मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक १३|
स्तबक १३ - अध्याय ८

कथा कल्पतरू - स्तबक १३ - अध्याय ८

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

वैशंपायना ह्नणे भारत ॥ ऋषे तूं सर्वज्ञ गुणवंत ॥ तरी सांगें अग्रवृत्तांत ॥ कृपा करोनी ॥१॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ जें धर्मा सांगे गंगानंदन ॥ तें ऐकें चित्त देवोन ॥ संक्षेपतः ॥२॥

गांगेय ह्नणे धर्माकारणे ॥ ऐकें आतां सावधानें ॥ शरणागत प्रतिपाळणें ॥ हा परमधर्म ॥३॥

पूर्वील तरी शिबिप्रमुख ॥ राजे येणेंचि धर्मे देख ॥ परमसिद्धीतें अनेक ॥ पावले देखा ॥४॥

शरणागत रक्षणार्थी ॥ पुण्यात्मे तेचि झटताती ॥ पूर्वील इतिहास इये अर्थी ॥ सांगतों ऐक ॥५॥

कथा अखिलपापनाशिनी ॥ तुज सांगतों गा नृपमणी ॥ जे सांगितली भार्गवमुनीनीं ॥ राया मुकुंदासी ॥६॥

चरित्र परम पुण्यकारक ॥ तें मी तुज सांगतों ऐक ॥ पारधी होता कोणीयेक ॥ क्रूर पक्षीघातकी ॥७॥

कृष्णांग आणि रक्तनेत्र ॥ दीर्घजिव्हा महावक्त्र ॥ संबंधीं बांधवी शीघ्र ॥ टाकिला जो ॥८॥

जो सर्पवंत परियेसी ॥ उद्वेग पाववी दुसर्‍यासी ॥ तो अरण्यांत पक्षियांसी ॥ मारोनि वृत्ती चालवी ॥९॥

जाहला धर्मपराड्मुख ॥ तया वृत्ति न रुचे आणिक ॥ मग ह्नातारपणीं देख ॥ ऐसें वर्तलें येकदा ॥१०॥

जाणों प्रळयकाळवत ॥ महावात विजायुक्त ॥ मेघ वर्षला बहुत ॥ मही जाहली जळपूर्ण ॥११॥

पक्षिश्चापदें वनीं ॥ राहिलीं लीन होवोनी ॥ येरु क्षुधा सीतें पीडोनी ॥ राहिला वृक्षाखाली ॥१२॥

तेथ वनदेवतां वंदोनी ॥ शिळेवरी पानें आंथरुनी ॥ क्रमूं लागलासे रजनी ॥ महाकाष्टें ॥१३॥

परि तेणें तिये दिवशीं ॥ कपोती धरोनियां पाशीं ॥ घातली होती पांजर्‍याशीं ॥ घरीं न्यावया ॥१४॥

तिचा भ्रतार तिये रात्री ॥ त्या वृक्षाचिये शाखेवरी ॥ खोपया माजी दुःखें भारीं ॥ पावला संताप ॥१५॥

ह्नणे कीं माझी युवती ॥ पतिव्रताशीळ कपोती ॥ जियें क्षणमात्रही प्रीती ॥ नाहीं ठेविली मजवेगळी ॥१६॥

तिये वांचोनि ययार्थ ॥ मज काळ होतसे युगवत ॥ असोनि गृह कुटुंबयुक्त ॥ परि स्त्रीविण अरण्य ॥१७॥

अहो पतिव्रता नारी ॥ असे जयाच्या गृहांतरी ॥ तोचि गृहस्थ संसारीं ॥ बोलिजे धन्य ॥१८॥

असाह्य रोगादि संभूत ॥ जो महाकष्टें पीडित ॥ तया स्त्रीहूनि अन्यत ॥ भेषज नाहीं ॥१९॥

ते साह्य धर्माकारणें ॥ ऐसीं पतीचीं विलापवचनें ॥ पांजरीं ऐकिली स्वकर्णे ॥ कपोतीयें ॥२०॥

मग ते बोलिली पाशस्थित ॥ अहो धन्य माझें जीवित ॥ माझे ऐसे गुण वर्णित ॥ असे भ्रतारु ॥२१॥

पतिदैवत हें महा थोर ॥ परि जिचेनि संतोषेना भ्रतार ॥ तरी जळो तिचा संसार ॥ दुर्भाग्येचा ॥२२॥

ऐसें विचारोनि दुःखित ॥ पतीप्रति लुब्धकगृहीत ॥ पक्षिणी बोलिली तेथ ॥ मध्यरात्रीं ॥२३॥

ह्नणे जी कपोतेया स्वामी ॥ हा पारधी तुमच्या आश्रमीं ॥ क्षुधेंसीतें आर्त भूमीं ॥ निजेला असे ॥२४॥

तरी आतां तुह्मी सद्भावें ॥ या शरणागतातें वरवें ॥ आदरातिथ्य करावें ॥ त्राण करोनी ॥२५॥

जे गृहस्थ यथाशक्ती ॥ आगतांचें स्वागत करिती ॥ ते उत्तमा गती पावती ॥ अक्षय्यलोकीं ॥२६॥

माझिये देहाची येक्षणीं ॥ दया काकुळती टाकोनी ॥ धर्मागिकार करोनी ॥ पूजा यासी ॥२७॥

परोपकार करितां निश्चिती ॥ तुह्मी आणीक पावाल युवती ॥ ऐसें पंजरस्था कपोती ॥ बोलिली पतीसी ॥२८॥

मग तो तियेचें वचन ॥ धर्मयुक्त आयकोन ॥ आलिया शरण ॥ त्याचें आतिथ्य करावें ॥३०॥

ऐसें जो न करी मूर्ख ॥ त्याचे अंतरती उभय लोक ॥ हें ऐकोनि लुब्धक ॥ बोलिला त्यासी ॥३१॥

ह्नणे मज सीत बाधतें भारी ॥ तूं तयाचें निवारण करीं ॥ तंव पक्षियें चंचुवेरीं ॥ मेळविलीं शुष्कपर्णे ॥३२॥

एके ढोलरामाजी अग्नी ॥ जळत होता तेथ जावोनी ॥ आणिला तेणें चंचू धरोनी ॥ केला ताप ॥३३॥

पारधियें काया शेकिली ॥ दुःखित अंगें मोकळीं केलीं ॥ हर्षोनि ह्नणे तिये वेळीं ॥ मजसी क्षुधा बाधते ॥३४॥

तरी तियेसि निवारावें ॥ यावरी पक्षि बोले स्वभावें ॥ आह्मीं मेळवोनि भक्षावें ॥ नाहीं संग्रह स्वगृहा ॥३५॥

आतां कैसी करुं गती ॥ ह्नणोनि निदूं लागला स्ववृत्ती ॥ मग अग्नी प्रदीप्त अती ॥ करोनि ह्नणे लुब्धका ॥३६॥

म्यां अतिथीभोजनीं उत्तम ॥ पूर्वी ऐकिला आहे धर्म ॥ तरी क्षणभरी होवोनि क्षम ॥ कृपा करावी ॥३७॥

यावरी सत्वें युक्त हांसोन ॥ अग्नीतें प्रदक्षिणा तीन ॥ करोनियां तो तत्क्षण ॥ प्रवेशला भीतरीं ॥३८॥

व्याधें अग्निप्रविष्ट देखिला ॥ बहुत विलाप करुं लागला ॥ ह्नणे मज थोर अधर्म घडला ॥ ऐसें काय केलें येणें ॥३९॥

निंदूं लागला स्ववृत्तीतें ॥ कीं मज पातकिया क्षुधितातें ॥ आपुलें मांस या कपोतें ॥ दीधलें ऐसियापरी ॥४०॥

अहो अतःपर मातें ॥ तेणें उपदेशिलें निरुतें ॥ तरी सांडोनि स्त्रीपुत्रातें ॥ करुं तप आपण ॥४१॥

उपवासादिकीं करोन ॥ स्वशरीर शुष्क करीन ॥ येणें परलोकां साधीन ॥ ऐसें मनीं धरियेलें ॥४२॥

