

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मग नारद ह्नणे जी श्रीहरी ॥ काहीं सभा विसर्जिलियावरी ॥ प्रश्न केला ऋषीश्वरीं ॥ शंकरासी ॥१॥

कीं कर्ताहर्ता संपूर्ण ॥ आणि काळस्वरुप कवण ॥ ययाउपरी त्रिनयन ॥ बोलता जाहला ॥२॥

ह्नणे जो वासुदेव निर्गुण ॥ तोचि सर्वाचें कारण ॥ त्याचें माहात्म्य संपूर्ण ॥ सांगों तुह्मा ॥३॥

तो ईश्वरपुरुष सत्य ॥ सकळविश्व जया आंत ॥ नानारुपें असे धरित ॥ त्रैलोक्य रक्षावया ॥४॥

तो मनुवंशीं अवतरेल ॥ मनूचा अंगराजा होईल ॥ तयापासोनि जन्मेल ॥ पुत्र अंतर्धामा ॥५॥

त्याचा हविर्धामा पाहीं ॥ तयापासोनि प्राचीनबहीं ॥ त्याचा प्राचेतस सही ॥ दक्ष तयाचा ॥६॥

दक्षकन्येचा पवित्र ॥ कश्यप होईल भ्रतार ॥ तये कश्यपाचा कुमर ॥ सूर्य जाणा ॥७॥

सूर्यापासोनि मनुवंश ॥ सुद्युम्न इळारुप विशेष ॥ त्याचा नहुष हे कथा परियेस ॥ प्रकारांतरें ॥८॥

नहुषाचा ययाति जाण ॥ त्याचा यदु त्याचा क्रोष्टा नंदन ॥ क्रोष्टयापासोनि पुत्र सुलक्षण ॥ वृजिनवंत ॥९॥

त्याचा सुरथ त्याचा सिंह जाण ॥ तिये वंशीं शूरसेन ॥ वसुदेव त्याचा नंदन ॥ तयाचे गृहीं ॥१०॥

वासुदेव साक्षात ॥ केवळ ब्रह्म मूर्तिमंत ॥ उपजेल स्थितिवंत ॥ तोचि पाळक ॥११॥

तो काळरुप हर्ताकर्ता ॥ तुह्मी ऋषीश्वरीं समस्तां ॥ त्याची पूजा कराल तथा ॥ मीही पूजीन ॥१२॥

ते बंधु रामकृष्ण ॥ विष्णुस्वरुप पुरातन ॥ ऐसें शिवें आह्मासि वचन ॥ बोलतांची ॥१३॥

तंव तत्समयीं हिमाचळ ॥ अंधकारप्राय सकळ ॥ जाहला धूमव्याकुळ ॥ प्रदेश तो ॥१४॥

मग दाहीदिशां भोंवते ॥ आह्मी चालिलों निरुते ॥ पाठीं पाहों तंव तेथें ॥ कैंचा हिमाचळ ॥१५॥

अकस्मात भ्रमों लागलों ॥ पृथ्वीवरी प्रविष्ट जाहलों ॥ मग यात्रा करीत आलों ॥ इये भूमीसी ॥१६॥

तरी शिवगौरीसंवादसमयीं ॥ जैसें देखिलें ऋषीश्वरांहीं ॥ तैसेंचि आतां येथेंही ॥ कृष्णनाथा देखिलें ॥१७॥

कृष्णा तवमूर्ती देखिलिया ॥ कृतकृत्य जाहलों स्वामिया ॥ मग नमस्कार करोनियां ॥ गेले सर्व ऋषी ॥१८॥

तरी शिवगौरीसंवादवेळें ॥ ऋषीश्वरां शिवें बोलिलें ॥ तत्प्रमाणें नारदें कथिलें ॥ त्या सभेसी ॥ ॥१९॥

भीष्म ह्नणे धर्मा उत्तमा ॥ हा तुज सांगीतला महिमा ॥ तत्प्रमाणें पुरुषोत्तमा ॥ जाणसी तूंही ॥२०॥

