श्रीगणेशाय नमः
वैशंपायनासि ह्नणे भारत ॥ मुने तूं अससी ज्ञानादित्य ॥ तरी सांगें अग्रवृत्तांत ॥ कृपाळुपणें ॥१॥
मग ह्नणे वैशंपायन ॥ राया ऐकें चित्त देवोन ॥ कथा सांगेन संकलोन ॥ अनुशासिकींची ॥२॥
भीष्माप्रति ह्नणे धर्म ॥ तुवां बहुतप्रकारींचा शम ॥ मज उपदेशिला उत्तम ॥ परि संतोष नपवेंची ॥३॥
याचें कारण परियेसीं ॥ कीं तूं पितामह आह्मासी ॥ असोनि बाणघाय विशेषीं ॥ तुझिये अंगीं देखतों ॥४॥
तेणें माझें चित्त दुश्चित्त ॥ बहुतचि आहे होत ॥ देखोनि लाज असे वाटत ॥ तुझे रक्तपूर ॥५॥
कां जे आह्मां निमित्त ॥ तुमचे हाल जाहले बहुत ॥ आणि स्वगोत्रघात ॥ घडला आह्मां ॥६॥
युद्धीं बहुत राजे मारिले ॥ ऐसें पाप आह्मीं केलें ॥ कोण दुष्टलोक निर्मिले ॥ असतील आह्मां ॥७॥
तो दुष्ट दुर्योधन थोर ॥ केला बंधूंसह संहार ॥ आतां कैसा होईल विचार ॥ आमुचिये जीविताचा ॥८॥
येणेंपरि संतापातें ॥ पावला देखोनि धर्मातें ॥ भीष्म ह्नणे तयातें ॥ ऐकें युधिष्ठिरा ॥९॥
तूं कां दुःखी जाहलासी ॥ तुवां काय केलें तयांसी ॥ कौरव पावले मृत्यूसी ॥ ते तुवां नाहीं मारिले ॥१०॥
पावले स्वकर्मफळ तत्वतां ॥ आतां ऐकें येकी कथा ॥ जे ऐकतां नृपनाथा ॥ पावे संतोष ॥११॥
संवाद यम गौतमीचा ॥ आणि काळलुब्धकसर्पाचा ॥ ऐकें जेणें करुनि मनींचा ॥ फिटे संभ्रम ॥१२॥
गौतमी नामें कोणी ब्राह्मणी ॥ वृद्धा शांता सधर्मिणी ॥ तियेचा पुत्र एकदा वनीं ॥ दंशिला सर्पे ॥१३॥
तें अर्जुनलुब्धकें देखिलें ॥ मग सर्पा फांशीं गाळिलें ॥ गौतमीप्रति आणिलें ॥ त्या पन्नगासी ॥१४॥
लुब्धक ह्नणे वो ब्राह्मणी ॥ यासी मारुं कीं जाळूं अग्नीं ॥ हा परम पापी जाणीं ॥ येणें बाळ खादला ॥१५॥
तंव बोलिली ब्राह्मणी ॥ हा सर्प देई सोडोनी ॥ यासी बोल नाहीं निर्वाणीं ॥ पुत्रमृत्याचा ॥१६॥
होष्यमाणें पुत्र मेला ॥ सर्प निमित्तधारी जाहला ॥ तंव अर्जुन बोलिला ॥ ऐकोनि ऐसें ॥१७॥
ह्नणे वैराग्य कां पावलीसी ॥ सर्पातें कां सोडवितेसी ॥ हा बाळहत्यारा यासी ॥ सोडितां पाप वाढेल ॥१८॥
ऐकोनि गौतमी ह्नणत ॥ हा मारिलिया जीवेल सुत ॥ तरी तुवां करावा घात ॥ या पन्नगाचा ॥१९॥
हा आज्ञाधारी प्रसिद्ध ॥ ऐसे गौतमीअर्जुनाचे शब्द ॥ ऐकोनि बोलिला पाशबद्ध ॥ सर्प देखा ॥२०॥
अरे लुब्धका अर्जुन ॥ तूं कां करिसी अज्ञानपण ॥ मी अस्वतंत्र पराधीन ॥ माझा स्वमी मृत्यु असे ॥२१॥