मग कपोती दीधली सोडोन ॥ मोडिले पांजर धनुष्यबाण ॥ अग्निमाजी जाळोन ॥ दूरस्थ गेला ॥४३॥

इकडे ते कपोती तेथ ॥ अनेक विलापातें करित ॥ ह्नणे पतिवेगळें समस्त ॥ मज जगत्र अमंगळ ॥४४॥

पतीचेनी सर्व भोगिलें ॥ सर्व शून्य तयावेगळें ॥ मग स्वयेंही तिये वेळे ॥ केला अग्निप्रवेश ॥४५॥

तंव तेणें पुण्यें करोनी ॥ विमान आलें तत्क्षणीं ॥ माजी बैसोनि स्वर्गस्थानीं ॥ गेली पती सांगातें ॥४६॥

तियें विमानास्थें दोनी ॥ पाहोनि लुब्धक ह्नणे मनी ॥ कीं मीही पावेन निर्वाणीं ॥ येचि गतीतें ॥४७॥

पुढें पंपासरोवरीं जावोनी ॥ निराहार निर्गम होवोनी ॥ प्रवेशला महावनीं ॥ तंव दावाग्नी देखिला ॥४८॥

प्रळयसमान धडकत ॥ देखोनि देहविमोक्षार्थ ॥ केला पावकप्रवेश त्वरित ॥ त्यापारधीयें ॥४९॥

मग तेणें पुण्यें करोनी ॥ तोही तैसाचि विमानीं ॥ बैसोनियां स्वर्गस्थानीं ॥ गेला देखा ॥५०॥

तरी हें जाणोनि जे नारी ॥ भ्रतारेंसीं सहगमन करी ॥ ते कपोतीचिये परी ॥ भोगी स्वर्गसुख ॥५१॥

हें कपोताचें आख्यान ॥ जया होय श्रवणपठण ॥ त्याचें होय पाप क्षाळण ॥ अंतीं परमगती ॥५२॥

ऐसें जाणोनि निभ्रांत ॥ राया राखावा शरणागत ॥ तयाचा जो करी घात ॥ तो जाय नरकीं ॥५३॥

तंव धर्म करी विनवणी ॥ जें पाप केलें नेणोनी ॥ तया पापाचिये पासोनी ॥ कोणें रितीं उत्धरिजे ॥५४॥

तंव ह्नणे गंगानंद ॥ इये अर्थी परम प्रसिद्ध ॥ इंद्रद्योत शौनकसंवाद ॥ ऐकें सांगतों ॥५५॥

तया राया अबुद्धिपूर्वक ॥ ब्रह्महत्या घडलीयेक ॥ ह्नणोनि प्रजाद्विज सकळिक ॥ त्यजिती तया ॥५६॥

येरु पापें सदा जळत ॥ दुःखें गेला अरण्यांत ॥ ब्रह्महत्यानिवृत्यर्थ ॥ तप करिता जाहला ॥५७॥

तथापि न संडी तयातें ॥ ह्नणोनि शरण गेला शौनकातें ॥ ऋषि ह्नणे पापिया येथें ॥ कांपां आलासी ॥५८॥

तूं येथोनि जाय दूरी ॥ तुझा उत्तमवंश अवधारीं ॥ पडिला आहे महाअघोरीं ॥ तुझेनि पापें ॥५९॥

तूं अधोमुखें केवळ ॥ महानरकांत पडशील ॥ तेथ अनेक पीडा करतील ॥ अधोमुख पक्षी ॥६०॥

राजा ह्नणे निरंतरीं ॥ पापाग्नि जळतो माझिये शिरीं ॥ तरी माझिये वंशावरी ॥ दृष्टी देवोनि कृपा कीजे ॥६१॥

जैसी पिता पुत्रातें करी ॥ मग शौनक ह्नणे अवधारीं ॥ दारुण तपें तूं आचरीं ॥ पुष्करादितीर्थी ॥६२॥