त्याचे पूजनें तुज जय ॥ कीर्ति धर्मादि प्राप्त होय ॥ हें ऐकोनि धर्मराय ॥ पुसता जाहला ॥२१॥

कोण एकदेव स्वामिया ॥ कोणा पूजावें उद्धरावया ॥ कोणाची पूजा केलिया ॥ पाविजे मोक्षादिक ॥२२॥

यावरी भीष्मदेव ह्नणत ॥ जो विश्वाचा हेतुभूत ॥ तो महापुरुष सत्य ॥ पूजिजे त्यासी ॥२३॥

तये महादैवताचिया ॥ पूजा नानापरींचिया ॥ त्यांत नानाविध धर्मराया ॥ ऋषीश्वरमतें ॥२४॥

सहस्त्रनामें पृथकपृथक ॥ बोलिलीं असती अनेक ॥ परि त्यांत जपावें एक ॥ विष्णुसहस्त्रनाम ॥२५॥

तेणें जें प्राप्त पुण्य ॥ तें अश्वमेधशतें जाण ॥ तुळापुरुषादि महादान ॥ नानातीर्थे ॥२६॥

परि नामतुळणा अधिक ॥ विष्णूसि असे संतोषजनक ॥ धर्मअर्थ काम मोक्ष ॥ यांचे जपें पाविजती ॥२७॥

मग सहस्त्रनाम कथिलें बरवें ॥ तें मूळग्रंथीं पहावें ॥ येथ लिहितां आघवें ॥ विस्तार होईल ॥२८॥

॥ श्लोकः ॥ राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ॥ सहस्त्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥१॥

कैलासीं पार्वतीसि शंकरें ॥ हेंचि सांगीतलें विस्तारें ॥ तेंचि कथिलें गंगाकुमरें ॥ धर्माप्रती ॥२९॥

यावरी ह्नणे पंडुनंदन ॥ कीं भूतळीं पूजावें कोण ॥ आणि कीजे साष्टांग नमन ॥ कवणाप्रती ॥३०॥

भीष्म ह्नणे तत्समयीं ॥ ब्राह्मणाहूनि कोणी नाहीं ॥ मान्य पूजेसि तेचि सही ॥ इये अर्थी इतिहास ॥३१॥

पूर्वी सहस्त्रार्जुन अवधारीं ॥ माहिष्मतीये राज्य करी ॥ तेणें पूजा शुश्रूषा भारी ॥ केली दत्तात्रेयाची ॥३२॥

तेथ विद्या अभ्यासिलिया ॥ दत्त संतोषी होवोनियां ॥ ह्नणे तीनी वर राया ॥ मागें मजपें ॥३३॥

तंव मागता जाहला राजा ॥ एके वरें सहस्त्र भुजा ॥ दुजियें समुद्रांत ओजा ॥ जिंकावी पृथ्वी ॥३४॥

तिसरिये वराचें ग्रहण ॥ तें पृथ्वीचें राज्य पावोन ॥ धर्मे प्रजांचें पाळण ॥ सामर्थ्ये कीजे ॥३५॥

वर त्रय पावला ऐसे ॥ चौथा मागितला स्वेच्छें ॥ कीं माझे कृपेंविशेषें ॥ व्हावा महानुभाव ॥३६॥

दत्तात्रेय ह्नणे तथास्तु ॥ येरु वर पावोनि गेला देशांतु ॥ परि कोणे समयीं उन्मतु ॥ जाहला राजमदें ॥३७॥

रथीं बैसोनि फिरतां मही ॥ ह्नणे मजसमान कोणी नाहीं ॥ मीचि मान्य निग्रहानुग्रही ॥ सकळजगांत ॥३८॥

तंव अशरीरिणी ह्नणत ॥ विप्रप्रसादें पाविजे समस्त ॥ निग्रहानुग्रहीं विप्र समर्थ ॥ तूं न होसी जाणपां ॥३९॥

ऐसें वाक्य ऐकतां ॥ महाकोपें जाहला ह्नणता ॥ कीं ब्राह्मणांलागिं आतां ॥ जिंकिन मी ॥४०॥

ह्नणोनि दळ सन्नद्ध केलें ॥ तें वायुदेवें जाणितलें ॥ मग रायासि सांगों मांडिलें ॥ समजाउनी ॥४१॥

अगा हें अनुचित नृपनाथा ॥ तुवां द्विजपराभव करितां ॥ राष्ट्रक्षोभ सर्वथा ॥ होईल जाण ॥४२॥

तेणें तुझा होईल नाश ॥ तूं ह्नणविसी आपणास ॥ कीं रक्षणपालन सर्वास ॥ मीचि कर्ता ॥४३॥

ऐसें धरुनि मानसीं ॥ श्रेष्ठ मानिसी आपणासी ॥ तरी सहस्त्र कर पावलासी ॥ कोणे प्रभावें ॥४४॥

हें विचारीं पां मनांत ॥ विप्र नवी प्रतिष्ठा करित ॥ आणि असिली प्रतिष्ठा हरित ॥ महादैवत ब्राह्मण ॥४५॥

जिंकिलीया भूमीचें ॥ यांसी दान द्यावें साचें ॥ येथ प्राचीनकथा रुचे ॥ ते आइक ॥४६॥

सोमाची कन्या भद्रा ॥ ते विवाहार्थ अवधारा ॥ दीधली होती ऋषीश्वरा ॥ उतथ्यासी ॥४७॥

तो ऋषी गृहस्थाचारीं ॥ नांदत असे यमुनातीरीं ॥ त्याची स्त्री येके समयांतरीं ॥ जळीं स्नान करितां ॥४८॥

ते वरुणें धरोनि नेली ॥ बळें भोगूं मांडिली ॥ हे वार्ता नारदें कथिली ॥ उतथ्यासी ॥४९॥

कीं वरुणगृहीं पाहें ॥ तुझी स्त्री देखिली आहे ॥ तंव उतथ्य बोलता होय ॥ नारदासी ॥५०॥

ह्नणे स्वामी कृपा करोन ॥ तुह्मी तेथ जावोन ॥ कठिण वाक्य बोलून ॥ आणावी पत्नी ॥५१॥

येरु शीघ्र वरुणापें गेला ॥ नानापरी समजाविला ॥ परि तो विषयें मातला ॥ नेदी स्त्रियेसी ॥५२॥

हें नारदें येवोनि सांगीतलें ॥ मग उतथ्यें क्रोधा धरिलें ॥ तेणें कोपांगारें शोषिलें ॥ समुद्रजळ ॥५३॥

तंव वरुण व्याकुळ होवोन ॥ तिये स्त्रियेतें घेवोन ॥ उतथ्यासी आला शरण ॥ तरी मोठा कोण पां ॥५४॥

दुसरें पूर्वी दानवदैत्यांहीं ॥ देव द्विज पराभविले पाहीं ॥ तेणें राहिले यज्ञादिसर्वही ॥ हव्यकव्य ॥५५॥

मग देव दुःखें फिरतां ॥ अगस्त्य देखिला अवचिता ॥ शरणागत होवोनि समस्ता ॥ कथिलें वृत्तांतासी ॥५६॥

तंव त्याचे तपतेजबळें ॥ महाज्वाळाजाळ चालिले ॥ तेणे दैत्यदानव जाळिले ॥ पतंगवत ॥५७॥

ऐसें केलें विश्वरक्षण ॥ तरी क्षत्रिय आणि ब्राह्मण ॥ या दोहींत श्रेष्ठ कवण ॥ सांग राया ॥५८॥

ऐसेचि वसिष्ठ अत्रि च्यवन ॥ यांचें जाणावें महिमान ॥ ह्नणोनि मोठे ब्राह्मण ॥ मानावें तयांसी ॥५९॥

