॥ श्रीगणेशाय नमः ॥
मुनीसि ह्मणे जन्मेजयो ॥ ऋषे तूं ज्ञानसागरींचा डोहो ॥ तरी सांगें अग्रान्वयो ॥ मोक्षधर्मीचा ॥१॥
मग ह्मणे वैशंपायन ॥ ऐकें राया चित्त देवोन ॥ भीष्मोक्तकथा ऐकोन ॥ पुसता जाहला युधिष्ठिर ॥२॥
कीं व्यासदेवाचा कुमर ॥ कैसा जाहला योगीश्वर ॥ तो बाळपणीं ज्ञानविचार ॥ लाधला केवीं ॥३॥
आणि त्याची माता कवण ॥ हें सांगावें शुकाख्यान ॥ तंव ह्मणे गंगानंदन ॥ ऐकें धर्मा ॥४॥
पूर्वी मेरूश्रृगीं कर्णिकार ॥ वनादिकें शोभती अपार ॥ तेथ क्रीडत होता शंकर ॥ भूतगणपरिवारेंसीं ॥५॥
हैमवती होती सवें ॥ तेथ उग्रतप व्यासदेवें ॥ वायुभक्षोनियां बरवें ॥ केलें वर्षशत ॥६॥
तययोगबळें जटा ॥ जाहल्या असती पिंगटा ॥ मनीं हेतू हाचि कीं गोमटा ॥ सुपुत्र असावा ॥७॥
तंव प्रसन्न जाहला शंकर ॥ ह्मणे पावसे इच्छितकुमर ॥ ऐसा लाहोनियां वर ॥ मुनि गेला स्वाश्रमीं ॥८॥
एकदां अरणीं सहित गृहाग्नी ॥ मंथिता जाहला व्यासमुनी ॥ तंव धृताची अप्सरा नयनीं ॥ देखिली अकस्मत ॥९॥
तियेचे अवयव देखोनी ॥ काममोहित जाहला मुनी ॥ तंव अप्सरा तियेक्षणी ॥ जाहलीं पोपटी रूप ॥१०॥
मग तयाजवळी आली ॥ येरें अप्सरा जाणितली ॥ अत्यंत कामबुद्धी दाटली ॥ नासावरे प्रयत्नें ॥११॥
परि ऐसाही आंवरूनी ॥ अग्निइच्छें मंथी अरणी ॥ मंथनश्रमें जाहला द्रवोनी ॥ वीर्यपात ॥१२॥
तें अरणीगभीं घातलें ॥ तेथ शुकासि जन्म जाहलें ॥ अग्निज्वाळेवत् देखिलें ॥ महायोगी बाळक ॥१३॥
उपजतांच भागीरथी ॥ येवोनि स्नान जाहली घालिती ॥ दंडकृष्णाजिन तयाप्रती ॥ पुढां पडिलें गगनींहूनी ॥१४॥
सुरदुंदुंभी वाजती ॥ अप्सरा नृत्य करिताती ॥ नारदतुंबर स्तविती ॥ गाती गंधर्वादिक ॥१५॥
अष्टौलोकपाळ आले ॥ हर्षे परम सुखी जाहले ॥ चारी वेद येवोनि राहिले ॥ उभे शुक्राजवळी ॥१६॥
तेव्हां ब्रह्मा बोलावुनी ॥ मौजीं बांधवी शूळपाणी ॥ गुरुनें वेदशास्त्रपुराणी ॥ केला विद्याउपदेश ॥१७॥
इंद्रे दिव्यकमंडलु दिला ॥ वेदव्रतें पूर्ण जाहला ॥ परि मन विश्रांति जिव्हाळा ॥ नपवेचि आश्रमीं ॥१८॥
मग व्यासपितयाप्रती ॥ साष्टांगें वंदोनियां प्रार्थी ॥ ह्मणे स्वामी मज स्थिती ॥ सांगा मोक्षधर्मीची ॥१९॥