तेणें भ्रूणहत्यादिकें ॥ पापें फिटताती अनेकें ॥ अथवा अश्वमेघशतकें ॥ होय पापानिष्कृंती ॥६३॥

हाचि अर्थ एकदा पूर्वी ॥ देवदैत्यादिकीं सर्वी ॥ पुसिला होता सद्भावी ॥ बृहस्पतीसी ॥६४॥

मग तेणें तयां सद्वचनीं ॥ कथिलें कीं सत्कर्मे करोनी ॥ असत्कर्माची तत्क्षणीं ॥ निवृत्ति होय ॥६५॥

जैसें वस्त्र मळलिया ॥ शुद्धद्रव्य धुतलिया ॥ ऐसें वचन ऐकोनियां ॥ गेला इंद्रद्योत ॥६६॥

तेणें अश्वमेध केला ॥ ब्रह्महत्येपासोनि मुकला ॥ निःपापत्वें करुं लागला ॥ सकळ राज्या ॥६७॥

तंव धर्मे पुसिलें सद्भावें ॥ मेलें मनुष्य मागुतें जीवे ॥ ऐसें असेल जरी ठावें ॥ तरी सांगावें गांगेया ॥ ॥६८॥

मग ह्नणे गंगानंद ॥ धर्मा इयेअर्थी प्रसिद्ध ॥ गृघ्रजंबुकसंवाद ॥ असे नैमिषारण्यीं ॥६९॥

कोणीयेक होता ब्राह्मण ॥ तयाचा मृत जाहला नंदन ॥ मग त्याचें प्रेत घेवोन ॥ बांधव चालिले ॥७०॥

रडतांरडतां स्मशानीं गेले ॥ बहुत शोक करुं लागले ॥ तंव गृध्रें येवोनि ह्नणितलें ॥ रडतेयांसी ॥७१॥

अरे तुह्मी येथें पुत्रातें ॥ टाकोनियां जावें निरुतें ॥ स्त्रीपुरुषांचे देह येथें ॥ नाश पावले अनंत ॥७२॥

परि ते नाहीं परतले ॥ जे आणिताती तेहि मेले ॥ ज्याचें जेतुलें आयुष्य तेतुलें ॥ वांचणें तया ॥७३॥

मग कर्मानुरुप स्थानीं ॥ स्वयें जात असे प्राणी ॥ संयोग आणि वियोग दोनी ॥ असती क्रमेंची ॥७४॥

हें अतिभ्यासुर स्मशानही ॥ येथ मेला जीवला नाहीं ॥ मर्त्यलोकीं सर्वासही ॥ असे मरण ॥७५॥

आतां पुत्रस्नेह टाकोनी ॥ शीघ्र जावेरें येथोनी ॥ येर भयभीत होवोनी ॥ चालिले वेगें ॥७६॥

तंव एक जंबूक येवोन ॥ मार्ग राहिला अवरोधोन ॥ ह्नणे रे पुत्रस्नेह टाकोन ॥ कोठें जातां नष्टहो ॥७७॥

स्नेहेंकरुनियां बहुत ॥ रुदन करा तुह्मी समस्त ॥ त्या शोकें उठोनि सुत ॥ भेटेल तुह्मां ॥७८॥

ऐसें जंबुकाचें वाक्य ॥ आइकोनियां सकळिक ॥ स्मशानाचे अभिमुख ॥ परतलें शोकें ॥७९॥

तंव गृध्र ह्नणे रे आइक ॥ अल्पबुद्धि क्षुद्रजंबुक ॥ याचेनि बोलें तुह्मी मूर्ख ॥ परतलेति कां पां ॥८०॥

हा काष्ठभूत मृतसुत ॥ तयाचा शोक करणें व्यर्थ ॥ तुह्मी आपुलें हिताहित ॥ न देखाची ॥८१॥

कांहीं तपसाधना करा ॥ जेणें सुटाल या संसारा ॥ जेणें सुखदुःखें समग्रां ॥ होताति कर्मानुरुप ॥८२॥

पुत्राचें कर्म पितयासी ॥ तथा पितयाचें पुत्रासी ॥ कामा नये सर्वाशीं ॥ स्वकर्मचि भोगणें ॥८३॥

