॥ श्रीगणेशाय नमः ॥
पूर्वी जनककुळीं थोर ॥ देवरात नामें नृपवर ॥ तो याज्ञवल्क्यासि विचार ॥ पुसता जाहला ॥१॥
ह्मणे पर अपर काय ॥ तंव बोलिला मुनिराय ॥ तो ऐके मोक्षेपाय ॥ राजशिरोमणी ॥२॥
महतत्व अहंकार अव्यक्त ॥ पंचतन्मात्राचें सूक्ष्मत्व ॥ हे अष्टविकारात्मक सत्य ॥ बोलिजे प्रकृती ॥३॥
दहा इंद्रियें पांच विषय ॥ मनयुक्त सोळा विकार पाहें ॥ ऐसी चोवीस विकारात्मक आहे ॥ प्रकृति सृष्टिरूपा ॥४॥
इयेचा संहारंक्रम ऐसा ॥ समाप्त होता ब्रह्मादिवस ॥ रात्रिआरंभी प्रेरी पुरुषा ॥ अव्यक्ताहंकारीं ॥५॥
तो द्दादशात्म कळार्क ॥ होवोनि जाळी सकळिक ॥ सर्व रसांतें सम्यक ॥ शोषी जाण ॥६॥
मग संवर्तकादि जळधर ॥ मुसळधारी वर्षतीं नीर ॥ होय एकार्णव समग्र ॥ तिये काळीं ॥७॥
तये उदकांतें समग्र ॥ काळानळ शोषी शीघ्र ॥ तेव्हां महाप्रतापमात्र ॥ उरे वन्हीं ॥८॥
त्याचिये उन्मेषें समस्त ॥ उरलेयाचें भस्म होत ॥ मग त्यांचे शोषण मारुत ॥ करितो जाण ॥९॥
त्या वायूंतें मक्षी गगन ॥ गगनांतें भक्षी मन ॥ मनासि महत्तत्व जाण ॥ महत्तत्वा अव्यक्त ॥१०॥
मग ब्रह्म शब्दावाच्य ॥ एकचि उरोनि असे साच ॥ ऐसा प्रळयसृष्टिआलोच ॥ नित्यानित्य परापर ॥११॥
आतां अध्यात्मादि विचार ॥ राया ऐकें समग्र ॥ आणि अधिमूतप्रकार ॥ अधिदैवतादी ॥१२॥
गुद अध्यात्म सत्य ॥ आनंद अधिभूत तेथ ॥ मित्र जाणिजे अधिमूत ॥ प्रजापती ॥१३॥
हरत अध्यात्म सत्य ॥ कर्तव्यव्यापार अधिभूत ॥ आणि इंद्र अधिदैवत ॥ वाचास्थानीं ॥१४॥
श्रोत्र अध्यात्म सत्य ॥ व्यक्ताव्यक्त अधिभूत ॥ दिशा जाण अधिदेवत ॥ निर्धारेंसीं ॥१५॥
जिव्हा अध्यात्म सत्य ॥ तेथें रस अधिभूत ॥ वायु वरूण अधिदैवत ॥ ओळखावे ॥१६॥
मन अध्यात्म सत्य ॥ मंतव्य तरी अधिभूत ॥ तेथें चंद्र अधिदैवत ॥ भर्वंसेनी ॥१७॥
अहंकार अध्यात्म सत्य ॥ अहंकारचि अधिभूत ॥ ब्रह्मारूद्र अधिदैवत ॥ मतभेदें जाण ॥१८॥
बुद्धी अध्यात्म सत्य ॥ आणि बोद्धव्य अधिभूत ॥ क्षेत्रज्ञ अधिदैवत ॥ जाणिजे राया ॥१९॥
ऐसे हे विकार समग्र ॥ मूळप्रकृतीचे परिकर ॥ आतां त्रिगुणाचा विस्तार ॥ ऐकें विकारभेदें ॥२०॥
सत्वगूण विकारव्यवस्था ॥ आनंद संतोष स्थिरता ॥ श्रद्धा धैर्य क्षमता ॥ दया आकर्पण्य ॥२१॥
सत्य अनृणता आर्जव ॥ शौच आचार मार्दव ॥ अलोभ अश्लाध्यतादि सर्व ॥ सत्वगुणाविकारें ॥२२॥
आतां रजोगुणरूप सुख ॥ सेवा सुयशीं प्रीति देख ॥ परिताप बुद्धीवाक्य ॥ थोर कठिणता ॥२३॥
काम क्रोध मद दर्प द्देष ॥ हे रजोविकार परियेस ॥ मोह मलिनता निंदा तामस ॥ अमंगळ निर्दयता ॥२४॥
सात्विकें स्थान उत्तम ॥ रजोगुणें फळ मध्यम ॥ तामसगूणें अधम ॥ गति पाविजे ॥२५॥
पुण्यपापरहितांचें स्थान ॥ तें अक्षर अव्यय निर्गुण ॥ शंभु रामकृष्ण निर्माण ॥ शब्दवाच्य ॥२६॥
ऐसें सांख्यशास्त्र पूर्वोक्त ॥ विचरे अध्यात्मज्ञानार्थ ॥ अष्टांगयोग अभ्यासित ॥ धरिजे ध्यान ॥२७॥
जैं प्राणोत्कमण होय ॥ तैं ऐशाऐशा स्थानीं जाय ॥ ते ऐकें स्थानसोय ॥ राजेश्वरा ॥२८॥
जरी चरणीं उत्क्रमण होय ॥ तरी वैष्णवस्थानीं ॥ जाय ॥ जंधास्थाणीं उत्क्रमण होय ॥ तैं वसुलोकप्रप्ती ॥२९॥
होतां गुडघेयांच्या ठायीं ॥ साख्यंलोका जाय सही ॥ पाश्वीं उत्क्रमता होई ॥ तरी शिवलोक ॥३०॥
मुखीं विश्वेदेंव दिशां कणीं ॥ नारायणलोक वायु घ्राणीं ॥ ऐसीं उत्क्रमणें निर्वाणीं ॥ जाण प्राणाचीं ॥३१॥
आतां अरिष्टज्ञान राया ॥ सांगतों तें जाणनियां ॥ कांहीं काळ मरण कळलिया ॥ राहे सावधान ॥३२॥
॥ श्लोकः ॥ रुंधतीं ध्रुवं चैव विष्णोर्स्त्रीणि पदानि च ॥ आयुहीना न पश्यंति चतुर्थ मातृमंडलं ॥१॥
अरुंधती भवेज्जिव्हा ध्रुवो नासाग्रमुच्यते ॥ त्रिपदा च भ्रुवोर्मध्ये नेत्रयोर्मातृमंडलं ॥२॥
जो ऋषिमध्यअरुंधती ॥ ध्रुवनक्षत्र गगनप्रांतीं ॥ नदेखे पूर्ण निशापती ॥ तो वांचे वर्ष एक ॥३३॥
परनेत्रीं आपुली छाया ॥ बाहुलीये न देखे प्राणिया ॥ आणि मूर्खत्व ज्ञानिया ॥ पावे एकाएकी ॥३४॥
रूपवतं निस्तिज होय ॥ निस्तेज कांतियुक्त होय ॥ प्रकृतिविपर्यय होतां जाय ॥ षण्मासां मरणीं ॥३५॥
कुळदैवतांप्रति निंदी ॥ ब्राह्मणांचा होय विरोधी ॥ तोही षण्मासीं कुबुद्दी ॥ पावे नाश ॥३६॥
सछिद्र देखे चंद्रसी ॥ तेवींच देखे सूर्यासी ॥ नाश होय तयासी ॥ सप्तरात्रें ॥३७॥
ज्यासी उगाचि ये शवगंध ॥ भासे सुगंध तो दुर्गध ॥ मूर्तीं नदेखे तो यमबंध ॥ सादिशां पावे ॥३८॥
कान नासिक निर्जिव होती ॥ डोळे दांत विलक्षण दिसती ॥ कीं हीनीं होय बुद्धीमती ॥ अंग पाला पडे ॥३९॥
उष्मा नसे जयादेहीं ॥ तो शीघ्र जाय यमगृहीं ॥ अद्भुत अकस्मात पाही ॥ गंधर्वनगरादी ॥४०॥
वामनेत्रीं अश्रुधारा चाले ॥ राहेचि ना काहीं केलें ॥ मस्तकीं धूं उठी तो तत्काळें ॥ पावे मरण ॥४१॥
इत्यादिक अरिष्टचिन्ह ॥ शास्त्रगुरुपासोनि जाणून ॥ करावें अहर्निश मनन ॥ ईश्वरनिष्ठ ॥४२॥
मागुतें ह्मणे याज्ञवल्क्य ॥ पुसिलें अव्यक्त तें काय ॥ तरी तयाचें उत्तर लाहें ॥ दत्तचित्तें ॥४३॥
म्यां सूर्यनारयणाची वहिली ॥ उग्रतपस्या आचरिली ॥ मग देव तिये वेळीं ॥ प्रसन्न जाहला ॥४४॥
ह्मणे मागें इष्टवरदान ॥ जें दुर्लक्ष तेंही देईन ॥ याउपरी करूनि नमन ॥ मागीतलें म्यां ॥४५॥
कीं वेद यजु साम दोनी ॥ इच्छितों जाणाया लागुनी ॥ तंव सूर्य ह्मणे तुझ्या वदनीं ॥ प्रवेशेल सरस्वती ॥४६॥
तरी आतां मुख पसरीं ॥ म्यां मुख पसरिलें तदुपरी ॥ तंव वाग्रुप शारदा वत्क्रीं ॥ प्रवेशली माझे ॥४७॥
शारदाप्रवेशतेजें दारूणें ॥ आणि पोळलों सूर्यकिरणें ॥ उदकांत पाडलों तेणें ॥ देहपीडित ॥४८॥
तें देखोनि ह्मणितलें सूर्ये ॥ घटिका दोनी धैर्य राहें ॥ शांत होसी दों घडियें ॥ तंव जाहलों शीतळ ॥४९॥
मग ह्मणे दिवसनाथ ॥ अगा सांगें वेद सार्थ ॥ तुझ्याठायीं राहील समस्त ॥ तूं शतपथ प्रवर्तविसी ॥५०॥
तदंती बुद्धी होईल मोक्षार्थ ॥ सांख्ययोग निरुपित ॥ पद पावसील सत्य ॥ मग सूर्य अंतर्धान पावला ॥५१॥
मीही आलों गृहाप्रती ॥ तंव स्वरव्यंजनात्मक सरस्वती ॥ मुखींहूनि वेदमती ॥ निघाली देखा ॥५२॥
तैं सांगरहस्य शतपथा ॥ शिष्यां कथिलें समस्तां ॥ ते शिष्य कृतकृत्यता ॥ होवोनि गेले ॥५३॥
तैं जाहलों महाहर्षित ॥ पंधराशाखा सूर्यें साक्षांत ॥ उपदेशिल्या होत्या तदर्थ ॥ ज्ञेय विचारित जाहलों ॥५४॥
तंव विश्वावसु गंधर्वपुत्र ॥ येवोनि मज केला नमस्कार ॥ पुसता जाहला प्रश्नसार ॥ वेदसंबंधी ॥५५॥
ह्मणे माझे आघवे ॥ चोवीसप्रश्न सांगावे ॥ पंचविसावा प्रकारें बरवे ॥ प्रश्न आन्वीक्षकीचा ॥५६॥
विश्व अविश्व ख्याति अख्याति जाण ॥ पुरुष प्रकृति मित्र वरूण ॥ ज्ञान ज्ञेयज्ञ आणि अज्ञ ॥ तपा अतपा ॥५७॥
सूर्य आणि सूर्याद ॥ विद्या अविद्या वेद्य अवेद्य ॥ प्रकृतिपुरुषभेदें प्रसिद्ध ॥ चळा अचळ ॥५८॥
अज आणि अक्षय ॥ ऐसे चोवीस निरूपणीय ॥ मग म्यां कथिलें वेदोपायें ॥ तें ऐकें राया ॥५९॥
मुहूर्तमात्र विचारोन ॥ सुर्यशारदा वंदोन ॥ सार काढिलें उपनिषदांतून ॥ नवनीतवत् ॥६०॥
अव्यक्त त्रिगुण गुणकर्तृता ॥ ते विश्वशब्दें सर्वथा ॥ आणि निर्मळ ते तत्वतां ॥ अविश्व बोलिजे ॥६१॥
रव्याति ते नामरूपात्मक ॥ अख्याति ते केवळ देख ॥ अव्यक्त तो निर्गुणपुरुष ॥ व्यक्त ते प्रकृती ॥६२॥
मित्रशब्दें होय पुरुष ॥ वरूण प्रकृति विशेष ॥ ज्ञान तें प्रकृति परियेस ॥ ज्ञेय निष्कल ॥६३॥
ज्ञशब्देंपुरुष प्रकृतिअज्ञ ॥ तपा प्रकृति अतपा निष्कल जाण ॥ प्रकृति सूर्य सूर्याद प्रमाद ॥ ईश्वर बोलिजे ॥६४॥
अविद्या प्रकृति विद्या पुरुष ॥ वेद्य अव्यक्त अवेद्य परेश ॥ चळा प्रकृति अचळ पुरुष ॥ दोनी अजें अक्षयें ॥६५॥
या प्रकृतिपुरुषांचें विचारण ॥ सांख्यशास्त्रोक्त करून ॥ तें आन्वीक्षकीविज्ञान ॥ विद्य त्रयीमय ॥६६॥