जेणें विश्रांती होय चित्ता ॥ ऐकोनि व्यास ह्मणे सुता ॥ मोक्षधर्म अपुर्वता ॥ सांगतो ऐक ॥२०॥
तेवेळीं कपिलोक्त थोर ॥ सांख्यशास्त्र योगशास्त्र ॥ याज्ञवल्क्यादि अपार ॥ अध्यात्मशास्त्रें ॥२१॥
तीं निरूपिलीं संपुर्ण ॥ तेणें जाहलें पूर्ण ज्ञान ॥ मग मोक्षमार्गी शुकाचें मन ॥ सविवर देखिलें ॥२२॥
यावरी व्यास ह्मणती शुका ॥ तुवां जावोनि भेटावें जनका ॥ मनुष्यमार्गें जावें देखा ॥ नवचावें अंतरिक्षें ॥२३॥
आपण मोठे तो यजमान ॥ हा नधरावा अभिमान ॥ होवोनियं तयाधीन ॥ रहावें मोक्षार्थ ॥२४॥
हें ऐकोनि शुक्र शीघ्रता ॥ जनकाजवळी जाहला जाता ॥ अनेक नदीपर्वत क्रमितां ॥ भारतवर्षी पावला ॥२५॥
आर्यावर्त देशीं पुण्यवनीं ॥ पुण्यनद्यांची तीर्थ क्रमोनी ॥ नानास्थळें देश सांडोनी ॥ मिथिलेप्रती पावला ॥२६॥
तेथ उपवनीं गेला ॥ मग राजद्दारीं प्रवेशला ॥ तंव द्दारपाळें वर्जिला ॥ ह्मणोनि राहिला तथेंची ॥२७॥
तंव माध्यान्हसमयीं जाय ॥ येवोनि तेथें मंत्रीप्रधान ॥ अर्ध्यादि पूजा करून ॥ अन्नदान दीधलें ॥२८॥
सुंदरजन पांचशत ॥ हावभावकटाक्ष करित ॥ त्यांहीं रात्री क्रमिली तेथ ॥ राहोनि तया भोंवते ॥२९॥
येरेंही असोनि आत्मध्यानीं ॥ क्रमिली असे ते रजनी ॥ उदयीक स्नानादि सारोनी ॥ बैसला तेथेंची ॥३०॥
तंव जनक नृपनाथ ॥ सप्रधान पूजेसहित ॥ येवोनि पूजिला विधियुक्त ॥ बैसवोनि रत्नासनीं ॥३१॥
मग स्तुति करोनि भावें ॥ ह्मणे आगमनकारण सांगावें ॥ तंव बोलिलें शुकदेवें ॥ रायाप्रती ॥३२॥
ह्मणे मी व्यासपित्यासि उत्तम ॥ पुसिले प्रार्थोनि मोक्षधर्म ॥ तेणें पाठविलें सप्रेम ॥ तुम्हांजवळीं ॥६३॥
तो मी आलों तुह्मांपाशीं ॥ आर्ति धरोनि मानसीं ॥ तरी भिक्षा द्यावी आह्मासी ॥ मोक्षज्ञानोपदेश ॥६४॥
ऐकोनि जनक बोलत ॥ ऋषे तुझ्या ठायीं समस्त ॥ मोक्षधर्म परिवर्तत ॥ परि विशेष आइकें ॥३५॥
मग विशिष्टधर्म कथिला ॥ तेणें शुकदेव संतोषला ॥ आज्ञा घेवोनि चालिला ॥ योगाभ्यासार्थ ॥३६॥
उत्तरदिशे हिमाचळ ॥ तेथ योजिले योगस्थळ ॥ जंव पावला उताविळ ॥ तंव तेचि समयीं ॥३७॥
नारदा दि ऋषीश्वर ॥ महेषाप्रति सुरवर ॥ करावया नमस्कार ॥ आले तेथें ॥३८॥
पुर्वी जिये हिमाचळीं ॥ शिवें शक्ती होती ठेविली ॥ तिये लगी वनमाळी ॥ नशकेचि उल्लंघूं ॥३९॥
जेथ श्रीवैकुंठनाथें ॥ तप केलेंसे पुत्रार्थें ॥ आणि तप केलें उमाकांतें ॥ बहुतकाळ ॥४०॥
त्या पर्वताचे माझारी ॥ पूर्वभागाचिये शिखरीं ॥ व्यास वेदाध्ययन करी ॥ स्वशिष्यासंह ॥४१॥
ते शिष्य मुख्य कवण ॥ सुमंत जैमिनी वैशंपायन ॥ पैलादिक चौघेजण ॥ ऋग्वेदांतें पढतीं पैं ॥४२॥
तिये आश्रमीं शुक गेला ॥ पितयासी प्रणाम केला ॥ मग जनकोक्त निरूपिला ॥ मोक्षधर्मवृत्तांत ॥४३॥
तंव वेदाध्ययन करिते ॥ चारी शिष्य संतुष्टचित्तें ॥ विनविते जाहले व्यासातें ॥ कीं शुकदेवा राहविजे ॥४४॥
जैसे आह्मी चौघेजण ॥ तैसाचि शुक तुमचा नंदन ॥ सहावा ऐसा निपूण ॥ आणिक नव्हावा ॥४५॥
यावरी व्यास ह्मणे तयांसी ॥ तुह्मी वेदप्रचार कीजे जनासी ॥ ब्रह्मलोकेच्छा जयांसी ॥ कर्मिष्ठ ब्राह्मणां ॥४६॥
तयां अवश्य वेद सांगावे ॥ कृतघ्न नष्ट अशूची वर्जावे ॥ तंव ते आज्ञामात्रें बरवे ॥ आलें भूमंडळीं ॥४७॥
अनेक शिष्यप्रतिशिष्य करोन ॥ यज्ञादिकर्में आचरवून ॥ लक्ष्मीप्रतिष्ठा सन्मान ॥ पावले ते ॥४८॥
इकडे व्यास शुकेसहिता ॥ तिये आश्रमीं राहिले असतां ॥ तंव नारदमुनी अवचितां ॥ आला तेथ ॥४९॥
ह्मणे पूर्वी ब्रह्मघोष होय ॥ आतां पर्वत भासे शून्यप्राय ॥ मग शुकासवें समयीं तिये ॥ वेदघोष आरंभिला ॥५०॥
तंव ध्वनीसवें वात ॥ वाजूंलागला अद्भुत ॥ मग व्यासें वर्जिला सुत ॥ अध्ययनकर्मीं ॥५१॥
शुकें व्यासा प्रश्न केला ॥ ह्मणे कैसा अनध्याय जाहला ॥ तेव्हां व्यास बोलिला ॥ पुत्राप्रती ॥५२॥
कीं साध्य नामक देवगणा ॥ त्याचा पुत्र समान ॥ समानाचा उदान ॥ त्याचा नंदन व्यान पैं ॥५३॥
व्यानापासोनि अपान ॥ अपानाचा पुत्र प्राण ॥ प्राणवायूसि नंदन ॥ नाहीं जाणा ॥५४॥
तेणें योगें श्वासोश्वास ॥ प्राणियां होय बहुवस ॥ ते धूमज विशेष ॥ ऊष्मज तेची ॥५५॥
श्वास प्रथममार्गी विख्यात ॥ प्रवह नामक मारुत ॥ दुजा विद्युल्लतेपासाव होत ॥ तो आहव नामें ॥५६॥
चंद्रनक्षत्रांचा उदयकारक ॥ तो तिसरा उद्दह नामक ॥ हा ऐकें स्कांदविशेषे ॥ मारुताचा ॥५७॥
समुद्रस्थजवळ घेवोन ॥ मेघांप्रति योजितो जाण ॥ तो मेघ जळवर्षण ॥ समयीं प्रबळ होतो ॥५८॥
जेणें विमानें आकाशस्थें ॥ असताति बाहीजतें ॥ तो संवहनामक निरुतें ॥ चौथा वात ॥५९॥
पांचवा विवहनामक वात ॥ जो वेगें गिरिवृक्षां मोडित ॥ साहवा परिवह विख्यात ॥ ऐकें तव्द्यापारू ॥६०॥
गगनगंगांबु रक्षितो थांबून ॥ करितो सुर्योचें स्तंभन ॥ आणि करिजतें आप्यायन ॥ जेणें चंद्रकळांचें ॥६१॥
सातवा परावह जाण ॥ तो सर्वप्राणियांचा प्राण ॥ अंतकाळीं काढितो ओढोन ॥ हे सप्त महामारुत ॥६२॥
हे अदितीचे पुत्र सुता ॥ तरी हा वायु वाजत असतां ॥ अनध्याय कीजे सर्वथा ॥ व्यास ह्मणे ॥६३॥
ऐसें सांगोनि त्यावेळां ॥ व्यास गंगेप्रति गेला ॥ वेदाध्ययनीं निवृत्त जाहला ॥ शुक्रदेव तो ॥६४॥
ऐशा शून्यसमयीं नारद ॥ येवोनि शुकासि बोले शब्द ॥ कीं तुज होईल सुखानंद ॥ ऐसें सांगेन मी ॥६५॥
तंव बोलिलें शुक्रदेवें ॥ इये लोकीं काय बरवें ॥ हितकारीं तें सागांवें ॥ मजप्रती स्वामी ॥६६॥
नारद ह्मणे पूर्वकाळी ॥ तत्त्व जाणावयाची भली ॥ उत्कटेच्छा उपजली ॥ ऋषीश्वरांसी ॥६७॥
सनत्कुमार तये वेळां ॥ ऋषीश्वरांप्रति बोलिला ॥ कीं विद्येसमान निर्मळा ॥ नाहीं नेत्र ॥६८॥
सत्यासमान तप नाहीं ॥ आसक्तिसम दुःख नाहीं ॥ आणि त्यागसमान काहीं ॥ नसे सुख ॥६९॥
असो इत्यादि क्रमें देखा ॥ नारदें उपदेशिलें शुका ॥ मग तपोबळां अनेका ॥ साधिलें तेणें ॥७०॥
सूर्यमंडळादिकीं संचरोन ॥ सर्वगतीं व्यापोन ॥ परमद व्यासनंदन ॥ पावला जीवन्मुक्तत्वें ॥७१॥
हें शुक्रदेव चरित्र ॥ विशेषें कथिलें विचित्र ॥ परि येथें पुराणांतर ॥ पृथक असे भारता ॥७२॥
कोणे एके शुभातिथी ॥ व्यासें मांडिली यज्ञस्थिती ॥ तेथें मीनले वेदमूर्तीं ॥ ऋषी थोरथोर ॥७३॥
मार्कंड पुलस्ति विभांडक ॥ श्रृंगऋषी शतानीक ॥ कौंडण्य वसिष्ठ उद्दालिक ॥ दुर्वास कश्यपादी ॥७४॥
समस्त ऋषी मिळाले ॥ व्यासा यज्ञकंकण बांधिलें ॥ तंव तेथें न्यून वाटलें ॥ सकळांप्रती ॥७५॥
ह्मणती पत्नीविण आहुती ॥ केविं हुताशन स्वीकारिती ॥ यागाची तरी ऐसी स्थिती ॥ शास्त्रोक्त असे ॥७६॥
ऐसें दधीचि बोलिला ॥ तो शब्द सकळां मानवला ॥ वसिष्ठ ह्मणे ब्रह्माचारियाला ॥ नाहीं अधिकार स्त्रीविणें ॥७७॥
