॥ श्रीगणेशाय नमः ॥
गंगात्मजासि ह्मणे धर्म ॥ अनेक ऐकिले मोक्षघम ॥ तरी सकळांमाजी उत्तम ॥ धर्म असे कोणता ॥१॥
आश्रमाधर्मवंता समान ॥ दुजा असे धर्म कवण ॥ तंव बोलिला गंगानंदन ॥ धर्माप्रती ॥२॥
इयेचि अर्थी प्राचीन कथा ॥ नारदें कथिली सुरनाथा ॥ ते ऐकें पंडुसुता ॥ सावधानपणें ॥३॥
कोणे एके दिवशीं ॥ इंद्र बैसला होता सभेसी ॥ तंव इच्छाचारी नारदऋषी ॥ आला तेथें ॥४॥
तया नानोपचारीं पूजिलें ॥ सकळही आसनीं बैसले ॥ मग इंद्रे पुसूं मांडिलें ॥ नारदासी ॥५॥
स्वामी तुह्मी इच्छाचारी ॥ फिरत असा त्रैलोक्याभीतरीं ॥ तरी कांहीं आश्वर्यपरी ॥ सांगिजे मज ॥६॥
तुह्मां कांहीं अंविदित नाहीं ॥ तरी श्रुत दृष्ट सांगाही ॥ नारद ह्मणे तत्समयीं ॥ कथा विपुळ ॥७॥
महापंथी कुरुक्षेत्रीं ॥ गंगेचिये उत्तरतीरीं ॥ असे ब्राह्मण सौम्यभारी ॥ कोणी येक ॥८॥
कुळीण वेदवेदांग ज्ञाता ॥ वैदीककर्म अनुष्ठिता ॥ धर्मतत्पर क्रोधाजिता ॥ नित्यतृप्त जिंतेंद्रिय ॥९॥
दयाळू सत्यवादी दाता ॥ न्यायाप्राप्तवित्तभोक्ता ॥ दानधर्मी उत्सुकता ॥ असे जयासी ॥१०॥
पंचमहायज्ञकरणीं प्रवीण ॥ एके दिनीं आन्हीक करून ॥ बैसलासे आपण ॥ इतुक्यांत गृही तयाचे ॥११॥
आला असे एक अतीत ॥ तो अत्यंत विनीत ॥ ज्ञानीं आणि विद्यावंत ॥ पूजिला ब्राह्मणें ॥१२॥
अतीता विश्रांति जालिया ॥ मग ब्राह्मणें ह्मणितलें तया ॥ कीं तुमचें माघुर्य देखोनियां ॥ थोर संतोष पावलों ॥१३॥
तरी माझा घराश्रम न्यून ॥ हा पुत्रासि निरवून ॥ दुजा मोठा मार्ग कवण ॥ धरूं सांगा जी ॥१४॥
आतां संसारसुख भोगणें ॥ इच्छा नाहीं मज करणें ॥ विषयसुखीं दुःख दारूणें ॥ आसती साच ॥१५॥
जंव पुत्र आहेति विधेय ॥ आणि शरीर दक्ष आहे ॥ तंव पारलौकिक पाहें ॥ साधावें कांहीं ॥१६॥
संसारसमुद्रीं विचरतां ॥ पार पडण्याची थोर चिंता ॥ उपजलीसे माझिये चित्ता ॥ एतल्लक्षण मी ॥१७॥
ऐसी बुद्धी उद्भवली मना ॥ कीं अनेक गर्भवेदना ॥ जन्ममरण दुःखें नाना ॥ भोगतां खेद उपजला ॥१८॥
उत्पात्तिप्रळय ऐकोन ॥ बहुत जाहलों खेदखिन्न ॥ माझें लोभीं आसक्त मन ॥ होत नाहीं ॥१९॥
तरी धर्मतत्वमार्गीं ॥ त्वां मज प्रेरावें वेगीं ॥ ऐसीं निस्पृहता अंगीं ॥ देखिली तयाच्या ॥२०॥
मग येरू सुलक्षणता ॥ ब्राह्मणासी जाहला बोलता ॥ ह्मणे मज पुसिलें द्दिजनाथा ॥ अपूर्व तुवां ॥२१॥
परि तेथ माझेंही मन ॥ संदेहातें पावतें जाण ॥ मीही ऐसेंचि विचारोन ॥ श्रमलों असें ॥२२॥
हें मन त्रैलोक्यांत पाहीं ॥ लागें ऐसें देखिलें नाहीं ॥ म्यां बहुतांहीं ठायीं ॥ पुसिलें ऐसेंची ॥२३॥
तंव कोणी मोक्ष कोणी यज्ञ ॥ कोणी गृहस्थाश्रम कोणी वन ॥ कोणी राजधर्म आत्मज्ञान ॥ बोलती कोण ॥२४॥
सांख्यशास्त्र गुरुशुश्रुषण ॥ कोणी योग ध्यान धारण ॥ कोणी प्रतिष्ठिती दान ॥ तुलापुरुषादी ॥२५॥
कृछ्रचांद्रायणादिक ॥ तपें बोलती कोणी येक ॥ कोणी मातृभक्ति सम्यक ॥ कोणी पितृभक्ती ॥२६॥
कोणी दया कोणी उंछवृत्ती ॥ कोणी वेदाध्ययन बोलती ॥ इंद्रियानिग्रह ह्माणती ॥ कोणी येक ॥२७॥
ऐसा आपुलालिया मतांचा ॥ निर्वाह करिताति साचा ॥ मी हए ऐकोनियां वाचा ॥ पावलों उद्देग ॥२८॥
तथापि मी उपदेश तुज ॥ सांगत असें परम गुज ॥ तूं योग्य आहेसि निज ॥ उपदेशासी ॥२९॥
ह्माणोनि अपूर्व स्वयमेव ॥ माझे गुरूनें धर्मतत्त्व ॥ सांगीतलेंसे सद्भाव ॥ आईक तें ॥३०॥
येथोनि पूर्वीसि गोमतीतीरीं ॥ नागाव्हय नामें नगरी ॥ जेथें समस्त सुरवरीं ॥ पूर्वकाळीं याग केलें ॥३१॥
तेथें पद्मनाग येणें नावें ॥ ब्राह्मण वसतसे सद्भावें ॥ तो उपकारक स्वभावें ॥ कायावाचा मानसीं ॥३२॥
साम दान भेद निग्रहां ॥ सर्व संग्रही संग्रहा ॥ अवलोकनमात्रें महा ॥ व्यसनें दवडी ॥३३॥
परमशुद्धाचार समर्थ ॥ दयापर भाग्यवंत ॥ तुझिये मनींचा वृत्तांत ॥ पुसावा तयासी ॥३४॥
तो वक्तां सकळशास्त्रां ॥ तैसा विलोंकीं नाहीं दुसरा ॥ तंव द्दिज ह्मणे योगेश्वरा ॥ दैवें भेटलासी ॥३५॥
माझा दुःखभार दूरे केला ॥ तुझ्या शब्दीं विश्वास उपनला ॥ तरी आजिंचा दिवस भला ॥ राहें येथें ॥३६॥
मग भोजनविधि सारिला ॥ उदयीक अतिथी स्वदेशीं गेला ॥ ब्राह्मणही चालिन्नला ॥ नागाव्हयनगरासी ॥३७॥
अनेक देश नगरें क्रमोनी ॥ पावला तयाचिये स्थानीं ॥ माध्यान्हकाळीं जावोनी ॥ राहिला उभा ॥३८॥
त्यासी देखोनियां नयनीं ॥ त्या पद्मनागाची कामिनी ॥ सुलक्षणी पूजा घेवोनी ॥ आली बाहेरी ॥३९॥
अर्घ्यपाद्यदिकीं पूजिलें ॥ स्वागतांतीं कारण पुसिलें ॥ द्दिज ह्मणे मन निवालें ॥ आदरें तुमचिये ॥४०॥
आतां उत्कंठा हेचि मनीं ॥ कं जे ज्याची ऐसी कामिनी ॥ तो पहावा निज नयनीं ॥ विप्रोत्तम ॥४१॥
तंव तो ह्मणे स्वामिया ॥ सूर्याचा रथ वहावया ॥ पाळी आली ते पुरवाया ॥ माझा पती गेलासे ॥४२॥
येईल दिवसां आठाआंत ॥ तोंवरी स्वामी गृहीं राहोत ॥ मी आतिथ्य करीन सत्य ॥ ऐकोनि विप्र बोलिला ॥४३॥
त्याचिये दर्शनाचें जाण ॥ मज कृत्य आहे ह्मणोन ॥ तंव परियंत मी क्रमीन ॥ गोमतीतीर ॥४४॥
पति येईल तेव्हां भामिनीं ॥ तयासि सांगावें मांडोनी ॥ आणि मज करावी जाणवणी ॥ गोमतीतीरीं ॥४५॥
ऐसें ह्मणोनि गोमतीतीरीं ॥ जावोनि राहिली निराहारी ॥ स्नानसंध्यादिक करी ॥ आरंभिलें ध्यान ॥४६॥
तंव तये विप्रालागुनी ॥ पद्मनागाचे कुटूंबी येवोनी ॥ नानापरी प्रार्थोनी ॥ ह्मणती जाहले ॥४७॥
स्वामे आमुचे कुळीं कोणी ॥ ऐसा जाहलाचि नाहीं प्राण ॥ कीं अतिथी उपवासी आणी ॥ स्वयें करी भोजन ॥४८॥
अहो आह्मासीही अत्यंत ॥ तुह्मायोगें लंघनें पडत ॥ तरी चलावें आहरार्थ ॥ आमुचे गृहीं ॥४९॥
नातरी बाळवृद्धें सहित ॥ आह्मी पीडूं तुह्मांनिमित्त ॥ तंव येरू ह्मणे समस्त ॥ ममाज्ञेनें जेवा तुह्मी ॥५०॥
मी ऋषीची आठ दिन ॥ पर्यंत वाट पाहीन ॥ पाठीं भोजन करीन ॥ तुह्मीं वृथा न कष्टावें ॥५१॥
ऐसी आज्ञा देवोनि त्यांसी ॥ विप्रें पाठविले गृहासी ॥ तंव सूर्य पामकिलें नागासी ॥ मर्यादा जालिया ॥५२॥
नाग स्वगृही पोंचला ॥ स्त्रियेनें उपचारीं पूजिला ॥ येरू तयेसि बोलिला ॥ सुखी आहेस कीं ॥५३॥
अतिथी देवपुजादि भले ॥ यथापूर्व चालविलें ॥ आळस नाहीं कीं केलें ॥ सूखासक्तत्वें ॥५४॥
नागिणी ह्मणे प्राणनाथा ॥ पतिवाक्य मान्य पतिव्रतां ॥ तुमचें व्रत म्यां चालवितां ॥ केला नाहीं आळस ॥५५॥
परंतु येक ब्राह्मण पाहीं ॥ आला होता आपुले गृहीं ॥ तो ह्मणे कोणे ठायीं ॥ आहे पद्मनाग ॥५६॥
न सांगेचि कार्य कारण ॥ गोमतीये उपवास करून ॥ करीत वेदपाठ ध्यान ॥ बैसलासे ॥५७॥
तुमचें दर्शनीं अत्यंत ॥ तो अपेक्षा असे करित ॥ तंव नाग ह्मणे दर्शनार्थ ॥ आला माझिये ॥५८॥
तो देव कीं मनुष्य असे ॥ हें निश्चयें कळे कैसें ॥ आह्मालागीं तापसी मनुष्यें ॥ देखूं न इच्छिती ॥५९॥
तेजोभरें पूर्ण आपण ॥ असेल जरी जाज्वल्यमान ॥ जरी देव असेल तरी जाण ॥ येईल आपसयांची ॥६०॥
ह्मणोनि तेथ काय जाणें ॥ यावरी नागिणी पतीसि ह्मणे ॥ तो द्दिज जितेंद्रियमनें ॥ क्रोधरहित म्यां देखिला ॥६१॥
आणि तुमचिया दर्शनार्थ ॥ थोर असे उत्कंठित ॥ तरी जावोनि आणावें त्वरित ॥ तया स्वागत करोनी ॥६२॥
जे कोणी आर्श करून ॥ आपलें घरीं पावले ब्राह्मण ॥ त्यांचें न करितां समाधान ॥ गर्भहत्यापाप होय ॥६३॥
यास्तव त्या द्दिजाची स्वामी ॥ आशा पुरवावीचि तुह्मी ॥ हें ऐकोनि गेला ऊर्मीं ॥ नाग गोमतीये ॥६४॥
त्यासी साष्टांगें वंदोन ॥ कुशळवाक्यें पुसोन ॥ ह्मणे स्वामी काय कारण ॥ येथ यावयाचें ॥६५॥
तंव येरू बोले वचन ॥ मी धर्मारण्य नामें ब्राह्मण ॥ पद्मनाग भेटावा ह्मणोन ॥ येथें असें पातलों ॥६६॥
कुळंबी पर्जन्याची जैसी ॥ वाट पाहे मी पाहतों तैसी ॥ तंव नाग ह्मणे परियेसीं ॥ तोचि मी तुझा किंकर ॥६७॥
मज आज्ञा कीजे सत्य ॥ जैं असेल मनोगत ॥ सूर्यलोकाहूनि आलों येथ ॥ तंव कथिलें पत्नीनें ॥६८॥
कीं द्दीज आलासे दर्शनार्थ ॥ मग तैसाचि आलों येथ ॥ तुझा पूर्ण कीजे मनोरथ ॥ याहूनि भाग्य कोणतें ॥६९॥
मग ब्राह्मण ह्मणे तया ॥ मी द्रव्यादि मागावया ॥ नाहीं आलों स्वामिया किंचिदपि ॥७०॥
शब्द दोनी उपदेश ॥ आलों असे पुसावयास ॥ तुमचा गुणग्राम प्रकाश ॥ चंद्रकिरणां समान ॥७१॥
आत्मनिष्ठ धर्म परायण ॥ ऐकिल अससी ह्मणोन ॥ कांहीं अंतरींचें वचन ॥ पुसणें असे ॥७२॥
आणि तुं ह्मणतोसि वचनीं ॥ कीं आलों सूर्यरथांहूनी ॥ तरी आश्चर्य दृष्ट नयनीं ॥ सांगें कांहीं तेथीचें ॥७३॥
हें ऐकोनि नाग ह्मणत ॥ सूर्यमूर्ती तेजोवंत ॥ आश्वर्यमयचि समस्त ॥ आहे जाण ॥७४॥
जो जलाची वृष्टी करितो ॥ सर्व रसांतें शोषितो ॥ आणि उदयमात्रें नाशितो ॥ सर्वाधकारा ॥७५॥
ब्रह्मा विष्णु त्रिनयन ॥ या तिहीं देवांचें स्थान ॥ तेथ आश्चर्य काय कवण ॥ पहावें गा ॥७६॥
ऐसें असतांहीं सम्यक ॥ आश्चर्य वर्तलें आइक ॥ विमान देखिलें आह्मी येक ॥ सुर्यरथामध्यें ॥७७॥
परवां माध्यान्हाचे समयीं ॥ सुर्य आपुले किरणीं पाहीं ॥ हें ब्रह्मांड सकळही ॥ तापवित असतां ॥७८॥
द्दितीयसूर्यवत प्रकाश ॥ आमुचे दृष्टी पडिला विशेष ॥ तेणें प्रकाशें आकाश ॥ जाहलें द्दिसूर्यवत ॥७९॥
ऐसें नाम नकळे देख ॥ कीं जो सूर्य असे आणिक ॥ मग तो वेगें आला सन्मुख ॥ आमुचे सूर्या ॥८०॥
ऐसा रथाजवळी भला ॥ तो तेजप्रकश पातला ॥ तया सूर्यें उचलूं मांडिला ॥ दोनी हातें ॥८१॥
सूर्यें आपुले दक्षिणहाता ॥ देवोनि तया रथीं घेतां ॥ मंडळीं सूर्यरूपीं तत्वतां ॥ मिळोनि गेला साकल्यें ॥८२॥
जेव्हां रथावरी वहिला ॥ तो तेजपुंज येवोनि बैसला ॥ तैं आह्मां संदेह वर्तला ॥ कीं सूर्य तो कवण ॥८३॥
ऐसें दोघां ऐक्य होतां ॥ आह्मासि पुढें पुढें जातां ॥ पुसिलें संदेहनिवृत्यर्था ॥ दिवाकरासी ॥८४॥
स्वामी हें काय कवण ॥ तंव बोलिला सूर्यनारायण ॥ कीं हा उच्छवृत्ती ब्राह्मण ॥ फळमुळापर्णाहारी ॥८५॥
वायु अथवा जीवन ॥ समयीं प्राप्त भक्षी अन्न ॥ ऐसें येणें तप दारूण ॥ केलें असे ॥८६॥
वासना कामना कांहीं ॥ येणें धरिलीचि नाहीं ॥ यातें देवगंधर्वादिही ॥ न शकती पराभवूं ॥८७॥
ऐसा हा योगी अपूर्व ॥ पूण्यशीळ शांत स्वभाव ॥ उंछवृत्तीनेंचि प्रभाव ॥ पावला ऐसा ॥८८॥
ऐसें नागराजें भलें ॥ सूर्यलोकींचें चरित्र कथिलें ॥ तें ऐकोनि नमन केलें ॥ द्दिजें नागराजासी ॥८९॥
ह्मणे तुं देवरूपी कोणी ॥ जें पुसणें होतेम मममनीं ॥ त्याचेंचि आश्चर्यगोष्टी करोनी ॥ केलें उत्तर ॥९०॥
आतां आज्ञा द्यावी यथार्थ ॥ तुझेनि जाहलों कृतार्थ ॥ मी आलों ज्या निमित्त ॥ तें सिद्ध जाहलें ॥९१॥
तरी आपणही अतःपर ॥ करुं उंछवृत्तीअंगिकार ॥ ऐसें ह्मणोनि तो शीघ्र ॥ गेला स्वगृहीं ॥९२॥
उंछवृत्ति अंगिकारिली ॥ तया मोक्षप्राप्ती जाहली ॥ नागें बिजें केलें तत्काळीं ॥ स्वगृहासी ॥९३॥
भीष्म ह्मणे कुंतीसुता ॥ हे उंछवृत्तीची कथा ॥ भार्गव जाहला सांगता ॥ नारदासी ॥९४॥
ते इंद्रसभे नारदें ॥ इंद्रासि कथिली विनोदें ॥ इंद्रे कथिली आनंदें ॥ सकळ देवांसी ॥९५॥
मज आणि परशुरामसी ॥ युद्ध होता आवेशीं ॥ तैं वसूंहीं आह्मासी ॥ सांगीतली कथा हे ॥९६॥
ह्मणोनियां गा तुवां भला ॥ मजसी परम धर्म पुसिला ॥ तो ऐसा हा सांगितला ॥ संक्षेपवचनें ॥९७॥
येणेंचि करोनि अंतीं ॥ होय मोक्षरूप प्राप्ती ॥ हे मोक्षधर्मीची विप्तत्ती ॥ शांतिपर्वीं ॥९८॥
वैशंपायन ह्मणती भारता ॥ या शांतिपर्वीच्या कथा ॥ कथिल्या उद्धरोनि समस्ता ॥ सारसार ॥९९॥
राजधर्म आपद्धर्म ॥ तिसरें खंड मोक्षधर्म ॥ तुज सांगीतलें उत्तम ॥ संकलोनी ॥१००॥
ऐकें मोक्षधर्मवृत्तांत ॥ पहिलेन सेनजितगीता ॥ पितृपुत्रसंवाद तथा ॥ गीता श्यामाका ॥१॥
प्रल्हादजनक संवाद ॥ सृगाल काश्य विविध ॥ संवाद आचार विधिशुद्ध ॥ अध्यात्म जाण ॥२॥
मनकोपाख्यान सिद्ध ॥ इंदुबृहस्पतिसंवाद ॥ सर्वभूतोत्पत्ति प्रसिद्ध ॥ दिशा स्वस्तिकें ॥३॥
अमृतप्राप्तिक प्रसिद्ध ॥ शक्रप्रल्हाद संवाद ॥ जैगीषव्यासितप्रबोध ॥ अनुक्रमेंसीं ॥४॥
नारदौग्रसेनसंवाद ॥ शुकानुप्रश्न प्रसिद्ध ॥ मृत्यु प्रजापति संवाद ॥ धर्मलक्षणीं ॥५॥
तथा पितृपुत्रसंवाद ॥ हारीतगीता वृत्रवध ॥ वृत्रगीता दक्षशब्द ॥ महेशस्तवन ॥६॥
जनकानुशासन शुद्ध ॥ जनकयाज्ञवल्क्यसंवाद ॥ सुलभायोगिनीसंवाद ॥ जनकरायासी ॥७॥
नरनारायणीय जाण ॥ उंछवृत्युपाख्यान ॥ इत्यादि शतवृत्तांत प्रमाण ॥ मोक्षधमीं ॥८॥
यामाजी सारसार ॥ संकलिलेंसे समग्र ॥ ग्रंथ विस्तारेल थोर ॥ ह्मणोनियां ॥९॥
आतां जनमेजयाप्रती ॥ पुढील पर्व परमप्रीतीं ॥ सांगेल वैशंपायन विप्तत्ती ॥ आनुशासिक ॥११०॥
तेथ सावधान होउनी ॥ आइकावें श्रोताजनीं ॥ समस्तां करितसे विनवणी ॥ कविमधुकर ॥११॥
इति श्रीकथाकल्पतरू ॥ त्रयोदशस्तबक मनोहरू ॥ उंछवृत्युपाख्यानप्रकारू ॥ द्दाविंशाध्यायीं कथियेला ॥११२॥
॥ श्रीगोपालकृष्णर्पणमस्तु ॥ ॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