तदाज्ञें दंशिला बाळक ॥ यावरी ह्नणे लुब्धक ॥ तरी बाळघातकी अंतक ॥ दंडा योग्य असे ॥२२॥
तंव सर्प असे ह्नणत ॥ हा येक ऐकें दृष्टांत ॥ यजमान याग करवित ॥ ऋत्विजां करवीं ॥२३॥
ऋत्विजांसि स्वर्गभुवन ॥ होय काय यजमानाविण ॥ हें सर्पाचें युक्तिवचन ॥ न साहवे लुब्धका ॥२४॥
तंव तत्समयीं शीघ्रगती ॥ मृत्यु आला आकाशपंथीं ॥ धरोनियां दृष्ट मूर्ती ॥ बोलिला सर्पासी ॥२५॥
अरे पन्नगा सर्वथा ॥ मीही नव्हे तुझा नियंता ॥ सर्वाचा काळ नेमिता ॥ स्वामी येक ॥२६॥
काळाधारें जीवजांत ॥ तया ब्रह्मादिकही भीत ॥ तरी तेणें काळें हा सुत ॥ नेला जाण ॥२७॥
जेवीं मेघपटलें गगनप्रांतीं ॥ जिकडे वायु तिकडे जाती ॥ तथा वर्षावो करिताती ॥ तेवीं लोक ब्रह्मांडीं ॥२८॥
सकळही काळवशेंकरुन ॥ सर्पा कार्यजात जाण ॥ नियंता हंता प्रमाण ॥ काळचि सकळां ॥२९॥
मग सर्प ह्नणे काळासी ॥ मी तरी पडिलों असें फाशीं ॥ मज सोडवावें विशेषीं ॥ या लुब्धकापासाव ॥३०॥
ऐसें ऐकोनि लुब्धक ॥ ह्नणे मृत्यु सर्प दोघे वंचक ॥ तरी मी आतां सम्यक ॥ मारीन दोघांसी ॥३१॥
धिक हा पापिष्ठ मृत्य ॥ लोकांसि नित्य मारित ॥ ऐसें बोले तंव त्वरित ॥ मृत्यु उभा राहिला ॥३२॥
ह्नणे मी तरी शुद्ध अत्यंत ॥ परि काळवशें वर्तत ॥ आह्मी दोघे निभ्रांत ॥ निरपराधी ॥३३॥
अन्यायाविण आह्मांसी ॥ वृथा बाधा कां करितोसी ॥ आह्मा दोघां सेवकांसी ॥ स्वामी काळ ॥३४॥
तंव लुब्धक बोले उत्तर ॥ तुह्मी जरी काळाचे किंकर ॥ तरी तुह्मां कां सुख थोर ॥ परपीडेचें ॥३५॥
मृत्यु ह्नणेरे लुब्धका ॥ या काळाच्या चेष्टा सकळिका ॥ काळाधीन आइका ॥ मनें सर्व लोकांचीं ॥३६॥
आह्माकडे नाहीं अपराध ॥ काळाज्ञें केला बाळकवध ॥ आह्मी निमित्तधारी प्रसिद्ध ॥ तंव तेथें काळ आला ॥३७॥
ह्नणे लुब्धका ऐक वचन ॥ हें नव्हे आमुचें करण ॥ लोकमारणीं निर्वेग जाण ॥ मी मृत्यु पन्नग ॥३८॥
लोक आपुलालेनि धर्मे ॥ शुभाशुभ भोगिती धर्मे ॥ आह्मीं निमित्तमात्र वर्मे ॥ जाणीं प्रसिद्ध ॥३९॥
गोमटें वोखटें आचरण ॥ हेंचि जन्ममरणाचें कारण ॥ धर्मे गोमटें पाविजे जाण ॥ पापें वोखटें पाविजे ॥४०॥
आह्मी तत्कर्मानुसार ॥ करीत असों व्यापार ॥ तरी हा स्वकर्मेचि कुमर ॥ पावला मरण ॥४१॥
येथ अन्यथा नाहीं वाचा ॥ हा संवाद गौतमी लुब्धकाचा ॥ आणि मृत्युपन्नगाचा ॥ सत्य जाण ॥४२॥
तंव बोलिली गौतमी ॥ काळ बरवें बोलिला वर्मी ॥ असत्य नाहीं धर्माधर्मी ॥ माझें कर्म पापिष्ठ ॥४३॥
तेणें बाळ गेला मरणें ॥ ऐसें ऐकोनि अर्जुनें ॥ सर्प सोडिला विचारपणें ॥ गेलीं स्वस्थानीं सर्वही ॥४४॥
गांगेय ह्नणे कुंतीसुता ॥ तरी स्वकर्मी बोल सर्वथा ॥ आतां शोक करणें वृथा ॥ कर्म प्राधान्य आपुलें ॥४५॥
तंव युधिष्ठिर ह्नणे पाहें ॥ गृहस्थाश्रमीं धर्मी इये ॥ मृत्यु जिंकिजे धर्मोपायें ॥ तो कवण धर्म ॥४६॥
हे कथा स्थैर्थे उत्तमा ॥ मजप्रती सांगा भीष्मा ॥ मग भीष्म ह्नणे धर्मा ॥ ऐकें प्राचीन इतिहास ॥४७॥
प्रजापती पासोनि मनु थोर ॥ तयाचा इक्ष्वाकु नामें कुमर ॥ तयासि शतयेक कुमर ॥ त्यांत दशाश्व दाहवा ॥४८॥
तो माहिष्मतीचा नृपवर ॥ त्याचा मदिराश्व नामें कुमर ॥ त्याचा द्युतिमान पुत्र ॥ त्याचा सुवीर जाण ॥४९॥
तयाचा दुर्जय नंदन ॥ दुर्जयाचा दुर्योधन ॥ तो धर्मवंत दारुण ॥ झुंजार उदार ॥५०॥
ऐसें परमतत्व जाणोन ॥ नर्मदानदी स्वयें येवोन ॥ तियेनें वरिला दुर्योधन ॥ त्याची कन्या सुदर्शना ॥५१॥
ते परम सुंदर जाणोन ॥ अग्नि दुर्बळद्विज होवोन ॥ आला वरावया लागोन ॥ राव नेदी दुर्बळासी ॥५२॥
तो नकळोनि धाडिला ॥ मग वन्ही ऐसा कळला ॥ तेणें राव दुःखी जाहला ॥ संतापला अंतरीं ॥५३॥
मग बोलावोनि ब्राह्मण ॥ ह्नणे म्यां अन्याय केला दारुण ॥ जे न दिलें कन्यारत्न ॥ अग्नीलागीं ॥५४॥
आतां मागुता यावा वन्ही ॥ ऐसा उपाय करा कोणी ॥ तंव ते ह्नणती प्रार्थोनी ॥ आणूं अमगार सामर्थ्ये ॥५५॥
मग ते द्विजवर जावोनी ॥ प्रार्थिते जाहले वन्हीलागोनी ॥ कीं दुर्योधनाची नंदिनी ॥ सुदर्शना त्वां वरावी ॥५६॥
तो शब्द वन्हीं मानिवला ॥ मग राजगृहीं प्राप्त जाहला ॥ राजा संतोष पावला ॥ मागों लागला देज काहीं ॥५७॥
ह्नणे इये कन्येसि वरावें ॥ आणि आमुचे गृहीं रहावें ॥ सदासर्वदा न वंचावें ॥ हें द्यावें देज ॥५८॥
तें मानवलें वन्हीसी ॥ मग वरिलें सुदर्शनेसी ॥ परमआसक्त तियेसी ॥ अग्नी जाहला ॥५९॥
पुढें तियेसि जाहला नंदन ॥ विद्यावंत नामें सुदर्शन ॥ ओघवत नृपनंदन ॥ पितामह नृगाचा ॥६०॥
त्याची कन्या ओघवती ॥ ते दीधली सुदर्शनाप्रती ॥ नांदे सुदर्शन ओघवती ॥ पत्नीसहित ॥६१॥
तो गार्हस्थ्यधर्मे भला ॥ कुरुक्षेत्रीं असे राहिला ॥ मग पण थोर मांडिला ॥ तेणें देखा ॥ ॥६२॥
कीं गृहस्थधर्माचरणें ॥ सर्वथा मृत्यूसि जिंकणें ॥ स्त्रियेसि ह्नणे अतिथीकारणें ॥ न धाडीं कदा विन्मुख ॥६३॥
जें अतिथीसि लागेल बरवें ॥ तें तुवां न वंचावें ॥ समयीं प्राणही समर्पावे ॥ अतिथीलागीं ॥६४॥
हें करावें माझें व्रत ॥ राहें मद्वचनीं सुचित ॥ मी नसतां येईल अतीत ॥ तया न चुकवावें ॥६५॥
हे माझी शिकवण ॥ न विसरिजे प्रमाण ॥ तें शिरीं धरिलें वचन ॥ ओघवतीयें ॥६६॥
ऐसें व्रत पाळितां नित्यानीं ॥ तंव कोणे एके दिनीं ॥ सुदर्शन गेला होता वनी ॥ इध्मालागीं ॥६७॥
तंव छिद्रान्वेषी त्वरित ॥ तेथ प्राप्त जाहला मृत्य ॥ ह्नणे ओघवतीये अतीत ॥ मी आलों ब्राह्मण ॥६८॥
तुजसी माझें आतिथ्य ॥ करणें गार्हस्थ्यसंमत ॥ ऐसें ऐकोनि पूजा करित ॥ ओघवती तयाची ॥६९॥
नानोपचारें सुखी केला ॥ शेखीं अतीत बोलिला ॥ मी तरी कामातुर वहिला ॥ आतां देई संगातें ॥७०॥
नातरी व्रत भंगेल जाण ॥ येरी चिंतावली ऐकोन ॥ इतक्यांत आठवलें वचन ॥ भ्रताराचें ॥७१॥
अतिथी घरीं आलिया बरावा ॥ तया देहही न वंचावा ॥ तरी हा वचनार्थ पाळावा ॥ भ्रतराचा ॥७२॥
मग अतीतें संभोग केला ॥ परमसुखिया असे जाहला ॥ इतुक्यांत सुदर्शन पातला ॥ पाचारीत स्त्रियेसी ॥७३॥
येरी नुघडीचि द्वार ॥ सुदर्शन उभा बाहेर ॥ तया ओघवती उत्तर ॥ बोलती जाहली ॥७४॥
ह्नणे स्वामी अवधारीं ॥ अतीत असे भीतरीं ॥ तयाप्रति संभोगकुसरी ॥ संतोषवितें ॥७५॥
तुह्मी लाहो न करा येथ ॥ माझें व्यग्र असे चित्त ॥ तंव सुदर्शन तेथ ॥ बोलता जाहला ॥७६॥
आजि मी सभाग्य धन्य ॥ जे स्त्रियेनें देह समर्पून ॥ संतुष्ट केलें असे मन ॥ अतीताचें ॥७७॥
अहो पतिव्रते पाहें ॥ त्वां पवित्र केलें कुळद्वय ॥ गार्हस्थ्यधर्म उपायें ॥ रक्षिला तुवां ॥७८॥
तंव दुजिये रुपें आकाशीं ॥ मृत्यु पाहत होता द्विजासी ॥ कीं प्रतिज्ञा भंगलिया यासी ॥ दंडीन मी ॥७९॥
ऐसें सर्वदा पाहिलें ॥ परि त्याचें व्रत न ढळलें ॥ तंव घरांतूनि बिजें केलें ॥ अतीत ब्राह्मणें ॥८०॥
मग त्रैलोक्यव्यापी ऐसा ॥ मेघशब्दें बोले परियेसा ॥ अरे सुदर्शना सहसा ॥ मी मृत्यु पुरुष ॥८१॥
तुझें गार्हस्थ्यव्रत ॥ पाहों आलों असें येथ ॥ तूं अतिधैर्यवंत ॥ जिंकिला मृत्यु तुवां ॥८२॥
तुझी पत्नी हे पावन ॥ परम पतिव्रता जाण ॥ इयेचेनि दर्शनें जन ॥ उद्धरतील ॥८३॥
इचिये पातिव्रत्यपणा ॥ कदा भंग नाहीं जाणा ॥ इचेनि संगें स्वर्गभुवना ॥ पावसी तूं येणेंचि देहें ॥८४॥
ऐसा वर दीधला ॥ मग स्वरुप दाविता जाहला ॥ सकळां देखतां प्रवेशला ॥ स्वर्मडळीं ॥८५॥
भीष्म ह्नणे युधिष्ठिरा ॥ अग्नि आला त्या अवसरा ॥ तेणें सुदर्शना परिकरा ॥ संभाविलें ॥८६॥
देवीं पुष्पवृष्टी करित ॥ स्वर्गी नेला विमानस्थित ॥ ऐसा गेला कांतेसहित ॥ मृत्यूप्रति जिंकोनी ॥८७॥
तेणें गृहस्थधर्म मृत्युनिवारण ॥ ऐकतां होय परम पुण्य ॥ धर्मराया ॥८९॥
परि हें ब्राह्मण्य परियेस ॥ त्रिवर्ण नपवती विशेष ॥ हें ऐकोनि भीष्मास ॥ युधिष्ठिर पुसे ॥९०॥
ह्नणे पुसतों गंगानंदना ॥ ब्राह्मण्य नपवे त्रिवर्णा ॥ तरी विश्वामित्र जाणा ॥ पावला कैसें ॥९१॥
येणेंचि देहें तयासी ॥ ब्राह्मण्य असे विशेषीं ॥ दावा चालवी वसिष्ठासीं ॥ ब्राह्मणपणाचा ॥९२॥
तेणें उग्र तपस्याबळें ॥ विचित्र कर्म आचरिलें ॥ तें सांगावें केतुलें ॥ भीष्मदेवा ॥९३॥
तंव ह्नणे गंगानंदन ॥ धर्मा ऐकें चित्त देवोन ॥ हा कैसा जाहला ब्राह्मण ॥ सांगेन आतां ॥९४॥
पूर्वी भरतवंशीं वोजा ॥ द्विमढि नामें होता राजा ॥ जन्हु तयाचा आत्मजा ॥ गंगा जेणें उपजविली ॥९५॥
त्याचा सिंधुद्वीप सद्भाव ॥ त्याचा पुत्र बळकाश्व ॥ त्याचा नंदन बल्लव ॥ तदात्मज कुशिक ॥९६॥
तयाचा गाधी नंदन ॥ तो निपुत्रक ह्नणोन ॥ वनवासीं गहन मन ॥ करिता जाहला ॥९७॥
त्यासी वनीं जाहली कन्यका ॥ सत्यवती नामें देखा ॥ तंव च्यवनपुत्रा ऋचिका ॥ आगमन तेथ जाहलें ॥९८॥
तेणें ते मागीतली ॥ रावो ह्नणे तिये वेळीं ॥ तुज दरिद्रीयासि बाळी ॥ द्यावी कैसी ॥९९॥
येरु तेथोनियं गेला ॥ परि मागुता फिरोनि आला ॥ कन्या मागता जाहला ॥ तंव ह्नणे रावो ॥ ॥१००॥
ऋचिका तूं देशील देज ॥ तरी कन्या देईन तुज ॥ ऋचिका मानवतां राज ॥ ह्नणता जाहला ॥१॥
एकत्र श्यामकर्ण पाहीं ॥ मज एकसहस्त्र देईं ॥ हें ऐकोनियां लाहीं ॥ गेला ऋचिक ॥२॥
मग वरुणासि प्रसन्न केलें ॥ तेणें श्यामकर्ण दीधले ॥ ते आणोनि वोपिले ॥ गाधीप्रती ॥३॥
राजा विस्मित होवोनी ॥ कन्या दीधली अलंकारोनी ॥ मग परमप्रीतीं दोनी ॥ वर्तती स्वगृहीं ॥४॥
पुढें एके समयांतरीं ॥ ऋचिक संतोषोनि अंतरीं ॥ कांतेसि ह्नणे सुंदरी ॥ माग कांहीं वरदान ॥५॥
ते जावोनि ह्नणे मातेसी ॥ काय मागों भ्रतारापाशीं ॥ येरी ह्नणे आह्मांसी ॥ मागें पुत्र ॥६॥
मग ते जावोनि पतिप्रती ॥ सांगती जाहली मातृस्थिती ॥ ऋचिक ह्नणे पुत्र होती ॥ दोघींसही ॥७॥
परि आतां एक करावें ॥ तुवां ऋतुस्त्रान जावें ॥ औदुंबरा भेटावें ॥ होईल पुत्र ॥८॥
आणि ऋतुस्नान तुझी माता ॥ ते भेटवावी अश्वत्था ॥ तथा दोनी चरु मंत्रिता ॥ ते भक्षावे दोघीं ॥९॥
येरी गेली मातेप्रती ॥ सांगीतली सकळ स्थिती ॥ माता ह्नणे कन्ये सत्यवती ॥ तुझा चरु देई मज ॥११०॥
आणि पालटावा तरुवरु ॥ येथ थोर असे विचारु ॥ तुझा पोटस्थेनें चरु ॥ मंत्रिला असेल ॥११॥
मज केली असेल वंचना ॥ येरी मानवली मातृवचना ॥ चरुवृक्ष पालटोनि जाणा ॥ विधान केलें ॥१२॥
मग तैसाचि गर्भ राहिला ॥ ऋषिअभिप्राय व्यर्थ जाहला ॥ तें देखोनि ऋचिक बोलिला ॥ कांतेप्रती ॥१३॥
ह्नणे त्वां केलें अज्ञानपण ॥ तुझा चरु तो ब्राह्मण ॥ मातेचा मंत्रिला जाण ॥ क्षत्रियमंत्रें ॥१४॥
तैसेचि मंत्रिले होते तरु ॥ ह्नणोनि आतां तुज कुमरु ॥ होईल तो महा क्रूरु ॥ क्षत्रिय जाण ॥१५॥
आणि तुझिये मातेसी ॥ पुत्र होईल ब्राह्मणऋषी ॥ हें ऐकोनि पडिली भूमीसी ॥ सत्यवती ते ॥१६॥
प्रहरा एका मूर्छा गेली ॥ मग पतीस विनविती जाहली ॥ ह्नणे क्षत्रिय पुत्र कुळीं ॥ न होवावा आपुलिये ॥१७॥
तंव ऋचिकें ह्नणितलें ॥ मंत्रविधान कदा नटळे ॥ परि गर्भ सामर्थ्यबळें ॥ करुं ब्राह्मण ॥१८॥
आतां तुझिये पुत्रासी ॥ जो पुत्र होईल परियेसीं ॥ तो क्षत्रिय तेजोराशी ॥ आपुला पौत्र ॥१९॥
महायोद्धा क्षत्रियकर्मा ॥ त्रास करील जनां अधमां ॥ तया जाण परशुरामा ॥ जन्मेजया गा ॥१२०॥
गांगेये ह्नणे धर्मासी ॥ पुढें पुत्र जाहले दोघींसी ॥ जमदग्नी सत्यवतीसी ॥ गाधिकांते विश्वामित्र ॥२१॥
तो परम ब्रह्मिष्ठ जाण ॥ त्यापासाव जाहले ब्राह्मण ॥ वंशगोत्र प्रवर्तन ॥ लोकीं विश्वामित्र ॥२२॥
तरी हा विश्वामित्र ॥ क्षत्रियाचा कुमर ॥ परि मूळीं बीजमंत्र ॥ ब्राह्मणाचा ॥२३॥
ह्नणोनि जाहला ब्राह्मण ॥ येरवीं क्षत्रिय वैश्य शूद्र तीन ॥ हे कदा न होती ब्राह्मण ॥ सर्वथैव ॥२४॥
हे विश्वामित्रकथा ॥ असे द्वितीयस्तबकीं भारता ॥ ह्नणोनि कथिली संक्षेपता ॥ प्रसंगास्तव ॥२५॥
तरी मृत्यु होय कर्मार्जित ॥ तो क्षणमात्र टळेना सत्य ॥ ह्नणोनि जाहला निःपात ॥ कौरवांचा ॥२६॥
परि स्वधर्मे वर्ततां ॥ उत्तमगती पावे सर्वथा ॥ जेवीं सुदर्शनव्यवस्था ॥ तेवीं होय ॥२७॥
आतां आणीकही कांहीं ॥ मनोगत पुसावें सही ॥ मग धर्म पुसेल तें श्रोताजनांहीं ॥ ऐकावें ह्नणे मधुकर ॥२८॥
इति श्रीक० ॥ त्रयोद० ॥ शोकोपशमहरणप्रकारु ॥ त्रयोविं० ॥१२९॥