दुर्वास ह्मणे सत्य वचन ॥ तरी कैसें कीजे कारण ॥ तंव भूर्णपिच्छ ह्मणे मी दान ॥ करितों आपुले कन्येचें ॥७८॥
भाकनिश्वयो जाहला ॥ जावोनि विवाह मेळविला ॥ सकळां आनंद वर्तला ॥ ऋषीश्वरांसी ॥७९॥
यज्ञाचें कृत्य ह्मणवोनी ॥ व्यासाचें लग्न लाविती मुनी ॥ ओंपुण्याह ह्मणोनी ॥ विप्रवर्य ॥८०॥
यावरी ह्मणे दुर्वासदेवो ॥ चला यज्ञस्थळा जावों ॥ मग वरातेंसीं व्यासदेवो ॥ निघता जाहला ॥८१॥
हिमागिरीचे पाठारीं ॥ आले व्यासाचे मंदिरी ॥ मग यज्ञकंकण अध्वरीं ॥ व्यासाकरीं बांधिलें ॥८२॥
लग्नकंकणावरी यज्ञकंकण ॥ यागदीक्षा स्वीकरण ॥ स्त्रीसहित व्यास आपण ॥ करी पूजा ॥८३॥
द्रव्याहुती तिलाज्याहुती ॥ सव्यापसव्य समर्पिती ॥ चारीवेद उच्चारिती ॥ ऋषी समस्त ॥८४॥
आचार्यपण दुर्वासया ॥ ब्रह्मासन दीधलें ब्रह्मया ॥ थोर आदरिलें बैसोनियां ॥ समस्तांसी ॥८५॥
ऐसा सप्तवरुषेंवरी ॥ यज्ञ केला ऋषीश्वरी ॥ संतोषले ब्रह्मा त्रिपुरारी ॥ अध्वरीं अंशें पातले ॥८६॥
यक्षकिन्नर देवगण ॥ लक्ष्मीसहित नारायण ॥ येवोनि ह्मणती वरदान ॥ मागावें जी व्यासदेवा ॥८७॥
जेणें यज्ञ आचरिजे ॥ तया प्रसन्न होइजे ॥ तंव व्यास ह्मणे देइजे ॥ पुत्रफळ मज ॥८८॥
यज्ञाचें सुकृतफळ सरे ॥ कृप कीजे परमेश्वरें ॥ तरी पुत्रभावें ऋषीश्वरें ॥ यांवें उदरीं माझिये ॥८९॥
हा बोल ऋषींनी अव्हेरिला ॥ परि शुक्राचार्यें मानिला ॥ तेणें देवो प्रसन्न जाहला ॥ शुक्रालागीं ॥९०॥
येरू ह्मणे जी केशवा ॥ मज संजीवनीं मंत्र द्यावा ॥ तरीच मी देवदेवा ॥ होईन सुत व्यासाचा ॥९१॥
बारावरुषें उदरीं रहीन ॥ सत्व व्यासाचें पाहीन ॥ ऐसें फेडीन अपुत्रपण ॥ मग पावेन स्वस्थळा ॥९२॥
ऐसा वर मागीतला ॥ तो नारायणें दीधला ॥ सकळां आनंद वर्तला ॥ तये वेळीं ॥९३॥
हे भविष्योत्तरींची कथा ॥ तुज कथिली गा भारता ॥ पुढें कथा ऐकिजे श्रोतां ॥ ह्मणे मधुकरकवी ॥९४॥
॥ इति श्रीकथाकल्पतरू ॥ त्रयोदशस्तबक मनोहरू ॥ शुकचरित्रकथाप्रकारू ॥ एकोनविंशाऽध्यायीं कथियेला ॥९५॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥
॥ इति श्रीकथाकल्पतरौत्रयोदशस्तबक एकोनविंशाध्याय समाप्तः ॥