मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक १३|
स्तबक १३ - अध्याय १७

कथा कल्पतरू - स्तबक १३ - अध्याय १७

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

मुनीसि ह्मणे जन्मेजयो ॥ अगा तुं सर्वज्ञ ऋषिरावो ॥ तरी सांगें कथान्वयो ॥ प्रेत्यादरें ॥१॥

तंव ह्मणे वैशंपायन ॥ राया ऐकें चित्त देवोन ॥ मोक्षधर्मीं गंगानंदन ॥ निरूपीतसे धर्मासी ॥२॥

जनकबोध आइकोन ॥ धर्मराजा करी प्रश्न ॥ या देहा नये जरामरण ॥ ऐसें काहीं आहे कीं ॥३॥

यावरी भीष्म बोलिला ॥ ह्मणे विदेहजनकें भला ॥ ऐसाचि प्रश्न होता केला ॥ पंचशिख भिक्षुकासी ॥४॥

मग भिक्षुकें तयाप्रती ॥ उत्तर दिधलें ऐसिया रीतीं ॥ की जरामरणाची निवृत्ती ॥ कदापि नव्हे ॥५॥

अनिवृत्तीही नाहीं जाण ॥ ह्मणोनि अखंडदंडायमान ॥ काळप्रवाहें वाहोनि जन ॥ नानादेह पावती ॥६॥

अनेक अवस्था पुत्रकलत्र ॥ होती पौत्रसंगम अपार ॥ तेथ बळी दुर्बळ सानथोर ॥ उंच नीच सारिखे ॥७॥

ऐशा प्रवाहें वाहतां बहळ ॥ सुखें काय सुखी होईल ॥ दुःखें दुःख पावेल ॥ दोनी अरक्षितीं ॥८॥

ऐसियामाजी एकचि जाण ॥ जें वैराग्यपुरःसर ज्ञान ॥ तें मात्र करी रक्षण ॥ अन्यप्रकार नाहीं ॥९॥

तंव धर्म ह्मणे गंगासुत ॥ गृहस्थाश्रम त्याग न करिता ॥ बुद्धीकरोनि सर्वथा ॥ कोण मोक्षा पावला ॥१०॥

तरी संन्यासि कीं युक्तात्मा ॥ कवण श्रेष्ठ सांगें भीष्मा ॥ यावरी भीष्म ह्मणे धर्मा ॥ ऐकें योगिनीसंवाद ॥११॥

सुलभानामें भिक्षुकी ॥ आणि मैथिल विवेकी ॥ यांचा संवाद अलोलिकीं ॥ ऐकें इये अर्थीं ॥१२॥

मिथिला नामं पुण्यनगरी ॥ तेथें जनक राज्य करी ॥ वेदवेदांगें बरव्यापरी ॥ जाणे धर्मशास्त्र ॥१३॥

पुराणें स्मृति कल्पसुत्रें ॥ योगशास्त्रें सांख्यशास्त्रें ॥ राजानीति धर्माविचारें ॥ प्रजा पाळीतसे ॥१४॥

कालांतरे अधिकाधिक ॥ कीर्ति प्रसरली अनेक ॥ कीं जनक नृपटिळक ॥ ऋषीहूनि आगळा ॥१५॥

ऐसा योगी आयकोनी ॥ कोणी सुलभनामें योगिनी ॥ विचरता इये मेदिनीं ॥ तंव त्रिदंडीं सांगीतला ॥१६॥

कीं जनक नृपनंदन ॥ मोक्षभागी असे संपूर्ण ॥ ऐसें ऐकोनियां वचन ॥ मनीं वाटला संदेह ॥१७॥

मग तें सत्य किंवा असत्य ॥ हें फेडाया मनोगत ॥ टाकोनि भिक्षुकी रूपत ॥ जाहली सुंदर तरूणी ॥१८॥

भिक्षा मागतमागतां ॥ आली जनकाचे समीपता ॥ येरे वस्त्रें रूपें देखतां ॥ मानिलें आश्चर्य ॥१९॥

कवण आली कोठोनी ॥ ऐसें विचारी अंतःकरणीं ॥ अन्नादिकीं संतोषवोनी ॥ केलें स्वागत ॥२०॥

ते योगिनी भोजन करुन ॥ संतुष्टचित्त होवोन ॥ सभे जनक बैसला देखोन ॥ विचारित अंतरीं ॥२१॥

ह्मणे हा जनक मोक्षवंत ॥ असे कीं नसे यथार्थ ॥ तरी हें जाणावें लक्षांत ॥ वेध करोनी ॥२२॥

सत्वगुणी महायोगिनी ॥ सत्वें प्रवेशली त्याचे नयनीं ॥ आपुलें त्याचिये नेत्रकिरणीं ॥ लाविलें नेत्रकिरण ॥२३॥

ते भावप्रवेशकरलक्षणा ॥ योगेबंधें बांधिलें नृपनंदना ॥ जनकही तद्भावगुणा ॥ घेता जाहला ॥२४॥

मग इचा भाव जाणोन ॥ बोलता जाहला नृपनंदना ॥ कीं तुवां हे चर्या कोठोन ॥ संपादिलीस ॥२५॥

आणि कोणे स्थळीं जासी ॥ कोठोनियाण आलीसी ॥ तूं आहेस कोणाची ऐसी ॥ केली पृच्छा ॥२६॥

शास्त्रश्रवणीं वयाच्या ठायीं ॥ ज्ञातीं बरा भाव दिसत ताहीं ॥ हें कारण काय लवलाहीं ॥ द्यावें उत्तर ॥२७॥

मज छत्रादि राजोपकरणें ॥ असतांही मुक्त जाणणें ॥ तूं आह्मां आहेसि मान्य ॥ मज मोक्षज्ञान विशेषें ॥२८॥

जया मोक्षाचा कोणीही ॥ सहसा सांगणारा नाही ॥ तेंही मज विदित सही ॥ अनुक्रमें असे ॥२९॥

पराशरगोत्रज पंचशिख ॥ त्याचा शिष्य मी आइक ॥ सांख्यज्ञानीं प्रवीण देख ॥ योग्यशास्त्रज्ञ ॥३०॥

राजनीतिवेत्ता सज्ञान ॥ त्रिविध मोक्षमार्गी प्रवीण ॥ तेणें मोक्षज्ञान संपूर्ण ॥ उपदेशिलें मज ॥३१॥

परि चळलों नाहीं राज्यापासोनी ॥ राज्य सांडोनि जावें वनीं ॥ परि मी राज्यपाळाण नित्यानी ॥ करितों गुर्वाज्ञेनें ॥३२॥

आणिकही मोक्षसंहिता ॥ विशेषें असे अभ्यस्ता ॥ मोक्षमार्गाची प्रथमतः ॥ भूमिका वैराग्य ॥३३॥

वैराग्यें उपजे ज्ञान ॥ ज्ञानास्तव करी प्रयत्‍न ॥ प्रयत्‍नें पावे मोठेपण ॥ सहजसहजें ॥३४॥

येणें महत् द्दंद्दविशेषें ॥ पीडा टळे द्दंद्दनाशें ॥ योगासिद्धी होय ऐसें ॥ निर्द्दद्द चित्त माझें ॥३५॥

मज राज्यपाळण करितां ॥ आहे मुक्तसंग सर्वाथीं ॥ ज्ञानकर्मनिष्ठा उभयतां ॥ मोक्षाप्रति कारण ॥३६॥

परंतु गुरुरायें तिसरी ॥ सांगितलीसे निष्ठापरी ॥ कीं यमनियम आचरीं ॥ द्देषकाम परिग्रह ॥३७॥

मौन दंभ मोहादिक ॥ गृहस्थासारिखें ॥ असावें देख ॥ त्रिदंडियासि ज्ञान सम्यक ॥ असतांचि मोक्ष ॥३८॥

तरी छत्रचामरवंतासी ॥ ज्ञान असतां विशेषीं ॥ मोक्ष कोण वारी परियेसीं ॥ सावधानें ॥३९॥

आपुलाले पदार्थाआंत ॥ ज्याचीज्याची अपेक्षा पडत ॥ त्याचात्याचा स्वीकार करित ॥ स्वामित्वपणें ॥४०॥

त्रिदंडीं दंडाकमंडलु घेतो ॥ राजा छत्रादीकीं मिरवतो ॥ ज्ञान जरी समान देखतों ॥ तरी मोक्ष कां पां नव्हें ॥४१॥

घराश्रमीं दोष देखोन ॥ परिव्राजकाश्रम अंगिकरण ॥ तरी अंगिकाररूप असता जाण ॥ संगी कैसोनि नव्हे ॥४२॥

स्वामित्व तरी रायासी समानत्व संन्यासियासी ॥ निग्रही अनुग्रही उभयांसीं ॥ समानत्व ॥४३॥

तरी भिक्षुकचि मुक्त होती ॥ आणी राजें कां पां न होती ॥ ज्ञानेंकरूनि होय मुक्ती ॥ रायासिं कोण वर्जी ॥४४॥

तस्मात् काषायवस्त्रधारण ॥ कमंडलुधारण मुंडण ॥ हीं मोक्षाप्रति कारण ॥ चिन्हें नव्हती ॥४५॥

चिन्हें असतांही सर्वाथी ॥ ज्ञानाचि कारण मोक्षाप्रती ॥ अथवा दुःखशिथिलता अती ॥ देखोनियां ॥४६॥

जरी हें काषायवस्त्रादिक ॥ चिन्ह धरिजे तरी सामान्य देख ॥ छत्रादिकांच्या ठायी सम्यक ॥ चिन्हत्त्व असे ॥४७॥

आतां अकिंचनत्वें मोक्ष जाण ॥ आणि सकिंचनत्वें बंधन ॥ तरी हाही नियम कारण ॥ दिसत नाहीं ॥४८॥

कां जे अकिंचनही विशेषें ॥ ज्ञानशुन्य असत असे ॥ आणि सकिंचन तो दिसे ॥ ज्ञान युक्त ॥४९॥

यास्तव धर्मार्थकाम मोह ॥ तथा राज्यपरिग्रह ॥ इयें स्थानें निःसंदेह ॥ बंधाचींची ॥५०॥

आणि मी तंव यथार्थ ॥ ऐसियांहूनि अतिरिक्त ॥ अबंधपदीं आतां सत्य ॥ राहिलों असें ॥५१॥

राज्यसंबंधीं ऐश्वर्यैं ॥ एतद्रूप पाशचि पाहें ॥ यांची स्नेहस्थानें मोहें ॥ पुत्रमित्रादिकें ॥५२॥

हीं पाशबधनें जाण ॥ मोक्षरूपपाषाणावरी ठेवोन ॥ त्याग अनासक्ति वैराग्य ज्ञान ॥ एतद्रूप खड्ग ॥५३॥

येणे बंध छेदिला असे ॥ हा फ्लितार्थ विशेषें ॥ संसारदुःख निरसे ॥ विरक्तत्वें ॥५४॥

मी पुत्रमित्र कलत्र ॥ क्षेत्रादिस्थळीं निरंतर ॥ असोनिया नसें तप्तर ॥ आत्मनिष्ठ ॥५५॥

आतां मी तंव ऐसा ॥ मुक्त असें वो भरंवसा ॥ परि तुझ्या वर्णविशेषा ॥ ऐकों इच्छितों ॥५६॥

तुझ्या देहीं सुकुमारता ॥ उत्तम नवयौवन असतां ॥ नियमादिक सर्वथा ॥ काय हेतु ॥५७॥

यासी कपटवेष धारण ॥ तुझ्या ठायीं युक्त जाण ॥ युक्तायुक्त हा नॄपनंदन ॥ ऐसी प्रतीती पाहणें ॥५८॥

निष्कामता माझ्या ठायीं ॥ त्रिदंडादि धारण नाहीं ॥ तथापि मी युक्त पाहीं ॥ हा अर्थ नाही झांकिला ॥५९॥

आणि तुवां स्वद्दष्टी अंतरीं ॥ निक्षेपिली माझ्या नेत्रीं ॥ स्वस्वभाव परिक्षे अवधारीं ॥ माझ्या हृदयीं प्रवेशविला ॥६०॥

तरी तुं ऐसी कपटी धूर्त ॥ कोणें आणिलीस राज्यांत ॥ कीं माझ्या हृदयीं स्वभावतः ॥ प्रवेशलीस ॥६१॥

तें काहीं युक्तायुक्त ॥ तुवां आणिलें नाहीं मनांत ॥ तुं ब्राह्मणजातीं स्वतः ॥ मी तरी क्षत्रिय ॥६२॥

तरी क्षत्रिय आणि ब्राह्मण ॥ ऐक्य युक्त कैसें जाण ॥ तुवां माझ्या ठायीं रिघोन ॥ केला वर्ण संकर ॥६३॥

तूं तरी मोक्षधर्मिणी ॥ ह्मणवितोसि निःसंग योगिनी ॥ गृहाश्रमी मजलागोनी ॥ जन बोलती ॥६४॥

हा त्वां केला अनाचार ॥ दुजा केला वर्णसंकर ॥ तुं मज नेणसी स्वगोत्र ॥ अथवा अन्यगोत्री ॥६५॥

तूं मजमाजी प्रवेशतां ॥ क्षत्रियामंध्यें सर्वथा ॥ तिसरा वर्णसंकर उभयतां ॥ होऊं पाहे ॥६६॥

तूं योगिनी मी गृहस्थ ॥ आपुले परीक्षारूप कार्यार्थ ॥ या कार्यीं वर्णसंकर सत्य ॥ केला अससी ॥६७॥

ते मुर्खता तुझी जाण ॥ अथवा तुझें मिथ्याज्ञान ॥ जैसें कवळ आलिया शुक्रवर्ण ॥ पीत देखे ॥६८॥

अथवा कोर्णायेक मळीण ॥ दोषफांटा जाहला उप्तन्न ॥ तैसी स्वस्वाधीन होवोन ॥ यथेच्छा वर्तसी ॥६९॥

ऐसें असतां कांहींही ॥ तुवां शास्त्रज्ञाना विषयीं ॥ श्रम केला असेल तोही ॥ वृथा गेला ॥७०॥

दुजें ममहृदयासि अति ॥ स्पर्शोनिया दृष्टता अंतीं ॥ जे तुझी गुप्तता होती ॥ ते प्रकाशली ॥७१॥

माझी सत्ता इये सभेसी ॥ इचाही जय करूं इच्छिसी ॥ ह्मणोनि माझ्या ठायीं दृष्टीसी ॥ ठेवितोसि वारंवार ॥७२॥

तेणें ऐसें जाणतों कारण ॥ कीं माझा पक्ष करावा न्यून ॥ आणि आपुला पक्ष पूर्ण ॥ उंच करावा ॥७३॥

अमर्षदोषें बुद्धीभ्रशें ॥ दुषिलीसि दोषविशेषें ॥ त्यांत मागुतेनि असे ॥ योगास्त्र तुज ॥७४॥

तें येक वाटतें मनीं ॥ कीं अमृत विष दोनी ॥ माझ्या ठायीं मेळवोनी ॥ प्रेरितेस ॥७५॥

तरी तॄषितासि नीर ॥ क्षुधितासि अन्नमात्र ॥ अमृतप्राय होतें निर्धार ॥ स्त्रिये अथवा पुरुषासी ॥७६॥

परि तयासि नसतां कारण ॥ विषवत होतें उदक अन्न ॥ ह्मणोनियां तुझें करण ॥ वृथा होय ॥७७॥

दृष्टी अथवा भावें करोन ॥ अथवा योगें केलें स्पर्शन ॥ आतां करूं परीक्षण ॥ पाहतेसी ॥७८॥

हा युक्त आहे कीं नाहीं ॥ हें जाणाया सर्वही ॥ आकार गोपन केला सही ॥ हें अयुक्त होय ॥७९॥

अथवा तुज सहज कोणें ॥ राज्यस्थिती पहाया कारणें ॥ केलें असेल पाठविलें ॥ आकारगोपन करोनी ॥८०॥

मग तूं येथ आलीसी ॥ तरी हें विरुद्धा नीतीसी ॥ आतां ऐकें वचनासी ॥ वृत्धोक्त शुभे ॥८१॥

राजे येकांतस्थळीं बैसले ॥ तथा द्दिजजातीही भले ॥ अथवा नूतन सर्वकाळें ॥ स्त्रीरूपवंत ॥८२॥

स्त्री गुणें बुद्धीमंत ॥ तियें समीप अकस्मात ॥ अपरिचि तें निभ्रांत ॥ नवचावें पैं ॥८३॥

या तिहींपदार्थाप्रती ॥ आर्जवें जावें हेचि नीती ॥ ते तूं अनोळखी स्त्रीजाती ॥ वृथा आलीस ॥८४॥

आपुलें ज्ञान अचारशीलत्व ॥ आणि अभिप्राय भाव ॥ येथ येण्याचें कारण सर्व ॥ सांगावया योग्य तुं ॥८५॥

ऐसी जनकें नानावचनें ॥ निर्भीर्त्सिली सुंदर तेणें ॥ मग येरी वेदार्थवचनें ॥ बोलती जाहली ॥८६॥

सुलभ ह्मणे राया पाहीं ॥ तुं बोलिलासि जें काहीं ॥ तें युक्त दिसत नाहीं ॥ विचारदृष्टीं ॥८७॥

मुख्य वाक्य वाक्यार्थ ॥ वाक्यगुणदोष यथार्थ ॥ ऐसें विचारूनि समस्त ॥ बोलावें वक्तयें ॥८८॥

तरी ऐकें वाक्य लक्षण ॥ सौक्ष्म्य सांख्य क्रम निर्णय प्रयोजन ॥ हे पांच अर्थसप्रमाण ॥ तें लक्षितवाक्य ॥८९॥

याचें अनुक्रमें लक्षण ॥ सौक्ष्म्य ह्मणिजे ऐसें जाण ॥ ज्ञानज्ञेयार्थासि भिन्न ॥ विषयत्व असतांही ॥९०॥

अत्यंत गांठी पाडणें ॥ ऐक्यकरणबुद्धी होणें ॥ हें सौक्ष्मवाक्य जाणणें ॥ सूक्ष्मदृष्टीं ॥९१॥

वाक्यदोष वाक्यलक्षण ॥ यांचें प्रमाणविभागें ज्ञान ॥ जो अर्थ त्यांचें लक्षण धारण ॥ हें सांख्य बोलिजे ॥९२॥

जें विवक्षित बोलणें स्वभावें ॥ तें आधीं काय पाठीं बोलावें ॥ हा विवेक अनुभवे ॥ तो क्रम जाणिजे ॥९३॥

इच्छापूर्व अथवा द्देषें ॥ जिये अर्थीं प्रवृत्ति विशेषें ॥ पुरुषाची होत असे ॥ तें प्रयोजन ॥९४॥

धर्मार्थकामादिकीं सहसा ॥ प्रतिज्ञा करितां परियेसा ॥ सार विचारणें हा ऐसा ॥ निर्णय बोलिजे ॥९५॥

या पांचाअंर्थीं युक्त वाक्य ॥ वक्तयें बोलावें सम्यक ॥ आतां गुण अठरा देख ॥ सांगत असे ॥९६॥

उपेतार्थ अभिन्नार्थ ॥ वेगळा अपवृत्त विपरीत ॥ अश्र्लक्ष्ण तरी न होत ॥ तथा संदिग्ध नोहे ॥९७॥

जड जोडाक्षरयुक्त नाहीं ॥ उफराटा अर्थ नसे कांहीं ॥ असत्य नव्हेचि पाहीं ॥ नव्हे धर्मविरुद्ध ॥९८॥

संस्कृतेंसिं मिळोनि जाय ॥ तेंचि वक्तयें बोलणीय ॥ कामें क्रोधें लज्जें भयें ॥ मानें न बोलावें ॥९९॥

तरी आतां राया तुजसी ॥ जें मी बोलेन परियेसीं ॥ तें ऐशा लक्षणेंसीं ॥ युक्त असेल ॥१००॥

आणि वक्ता श्रोता वाक्यें ॥ हे तिन्हीं असती सारिखे ॥ तरीच अर्थाचा विवेकें ॥ प्रकाश होय ॥१॥

अगा तुहीं अससी सज्ञाना ॥ माझें लक्षण वचन ॥ तरी तें ऐकें सावधान ॥ ह्मणे सुलभा ॥२॥

आतां त्वां मज पुसिलें वचन ॥ कीं तुं कवणाची कवण ॥ त्याचें उत्तर प्रमाण ॥ एकें जनका ॥३॥

तृणकाष्ठपृथ्वीरजें ॥ इयें उदकयोगें वोजें ॥ एकवट संलग्न करिजो ॥ तैसा संसार प्राणियाचा ॥४॥

शब्द स्पर्श रूप रस गंध ॥ हे पंचविषय प्रसिद्ध ॥ श्रोत्र त्वक् चक्षु जिव्हा घ्राण शुद्ध ॥ हीं पंच ज्ञानेंद्रियें ॥५॥

या दहासिं परस्परीं ॥ लाख लांकडाचिये परि ॥ रंगिलें काष्ठ अवधारीं ॥ तैसा संबंध ॥६॥

यांचा संबधी घट जाण ॥ माजी अकरावा गुण मन ॥ मन इंद्रियांचे संबधान ॥ जाहला बद्ध ॥७॥

आपणचि विषयभोगातें ॥ भोगितो हें जाणे यथार्थें ॥ एतदाकार निश्चितें ॥ बुद्धीगुण बारावा ॥८॥

येथ सत्वादि परियेस ॥ तेरावा गुण असे विशेष ॥ महासत्व अल्पसत्व पुरुष ॥ जेणें अनुमानें जाणवे ॥९॥

त्यांत चौदावा गुण ॥ तो क्षेत्रज्ञ जीव जाण ॥ जो माझें मी प्रमाण ॥ जाणत असे ॥११०॥

आतां हेहे पदार्थ संपूर्ण ॥ यांचें करी संन्निधान ॥ तो सामग्य पंधरावा गुण ॥ ऐकें अर्थ तयाचा ॥११॥

सामग्न ऐसें ह्मणणें ॥ तरी सकल समृद्ध होणें ॥ हा सुत्रशब्दवचनें ॥ पंधरावा ॥१२॥

या पंधारांचा संघात ॥ तो तंतूंचा ओतप्रोत ॥ तये संघातें समस्त ॥ पटसिद्धि ॥१३॥

तैसेंचि ऐक्य संपूर्ण ॥ हा बोलिजे सोळावा गुण ॥ इये संघातीं वर्तमान ॥ आकृति असे ॥१४॥

आकृति ह्मणिजे आकार ॥ हा सतरावा गुण साचार ॥ व्यक्तिगुण बोलिजे निर्धार ॥ ऐकें अर्थ ॥१५॥

जड पिंडीभूत देह ॥ जा अठरावा निःसंदेह ॥ तेथ सुखदुःख द्दंद्दसमूह ॥ एकुणिसावा ॥१६॥

तेथ विसावा गुणमेळ ॥ संवत्सरादिरूप काळ ॥ तद्योगें होतो सकळ ॥ परिणामादी ॥१७॥

आणिक पंचमहाभूतें जाणी ॥ सद्योग असद्योग दोनी ॥ दैव शुक्र बळ तिन्ही ॥ ऐसे दहा गुण ॥१८॥

हे एकवटती सगुण ॥ घनीभूत निबिड होवोन ॥ तो देह पिडप्रमाण ॥ देहमात्रीं ॥१९॥

ऐसे तीसगूण असती ॥ तोचि देह गा भूपती ॥ तरी हा प्रकृतिरूपें बोलती ॥ स्त्रीरूप देह ॥१२०॥

ऐसाचि पुरुषदेह उप्तन्न ॥ इयेमर्यादें होतां प्रमाण ॥ तुं कोण हें ऐसें वचन ॥ पुसिलें कोणासी ॥२१॥

स्त्रीपुरुषसंयोगें केवळ ॥ बिंदुरक्तयोगें कलल ॥ घनकर्दमप्राय मूळ ॥ गर्भी होतें ॥२२॥

बुहुद कललापसुन ॥ पेशी होय तेथोन ॥ तिये पेशीपासाव जाण ॥ निर्माण अंगें ॥२३॥

रोमनखें अंगापासुन ॥ पुढें येणेक्रमेंचि जाण ॥ नवांमासीं शरीर संपूर्ण ॥ गर्भीं होतें ॥२४॥

तो दहाविये मासीं ॥ आपुलाले चिन्हेंसीं ॥ स्त्री अथवा पुरुष परियेसीं ॥ जन्म पावे ॥२५॥

जातकर्म नामकरण ॥ क्रमेंचि असे बाळपण ॥ कौमार वयसा यौवन ॥ पावे प्राणी ॥२६॥

उत्तरोत्तर वय पावत ॥ तैं पुर्ववय क्षीण होअ ॥ कळांचा प्रतिक्षणीं होत जात ॥ र्‍हास जैसा ॥२७॥

र्‍हासभेद अत्यंत पाहीं ॥ सूक्ष्म ह्मणोनि लक्षवत नाहीं ॥ जैसी दीपशिखा सही ॥ प्रतिक्षणीं विलक्षण ॥२८॥

तो लक्षवेना सहसा ॥ तरी निरूपावा कैसा ॥ ऐक्य निरूपावें तरी ऐसा ॥ असे भेद ॥२९॥

आपुलालिये वयीं जाणीं ॥ संबंध असतां प्रतिक्षणीं ॥ अवस्था विलक्षणगुणी ॥ असे ऐसी ॥१३०॥

जेवीं सूर्यकांतीपासोनी ॥ स्फटिकापासाव पडे वन्ही ॥ तेवीं काळासमुदायपासोनी ॥ प्राणी उप्तन्न होतो ॥३१॥

तरी जैसें आपुले देहीं ॥ आपणा देखतोसि पाहीं ॥ तैसें देखत कां नाहीं ॥ देहमात्रीं ॥३२॥

ह्मणोनि पुसणें तें वायां ॥ आतां तुवां पुसिलें राया ॥ कीं तुं कोणाची काया ॥ हेंही वृथाची ॥३३॥

तुं ह्मणविसी मी द्दंद्दहीन ॥ तरी कोणाची कोण कोठोन ॥ या प्रश्नाचा कवण ॥ उपयोग सांगें ॥३४॥

जरी वैरी मित्र उदासी ॥ कृतवंत त्याचिये कृत्यासी ॥ पुसिले कार्य करावयासी ॥ तो कैसोनि मुक्त ॥३५॥

ज्यासी स्वपरभाव पाहीं ॥ अंतरीं टळलाचि नाहीं ॥ इयें लक्षणें सर्वही ॥ तयासि जाण ॥३६॥

जो असमुद्रांत पृथ्वी ॥ एकछत्रें पाळी आघवी ॥ त्यामाजी येकी बरवी ॥ हे राजधानी ॥३७॥

त्यांत एक गृह अवधारीं ॥ एक पलंग तयाभीतरीं ॥ त्या पलंगार्धभागीं रात्रीं ॥ तूं शयन करितोसी ॥३८॥

आणि अर्धपलंगीं स्त्री ॥ येणें प्रसंगें निरंतरीं ॥ सकल चिंता अन्नवस्त्रीं ॥ करित आहेसी ॥३९॥

दंड होणें अपराधियांसी ॥ कृपा करणें सेवकांसीं ॥ त्यांत संधिविग्रह परियेसी ॥ यानादि राजनीती ॥१४०॥

नीतीचे मुख्य साही गुण ॥ यांचे योगें पराधीन ॥ तुं करुं नसकसी शयन ॥ सदा कष्टभूत ॥४१॥

कुटुंबीं आज्ञा करिसी व्यग्रा ॥ ह्मणसी माध्यान्हीं स्नान करा ॥ वैश्वदेवकर्म सारा ॥ होमकाळ जात असे ॥४२॥

येत आहिति याचक जन ॥ त्यांसीही देणें स्वल्प दान ॥ कांजे पुढील निर्वाह मागुतेन ॥ जाहला पाहिजे ॥४३॥

बहुत दीधलिया धन ॥ भांडार वेचोनि होईल न्यून ॥ त्यांत सुपात्रीं अधिक दान ॥ हीन हीनपात्रीं ॥४४॥

इत्यादि निग्रहानुग्रह तूतें ॥ जैसे आहेति यथार्थे ॥ तैसेचि सकळ गृहस्थांतें ॥ असती सर्वा ॥४५॥

ऐसे असतां पूर्वाक्त गुण ॥ तेही स्वगृहींचे राजे जाण ॥ तुजचि सारिखे ह्मणोन ॥ तेही मुक्तची ॥४६॥

तरी तुझें वचन वर्तन ॥ सर्व असे निष्कारण ॥ तृणाग्निप्राय जळ फेन ॥ तद्दत् क्षणभंगुर ॥४७॥

साम्राज्य पावोनियां जाण ॥ उपशम तरी पावे कवण ॥ सर्वपदर्थीं असे मन ॥ ममताव्याप्त ॥४८॥

अश्वरथपैदाती कुंजर ॥ प्रधान मित्र पुर भांडार ॥ राष्ट्र दंडकोश समग्र ॥ माझे ह्मणसी ॥४९॥

हें सप्तांग राज्य पाहें ॥ स्वयें पावोनिया रायें ॥ मग उपशम कैसा होय ॥ कोणें प्रकारें ॥१५०॥

ऐसें सप्तांग राज्य करितां ॥ तथा त्रिदंडधर्मे राहतां ॥ दोहींगुणांत अधिकता ॥ कोना कोणाहोनी ॥५१॥

तियेतिये काळीं देख ॥ तेणें तें लक्षण अधिक ॥ जेणें जें कार्य सम्यक ॥ होय तें प्रधान ॥५२॥

ऐसें राज्य पाळितां ॥ धर्म साधे कैसा तत्वतां ॥ आणि धर्म साध्य नसतां ॥ परमपद कैसें ॥५३॥

रायें पावोनि पृथ्वी समग्र ॥ अश्वमेघयागीं सर्वत्र ॥ पृथ्वी ब्राह्मण सोपस्कर ॥ दक्षिणा द्यावी ॥५४॥

तेही तुज दिसत आहे ॥ ऐसे नसतां राज्य पाहें ॥ करितां तंव अत्यंत होय ॥ आधिव्याधी ॥५५॥

मग एतत्संबंधीं थोर ॥ भोगणें दुःखकोटी अपार ॥ त्या माझेनि उच्चार ॥ केलिया न जाती ॥५६॥

तरी हीं दुःखें मद्देहासी ॥ नासती ऐसें बोलिलासी ॥ तें कोणें विचारें परियेसीं ॥ बोलिलास ॥५७॥

आणि त्वां पंचशिख ऋषिमुखें ॥ सांग सोपाय आसकें ॥ आइकिलें असे नेटकें ॥ मोक्षधर्मी ॥५८॥

त्याचें हेंचि फळ विशेष ॥ अनेक भेद ज्ञान पाश ॥ तरी आशा मनशा तोडावयास ॥ निःसंग व्हावें ॥५९॥

अगा छत्रादि राजापाशीं ॥ कां संगातें पावतोसी ॥ त्वां हा श्रमचि केलासी ॥ वेदशास्त्रज्ञ असूनी ॥१६०॥

अथवा उपदेश केला गुरुनें ॥ तो तुवां तुझेचि अज्ञानें ॥ विपरीत ऐकोनिया मनें ॥ हें थोतांड आरंभिलें ॥६१॥

तस्त्मात जनका समग्र ॥ हे तुझे सर्व विचार ॥ जेवीं कौटाळ सुंदर चरित्र ॥ तेवीं भासतसे ॥६२॥

तथा त्वां बोलिलें वचन ॥ कीं माझ्याठायीं प्रवेशून ॥ केला अति अप्रमाण ॥ वर्णसंकर ॥६३॥

तरी माझेनि सत्वगुणें विशेष ॥ तुझ्याठायीं केला प्रवेश ॥ हा म्यां काय तुज अविशेष ॥ अपकार केला ॥६४॥

तूंचि राया आपणेयासी ॥ मुक्तसंग ह्मणवितोसी ॥ परि म्यां असे देखिलासी ॥ शुन्यस्थळरूप ॥६५॥

म्या तें शून्यस्थळ भलें ॥ मजकरितां राहोनि वसविलें ॥ तरी कोणाचें काय दुःखिलें ॥ पाहें विचारोनी ॥६६॥

कथंचित हस्तपाद जघन ॥ इत्यादि अवयवें करून ॥ जरी तुज स्पर्शित्यें जाण ॥ तरी बोल साजता ॥६७॥

तूं थोरकुळीं होवोनि परियेसीं ॥ बुद्धीवंत दीर्घवंशीं ॥ ऐसें स्वयें आपणासी ॥ ह्मणवितोस ॥६८॥

हे महापंडित सभाजन ॥ हे गुरुजन हे प्रधान ॥ यांचा राजगुरु सज्ञान ॥ परंपरा तुं ॥६९॥

इये संभे बैसला असतां ॥ तुंही राजनीती पूर्णता ॥ स्त्रीपुरुष संकर बोलतां ॥ कैसा न लाजसी ॥१७०॥