ऐसिया वेदवेदार्थातें ॥ जे नेणतीं भ्रामितचित्तें ॥ ते पुनःपुनः संसारचक्रातें ॥ फिरती प्राणी ॥६७॥
यास्तव राया इयें दोनी ॥ प्रकृतिपुरुषें देखावीं ज्ञानीं ॥ तेणें जन्ममरणापासोनी ॥ सुटिजे सत्य ॥६८॥
यावरी विश्वावसु ह्मणत ॥ म्यां पंचविसावें तत्व सत्य ॥ ऐकिलें बहमुखोक्त ॥ तें ऋषी सांगतों ॥६९॥
असित जैगीष देवल देख ॥ पराशर ब्रह्मर्षि पंचशिख ॥ आष्टिषेण कपिल शुक्र ॥ गौतम गर्ग नारद ॥७०॥
आसुरी पुलह पुलस्य ॥ सनत्कुमार शुक्र देवरात ॥ कश्यप आणि स्वपिता सत्य ॥ इत्यादिकांपासाव ॥७१॥
आयकिलें परि सर्व ॥ तुझिये मुखापासाव ॥ ऐकों इच्छितों सद्भाव ॥ तंव याज्ञवल्क्य बोलिला ॥७२॥
ह्मणे प्रकृतीतें पुरुष जाणे ॥ परि पुरुषांतें प्रकृति नेणे ॥ पश्य अपश्यातें जाणे ॥ तो पंचविसावा ॥७३॥
चोविसावी प्रकृती ॥ पंचविसावा पुरुष वक्ती ॥ यांतें सव्विसावा देखे सिद्धांती ॥ तो क्षरक्षरातीत ॥७४॥
ऐसें मीनी आपण ॥ कीं मी प्रक्रुतिहूनि भिन्न ॥ आणि क्षराक्षर देखे संपूर्ण ॥ तो पुरुष सव्विसावा ॥७५॥
तो सव्विसावा उत्तमातें ॥ देखे परमतत्वातें ॥ आत्मनिष्ठ मनातें ॥ करूनियां ॥७६॥
हा वेदसारांश कथिला ॥ तेणें विश्वावसु संतोषला ॥ साष्टांगे वंदोनियां गेला ॥ आपुले स्थानीं ॥७७॥
तस्मात् राया तूं जाण ॥ सांख्ययोगचि मुख्य कारण ॥ ब्रह्मप्राप्तीसि ज्ञानाहून ॥ दुजें अंतरंग नाहीं ॥७८॥
तये ज्ञानावांचोनि मोक्ष ॥ सर्वथा प्राप्त नव्हे देख ॥ ऐसें देवराता सम्यक ॥ सत्यमानी ॥७९॥
हें रायें आयकोनी ॥ दानमानें संतोषवोनी ॥ याज्ञवल्क्या स्वभुवनीं ॥ पामकिता जाहला ॥८०॥
नानमुक्तें प्रवाळमणी ॥ दीधलीं ब्राह्मणां पसे भरोनी ॥ गाई कोटिसंख्या दोवोनी ॥ पुत्रा राज्य दीधलें ॥८१॥
मग तो देवरात भला ॥ मोक्षधर्मनिष्ठ जाहला ॥ हा इतिहास निरूपिला ॥ धर्मरायासी ॥८२॥
भीष्म ह्मणे गा पांडवा ॥ तुवाही ज्ञानाभ्यास करावा ॥ मग होसील ऋषि बरवा ॥ सर्वां वंद्य ॥८३॥
हा याज्ञवल्क्योक्त ज्ञानप्रकाश ॥ मनीं धरावा सविशेष ॥ भीष्में दीधला उपदेश ॥ मोक्षधर्मीं ॥८४॥
वैशंपायन ह्मणती राया ॥ ऐसें भीष्में कथिलिया ॥ मग पुसता जाहला तया ॥ धर्मराय ॥८५॥
ते पुढें अपुर्वकथा ॥ श्रवणमात्रें नाशी दुरितां ॥ सावधान ऐकावी श्रोतां ॥ ह्मणे कवि मधुकर ॥८६॥
इति श्रीकथाकल्पतरू ॥ त्रयोदशस्तबक मनोहरू ॥ देवरातयाज्ञवल्क्यसंवादप्रकारू ॥ षोडशाध्यायीं कथियेला ॥८७॥
॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥
॥ इति श्रीकथाकल्पतरौ त्रयोदशस्तबक षोडशोऽध्यायः समाप्तः ॥