त्यांचिये प्रसादें पाहें ॥ त्रैलोक्यराज्य प्राप्त होय ॥ अवकृपें करिती क्षय ॥ इंद्रादिकांचा ॥६०॥

ह्नणोनि अर्जुना क्रूरभावें ॥ तुवां गर्वातें न करावें ॥ ऐसें सहस्त्रार्जुना बरवें ॥ बोधिलें पवनें ॥६१॥

ह्नणोनि गा धर्मराया ॥ ब्राह्मणांसि पूजिलें मियां ॥ वर्णाश्रम जाणोनियां ॥ दानधर्म चतुर्विध ॥६२॥

हें ऐकोनि मागुता ॥ धर्म भीष्मासि ह्नणे ताता ॥ मज सत्यधर्म आतां ॥ सांगा विस्तारोनी ॥६३॥

मग ह्नणे गंगानंदन ॥ सत्यधर्मी बहुळाख्यान ॥ सांगतों तें चित्त देवोन ॥ ऐकें सावध ॥६४॥

पूर्वीलयुगीं माथुरदेश ॥ होता धनधान्यव्याप्त बहुवस ॥ अन्नें यज्ञस्थानें विशेष ॥ शोभिवंत ॥६५॥

पंडित कवीश्वर विराजित ॥ उत्साह घरोघरीं बहुत ॥ धर्मकार्यै होती समस्त ॥ अपूर्व रचना ॥६६॥

पोंवळी हुंडे खंदक ॥ चावडिया मळे अनेक ॥ नागकेसर बकुळ चंपक ॥ सर्व वृक्षवल्ली ॥६७॥

त्या माथुरदेशाभीतरीं ॥ अर्धचंद्राकार कुसरी ॥ चंद्रावती नामें नगरी ॥ शोभिवंत ॥६८॥

नगराउत्तरभागीं थोर ॥ सिंहमृगादि भयंकर ॥ श्वापदें असती अपार ॥ गहन वनामध्यें ॥६९॥

तेथ कामरुपी नामें थोर ॥ व्याघ्र असे निरंतर ॥ भोंवती निळीं तृणें सुंदर ॥ बहुत असती ॥७०॥

तीं चरावया लागोनु ॥ कोणीयेक विप्रधेनु ॥ नीचश्रृंगी पृष्ठतनु ॥ शांत सुंदर ॥७१॥

निळकंठ घंगाळ शोभित ॥ होती गाईच्या कळपांत ॥ ते चुकोनि गेली तेथ ॥ चरतचरतां ॥७२॥

ते व्याघ्रें देखतांचि तत्क्षणीं ॥ महाउड्डाण करोनी ॥ तिये समीप येवोनी ॥ बोलता जाहला ॥७३॥

ह्नणे दैवयोगें आह्मासी ॥ देवें आहार तूं पाठविलीसी ॥ हें ऐकोनि बहुळेसी ॥ भयशोक उपनला ॥७४॥

तयेनें चंद्रमुख आपुला ॥ मनीं बाळक आठविला ॥ तेणें दुःखें आरंभिला ॥ आक्रंद थोर ॥७५॥

तंव व्याघ्र ह्नणे तूं इतुकें ॥ कां रोदन करितेसि दुःखें ॥ येथ आलीसि विशेषें ॥ भक्ष्य माझें ॥७६॥

आतां रडलिया रक्षील कोण ॥ तुझें वृथा शोकरुदन ॥ परि सांगें प्रयोजन ॥ कां रडतेस ॥७७॥

तंव गाय ह्नणे साचें ॥ तुज देखतां मरावयाचें ॥ हें मज विदित निर्वाणीचें ॥ परि मी मरणा रडत नाहीं ॥७८॥

अगा मी प्रथमचि व्यालियें ॥ घरीं सुंदर वत्स आहे ॥ त्यासी पाजिलें नाहीं मोहें ॥ नाहीं निरविलें कवणासी ॥७९॥

हें आठवूनि दीनाची ॥ रडतें खंती वाटे तयाची ॥ आज्ञा देसील तरीची ॥ वत्सा जवळी जाईन ॥८०॥