सभासदांमध्यें कैसीं ॥ असभ्य वचनें बोलतोसी ॥ हे मुक्तता तुज ऐसी ॥ शोभत नाहीं ॥७१॥

मी तरी तुझ्याठायीं पाहें ॥ अस्पर्शत्वें राहिलीयें ॥ जेवीं कमळामध्यें राहें ॥ जळबिंदु अलिप्त ॥७२॥

ऐसें असोनियां पाहीं ॥ मी तुज स्पर्शिलें नाहीं ॥ आणि तुं ह्मणसी सही ॥ स्पर्शिलीस ॥७३॥

तरी तुझे गुरूनें कैसी ॥ विद्या सांगोनि नाडिलासी ॥ निबींज ज्ञान सर्वांशीं ॥ केलें तुझें ॥७४॥

आतां गार्हस्थ्यापासोनिही ॥ गुरुनें टाळिलासि पाहीं ॥ तुवां मोक्षाचा गंधही ॥ नाहीं जाणितला ॥७५॥

ऐसा दैवयोगें ॥ परियेसीं ॥ दोहीं अर्थापासोनि टळलासी ॥ मोक्षाची वार्ताही विशेषीं ॥ नाहीं ऐकिलीस ॥७६॥

अमुक्ता आणि मुक्तासी ॥ संबंध असतां परियेसीं ॥ ज्ञानें समानता कैसी ॥ वर्णसंकरव्यवस्था ॥७७॥

भावाअभाव योगी ह्मणिजे ॥ एक उत्तम अपकृष्ट दुजें ॥ यासी संबंध तो बोलिजे ॥ वर्णसंकर ॥७८॥

हस्ती पात्र आहे देखा ॥ पात्री दुग्ध मजी मक्षिका ॥ हीं परस्परें आहेति ऐका ॥ कोण कोणा आश्रितें ॥७९॥

ऐसें असोनि ऐकेठायीं ॥ आश्रयते वेगळेचि पाहीं ॥ तथा तयांचे वर्णही ॥ वेगळेची ॥१८०॥

ऐसेम परस्पर वेगळेपण ॥ असतां वर्णसंकर कोठोन ॥ दुसरें ऐकें प्रमाण ॥ वर्णसंकराविषयीं ॥८१॥

मी ज्ञातीनें उत्तम । ना वेश्या रुप अधम ॥ तरी माझी जाती सम ॥ श्रेष्ठ शुद्धऋषीं ॥८२॥

तत्कूळी जाहला देह देख ॥ याचें नाम सुलभा नामक ॥ स्त्री असोनि आपणा सम्यक ॥ भ्रतार न मिळे ॥८३॥

ह्मणोनि येकाकी जाण ॥ तपस्वी योगिनी होवोन ॥ ऋषिचयें करून ॥ वर्तत असें ॥८४॥

तरी गूढाभिप्राय काहीं ॥ माझ्या मनीं नसे पाहीं ॥ ना परस्वीं चित्त नाहीं ॥ ना नव्हे अभिमानिनी ॥८५॥

ना स्वानुष्ठित धर्मसार ॥ तेथ नव्हे क्षणभंगुर ॥ ना अज्ञानें अविचार ॥ न जाणोनि न बोलें ॥ ८६॥

ना अविचारूनियां ॥ येथें आल्यें नाहीं राया ॥ तुझी मोक्षी बुद्धीं जाणोनियां ॥ आल्यें सत्य ॥८७॥

तरी स्वपक्षीं अभिमान काहीं ॥ परपक्षीं द्देष नाहीं ॥ भिक्षुकी वसें कोणीही ॥ शून्यस्थळीं एकी रात्री ॥८८॥

तैसी मी तुझेठायीं जाण ॥ आजिंची रात्री राहून ॥ मग स्थळातरीं जाईन ॥ जाण राया ॥८९॥

मजसी तुवा स्ववाक्यें ॥ पूजिलें अर्ध्यपाद्यादिकें ॥ आतां रात्रि क्रमोनि हरिखें ॥ जाईन उदईक ॥१९०॥

भीष्म ह्मणे धर्मा परियेसी ॥ या ऐकोनि सुलभावाक्यासी ॥ जनक उत्तर नेदी तियेसी ॥ राहिला उगा ॥९१॥

हा सुलभायोगिनीजनकाचा ॥ संवाद कथिला भारतींचा ॥ पुढें पुराणांतर वाचा ॥ बोलेल कवि मधुकर ॥९२॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ त्रयोदशस्तबक मनोहरू ॥ सुलभाजनकसंवादप्रकारू ॥ सप्तदशाध्यायीं कथियेला ॥१९३॥

॥ इति श्रीकथाकल्पतरौ त्रयोदशस्तबक सप्तदशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP