॥ श्रीगणेशाय नम: ॥
मुनीसि विनवी जन्मेजयो ॥ सांगा जी अग्रकथान्वयो ॥ तंव बोलिला मुनिरावो ॥ ऐकें भारता गा ॥१॥
दानधर्म ऐकोनि भले ॥ युधिष्ठिरें भीष्मासि पुसिलें ॥ जे वेदीं ऐसें असे बोलिलें ॥ कीं पुरुष शतायु ॥२॥
तरी थोडक्याचि दिवशी ॥ कां पावती मरणासी ॥ तंव भीष्म ह्मणे धर्मासी ॥ ऐकें उत्तर ॥३॥
जें आचरितां पुरुष ॥ पावे सत्कीर्ति आयुष्य ॥ आणि जें करितां होय बहुवस ॥ अधर्म अकीर्ती ॥४॥
याचें कारण सारतर ॥ त्र्कमेंचि आचार अनाचार ॥ पूर्णायु असतांही रहिताचार ॥ होय अल्पायुषी ॥५॥
कुत्सिरतुप असता पाहें ॥ सदाचारें दीर्घजीवी होय ॥ ते आतां सांगताहें ॥ आचारभूमी ॥६॥
सदा अत्र्कोधत्व मनें ॥ पारक्याची ईर्ष्या न करणें ॥ सत्यवाक्य श्रध्दा धरणें ॥ अकुटिळ सुजनता ॥७॥
इत्यादि देहगुणपुर:सर ॥ मृत्तिका शौचादि आचार ॥ स्नानादिक करते नर ॥ शतजीवी होताती ॥८॥
जे मोठे शब्दें हांसती ॥ मोठा ग्रास मुखीं घेती ॥ त्यांचें आयुष्य कर्मगतीं ॥ न्यून होय ॥९॥
चारघटिका उरेल रात्री ॥ उठावें तिये अवसरीं ॥ मळमूत्रादि बाहेरी ॥ करावे देहधर्म ॥१०॥
मग शौचचमन कीजे ॥ अंतरीं परमेश्वरा स्मरिजे ॥ मातापिता नमिजे ॥ गुरुदेवता ॥११॥
परस्त्रगिमन स्वभावें ॥ कदाही मनीं न धरावें ॥ प्रात:काळीं करावें ॥ देवतापूजन ॥१२॥
नित्यदान यथाशक्ति कीजे ॥ चालतां कांहींच न भक्षिजे ॥ आनि उच्छिष्ट न अर्पिजे ॥ गोब्राह्मणअग्नीसी ॥१३॥
उच्छिष्टें सूर्यचंद्रनक्षत्रें यांतें न पहावें नेत्रें ॥ भोजन न कीजे निर्धारें ॥ फुटक्यापात्रीं ॥१४॥
करोनि येकवस्त्र परिधान ॥ कदा न कीजे स्नान भोजन ॥ आणि नागवें स्नानशयन ॥ करुंचि नये ॥१५॥
डोईचे केश न ओढावे ॥ मस्तकप्रहारां न करावें ॥ आणि शिर न खाजवावें ॥ दोहीं हातीं ॥१६॥
शिरस्नान करोनि जाणा तेलें अंग माखावें न ॥ अनध्यायीं अध्ययना करुंचि नये ॥१७॥
अनओळखी तयासवें ॥ भलते गांवीं नव जावें ॥ क्षत्रिय ब्राह्मण सर्प आघवे ॥ यांची अवगणना न कीजे ॥१८॥
ब्राह्मण गाई नृपवर ॥ वृध्द आणि स्त्री गरोदर ॥ भारात्र्कांत दुर्बळ थोर ॥ यांसी मार्ग द्यावा ॥१९॥
मार्गी देवालय थोर मोठे बोलिले तरुवर ॥ त्यांसी प्रदक्षिणा निर्धार ॥ करावीची ॥२०॥
देवपितरां दिल्याविण ॥ कदा न कीजे भोजन ॥ कोणासि उद्वेगकारी वचन ॥ बोलोंचि नये ॥२१॥
