॥ श्रीगणेशाय नमः ॥
रायासि ह्मणे वैशंपायन ॥ ऐकें राया सावधान ॥ शांतिपर्वींचें आख्यान ॥ आपद्धर्मीं ॥१॥
कथांतरीं खड्गकुशळ ॥ भीष्मातें पुसे नकुळ ॥ कीं खड्गाहूनि दुजें सवळ ॥ आयुध नाहीं ॥२॥
धनुष्य अश्र्व क्षीण असतां ॥ वीर खड्गेंसि उभा राहतां ॥ धनुष्य गदा शक्ति धर्ता ॥ त्यातें खड्गधारी निवारी ॥३॥
तो खड्ग कोणें किमर्थ ॥ कैसा उपजविला सांगें सत्य ॥ तंव भीष्मदेव ह्मणत ॥ ऐकें नकुळा ॥४॥
पूर्वी एकार्णव जें होतें ॥ तें काहींचि नवतें तेथें ॥ मग जन्म जाहलें ब्रह्मयातें ॥ नाभिपद्मी विष्णुचे ॥५॥
तेणें निर्मिलें सृष्टीसी ॥ मरिचिमुख्य सप्त ऋषी ॥ पुढें साठ कन्या दक्षासी ॥ जाहल्या देखा ॥६॥
त्यांहीं देवर्षि गंधर्व राजे ॥ अप्सरा किंबहूना जारजें ॥ अंडज स्वेदज उद्गिज्ज्यें ॥ स्त्रजिंलें स्थावरजंगम ॥७॥
तेथ देवऋषी पितर ॥ जंगम आणि स्थावर ॥ ब्रह्मयाचिये आज्ञें समग्र ॥ धर्ममार्गीं राहिले ॥८॥
पुढें हिरण्यकशिपु हिरण्याक्ष ॥ विरोचन शंभरादि प्रमुख ॥ उद्भवले नुमची प्रभृतिक ॥ दैत्यगणयुक्त ॥९॥
त्यांहीं धर्ममर्यादा सांडोनी देवां ऋषीश्वरां विरोधानी ॥ प्रजा प्राणियांतें दंडोनी ॥ दुःख देवों लागले ॥१०॥
मग देव ब्रह्मऋषी मिळाले ॥ हिमाचळश्रृंगीं गेले ॥ तें शतयोजन विस्तार्ण भलें ॥ पत्रपुष्पफळीं युक्त ॥११॥
तेथ ब्रह्मा यज्ञकुशळ ॥ सवें दिवऋषी सकळ ॥ स्वर्णपात्रादि घेवोनि सकळ ॥ यज्ञ आरंभिता जाहला ॥१२॥
तंव अग्निज्वाळेंतूनीं ॥ जैसा चंद्र उगवे गगनीं ॥ तैसें भूत येक तत्क्षणीं ॥ निघालें भयंकर ॥१३॥
नीलोत्पदलदल समान ॥ कृशोदर दंत तीक्ष्ण ॥ अति उंच दैदीप्तमान ॥ उदले अद्भुत ॥१४॥
तेव्हां समुद्र डहूळले ॥ उल्कांपात थोर जाहले ॥ सकळ ब्रह्मांड कांपिन्नलें ॥ व्यामोहलें भूतजात ॥१५॥
तो खड्गरूप देखिला ॥ मग ब्रह्मा बोलता जाहला ॥ कीं हा खड्ग देवें उपजविला ॥ लोकरक्षणार्थ ॥१६॥
तरी देव हो अवधारा ॥ येणें संहार होईल असुरां ॥ मग तो काळांत तीक्ष्णधारा ॥ दीधला सकळीं रुद्रासी ॥१७॥
तो काळाग्निसमान ॥ रुद्रें चहूंहती धरून ॥ स्वयें विक्राळरूप धरून ॥ केला सिंहानाद ॥१८॥
तें ऐकोनिक दैत्य आले ॥ पाषाण आयुधीं वर्षले ॥ रुद्रें खड्गप्रहारें मारिलों ॥ कित्येकांसी ॥१९॥
कित्येक छिन्नभिन्न जाहले ॥ दशादिशांतें पळाले ॥ एक पाताळविवरीं गेले रक्तें नद्या वाहतीं ॥२०॥
ऐसें दानवां निवटोनी ॥ शिव जाहला शूळपाणी ॥ तो स्तविला देवगणीं ॥ जयजयकारें ॥२१॥