त्या बाळा स्तन पाजून ॥ सख्यांसि निरवूनि येईन ॥ पाठीं त्वां यथेष्ट भक्षण ॥ करावें माझें ॥८१॥

व्याघ्र ह्नणे अवधारीं ॥ कैंचा पुत्र मेल्यावरी ॥ मज देखोनीचि वनचरीं ॥ सांडिजतो प्राण ॥८२॥

आतां तूं आणि मी येथ ॥ या गोष्टी आहों करित ॥ तरी तूं गेलिया कुटुंबांत ॥ पुत्राजवळी ॥८३॥

तें पुत्रकुळ टाकोनी ॥ कां पां येसील फिरोनी ॥ लटिकेचि मनोरथ मनीं ॥ करुं नको गाई ॥८४॥

तंव गाई ह्नणे निर्वाण ॥ आण प्रमाण सत्य येईन ॥ वाघ ह्नणे वाहें आण ॥ कैसी पाहूं ॥८५॥

गाय ह्नणे द्विजगुरुसि पाहीं ॥ होमितां अग्नीचिये ठायीं ॥ तेथें विघ्न करी उपायीं ॥ त्यासी जें पाप होय ॥८६॥

व्याघ्रा तें पाप परियेसीं ॥ प्राप्त व्हावें मज बहुळेसी ॥ जरी मी न यें तुजपाशीं ॥ मागुतेन ॥८७॥

अथवा वेदाध्ययन करोनी ॥ वेद विकी द्रव्य घेवोनी ॥ उदरचाडे ह्नणोनी ॥ करी वेदाभ्यास ॥८८॥

नातरी मागणार ब्राह्मण ॥ जो न संतोषें थोडेन ॥ तयाचीं पापें दारुण ॥ व्हावीं मज ॥८९॥

मद्यमांस मीठ लाख ॥ विकितां वैश्यासि होय पातक ॥ जाणोनि परक्याची नांदणुक ॥ देखों न साहे ॥९०॥

परकीय गुणाभीतरीं ॥ अखंड जो अपवाद करी ॥ अथवा भ्रतारा न मानी नारी ॥ ऐसी पातकें ॥९१॥

नाहीं तरी उदरभरणें ॥ परद्रव्य हरुनि करणें ॥ त्याचेनि पापें मज लिंपणें ॥ जरी नयें मागुती ॥९२॥

वैश्वदेवादि न करितां जाण ॥ अखंड करी परान्नसेवन ॥ आणि जो करी गृहदहन ॥ पारकीय ॥९३॥

जो पारकेया विष घाली ॥ कन्या एकदा एका दीधली ॥ मग मागुती वोपिली ॥ आणिकेयासी ॥९४॥

अथवा करितां हरिकीर्तन ॥ कांहीं वोखटी गोष्टी करुन ॥ कथेमाजी करी विघ्न ॥ तें पाप लागो मज ॥९५॥

ज्याचें घरीं आशा धरोनी ॥ कोणी अन्नार्थ आले प्राणी ॥ त्यांची यथाशक्ति करोनी ॥ पुरविना आशा ॥९६॥

जयाचिया दोनी नारी ॥ गुणवंतिया सुंदरी ॥ त्यांत एकी त्यजोनि दूरी ॥ मानी प्रियतमा ॥९७॥

येकलाचि पक्कान्न पाहें ॥ गोडगोड रांधोनि खाय ॥ जो पर्वकाळीं बैल वाहे ॥ त्याचीं पातकें ॥९८॥

इयें मुख्य करोनि पापें ॥ मज होवोत अमूपें ॥ जरी न येई विकल्पें ॥ मागुती येथ ॥ ॥९९॥

तंव व्याघ्र ह्नणे चित्तीं ॥ पाहों ना कां हे प्रचीती ॥ मग ह्नणे जावें त्वरितीं ॥ बहुळे तुवां ॥१००॥