कठोर अक्षर न बोलावें ॥ निरर्थक न उच्चरावें ॥ अमंगळ वाणी तमोभावें ॥ बोलावीचि ना ॥२२॥
गोब्राह्मण वेद देव ॥ वडील स्त्रिया सुस्वभाव ॥ यांची निंदा आणि गर्व ॥ करुंचि नये ॥२३॥
आधीं देवपितरां देउनी ॥ मग भक्षावें सहजनीं ॥ किटले आरसां नयनीं ॥ न पहावें स्वरुप ॥२४॥
पर्वकाळीं स्त्रीप्रति न जावें ॥ आसन पायें ओढोनि न बैसावें ॥ अमार्गे घरांत न यावें ॥ शिरीं न धरावें रक्तपुष्प ॥२५॥
एकादशीचिये दिवशीं ॥ उपवास करावा नेमेंसीं ॥ भोजनसमयीं चांडाळादिकांसी ॥ न पहावें ॥२६॥
स्त्रिये शेळी उंटिणीचें ॥ हस्तिणी चमरीगाईचें ॥ दूध न भक्षावें यांचें ॥ वर्णत्रयीं ॥२७॥
गोष्टी करितां न जेवावें ॥ रात्रीं श्राध्द न करावें ॥ जेऊनि केश न विंचरावे ॥ हस्तदत्तलवण न भक्षिजे ॥२८॥
कुष्टिनी स्त्री असेव्य पाहीं ॥ अपस्मारी हीनांग सही ॥ यांचेपासोनि जाली तियेचाही ॥ संभोग वर्जावा ॥२९॥
मघारेवती टाकोन ॥ चार टाकिजे ऋतुआद्यदिन ॥ श्राध्ददिवस वर्जून ॥ स्त्रीगमन कीजे ॥३०॥
समदिनीं कन्या सत्य ॥ विषमदिनीं संभवे सुत ॥ सोळादिवस परियंत ॥ ऋतुकाळ हा ॥३१॥
इत्यादि आचारें वर्तती ॥ ते पुरुष शतायु होती ॥ निषिध्द वर्तलिया अंतीं ॥ होय आयुष्य क्षीण ॥ ३२॥
तंव युधिष्ठिर प्रश्न करी ॥ कोण उत्तमतीर्थ तीर्थाभीतरीं ॥ मग याचें उत्तर करी ॥ भीष्मदेवो ॥३३॥
कीं प्रथम सत्य बोलणें ॥ तद्रूपचि जळलक्षणें ॥ अगाध धैर्यरुप जाणणें ॥ डोह जेथ ॥३४॥
हें जाणावें मानसतीर्थ ॥ श्रेष्ठ असे सर्वाआंत ॥ तैसेंचि मृदुपणही तीर्थ ॥ आणि सौजन्यही ॥३५॥
भूत दया अकठिनता ॥ इंद्रियनिग्रह लोभरहितता ॥ अहंकारराहित्य तथा ॥ संग्रहत्याग ॥३६॥
आणि निर्मळ अंत:करण ॥ इत्यादि मानसतीर्थे जाण ॥ यांच्याठायीं केलिया स्त्रान ॥ होती उत्तमलोक ॥३७॥
बाह्य गंगादितीर्थे सही ॥ जीं पूर्वोक्त त्यांच्याठायी ॥ तथा मानसतीर्थे पाहीं ॥ सत्यादिकें ॥३८॥
या दोहीं तीर्थाप्रती ॥ जे नर स्त्रानें करिताती ॥ ते स्वर्गमोक्षातें पावती ॥ ऐसा तीर्थमहिमा ॥३९॥
यावरी युधिष्ठिर पुसत ॥ जरी हा प्राणी निभ्रांत ॥ पांचभौतिक देह सत्य ॥ टाकीत असे ॥४०॥
तरी या समागमें जाण ॥ जात असे कवण कवण ॥ तें सांगा मजलागुन ॥ मातापिता किंवा गुरु ॥४१॥
मग भीष्म जाहला बोलता ॥ अगा शरीर टाकोनि जातां ॥ एक सहाय असे तत्वतां ॥ धर्म मात्र ॥४२॥
धर्मे सकळ जीवजात ॥ होय सुखिया अत्यंत ॥ कुकर्मे दुष्टयोनी पावत ॥ तें ऐक आतां ॥४३॥
ब्राह्मण वेदाधिकारी जरी ॥ पतीतप्रतिग्रह करी ॥ तो मेलिया भोगी भारी ॥ नरकभोग ॥४४॥
मग पंधरावर्षे खर होय ॥ तो मरुनियां पाहें ॥ सातवरुषें पावे देह ॥ बळीवर्दाचा ॥४५॥
तोही मरुनि तीनी मास ॥ मग होय ब्रह्मराक्षस ॥ मागुता पावे परियेस ॥ ब्राह्मणजन्म ॥४६॥
पतिताचें याजन करी ॥ तो नरक भोगी भारी ॥ पंधरावर्षे तदुपरी ॥ कृमी होय ॥४७॥
मागुता पांचवरुषें जाण ॥ कुकडा होय मरुन ॥ एकैकवर्ष लांडगा श्वान ॥ पाठीं मनुष्य होय ॥४८॥
मातापितरांचा निरंतरीं ॥ जो पुत्र अपमान करी ॥ तो दहावरुषें वरी ॥ गर्दभ होय ॥४९॥
जे अन्न भक्षूनि धनियाचें ॥ वोखटें चिंती तयाचें ॥ तो देह पावे वानराचें ॥ वरुषें दहा ॥५०॥
जो नर बुडवी ठेवणी ॥ तो भोगी शतयोनी ॥ भोगोनि पंधरावर्षे जाणीं ॥ कृमी होय ॥५१॥
पारक्याचा राग करी ॥ तो सारंग होय निर्धारीं ॥ विश्वासघाती अवधारीं ॥ आठवर्षे मीन होय ॥५२॥
पय तीळ उडीद जाण ॥ कुळीथ शिरस चणे सण ॥ राळे मूग गहूं प्रधान ॥ सर्वधान्यें ॥५३॥
ऐसियामध्यें निरुता ॥ एकादिया धान्याचा हर्ता ॥ तो मूषकादि योनी भोक्ता ॥ होय त्र्कमेंची ॥५४॥
पूर्वी कन्या एकास देउनी ॥ दुसर्यासि देतो कृमी जाणीं ॥ चौदावर्षे भोगोनी ॥ मग मनुष्य होय ॥५५॥
जो करी स्त्रीहनन ॥ तो कुत्सितजन्म भोगून ॥ वीसवरुषें कृमी होवोन ॥ पावे दु:ख ॥५६॥
जो परकीय भोजन चोरी ॥ तो मक्षिका होय भारी ॥ मीठ चोरी तो निर्धारीं ॥ होय चिडीपक्षी ॥५७॥
दहीं चोरी तो बगळा देख ॥ पाणी चोरी तो होय बक ॥ तैलचोर तैलपाई सम्यक ॥ होय किडा ॥५८॥
लोह चोरी तो काक परियेसीं ॥ कांसें चोरी तो हारीत पक्षी ॥ रौप्यपात्र चोरी तयासी ॥ जन्म कपोताचा ॥५९॥
सुवर्णभांडार चोरिता ॥ कृमी होय निरुता ॥ धुतलें कौशेय चोरिता ॥ होय पशु ॥६०॥
देवपितृकार्य आरंभून ॥ मांसादिक त्यांसी नेढून ॥ जो स्वयें करी भोजन ॥ तो काक होय ॥६१॥
जो पुरुष व्यभिचारी ॥ ब्राह्मणीसी गमन करी ॥ तो पावे मरणानंतरीं ॥ चांडाळत्व ॥६२॥
कृतन्घासि यमलोकीं तत्काळ ॥ पट्टीश मुद्नल आणि शूळ ॥ अग्निकुंभिपाकादि सकळ ॥ असिपत्रवन ॥६३॥
तप्तवाळु कंटक शाल्मली जाण ॥ हे त्र्कमेंचि नरकयातन ॥ यमदूतीं भोगवून ॥ पावे कृमित्व ॥६४॥
तयाचा मग गर्भपात ॥ ऐसें भोगिता होय रात ॥ तर्यग्जाती बहु दु:खित ॥ होवोनि मरे ॥६५॥
पाठीं कूर्मयोनी पावे जाण ॥ आणि जो अशस्त्रा करी हनन ॥ शस्त्र हातीं घेऊन ॥ धनालागीं ॥६६॥
अथवा वैरभावें मारी ॥ तो यमयातने उपरी ॥ गर्दभ वर्षे दोनीवरी ॥ होवोनि मरे ॥६७॥
पाठी मृगमत्स्यश्वापद ॥ ऐशा योनी पावे विविध ॥ हे पापफळभोगभेद ॥ कथिले लेशमात्रें ॥६८॥
तंव यु्धिष्ठिर बोलिला ॥ कीं अधर्मपरिपाक कथिला ॥ तो स्वामिया ऐकिला ॥ साकल्यपणें ॥६९॥
आतां धर्म करितां अंतीं ॥ नरा होय कवणी गती । तंव बोले धर्माप्रती ॥ देवव्रत ॥७०॥
ह्मणे ऐसीं पापें जाणीं ॥ नानाप्रकारीं करोनी ॥ पश्वात्तापें पोळे मनीं ॥ आणि न करी मागुतेन ॥७१॥
जैसेजैसें अवधारीं ॥ स्वपापकर्मनिंदा करी ॥ तैसतैसें क्षीण भारी ॥ होय पाप ॥७२॥
पहिलें पाप करुन ॥ मग चित्त ठायीं राखोन ॥ प्रायश्वित्त करी ॥ तो त्यापासून ॥ सुटे सत्य ॥७३॥
मन आंवरुनि श्रध्दापूर्वक ॥ करी प्रायश्वित्तांग अन्नदानादिक ॥ स्वधर्मप्राप्त द्रव्य सम्यक ॥ सुपात्रीं वेंची ॥७४॥
आणि वेदाध्ययन करी ॥ ऐसा वर्ते सदाचारीं ॥ तो पापनिर्मुक्त संसारीं ॥ होय जाण ॥७५॥
तंव धर्म ह्मणे अहिंसा ध्यान ॥ इंद्रियनिग्रह गुरुशुश्रूषण ॥ यातं कल्याणकारी कवण ॥ मनुष्यासी ॥७६॥
मग ह्मणितलें गंगाकुमरें ॥ इये अहिंसादि समग्रें ॥ धर्माचीं असती द्वारें ॥ आपुलाले समई ॥७७॥
अहिंसा परमधर्म जाण ॥ या धर्मासि आश्रयून ॥ अन्यत्रधर्म संपूर्ण ॥ राहताती ॥७८॥
जाणि जें आपणासि जैसें ॥ सुखदु:ख होत असे ॥ परदेहीं अनुभवा तैसें ॥ जाणावेंची ॥७९॥
हें विचारोनि प्राणिघातीं ॥ जे पुरुष न प्रवर्तती ॥ कवणीही त्यांसमान नवती ॥ पुण्यकर्ते ॥८०॥
जो अश्वमेधयाग करी ॥ आणि दुजा आजन्मवरी ॥ मांसभक्षण न करी ॥ तरी हाचि अधिक ॥८१॥
जो आपुलें मांस अवधारीं ॥ परमासें पुष्ट करी ॥ तो निरयीं अघोरीं ॥ भोगी यातना ॥८२॥
मग कृमियोनि लाहे ॥ पाठीं मनुष्यपण होय ॥ मग त्याचें मांस खाय ॥ मारिला जो तो ॥८३॥
तरी अहिंसे समान ॥ नाहीं तपस्या धर्मदान ॥ अहिंसक असेल तो कैसेन ॥ होईल मांसभक्षक ॥८४॥
मांस द्रव्यें घेविकत ॥ तथा मांस भक्षी परदत्त ॥ एक बांधोनि प्राणी मारित ॥ हे तिन्ही पापी समानची ॥८५॥
यास्तव मांसासि भक्षिता ॥ तोचि सर्वपापकर्ता ॥ जो वर्जी तो सर्वधर्मकर्ता ॥ भारता होय ॥८६॥
ऐसी पुण्यपाप व्यवस्था ॥ ऐसोनि धर्म जाहला पुसता ॥ ह्मणे निवालों गंगसुता ॥ अग्र आतां सांगावें ॥८७॥
अकाम अथवा सकाम होत्साते ॥ युध्दीं अंतीं प्रिय प्राणांतें ॥ जे जाहले टाकिते ॥ ते कवणगती पावती ॥८८॥
तंव ह्मणितलें भीष्मदेवें ॥ जो प्राण टाकी जेणें भावें ॥ तो तैसीच गति पावे ॥ इये अर्थी इतिहास ॥८९॥
पूर्वी ब्रह्मिष्ठ व्यास तत्त्वतां ॥ एकदां मार्गी जात होता ॥ तंव देखिला कीटक जातां ॥ तेचि वाडवाटे ॥९०॥
तेणें व्यासासवें त्वरा ॥ आरंभिली अवधारा ॥ हें अंतरीं ऋषीश्वरा ॥ कळलें सर्वज्ञत्वें ॥९१॥
मग व्यास त्या किडेयासी ॥ पुसता जाहला परियेसीं ॥ ह्मणे तांतडी कां करितोसी ॥ गमनाची पैं ॥९२॥
किडा ह्मणे हो ऋषिपती ॥ मागां पैल थोर पंथीं ॥ फुंफाट वाजत आहेती ॥ धोरी बैलांचे ॥९३॥
गाडेयांच्या चत्र्कधारा ॥ वाजताती झरझरां रथीं बैसले अपारा ॥ कोल्हाळ करिती ॥९४॥
तें ऐकतों ह्मणोन ॥ रथचक्राखालीं दडपोन ॥ मरण येईल हें जाणोन ॥ असें पळत ॥९५॥
तंव व्यास ह्मणती पाहें ॥ तुज हा देह वल्लभ काय ॥ जेथ मनुष्य तेथ उपाय ॥ नाहीं अष्टभोगीं ॥९६॥
कीटक ह्मणे ऋषिनायका ॥ जीव सर्वत्रां सारिखा ॥ इये देहीं मी सुखा ॥ पावलों असें ॥९७॥
प्राणिया देहा नुरुप पाहें ॥ विषयसुख सर्व आहे ॥ भोग भोग्यानुरुप आपुलिये ॥ देहीं आहेतिची ॥९८॥
मी पूर्वजन्मीं होतों शूद्र ॥ धनधान्या नाहीं पार ॥ परि द्विजां न मानींचि थोर ॥ कृपणदोषी ॥९९॥
जे बुध्दिमंत असती ॥ बरें बोलणार शुध्दमती ॥ त्या सर्वाची अप्रीती ॥ मी करीतसें ॥१००॥
मी लटिकाचि भारी ॥ परद्रव्याचें दु:ख करी ॥ परद्रव्यहरणीं निर्धारीं ॥ तत्पर होतों ॥१॥
सेवकां अति कार्पण्य ॥ बाळकादिकांसि करुन ॥ नानावचनें करुन ॥ कष्टविलेंसे ॥२॥
अवमानिले देवपितर ॥ दीधलें नाहीं अन्नमात्र ॥ ऐसीं पापकर्मे त्याचें समग्र ॥ फळही जाणतों ॥३॥
हें स्मरण असे कशास्तव ताता ॥ जे नानापरी पूजिली होती माता ॥ ब्राह्मणही एक तथा ॥ महाकुळशीळसंपन्न ॥४॥
वेदवादीं असे भला ॥ तोही मार्गी येतां भेटला ॥ प्रसंगीं घरीं आणिला ॥ पूजिला येकवेळे ॥५॥
यास्तव जातिस्मरता जाहली ॥ ह्मणोनि देहव्यवस्था कथिली ॥ आतां बहुसुख कोणे काळीं पावेन सांगावें ॥६॥
यावरी व्यासदेव बोलत ॥ कृतकर्मे भोगिलीं पाहिजेत ॥ तीं त्र्कमेंचि समस्त ॥ ऐकें कीटका ॥७॥
श्वान घोरपड वराह हरिण ॥ पक्षी चांडाळ शूद्र जाण ॥ या योनी पावोनि निर्वाण ॥ राजा होसी ॥८॥
मग होईल माझें दर्शन ॥ तेव्हां ज्ञानोपदेश करीन ॥ तेणें ब्राह्मणपण पावोन ॥ जासी ब्रह्मलोकीं ॥९॥
ऐसें होईल आमुचे निष्ठे॥ मग कीटक गेला आपुलेवाटे ॥ हें कीटोपारव्यान गोमटें ॥ कथिलें तुज ॥११०॥
ह्मणोनि जैसे कर्म कीजे ॥ तेणें तैसेंचि भोगिजे ॥ तंव पुसिलें धर्मराजें ॥ परिसोनियां ॥११॥
ह्मणे विद्या तप दान ॥ या तिहींमध्यें थोर कवण ॥ तंव सांगे गंगानंदन ॥ व्यासमैत्रेयसंवाद ॥१२॥
पूर्वी वाराणसी आतं ॥ मैत्रेयमुनी होता नांदत ॥ तंव व्यास गेला तेथ ॥ आज्ञातरुपें ॥१३॥
मैत्रेयें अर्घ्यपाद्यें जाण ॥ पूजापूर्वक करविलें भोजन ॥ तें उत्तम कामीक अन्न ॥ भक्षिलें व्यासें ॥१४॥
तेणें व्यास सविस्मय जाहला ॥ हें जाणोनि तये वेळां ॥ मैत्रेयऋषी बोलिला ॥ ऐकें स्वामी ॥१५॥
कीं तूं परम तापसा ॥ रहित असोनि हर्षामर्षा ॥ त्या तुज भोजनें काइसा ॥ विस्मय उपजतो ॥१६॥
तरी हें फेडीं आश्चर्य ॥ तंव बोलिला ॠषिराय ॥ कीं मज भोजनाचा विस्मय ॥ उपजला नाहीं ॥१७॥
तूं तपश्चर्या करित ॥ आधींच शुद्ध तयाआंत ॥ मज सारिखें क्षुधार्त ॥ पात्र आलें ॥१८॥
तें तुवां प्रेमादरें ॥ तोषविलें अन्नदानमात्रें ॥ लोक पावसी निर्धारें ॥ इतुकेन उत्तम ॥१९॥
तरी थोडेंनि बहुत पाहें ॥ पाविजे हें वाटतें आश्चर्य ॥ ऐसें ऐकोनि मैत्रेय ॥ पुसता जाहला ॥१२०॥
ह्नणे दानाचें फळ स्वामी ॥ जरी ऐसें वर्णितां तुह्मी ॥ तरी आपण स्वधर्मी ॥ संपन्न विद्यातपें ॥२१॥
ह्नणोनि सर्वात मान्य काय ॥ व्यास ह्नणे तपश्चर्ये ॥ पापें नाशूनि समर्थ होय ॥ निग्रहानुग्रही ॥२२॥
तो इंद्रादिलोक पावे जाण ॥ ते तपादि धर्म संपूर्ण ॥ परि तयांवरी उपकार जाण ॥ होय दानधर्मे ॥२३॥
यास्तव परस्परें सर्वथा ॥ विद्यातपांसि असतां ॥ दानप्रभावें होय पावता ॥ लक्ष्मीवृद्धयादी ॥२४॥
हें मैत्रेयासी उपदेशिलें ॥ तेंचि धर्मा तुज वहिलें ॥ म्यां संक्षेपें सांगीतलें ॥ युधिष्ठिरा गा ॥२५॥
आतां याचिये पुढील महिमा ॥ युधिष्ठिर पुसेल भीष्मा ॥ तो ऐकावा नृपोत्तमा ॥ ह्नणे वैशंपायना ॥२६॥
इये अनुशासिकीं बरवीं ॥ इतिहासआख्यानें स्वभावीं ॥ श्रोतीं आयकावीं आघवीं ॥ ह्नणे कवि मधुकर ॥२७॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ त्रयोदशस्तबक मनोहरु ॥ धर्मफळव्यवस्थाप्रकारु ॥ एकोनत्रिंशाध्यायीं कथियेला ॥१२८॥ ॥