मग तें खड्ग कैलासनाथें ॥ सत्कारें दीधलें विष्णूतें ॥ तेणें वोपिलें मरीचीतें ॥ ऋषीश्वरासी ॥२२॥
तेणें ऋषीश्वरें इंद्रातें ॥ इंद्रे दीधलें लोकपाळातें ॥ त्याहीं देवोनि मनुरायातें ॥ बोलिले देखा ॥२३॥
अगा मनुराया अवधारीं ॥ तूं धर्ममार्गें निरंतरीं ॥ प्रजांचा प्रतिपाळ करीं ॥ निवटोनि शत्रु ॥२४॥
पुढें तो खड्ग अवधारा ॥ मनुपासोनि परंपरा ॥ हातीं आला नृपवरां ॥ अनुक्रमेंसीं ॥२५॥
मनु क्षुप पुरूरवा वीर ॥ भरत दौष्कर धुंधुमार ॥ कांबोज मुचकुंद नृपवर ॥ रैवत मरुत ॥२६॥
यौवनाश्व रघु हरिणाश्व ॥ शुन कंठशीर अपूर्व ॥ शिबि प्रतर्दन पृषदश्व ॥ भारद्वाज कृप देखा ॥२७॥
पूर्वपूर्वोत्तरोत्तरंतें ॥ देते जाहले त्या खड्गतें ॥ शेवटें लाधलें पांचा तूह्मातेम ॥ कृपाचार्यापासोनी ॥२८॥
त्या खड्गांचें कृत्तिका नक्षत्र ॥ अग्नि देवता द्रुहिण गोत्र ॥ रुद्र गुरु बीजमंत्र ॥ हनुमंतादी ॥२९॥
त्याचीं आठ नांवें गुप्त असती ॥ तिये तुज सागेन प्रीतीं ॥ जेणें संग्रामीं जयकीर्तीं ॥ धर्म पाविजे ॥३०॥
श्लोकः ॥ असिर्विशसनः खड्गस्तीक्ष्णधारो दुरासदः ॥ भीगभों विजयश्वैव धर्मपालस्तथैवच ॥१॥
ऐसा सर्वशास्त्रा आंतु ॥ खड्ग उत्कृष्ट असे बहुतु ॥ धनुष्य उपजविता जाहला पृथु ॥ पृथ्वी केली समान ॥३१॥
ह्मणोनि ज्ञानियें खड्गपूजा ॥ करावीचि रायें वोजा ॥ ऐसें हें ऐक तां राजा ॥ पावे कीर्तिसुख ॥३२॥
यापरी हे खड्गोप्तत्ती ॥ भीष्में कथिली नकुळाप्रती ॥ तंव प्रीतीं विदुराप्रती ॥ धर्म पुसता जाहला ॥३३॥
ह्मणे जी धर्म काम ॥ ययांमाजी कोण उत्तम ॥ तंव विदुर ह्मणे धर्म ॥ उत्तम सर्वात ॥३४॥
अर्थ मध्यम काम न्यूंन ॥ आतां पुरुषांच्या ठायीं जाण ॥ जे असावे मुख्य गुण ॥ ते सांगतों ऐक ॥३५॥
बहुश्रुत तपस्त्याग क्रिया ॥ श्रद्धा क्षमा भाव शुद्धी दया ॥ सत्य संयम इतुक्या ठायां ॥ मन चंचळ नसावें ॥३६॥
ह्मणोनि धर्म तो अपूर्व ॥ धर्माचिया पासाव ॥ वृद्धीप्रति पावले सर्व ॥ ऐसें विदुर बोलिला ॥३७॥
तंव बोलिला वीर पार्थ ॥ सर्वोत्तम जाणिजेज अर्थ ॥ अर्थें जोडती सर्व पदार्थ ॥ प्राणियासीं ॥३८॥
कृषि गोरक्ष्य वाणिज्य जाण ॥ अनेककला विद्या पूर्ण ॥ धर्मकामही संपन्न ॥ अर्थे होती ॥३९॥
अर्थे टळती सर्वापत्ती ॥ जटिल मुंडी विद्दांस यती ॥ आस्तिक नास्तिकही इच्छिती ॥ अर्थाचि लागीं ॥४०॥
तो मार्गी लावी सेवकातें ॥ दंडी सर्व वैरियांतें ॥ ऐसें सामर्थ्य अर्थार्थें ॥ पाविजे सदैव ॥४१॥
मग नकुळ सहदेव बोलिले ॥ कीं धर्म अर्थ दोन्ही भले ॥ परि अर्थापरिस देखिलें ॥ धर्मी उत्तमत्व ॥४२॥
भक्ति भजन ध्यान ॥ अंगकष्टें तपसाधन ॥ करितां धर्म निष्पन्न ॥ होय सफळ ॥४३॥
तया धर्मापासाव अर्थ ॥ अदृष्टणें होती प्राप्त ॥ मग कामादिक समस्त ॥ सहजचि आले ॥४४॥
तंव भीम ह्मणे तयांतें ॥ कामावांचोनि धर्मार्थांतें ॥ कोणी इच्छित नाहीं निरुतें ॥ श्रेष्ठ असे कामाची ॥४५॥
कामें तप धारणा ध्यान ॥ अनेक व्यापार अध्ययन ॥ समुद्रादि उदक तरण ॥ होय कामें करोनी ॥४६॥
जैसें तरी दहिंया आंत ॥ लोणी आणि दुजें घृत ॥ तैसे सर्व धर्म अर्थ ॥ असती कामामाजी ॥४७॥
तस्मात् भले जे उत्तम ॥ त्यांहीं धर्मअर्थ परम ॥ जोडावें परि काम उत्तम ॥ तिघांमाजी ॥४८॥
तदुपरि मुहूर्त परियंत ॥ बंधुवचनाचा जाणोनि अर्थ ॥ विचारोनियां मनांत ॥ बोलिला धर्म ॥४९॥
ह्मणे सर्वांचिया पैक्षां ॥ उत्तमत्व असे मोक्षा ॥ त्यावीण आणिक प्रत्यक्षा ॥ दिसत नाहीं ॥५०॥
ज्यांचें मन पापपुण्य ॥ अर्थधर्मकामांपासोन ॥ मुक्त आणि लोष्टकांचन ॥ समान जयांसी ॥५१॥
ते धन्यपुरुष महंत ॥ ऐसें ऐकोनि धर्मोक्त ॥ राजे ऋषि प्रशंसित ॥ युधिष्ठरासी ॥५२॥
यावरी धर्म पुसे भीष्मासी ॥ कीं आपत्तिकाळीं कोणासी ॥ प्रीति कीजे न कीजे त्यासी ॥ सांगिजे मज ॥५३॥
आणि आपत्ति कंठितां पाहीं ॥ जैं धनसोइरे कोणी नाहीं ॥ तैं कामा येती कोण तेंही ॥ सांगावे मज ॥५४॥
मग भीष्म ह्मणे अवधारी ॥ मूर्ख क्षुद्र पापाचारी ॥ लोभी क्रूर दीर्घसूत्री ॥ सर्वशंकी अधर्मी ॥५५॥
गुरुदाराभिगामी नास्तिक ॥ व्यसन नसंडी वेदनिंदक ॥ कुटिल दुरात्मा निर्लज्ज्य देख ॥ सर्वत्र पापदृष्टी ॥५६॥
मत्सरी मित्रविरोधकारी ॥ सोइरेयांतें वक्र निहारी ॥ अल्पअपराधींही करी ॥ क्रोध मोठा ॥५७॥
कार्यापुरती मैत्री धरी ॥ सेवाधर्में अपकार करी ॥ इत्यादिकांसी सुज्ञें मैत्रीं ॥ आपत्तिकाळींही करूं नये ॥५८॥
आतां ऐकें मैत्रिकरण ॥ कुळीण वृद्धवाक्यसंपन्न ॥ कुशळ जाणे ज्ञानविज्ञान ॥ रूपगूणयुक्त ॥५९॥
निर्दोष प्रसिद्ध व्यायामशीळ ॥ केले उपकार जाणीं प्रेमळ ॥ जाणे काळ अकाळ ॥ वैराग्यसंपन्न ॥६०॥
कनककांतेचिये ठायीं ॥ जया विकार नुपरे कहीं ॥ दंभ अहंकार नाहीं ॥ स्वामिकार्यतप्तर ॥६१॥
ऐसियासीं करितां मैत्री ॥ त्याची चंद्रज्योत्स्नेपरी ॥ कीर्ति विस्तारे सर्वत्रीं ॥ सुखप्राप्ती सहजेंची ॥६२॥
परि जो सांगितला दोषी ॥ त्याहीरपरिस कृतघ्न घातकी ॥ दुराचारी पातकी ॥ टाकिजे सर्वथा ॥६३॥
तंव धर्म विनवी सद्भावें ॥ कृतघ्न मित्रद्रोही सांगावे ॥ यावरी इतिहास भीष्मदेवें ॥ सांगो आरंभिला ॥६४॥
उत्तरदिशे म्लेच्छदेशीं ॥ कोणीएक ब्राह्मण देशी ॥ वेदवर्जित भिक्षेसी ॥ गेला ग्रामीं चोरंचें ॥६५॥
तेथ होता एक ब्राह्मण ॥ तो तस्कर परि धनपूर्ण ॥ वर्णविशिष्टातें जाणोन ॥ दानालागीं करीतसे ॥६६॥
त्याचे घरीं भिक्षा मागीतली ॥ मग तेणें तये वेळीं ॥ वार्षिकभिक्षा वस्त्रें दीधलीं ॥ केला आश्रय ॥६७॥
एकी भ्रताररहिता नारी ॥ दीधली त्यासी सुंदरी ॥ मग हर्षित त्याच्या घरीं ॥ राहिला तो स्त्रीसहित ॥६८॥
तो गौतमनामक ब्राह्मण ॥ कुंटुबार्थ करी प्रयत्न ॥ वर्ष एक धनुर्बाण घेउन ॥ अभ्यासिली विद्या ॥६९॥
मग दासीकुटुंबानिमित्त ॥ वनचरें मारी वनांत ॥ चोरसंगतीं सतत ॥ जाहला तत्समान ॥७०॥
ऐसें बहुत काळ असतां ॥ सुखें वर्तें हिंसा करितां ॥ तंव ब्राह्मण आला अवचिता ॥ सखा त्याचा पूर्वील ॥७१॥
तो जटिली चीराजिनधर ॥ ब्रह्माचारी परमपवित्र ॥ वेदपारंगत परिकर ॥ आला त्याचिये घरीं ॥७२॥
शूद्रान्नपरिवर्जक भला ॥ तेणें गौतम देखिला ॥ धनुर्धारी रक्तें माखला ॥ महाहिंसक ॥७३॥
मग ब्रह्मचारी ब्राह्मण ॥ तयाप्रति बोलिला वचन ॥ तुं मध्यदेशीय कुळीण ॥ भला गौतमा ॥७४॥
तरी टाकोनि आचारस्थिती ॥ काय घेतली अधमवृत्ती ॥ येरू ह्मणे तयाप्रती ॥ कीं मी निर्धन मूर्ख ॥७५॥
वित्तार्थ येथें आलों पाहीं ॥ परि तुज देखोनि कृतार्थ सही ॥ तरी आज येथें राहीं ॥ उदयीक येतों तुजसवें ॥७६॥
ऐसा नानापरी प्रार्थिला ॥ येरू अन्नोदक न घेतां राहिला ॥ परि अमंगळपणें त्रासला ॥ निघोनि गेला सूर्योदयीं ॥७७॥
तें गौतमें जाणोनी ॥ आपणही निघाला तत्क्षणीं ॥ उद्ममी जात ॥ सिंधूस्थानीं ॥ तयासवें चालिला ॥७८॥
मनीं ह्मणे यासी मारूं ॥ मग याचा द्रव्यार्थ हरूं ॥ ऐसे जातजातां गिरिवरू ॥ पावले दोघे ॥७९॥
तंव मत्तगज उठावला ॥ तेणें तो उद्ममी मारिला ॥ येरू भीतीनें पळाला ॥ खेदखिन्न ॥८०॥
मग समुद्राभिमुख जातां ॥ एक वन जाहला पावता ॥ जया नंदनवनाची साम्यता ॥ वृक्षलता नानाविध ॥८१॥
तेथें चित्रविचित्र पक्षी ॥ बोलताती वृक्षोवृक्षीं ॥ जंव उत्तरोत्तर अवेक्षी ॥ तंव वट एक देखिला ॥८२॥
तो स्वर्गप्राय विस्तीर्ण ॥ फळींपत्रीं शोभायमान ॥ दिव्यपुष्पाचें आंथरूण ॥ तयाखालीं ॥८३॥
चंदनादिपरिमळीं युक्त ॥ देखोनि संतोषला बहुत ॥ तेथ निजेला तंव अस्तंगत ॥ जाहला भानु ॥८४॥
इतुक्यांत ब्रह्मलोकापासोन ॥ कश्यपऋषीचा नंदन ॥ तेथें आला श्र्वेतवर्णाराजधर्मा नावें ॥८५॥
तो आला देवकन्यायुक्त ॥ दिव्याभरण शोभित ॥ तया देखोनि विस्मित ॥ गौतम जाहला ॥८६॥
असे क्षूत्पिपासापीडित ॥ हिंसार्थी त्याकडे पाहत ॥ तंव राजधर्मा ह्माणत ॥ गौतमासी ॥८७॥
अगा तूं सायंकाळीं आह्मासी ॥ प्रिय अतिथी भेटलासी ॥ तरी तवाआतिथ्य परियेसीं ॥ करीन येथोक्त ॥८८॥
मग तयासी आसन दीधलें ॥ दिव्यपुष्पमाळें पूजिलें ॥ भक्ष्यमोज्य समर्पिलें ॥ नानाविध ॥८९॥
भोजनोत्तर आपुलेनी ॥ पांखांचिये विंजणेनी ॥ त्याचे श्रम दुरी करोनी ॥ पुसता जाहला ॥९०॥
ब्राह्मणा नांव सांगा आपुलें ॥ येथ किमर्थ येणें जाहलें ॥ तंव गौतमें ह्मणितलें ॥ मी असे दरिद्री ॥९१॥
यावरी पक्षिराज ह्मणत ॥ मी ऐसा प्रयत्न करीन सत्य ॥ जेणें होसील अर्थवंत ॥ काहीं चिंता न कीजे ॥९२॥
मग ह्मणे उद्इक ॥ येथोनि तीनीगांवें देख ॥ विरूपाक्ष नामें येक ॥ असे राक्षसराजा ॥९३॥
तो मित्र असे माझा ॥ माझिये वचनें तुज द्दिजा ॥ इच्छितार्थ देईल वोजा ॥ येथ संदेह नाहीं ॥९४॥
ऐसें ऐकोनियां त्वरित ॥ चंदनागरवनाआंत ॥ गेला अमृतफळें भक्षित ॥ विरूपाक्षनगरीं ॥९५॥
तेथें द्दारपाळा श्रुत केलें ॥ येरें रायासि जाणविलें ॥ कीं प्रिय अतिथीसि पाठविलें ॥ राजधर्में तुह्मांकडे ॥९६॥
तंव तो ह्मणे आणा शीघ्र ॥ मग येरू पाहात चालिला नगर ॥ सवें गेला वेगवत्तर ॥ विरूपाक्षाजवळी ॥९७॥
रायें स्वागत आतिथ्य केलें ॥ नामगोत्र स्थान पुसिलें ॥ ब्राह्मणें मग ह्माणीतलें ॥ कीं मी द्दिज मध्यदेशी ॥९८॥
मी भिल्लवनाआंत ॥ असतों शूद्र स्त्रीयुक्त ॥ वेदमार्ग विवर्जित ॥ नेणें गोत्रोच्चारु ॥९९॥
मग तो ब्राह्मण जातिमात्र ॥ जाणोनि विरुपाक्ष करी विचार ॥ ह्मणे राजधर्मा सुमित्र ॥ तेणें अतिथी पाठविला ॥१००॥
तरी प्रिय करूं यासी ॥ आज कार्तिकी पौर्णिमेसी ॥ सहस्त्रयेका ब्राह्मणांसी ॥ होईल भोजन ॥१॥
त्यासवें यासी जेववुनी ॥ पाठवूं बहुत धन देउनी ॥ मग ब्राह्मण तिये दिनीं ॥ सहस्त्र येक पाचारिले ॥२॥
त्यासी विधियुक्त पूजोनी ॥ सूवर्णपात्रीं दिव्यान्नीं ॥ मधुमांस भोजन देवोनी ॥ रत्नराशी दीधल्या ॥३॥
वस्त्रालंकार दीधले ॥ मग विरूपाक्ष बोले ॥ दिवस आहे तंव वहिलें ॥ जावें आपुलें स्थानीं ॥४॥
रात्रीं उपद्रविती निशाचर ॥ हें ऐकोनि ते द्दिजवर ॥ आपुलाले ॥ स्थानीं शीघ्र ॥ गेले धनरत्नें घेवोनी ॥५॥
तो प्रत्यहीं बरव्यापरी ॥ सहस्त्रभोजनातें करीं ॥ परि कार्तिकीसि परिकरीं ॥ खचीं रत्नालंकार ॥६॥
असो हें तो गौतमाविप्र ॥ त्या ब्राह्मणासवें शीघ्र ॥ घेवोनि गेला रत्नभार ॥ पूर्व वटाखालीं ॥७॥
व्यग्रचित्तें बैसला ॥ तंव पक्षिराज जवळी आला ॥ पूर्वप्रकारीं पूजिला ॥ निवविला पक्षवातें ॥८॥
गौतम मनीं विचारी ॥ कीं मज जाणें आतां दूरी ॥ मार्गीं नाहीं कांहीं शिदोरी ॥ भक्षिजे ऐसी ॥९॥
आणि रत्नहेमभार ॥ हा तंव घेतलासे फार ॥ तरी मारूनि हा पक्षिवर ॥ करूं मांसशिदोरी ॥११०॥
ऐसें विचारिलें गुप्त ॥ तंव राजधर्मे त्वरित ॥ शीत वायु निवारणार्थ ॥ जगरें थोर केलेंस ॥११॥
पक्षी विश्वास पावला ॥ ह्मणोनि तयापाशीं निजेला ॥ येरें पक्षहाणोनि मारिला ॥ जळते कोलितें ॥१२॥
मग पांख रोम दूरी करोनी ॥ त्यासी अग्निमध्यें भाजोनी ॥ शिदोरी पालवीं बांधोनी ॥ चालिला शीघ्र ॥१३॥
येरीकडे दुसरे दिवशीं ॥ विरूपाक्ष ह्मणे पुत्रासी ॥ कारें राजधर्मा पक्षी ॥ दिसत नाहीं ॥१४॥
तो प्रत्यहीं येवोनियां ॥ माझें दर्शन घेवोनियां ॥ जाय प्रणाम करूनियां ॥ ब्रह्मया जवळी ॥१५॥
आजि दोनी दिवस जाहले ॥ तेणें नाहीं बिजें केलें ॥ झणीं असेल मारिलें ॥ मूर्खें द्दिजें तयासी ॥१६॥
ऐसी शंका उपजले ॥ तरी गिंवसावें तयातें ॥ येरू राक्षसां सांगातें ॥ निघाला शीघ्र ॥१७॥
राजधर्माचे वटीं आला॥ तेथ पिसें देखता जाहला ॥ मग रुदन करूं लागला विरूपाक्षपुत्र ॥१८॥
यावरी गौतमविप्रातें ॥ तेणें शीघ्र धरावयातें ॥ पाठविलें राक्षसातें ॥ दाहीदिशां ॥१९॥
त्याहीं जवळचि देखिला ॥ मग विप्र धरूनि आणिला ॥ झाडा घेती तंव देखिला ॥ राजधर्म पल्लवीं ॥२०॥
सकळ त्यातें घेवोनि चालिले ॥ मेरूव्रजनगरीं आले ॥ विरूपाक्षा दाखविलें ॥ कृतघ्नत्व तयाचें ॥२१॥
मग विरूपाक्ष कुटुंबेसीं ॥ शोक करूनि ह्मणे पुत्रासी ॥ अरे मारूनि या कृतघ्नासी ॥ देयीं भोजन राक्षसां ॥२२॥
मग पुत्र राक्षसांसि ह्मणे ॥ याचें मांस तुह्मीं भक्षणें ॥ परि तो ह्मणती येणें ॥ केलें असे कृतघ्नत्व ॥२३॥
तरी आह्मी न भक्षूं यासी ॥ याचें मांस द्या चोरांसी ॥ चोरही ह्मणती पापियासी ॥ नभक्षूं आह्मी ॥२४॥
क्षुद्र कृमि कीटक पतंगही ॥ याचें मांस न खाती कहीं ॥ ह्मणोनि मग छिदिला तिहीं ॥ तिळप्राय ॥२५॥
॥श्लोकः ॥ ब्रह्मघ्ने च सुरापे च चौरे भग्नव्रते तथा ॥ निष्कृतिर्विहिता राजन् कृतघ्ने नास्ति निष्कृतिः ॥१॥
मग विरुपाक्षें चिता करूनी ॥ जाळीलें राजधर्म्या लागुनी ॥ यथोक्त प्रकारें करूनी ॥ केलें प्रेतकर्म ॥२६॥
तंव तत्समयींचि जाणी ॥ कामधेनु आली स्वर्गीहूनी ॥ वागोळ केला तिये स्थानीं ॥ चितेवरी ॥२७॥
तो दुग्धमिश्रित फेन ॥ चितेवरी पडतां जाण ॥ तेणें जीवित्व पावोन ॥ उठिला पक्षिरावो ॥२८॥
तंव इंद्रही तेथ आला ॥ ह्मणे दैवें पक्षीं वांचला ॥ मग पूर्ववृत्तांत सांगितला ॥ विरूपाक्षासी ॥२९॥
ह्मणे कोणे एके समयीं ॥ हा राजधर्मा पक्षी पाहीं ॥ उन्मत्तपणें गेला बाहीं ॥ ब्रह्मसभेसी ॥३०॥
ह्मणोनि विधीनें शापिलें यासी ॥ कीं तूं आला नाहींस सभेसी ॥ तरी गौतमाचेनि मरसी ॥ कृतघ्न संगतीस्तव ॥३१॥
ह्मणोनि ते घडलें आतां ॥ परि हा तेणेंचि मागुता ॥ अमृत सिंचोनि सर्वथा ॥ जीवविला धेनुद्दारें ॥३३॥
येवढें कृपाकरण कीजे ॥ माझा मित्र उठविजे ॥ मग अमृत सिंचोनि ओजें ॥ जीवविला इंद्रें ॥३४॥
समस्तांसी कौतुक वाटलें ॥ आपुलाले स्थानीं गेले ॥ ब्रह्में आतिथ्यें पूजिलें ॥ राजधर्मयासी ॥३५॥
गौतम देवशापें करूनी ॥ शूद्रीच्या ठायीं येवोनि ॥ दुष्टपुत्रातें जन्मवोनी ॥ पावला मृत्य ॥३६॥
मग कृतघ्नाचे नरक ॥ तया प्राप्त जाहले अनेक ॥ हें मज नारदें कथिलें देख ॥ कृतघ्नाख्यान ॥३७॥
तें स्मरोनि तुज विशेंषीं धर्मा कथिलें संक्षेपेंसीं ॥ या कारणें कृतघ्नासी ॥ मैत्री कदा करूनयें ॥३८॥
॥ श्लोकः ॥ मित्रद्रोहो नकर्तव्यः पुरुषेण विजानता ॥ मित्रधृक् नरकं धोरं महांतं प्रति पद्मते ॥२॥
तस्मात् भल्यानें सर्वथा ॥ न कीजेचि कृतघ्नता ॥ सर्वही पापी प्रायश्चित्ता ॥ पावोनि मुक्त होताती ॥३९॥
परि कृतघ्नासी कांहीं ॥ जगीं प्रायश्चित्तचि नाहीं ॥ ह्याणोनि याचा त्याग सही ॥ सर्वदा कीजे ॥४०॥
हें आख्यान जे ऐकती ॥ त्यांच्या सर्व आपत्ती टळती ॥ भीष्में कथिलें धर्माप्रती ॥ ऐकें जन्मेजया ॥४१॥
ऐंसे हे शांतिपर्वाआंत ॥ आपद्धर्म संकलित ॥ सांगीतले असती प्राकृत ॥ भाषाबंधें ॥४२॥
आतां पुढें मोक्षधर्म ॥ धर्मरायास सांगेल भीष्म ॥ ते कथा ऐका उत्तम ॥ ह्मणे मधुकरकवी ॥४३॥
इति श्रीकथाकल्पतरू ॥ त्रयोदशस्तबक मनोहरू ॥ संगासंगकृतघ्नाख्यानप्रकारू ॥ नवमाध्यायीं कथियेला ॥१४४॥
॥ इति श्रीकथाकल्पतरौ त्रयोदशस्तबक नवमोऽध्यायः समाप्तः ॥