बोलाप्रमाणें येई वहिली ॥ यावरी बहुळा निघाली ॥ दीनवदना गोकुळीं आली ॥ सखियांमाजी ॥१॥

पुत्रसखिया ह्नणती तियेसी ॥ तूं आज कां दीन दिसतेसी ॥ येरी सांगती जाहली तयांसी ॥ वृत्तांत सर्व ॥२॥

मग स्तनीं लावोनि सुत ॥ ह्नणे पान्हा घेरे त्वरित ॥ मज जाणें आहारार्थ ॥ व्याघ्राचिये ॥३॥

तंव वत्स ह्नणे मी जाऊन ॥ व्याघ्रा आपुला देह देईन ॥ माते वांचवीन तुझा प्राण ॥ राहीं तेथें मउलीये ॥४॥

बहुळा ह्नणे जरी सत्व गेलें ॥ तरी मग काय उरलें ॥ ऐसें वत्सासि शिकविलें ॥ नानापरी ॥५॥

आणि ह्नणे वनीं फिरतां ॥ सावधान राहें चरतां ॥ बाळा अतिलोभ सर्वथा ॥ करुंचि नये ॥६॥

सर्वोपरी देह बरवा ॥ मरणापासाव रक्षावा ॥ सहसा विश्वास न धरावा ॥ कवणाचाही ॥७॥

ऐसें वत्सासि शिकवून ॥ सांगातिणीसि निरवून ॥ मग ते धेनु गेली आपण ॥ व्याघ्रासमीप ॥८॥

ह्नणे जें सत्य शपथ केलें ॥ तत्प्रमाणें आतां आल्यें ॥ ऐसें व्याघ्रासि सांगीतलें ॥ तंव येरु बोलिला ॥९॥

कीं सत्यरत्वें आलीस येथ ॥ तरी सत्याचें बळ अद्भुत ॥ तुजलागीं जाहलें विदित ॥ आतां तुज अशुभ नाहीं ॥११०॥

म्यां देखिलें तुझें सत्य ॥ पशुयोनींत हें विख्यात ॥ तरी सोडिलीस त्यानिमित्त ॥ जाई धेनुके स्वस्थाना ॥११॥

त्या सांगातिणी धन्या विशेष ॥ धन्य राजा तो धन्य देश ॥ जेथ तुजऐशा बहुवस ॥ सत्यवादिनीं ॥१२॥

तूं वो धन्य माझी माउली ॥ दर्शनें दुष्टबुद्धी नाशिली ॥ आतां मी कोणेही काळीं ॥ न करीं हिंसा ॥१३॥

ऐसें व्याघ्र बोलतबोलतां ॥ अंतरीं धेनुस्मरण करितां ॥ स्वप्राण जाहला सांडिता ॥ तंव आलें विमान ॥१४॥

तेव्हां इंद्रादि सुरगणीं ॥ विमानीं व्याघ्रासि वाहुनी ॥ मिरवत नेला उत्तमस्थानीं ॥ वाद्यगजरें ॥१५॥

तंव ते गाईहीगोकुळीं ॥ आली सखिया वत्साजवळीं ॥ हें आख्यान ऐकतां त्रिकाळीं ॥ होय पुण्यवंत ॥१६॥

हें बहुळाख्यान सांगतां ॥ विस्तारासि जाईल कथा ॥ ह्नणोनि संकलिली श्रोतां ॥ न ठेवावें दूषण ॥१७॥

याउपरी धर्मा मनीं ॥ संदेह उपजला ह्नणोनी ॥ पुसिलें गांगेयालागुनी ॥ वेगळालें ॥१८॥

मग क्रमेंचि गांगेय ॥ कथिता जाहला कथान्वय ॥ तया इतिहाससमुच्चय ॥ ऐसें नाम ॥१९॥

तें सांगों घेवोनि पसरु ॥ तरी विस्तारेल कल्पतरु ॥ आणि तेथींचा भाव समग्रु ॥ असे पर्वद्वयीं ॥१२०॥

शांति आणि अनुशासिक ॥ सर्वधर्मप्रकाशक ॥ ह्नणोनि अंतर्भूत केला देख ॥ इतिहाससमुच्चय ॥२१॥

ऐसें नानापरी उत्तम ॥ इये पर्वी दानधर्म ॥ भीष्में कथिले सवर्म ॥ धर्माप्रती ॥२२॥

मग श्रमोनि क्षणमात्र ॥ स्तब्ध राहिला गंगापुत्र ॥ तें देखोनियां शीघ्र ॥ व्यास ह्नणे जी गांगेय ॥२३॥

हा राजा युधिष्ठिर ॥ आणि कृष्णादि समग्र ॥ यांसी जावया शीघ्र ॥ द्यावी आज्ञा ॥२४॥

मग भीष्में पांडवांसी ॥ श्रीकृष्णादि सकळ रायांसी ॥ धृतराष्ट्र गांधारीमुख्यांसी ॥ केली आज्ञा ॥२५॥

आतां तुह्मी नगरीं जावें ॥ उत्तरायण होईल बरवें ॥ तेव्हां मागुतें येथ यावें ॥ सामुग्रीसह ॥ ॥२६॥

मग दंडवतें घालून ॥ अंधगांधारी पुढें करुन ॥ सह पांडव श्रीकृष्ण ॥ गेले स्वस्थानीं ॥२७॥

नगरीं आनंद वर्तला ॥ धर्म सिंव्हासनीं बैसला ॥ मग राज्यस्थिति सकळा ॥ चालवी राजनीतीं ॥२८॥

ऐसें पन्नासदिवस नगरीं ॥ राहिले बरवियापरी ॥ तंव उत्तरायण झडकरी ॥ आलें समीप ॥२९॥

मग तो समय जाणोनी ॥ चंदनादि काष्ठें मेळवोनी ॥ पुष्पें कर्पूरादि घेऊनी ॥ सामुग्री सर्व ॥१३०॥

तैं धृतराष्ट्रादि वहिले ॥ सकळही कुरुक्षेत्रीं आले ॥ धर्मादिकीं वंदिलें ॥ शरतल्पीं भीष्मासी ॥३१॥

तंव भीष्में नेत्र उघडिले ॥ कृष्णादिकांतें देखिलें ॥ ह्नणे सुखें विजें केलें ॥ देवराया ॥३२॥

उत्तरेसि मुरडला भानु ॥ राहिलों शरतल्पीं पूर्णु ॥ आजवरी रात्री अठ्ठावनु ॥ आतां माघमास ॥३३॥

अंतसवित्र ॥ साक्षात असे धर्मावतार ॥ तरी यावरी निरंतर ॥ कृपाकटाक्ष राखिजे ॥३५॥

दुर्योधन आपुलिये ॥ करणीकरितांचि पाहे ॥ पावोनियां सर्व क्षय ॥ तुह्मां संकटीं पाडिलें ॥३६॥

मग ह्नणे आपण ॥ आतां टाकूं इच्छितों प्राण ॥ तरी सकळीं कृपा करोन ॥ आज्ञा द्यावी ॥३७॥

हा साक्षांत परिपूर्ण ॥ आहे ईश्वरपुरुष कृष्ण ॥ ऐसें नारदादिकां पासोन ॥ ऐकिलें असे ॥३८॥

तंव ह्नणे परमानंद ॥ आपुले वसूंचे पूर्वपद ॥ तें सनाथ करीं प्रसिद्ध ॥ तथा येरीं वंदिलें ॥३९॥

हें भीष्में ऐकोन ॥ ओंनम इति ह्नणोन ॥ ध्यानधारणें काढिला प्राण ॥ सर्वी देखिला तेजपुंज ॥१४०॥

सुरवरांचीं वाद्यें लागलीं ॥ अपार पुष्पवृष्टी जाहली ॥ महाआनंदें निवाली ॥ त्रिजगती देखा ॥४१॥

पाठी क्रियादिक भलें ॥ सकळ गंगातटीं सारिलें ॥ तेथ शोकादिक केले ॥ गंगादेवियें ॥४२॥

मग तेथ श्रीगोपाळें ॥ गंगादेवीचें सांत्वन केलें ॥ शोकदुःख निवारिलें ॥ अंधादिकाचें ॥४३॥

यावरी आले हस्तनापुरीं ॥ नगर श्रृंगारिलें मखरीं ॥ गुढियातोरणीं समग्रीं ॥ उत्साह केला ॥४४॥

नंतर धर्मासि पुसोनी ॥ समस्तांची आज्ञा घेउनी ॥ द्वारकेसी चक्रपाणी ॥ शीघ्र गेला ॥४५॥

भारता हीं पर्वे दोनी ॥ जाणों मोक्षपदाची निश्रेणी ॥ श्रोतीं ऐकिलिया श्रवणीं ॥ पावे पद वैकुंठींचें ॥४६॥

कीं जे देवव्रताची वाणी ॥ उभयतटिनी हे मंदाकिनी ॥ प्रेमळभाविकांलागुनी ॥ कलिमलहारिणी गंगा हे ॥४७॥

हिचें करितां स्नानपान ॥ प्रसन्न होय अंतःकरण ॥ भक्ति वैराग्य आणि ज्ञान ॥ वर्धमान होताती ॥४८॥

आतां असो हा विशेष ॥ स्तबक संपला त्रयोदश ॥ पुढें चतुर्दशाचा सौरस ॥ श्रोताजनीं आयकिजे ॥४९॥

तेथ धर्म घोडा सोडील ॥ सकलराजयां जिंकील ॥ तीं आश्वमेधिकादि सकळ ॥ पंचपर्वै ॥१५०॥

प्रतिपर्वी एकैक ब्राह्मण ॥ ऐसे त्रयोदश उठिले जाण ॥ त्यांहीं रायासि आशीर्वचन ॥ केलें देखा ॥५१॥

वस्त्रही उजळलें तेरा हात ॥ तैसेंचि कुष्ट जावोनि त्वरित ॥ सुखी जाहला नृपनाथ ॥ तयेवेळीं ॥५२॥

अहो हरीचे वर्णितां गुण ॥ महादोषाचें होय दहन ॥ तेथें ब्रह्महत्येचें लांछन ॥ उरे केवीं ॥ ॥५३॥

संख्या वाढेल कल्पतरुची ॥ ह्नणोनि कथिलें सारसारची ॥ प्राकृतां उपजावया रुची ॥ केला संग्रहो ॥५४॥

सर्वपुराणांचें सार ॥ भारतइतिहास सुंदर ॥ मोहाळ सरळ सपवित्र ॥ गोठला या कल्पवृक्षीं ॥५५॥

माझी केतुलीती मती ॥ कीं साभिमानें बोलावें ग्रंथीं ॥ परि श्रवणमात्रें हरिभक्ती ॥ पावे ज्ञानवैराग्य ॥५६॥

अनंतशास्त्रें पुराणमतें ॥ वेदाधारें ऋषिप्रणितें ॥ त्या सकळांचे आद्यंतातें ॥ पावे ऐसा कोणी नसे ॥५७॥

कृष्णयाज्ञवल्कींयें मार्ग दाविला ॥ तोचि म्यां पुढें चालविला ॥ अष्टमस्तबकापासोनि मांडिला ॥ कथाकल्पतरु ॥५८॥

कविमधुकरेंकृपाळा ॥ प्रेमें स्तवोनि श्रीगोपाळा ॥ त्रयोदशस्तबक संपविला ॥ ह्नणे मधुकरकवी ॥५९॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ त्रयोदशस्तबक मनोहरु ॥ बहुळादिनानाख्यानप्रकारु ॥ एकत्रिंशाध्यायीं कथियेला ॥१६०॥

शुभंभवतु ॥

स्तबकओव्यासंख्या ॥३९६४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP