श्रीगणेशाय नमः
मुनीसि ह्नणे जन्मेजयो ॥ राज्यीं बैसला धर्मरावो ॥ तेणें जाहला उत्साहो ॥ अग्रकथा सांगें पुढें ॥१॥
मग वैशंपायन बोले ॥ ते सर्वही तेथोनि निघाले ॥ भीष्मा शरतल्पीं होतें घातलें ॥ गेले तिये स्थानीं ॥२॥
तंव श्रीकृष्णातें देखोन ॥ संतोषला गंगानंदन ॥ अनेकशब्दीं स्तुति करोन ॥ राहिला ध्यानस्थ ॥३॥
त्यासि सर्वी केला नमस्कार ॥ तें चितास्थान पूर्वापर ॥ भूतप्रेतगजाश्वनर ॥ शिर रचित जें ॥४॥
सहस्त्रशस्त्रास्त्रमुक्त ॥ ऐसें कुरुक्षेत्र विख्यात ॥ श्रीकृष्ण धर्माप्रति ह्नणत ॥ ऐकें ख्याती ययाची ॥५॥
परशराम पूर्वी येथें ॥ पांच र्हदं क्षत्रियांचे रक्तें ॥ भरुनि पितृतर्पणातें ॥ करिता जाहला ॥६॥
एकदा सहस्त्रार्जुनाचे कुमर ॥ येवोनियां सपरिवार ॥ वधिते जाहले मातापितर ॥ परशरामाचे ॥७॥
यास्तव रामें संकल्प केला ॥ कीं निक्षत्री येकवीसवेळां ॥ करुनियां महीतळा ॥ देईन ब्राह्मणासी ॥८॥
मग तैसेंचि रामें केलें ॥ क्षत्रियाचें रक्त गोठलें ॥ तेणें र्हद पांच भरिले ॥ सारिलें पितृतर्पण ॥९॥
पुढें अश्वमेधाच्या अंतीं ॥ कश्यपातें दीधली क्षिती ॥ ते हे रक्तडोह बोलती ॥ स्यमंतओपंचकीं पांच ॥१०॥
हे परशरामाची कथा ॥ द्वितीयस्तबकीं संपूर्णता ॥ ह्नणोनि कथिली संक्षेपता ॥ प्रसंगवशें ॥११॥
परि पृथ्वी बहु पीडली ॥ ते कश्यपातें शरण गेली ॥ ह्नणे मदर्थ शांती जाहली ॥ भूपाळांची ॥१२॥
क्षत्रियांचे पुत्र पौत्र ॥ मातें पाळिती समग्र ॥ मग कश्यपें नृपवर ॥ तेचि प्रतिष्ठिले ॥१३॥
त्यांचेचि वंशींचे आतांही ॥ राज्यें करिताति मही ॥ ऐसें धर्माप्रति सर्वही ॥ सांगीतलें श्रीकृष्णें ॥१४॥
यावरी भीष्मासि ह्नणे कृष्ण ॥ तूं भूतभविष्यवर्तमान ॥ जाणत अससी संपूर्ण ॥ तरी धर्मातें निरुपीं ॥१५॥
वर्ण आश्रम आणि संकर ॥ जातीचे धर्म सांगे समग्र ॥ जेणें निःसंदेह युधिष्ठिर ॥ करील राज्य ॥१६॥
ऐसें ऐकोनियां भीष्म ॥ स्तविता जाहला पुरुषोत्तम ॥ कीं तूं सृष्टिरचिता परम ॥ विराटस्वरुपा ॥१७॥
हें ब्रह्मांड सचराचर ॥ उत्पत्ति स्थिति संहार ॥ सर्वकर्ता अपरंपार ॥ नाहीं तुजवेगळा ॥१८॥
असो व्यासादिकींही समस्तीं ॥ नानापरी स्तविला श्रीपती ॥ स्वर्गी वाद्यगजरें सुरपती ॥ पुष्पवृष्टी करिता जाहला ॥१९॥
भीष्म श्रीकृष्णासि ह्नणे ॥ सर्वत्र सुख तवदर्शनें ॥ त्रिविधतापपापत्राणें ॥ जाहली माझी निवृत्ती ॥२०॥
नारद ह्नणे पवित्रा भीष्मा ॥ धर्मा सांगावें राजधर्मा ॥ गांगेय ह्नणे पुसलिया आह्मां ॥ सांगों सकळ ॥२१॥
येरु ह्नणे गांगेया जाण ॥ धर्मे संबंधी सोइरे ब्राह्मण ॥ वधिले यास्तव लाजोन ॥ पुसत नाहीं ॥२२॥
ययावरी ह्नणे भीष्म ॥ युद्धीं शस्त्रवध उत्तम ॥ तो क्षत्रियासी स्वधर्म ॥ तेथ लज्जा कायसी ॥२३॥
धर्म ह्नणे देवव्रतासी ॥ राजधर्म नरेंद्रासी ॥ आचरणीय सर्वाशीं ॥ परम हितावह ॥२४॥
चतुर्विध पुरुषार्थ भले ॥ जेणें करुनि साधती आपुले ॥ मग भीष्में सांगों मांडिले ॥ राजधर्म ॥२५॥
प्रथम रक्षूनि गोब्राण ॥ करावें प्रजांचें संरक्षण ॥ आणि बोलोनि सत्यवचन ॥ करावा पुरुषार्थ ॥२६॥
परि आपत्तीक काळीं ॥ धैर्य नसंडावें भूपाळीं ॥ ऐसें वागावें सहकुळीं ॥ होवोनि गुणवंत ॥२७॥
शांतशीळ दातार ॥ अमृदुत्वें धर्मतत्पर ॥ जितेंद्रिय दर्शनार्ह ॥ स्थूललक्षी ॥२८॥
तये पार्थिवा वैभवश्री ॥ नसंडिती काळांतरीं ॥ आणीकही अवधारीं ॥ युधिष्ठिरा गा ॥२९॥
आर्जव सर्वकार्यी करावें ॥ परी मृदुपणें नसावें ॥ अतितीक्ष्णही नसावें ॥ न दंडावे ब्राह्मण ॥३०॥
तोचि राजा विशेषें ॥ महत्वासी पावत असे ॥ आतां तेणें वर्तावें कैसें ॥ तेंही ऐक ॥३१॥
पौरुषसंचयाहूनि पाहीं ॥ आणिक कोश दुजा नाहीं ॥ तेणें सकलही शास्त्रांविषयीं ॥ होय परिपूर्णता ॥३२॥
परि मृदु नव्हावें साच ॥ तेणें स्वयें होय नीच ॥ मग पराभव करितीच ॥ वैरीजन ॥३३॥
वसताच्या अर्कापरी ॥ सदा असावें नृपवरीं ॥ प्रत्यक्ष अनुमानें अवधारीं ॥ स्वपर परीक्षावे ॥३४॥
टाकावें सर्व व्यसनांतें ॥ व्यसनी पावे पराभवातें ॥ आपुला उद्वेग लोकांतें ॥ नसांगावा ॥३५॥
गरोदरेच्या परि असावें ॥ निश्चळधर्मे वर्तावें ॥ लोकहितातें करावें ॥ नटाकावें धैर्य ॥३६॥
धीरा आणि योग्यदंडासी ॥ कदा भय नाहीं परियेसीं ॥ आणि परिहास भृत्यांसीं ॥ नकरावा रायें ॥३७॥
करितां वचन उल्लंघिती ॥ आपुलें काम न करिती ॥ द्यूतकारी स्त्रीजितसंगती ॥ नकरावी रायें ॥३८॥
मृदुपार्थिवा समक्ष ॥ निष्ठीवन करिती प्रत्यक्ष ॥ ते त्यजावे विशेष ॥ वाग्व्यवहारी ॥३९॥
पार्थिवाचें प्रिय वाहन ॥ गजअश्वादिक जाण ॥ त्यावरी करिती आरोहण ॥ आज्ञा नसतां ॥४०॥
राया सांगातें प्रीतीं ॥ क्रीडा करुं इच्छिती ॥ कीं आमुच्या वचनीं भूपती ॥ ऐसें दर्शविती लोकांत ॥४१॥
याकारणास्तव रायें ॥ सदा सावध असावें पाहें ॥ एतदर्थी बोलिलें आहे ॥ पूर्वील विद्वज्जनीं ॥४२॥
राजा अविरोधी विप्र प्रवासी ॥ पृथ्वी ग्रासी या दोघांसी ॥ जेवीं सर्प उंदिरासी ॥ करी ग्रास ॥४३॥
ज्यासी करुं ये योग्य संधी ॥ त्यासी सत्वर करावा बुद्धीं ॥ विरोधा योग्य त्यासी आधीं ॥ करावा विरोध ॥४४॥
गुरु अथवा राजमंत्री ॥ सप्तांगपदार्थ सामुग्री ॥ जो रायासि वैपरीत्य करी ॥ त्याचा त्याग करावा ॥४५॥
चतुर्वर्णासि बरवा ॥ रायें धर्म शिकवावा ॥ विश्वास अविश्वास न धरावा ॥ कोणाचाही अत्यंत ॥४६॥
राष्ट्रीचे गुणदोष आघवे ॥ आपण स्वबुद्धीं पहावे ॥ आणि अखंड पाहत असावें ॥ छिद्र वैरियाचें ॥४७॥
सर्वाचे परामर्श घ्यावे ॥ कोशउपार्जन करावें ॥ स्थान वृद्धि क्षय पहावे ॥ सावधानत्वें ॥४८॥
अलोलुपत्व धरावें ॥ सतीचे आचार पहावे ॥ भ्याडाचें वित्त न घेयावें ॥ हरावें असताचें ॥४९॥
तें वित्त द्यावें संतां ॥ स्वयें हर्ता स्वयें दाता ॥ वश्यात्मता आणि सत्ता ॥ साधनवंत ॥५०॥
काळीं दाता भोक्ता व्हावें ॥ आचारशुद्ध असावे ॥ आतां साह्य कोणा करावें ॥ तें ऐकें धर्मा ॥ ॥५१॥
शूर कुळीण ईश्वरभक्त ॥ आरोग्मशीळ विद्यावंत ॥ असंक्रुद्ध धर्मनिरत ॥ साधु बळी अभिमानी ॥५२॥
इहलोक आणि परलोक ॥ यांचे असती अवेक्षक ॥ ऐसे शुभगुणलक्षणीक ॥ करावें साह्य तयांसी ॥५३॥
जो शुचि अक्रोधी राय ॥ अव्यसनी मृदुदंड जितेंद्रिय ॥ त्यासी पतन कदा नहोय ॥ सर्व विश्वास मानिती ॥५४॥
ऐसा तो उत्तम नरेंद्र ॥ प्राज्ञगुणी पररंध्रतत्पर ॥ सुष्टदर्शनीय समग्र ॥ पाहे न्याय अन्याय ॥५५॥
कार्यारंभीं श्लाघ्य नधरीं ॥ आरंभिल्याची समाप्ती करी ॥ प्रजा पुत्रांचिया परी ॥ पाळी निरंतर ॥५६॥
प्रजा शांत राखी निरंतरीं ॥ आणि जो कूटमान न करी ॥ वैरियां कळे मित्रापरी ॥ तो उत्तम राजा ॥५७॥
रायें पहावें चारनेत्रीं ॥ दान द्यावें अमत्सरीं ॥ युक्तिशूर सत्य दाक्षिण्यभारी ॥ प्रजाहित संग्रहावें ॥५८॥
रायें अपराधियां दंड ॥ कीजे यथाकाळीं यथापाड ॥ आणि साधुकुळीण सुघड ॥ याचा त्याग नकरावा ॥५९॥
बळिष्ठें निर्बळशत्रूची ॥ अवज्ञा न करावीची ॥ यथा अल्पही विष मारीची ॥ तथा जाळी वन्ही ॥ ॥६०॥
बाह्यआर्जव हदयीं जिह्नता ॥ ज्याच्या वचनीं सदा मृदुता ॥ तरी आर्जवेंचि सर्वथा ॥ करावें राज्य ॥६१॥
अदंभें दंभेंही परी ॥ धर्म करावा नृपवरीं ॥ धर्माहूनि दूसरें अवधारीं ॥ इष्ट नाहीं रायातें ॥६२॥
हे नीति नारायणें शिवासी ॥ शिवें कथिली इंद्रासी ॥ इंद्रें बृहस्पतीसी ॥ केली श्रुत ॥६३॥
पुढें बृहस्पतीनें शुक्रासी ॥ शुक्रें संक्षेपें नारदासी ॥ नारदें कथिली आह्मासी ॥ हे राजनीती ॥६४॥
भीष्म ह्नणे राजटिळका ॥ ऐसी आली मृत्युलोका ॥ तेचि कथिली तुज सम्यका ॥ संक्षेपवाक्यें ॥६५॥
ऐसी राजनीती प्रथम ॥ ऐकोनियां पुसे धर्म ॥ कीं सर्वाहूनि उत्तम ॥ भूपाळ जो ॥६६॥
जयाचिये दुःखविशेषीं ॥ सर्वजन होती दुःखी ॥ त्याचेनि तरी सुखें सुखी ॥ होती सकळ ॥६७॥
राया आणि प्रजांचे जाण ॥ शरीरावयव समसमान ॥ मग तो विष्णुअंश निर्माण ॥ कां पां ह्नणिजे ॥६८॥
भीष्म ह्नणे पंडुसुता ॥ पूर्वी राजदंड दंडिता ॥ हे कांहींचि व्यवस्था ॥ नवती जाण ॥६९॥
सर्वलोक आनंदेंसीं ॥ असतां तंव एकदा तयांसी ॥ मोह उपजोनियां खेदासी ॥ पावते जाहले ॥७०॥
तेणें धर्म नाशूं लागला ॥ मग सर्व मिळोनि त्या वेळा ॥ अवघियांचा राजा केला ॥ अंगनामें ॥७१॥
तेणें मृत्यूची मानससुता ॥ पत्नी केली नांव सुनीथा ॥ तिचिये पोटीं भारता ॥ उपजला वेन ॥७२॥
तो प्रजांविरुद्ध वागला ॥ रागद्वेषां वश जाहला ॥ ह्नणोनि ऋषीश्वरीं मारिला ॥ शापोनि देखा ॥७३॥
मग ऋषीश्वरीं तयावेळां ॥ त्याचा दक्षिणऊरु मथिला ॥ तंव र्हस्वांग पुरुष उपजला ॥ अति विकृत ॥७४॥
तयापासोनि भिल्ल जाहले ॥ ह्नणोनि दक्षिणकरीं मंथिलें ॥ तेणें पृथूसि जन्म जाहलें ॥ शस्त्रशास्त्रीं प्रयुक्त ॥७५॥
तो ह्नणे ऋषीश्वरां ॥ मज धर्मार्थी आज्ञा करा ॥ मुनि ह्नणती गा नृपवरा ॥ करीं धर्मरक्षण ॥७६॥
कामक्रोधांतें सांडोनी ॥ सत्पात्रातें पूजोनी ॥ प्रियाप्रियांतें टाकोनी ॥ दंडावे द्वेषी ॥७७॥
मग शुक्रा पुरोहित केलें ॥ मंत्री वालखिल्य जाहले ॥ तेणें धनुष्यें गिरि मर्दिले ॥ पृथ्वी केली समान ॥७८॥
तंव इंद्रदेव ऋषि आले ॥ पृथूसि राज्यीं स्थापिलें ॥ धान्यादि पदार्थ ओपिले ॥ स्वसामर्थ्ये ॥७९॥
मेरुनें स्वकन्या दीधली सत्य ॥ मग चिंतिता हयनाग रथ ॥ कोटिसंख्या अनंत ॥ प्रकट जाहले ॥८०॥
ज्याचिये दंडनीती करोनी ॥ स्वधर्मी राहिले सर्व प्राणी ॥ पर्वती मार्ग दीधला मेदिनी ॥ जाहली कामदुधा ॥८१॥
सकळही प्रजा रंजिल्या ॥ मग विष्णूनें ह्नणितलें तया ॥ कीं तूं मजतुल्य लोकत्रया ॥ होसील मान्य ॥८२॥
तुवां दंडनीतीकरोनी ॥ रक्षण करावी मेदिनी ॥ मग लक्ष्मी मूर्ती धरोनी ॥ राहिली घरीं तयाचे ॥८३॥
तया समयापासोन ॥ राजा विष्णुअंश ह्नणोन ॥ महत्व पावला संपन्न ॥ चतुःपदार्थी ॥८४॥
चौदाविद्यांची प्रवृत्ती ॥ तैंहूनि जाहली निरुती ॥ यास्तव सर्वमान्य भूपती ॥ बोलिजे देवमय ॥८५॥
ह्नणोनि धर्मा अवधारीं ॥ ऐसें जो राज्य करी ॥ तो चिरकाळ स्वर्गपुरी ॥ भोगी सर्व सुखें ॥ ॥८६॥
पुढें पुण्यक्षयानंतरें ॥ राजाचि होवोनि अवतरे ॥ परि पापआचरितां त्वरें ॥ भोगी नरक ॥८७॥
हें पृथुचरित्र सर्वथा ॥ सातव्यास्तबकीं संपूर्णता ॥ असे ह्नणोनि संक्षेपता ॥ सांगीतलें जाण ॥८८॥
ऐसा राजधर्मी पहिला ॥ नीतिमार्ग उपदेशिला ॥ राज्य करावें भूपाळा ॥ येणें प्रबोधें ॥८९॥
आतां पुढील राज्यस्थिती ॥ भीष्म धर्मा सांगेल प्रीतीं ॥ ती आयकावी श्रोतीं ॥ ह्नणे कविमधुकर ॥९०॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ त्रयोदशस्तबक मनोहरु ॥ राजधर्मनीतिप्रकारु ॥ द्वितीयोध्यायीं कथियेला ॥९१॥
॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥ ॥