प्राणी मूर्ख अथवा प्राज्ञ ॥ सधन अथवा निर्धन ॥ बाळ वृद्ध आणि तरुण ॥ सर्वही काळवश आहेती ॥८४॥

ऐसें विचारोनि मनीं ॥ जारे आपुलिये स्थानीं ॥ तंव तें संदेशवाक्य ऐकोनी ॥ बोलिला जंबुक ॥८५॥

अरे तो मूर्ख गृध्र यथार्थ ॥ त्याचेनि बोलें तुह्मी येथ ॥ पुत्रस्नेह टाकोनि जात ॥ तरी ऐसें न पाहिजे ॥८६॥

शोकादि रुदनप्रयत्नें देख ॥ पावाल वंशधर बाळक ॥ प्रयत्नें सांगा काय येक ॥ नपविजे प्राणी ॥८७॥

मग गृध्र ह्नणे आइका ॥ मज वर्षे जाहलीं सहस्त्राधिका ॥ परि स्त्रीपुरुष नपुंसकां ॥ स्थावरजंगमादी ॥८८॥

कोणी मरुनि जाहलें जित ॥ ऐसें दृष्ट ना श्रुत ॥ त्याचें कर्म स्मरोनि बहुत ॥ होईल तुह्मां शोकची ॥८९॥

परि नव्हे पुत्रप्राप्ती ॥ हे ऐकोनि गृध्रोक्ती ॥ मग जंबुक तयांप्रती ॥ बोलता जाहला ॥९०॥

अरे गृध्रवचनें सत्य ॥ तुमचा गौरवर्ण सुत ॥ सुवर्णकुंडलेंयुक्त ॥ सांडिजे हें युक्त नाहीं ॥९१॥

म्यां ऐकिलेंसे पुराणोक्त ॥ जे जंबुक शूद्रवधें सत्य ॥ अल्पायुषी द्विजसुत ॥ मेला तो आला पुनरपि ॥९२॥

तथाविधचि आणिक ॥ श्वेतराजर्षीचा बालक ॥ तो मृत आला सम्यक ॥ शुद्धकर्मे जीवंत ॥९३॥

ह्नणोनि तुमचा येथें ॥ शोक आयकोनि समस्तें ॥ मुनिदेवतादि पुत्रातें ॥ जीवविती कृपेस्तव ॥९४॥

ऐसें त्यांहीं आयकोनी ॥ अंकीं पुत्राचे शिर ठेवोनी ॥ हायधायें मोकलोनी ॥ रडती जाहली ॥९५॥

तें रुदन आयकोनी ॥ गृध्र ह्नणे समीप येवोनी ॥ अरे मराल हदय फुटोनी ॥ तुह्मी अवघे ॥९६॥

परि शतसहस्त्रही वर्षाहीं ॥ मृतपुत्र नुठे कहीं ॥ जंबुकशब्दें सर्वही ॥ भुललेति काय ॥ ॥९७॥

ब्रह्मा विष्णु पशुपती ॥ सावित्री लक्ष्मी पार्वती ॥ यांचेंही मृतप्राणियाप्रती ॥ नचले कांहीं ॥९८॥

ऐसे शब्द आयकोनी ॥ मृतपुत्राचें प्रेत सांडोनी ॥ सर्व चालिले तत्क्षणीं ॥ स्वस्व गृहास ॥९९॥

जंबुक ह्नणे मागुतेनी ॥ या तरी मनुष्यजन्माहुनी ॥ बरवी असे पशुयोनी ॥ सर्वप्रकारें ॥१००॥

कीं सुखाचे अंती दुःख ॥ आणि दुःखाचें अंतीं सुख ॥ इतुकाही विचार सम्यक ॥ नाहीं जेथें ॥१॥

असो मग ते स्वकार्यतत्पर ॥ जंबुक आणि दुजा गृध्र ॥ उत्तरासी प्रत्युत्तर ॥ बोलिले युक्तीं ॥२॥

त्यांचेनि दैवयोगें ते वेळां ॥ शंकर पार्वतीयें प्रेरिला ॥ तो तयांसी प्रत्यक्ष जाहला ॥ ह्नणे मागा वरदान ॥३॥

येरु ह्नणती कृपाळुवा ॥ हा मृतपुत्र जीववावा ॥ मग शंकरें उठविला बरवा ॥ कृपादृष्टीं ॥४॥

दीधलें शतवर्षे आयुष्य ॥ आणि गीधा जंबुकांस ॥ केला क्षुधेचा विनाश ॥ सदा तृप्तची ॥५॥

मग देवातें वंदोनी ॥ दोघे गेले उद्धरोनी ॥ पुत्रही आला निजस्थानीं ॥ आपुलीये ॥६॥

तरी प्रयत्नें निश्चयें ॥ स्वल्पकाळेंही फळ होय ॥ या इतिहासश्रवणें उभय ॥ लोकप्राप्ती ॥७॥

मग धर्म असे विनवित ॥ जरी बळकट वैरी बहुत ॥ तरी कैसें वर्तिजे तेथ ॥ प्रत्यासन्नें दुर्बळें ॥८॥

तंव ह्नणे गंगानंदन ॥ इये अर्थी पुरातन ॥ शाल्मली आणि पवन ॥ यांचा संवाद आइक ॥९॥

हिमाचळीं विस्तृत येक ॥ होता शाल्मलीचा वृक्ष ॥ सर्वा विश्राम कारक ॥ प्राणियंसी ॥११०॥

पक्षि श्वापदें हस्ती ॥ वणिजारे मार्गस्थ यती ॥ तपस्वी अनेक राहती ॥ आश्रयें त्याचिये ॥११॥

त्याचा अनंतशाखा थोरा ॥ तळीं वास अंधकारा ॥ तीतें देखोनी उत्तरा ॥ बोलिला नारद ॥१२॥

ह्नणे अहो तरुरमणीये ॥ तुझेनि दर्शनें आनंद होय ॥ परि तुझी पवनासि काय ॥ मैत्री असे ॥१३॥

नदी नद पाताळ जीवन ॥ सकळही शुष्क करी पवन ॥ पर्वत वृक्षांतेंही पाडोन ॥ करितो समस्तळ ॥१४॥

तुज देखोनि शोभिवंत ॥ स्वर्गलोकहे संतोषत ॥ परि पवनासि यथार्थ ॥ तुज मैत्रीभाव असे ॥१५॥

तूं राहिलीस त्याची होउनी ॥ तुजप्रति पाळितो ह्नणोनी ॥ ऐसें नारदोक्त ऐकोनी ॥ शाल्मली ह्नणे ॥१६॥

माझें तेजोबळ पाहीं ॥ पवनासि साहवत नाहीं ॥ वृक्षपर्वत मोडोनि सर्वही ॥ येतो पवन ॥१७॥

मग मी तया श्रांतासी ॥ विष्टंभितें परियेसी ॥ परि त्याचें काहीं मजसी ॥ चालेचि ना ॥१८॥

यावरी नारद बोले वचन ॥ वायु सर्वप्राणियां जीवन ॥ नये त्याचें साम्यपण ॥ इंद्रादिका ॥१९॥

तूं मूर्ख बहुभाषी ॥ गर्वे बोलतेसि मजसी ॥ परि याचें फळ पावसी ॥ अल्पकाळें ॥१२०॥

मग गेला वायुजवळी ॥ ह्नणे शाल्मली येकी हिमाचळीं ॥ गर्वे असे मातली ॥ तुज अपमानिते ॥२१॥

यावरी वायु येवोनि तेथें ॥ क्रोधें ह्नणे शाल्मलीतें ॥ मी मारुत जाण निरुतें ॥ जाणों परस्परें आपण ॥२२॥

तूं मत्प्रसादें वांचलीसी ॥ तरी आतां फळ पावसी ॥ तंव शाल्मली ह्नणे तयासी ॥ मी बळाधिक असें जाण ॥२३॥

तुझें मज भय नाहीं ॥ मग वायु ह्नणे पाहीं ॥ प्राप्तकाळीं फळ सर्वही ॥ दावीन याचें ॥२४॥

शाल्मली मनीं विचारी ॥ मी वायूसि निर्बळ खरी ॥ तथापि बुद्धिबळ कुसरीं ॥ वायुभय टाळावें ॥२५॥

अन्यवृक्षां बुद्धि नाहीं ॥ ह्नणोनि कष्ट पावती सही ॥ हें जाणोनियां तत्समयीं ॥ काय केलें शाल्मलीयें ॥२६॥

शाखा पत्रपुष्पें टाकोन ॥ स्वयें राहिली स्तंभ होवोन ॥ मग क्रोधें आला पवन ॥ तंव तैसी देखिली ॥२७॥

तेणें तियेसि ह्नणितलें ॥ माझें कृत्य तुवांचि केलें ॥ आपुले दुर्बुद्धीचीं फळें ॥ पावलीस ॥२८॥

तैं नारदाचें वचन ॥ शाल्मली मनीं आठवून ॥ पश्चात्तापातें पावोन ॥ पावली दुःख ॥२९॥

तरी ऐसें जाणोनि मानसीं ॥ दुर्बळें वागावें बळवंतासी ॥ वैर नकरावें सर्वाशीं ॥ वाचाप्रकटही न कीजे ॥१३०॥

बुद्धिमंताचे ठायीं अवधारीं ॥ वैर वाढे निरंतरीं ॥ तृणीं अग्नीचिये परी ॥ बुद्धी पावे ॥३१॥

तस्मात् बुद्धिबळाहुनी ॥ आणीक बळ नाहीं जाणीं ॥ पार्थे अकराअक्षौहिणी ॥ सैन्य मारिलें बुद्धिबळें ॥३२॥

भीष्म ह्नणे धर्मा जाण ॥ सर्वपापांचें अधिष्ठान ॥ लोभचि असे त्या पासून ॥ इतुके पदार्थ घडताती ॥३३॥

क्रोध काम मोह माया ॥ अक्षमा आणि अधैर्य होय ॥ लज्जालक्ष्मी धर्मक्षय ॥ ऐश्वर्य विद्या मदादी ॥३४॥

द्रोह असत्कार अभाव ॥ अविश्वास अनार्जव अनार्जव ॥ परवित्तदारादि सर्व ॥ हरण घडे ॥३५॥

वाचा मन निंदेचा वेग ॥ उदरदुःख मृत्यु उद्वेग ॥ ईर्ष्या ॥ ईर्ष्या मिथ्याचार अनेग ॥ श्रोत्रवेग श्लाघ्यता ॥३६॥

मात्सर्य साहस अकार्यकारण ॥ वृद्धतरुणावस्था जाण ॥ उत्तरोत्तर अधिकपण ॥ पावे प्राणी ॥३७॥

परि नव्हे परिपूर्ण ॥ जेवीं नदीवोघें उदन्वान ॥ तेवीं काम ऐश्वर्यैं करुन ॥ तृप्ती नपवे ॥३८॥

सुरासुर गंधर्वासही ॥ लोभ जिंकवला नाहीं ॥ सकळ धर्ममार्गासही ॥ मोडिता जो ॥३९॥

ह्नणोनि ऐसियाची संगती ॥ न धरावी बुद्धिमंतीं ॥ प्रिय अप्रियाची आसक्ती ॥ करुं नये ॥१४०॥

शिष्टाचार धर्मपाळण ॥ जया सुखदुःखसमान ॥ करी सत्य प्रिय दान ॥ प्रतिग्रह पराडमुख ॥४१॥

उपकारी दयावंत ॥ पूजी देवतिपर अतीत ॥ जिंकिले कामक्रोध समस्त ॥ अहंकार नाहीं ॥४२॥

तंव विनविलें धर्मरायें ॥ कीं अज्ञान वृद्धि क्षय ॥ यांचें मूळ कारण काय ॥ तें सांगा मजलागीं ॥४३॥

आणि अज्ञान उद्भवलिया ॥ दुःख पावतो प्राणिया ॥ तंव ऐकें ह्नणे गांगेया ॥ धर्माप्रती ॥४४॥

लोभ आणिक अज्ञान ॥ इयें परस्परें जाण ॥ येरयेरांचें कारण ॥ मूळ असती ॥४५॥

तुज लोभाचें सर्व कार्य ॥ पूर्वीचि सांगीतलें आहे ॥ तेंचि अज्ञाना उपजवी पाहें ॥ ह्नणोनि लोभ वर्जावा ॥४६॥

॥ श्लोकः ॥

जनको युवनाश्वश्र्व वृषादर्भिः प्रसेनजित ॥ लोभक्षयाद्दिवं प्राप्तास्तथैवान्ये जनाधिपाः ॥१॥

हें ऐकोनि धर्म पुसत ॥ धर्मप्रकार अनंत ॥ तरी मुख्यधर्म तयांत ॥ सर्वसाधनरुपी ॥४७॥

सर्व धर्माचें फळ पाविजे ॥ दोहींलोकीं सुखी होइजे ॥ तो धर्म मज सांगिजे ॥ भीष्मदेवा ॥४८॥

मग ह्नणे गंगानंदन ॥ ऐकें मुख्यधर्म सांगेन ॥ जेणें अमृतवन ज्ञान ॥ होय तृप्ती ॥४९॥

देहदमनाहूनि काहीं ॥ आणीक जगीं धर्म नाहीं ॥ जेणें करुनि मुक्तीही ॥ पाविजे सत्य ॥१५०॥

दमें दानक्रियासिद्धी ॥ ज्ञान अध्ययन तेजोवृद्धी ॥ पवित्रता सबुद्धी ॥ निःपापता पाविजे ॥५१॥

इहलोकीं आणि परलोकीं ॥ प्राणी होइजेतो सुखी ॥ दमें सुखचि आइकीं ॥ निद्राप्रबोध पावे ॥५२॥

आणि प्रसन्न होय चित्त ॥ ह्नणोनि दमचि समर्थ ॥ अदांत तो बहु अनर्थ ॥ क्लेशपावे ॥५३॥

तें देहदमन बरवें ॥ इहीं लक्षणीं जाणावें ॥ क्षमाधृतीं लक्षावें ॥ अहिंसाचरण ॥५४॥

समता सत्य आर्जव ॥ इंद्रियजय आणि मार्दव ॥ अचपळता अपूर्व ॥ कार्पण्यविरहित ॥५५॥

संतोष कीं प्रिय वचन ॥ अचिकित्सा गुरुपूजन ॥ भृतदया अपैशून्य ॥ अमिर्थ्यावाद ॥५६॥

तरी सर्वकर्मे संन्यासोन ॥ जाहला देहदमनपरायण ॥ तो परब्रह्मनिर्वाण ॥ पावे पद ॥५७॥

जेथोनियां पुनरावृत्ती ॥ भय नाहीं कल्पांतीं ॥ ऐसी होय उत्तम गती ॥ टाकितां लोभ ॥५८॥

दांता आश्रम अरण्यतीर्थ ॥ यज्ञ दानादिकांचें समस्त ॥ प्रयोजन नाहीं तो जेथ ॥ असे तेथें सर्वही ॥५९॥

आणिक ऐकें कुंतीसुता ॥ तपोमूळ सर्व व्यवस्था ॥ तपेंचि सर्व स्त्रजिता ॥ जाहला प्रजापती ॥१६०॥

ऋषी तपें पावले वेदार्थ ॥ फळमूळ अन्नादि पदार्थ ॥ तपें औषधक्रिया समस्त ॥ पावताती सिद्धीतें ॥६१॥

तपें असाध्यें साध्य होती ॥ ब्रह्महत्यादि नासती ॥ सर्वपापांची निवृत्ती ॥ होय तपेंची ॥६२॥

अहिंसा आणि सत्यवचन ॥ दान अतिथीपूजन ॥ याहूनि श्रेष्ठ नाही जाण ॥ दुसरें तप ॥६३॥

तंव गांगेया धर्म ह्नणे ॥ कैसीं सत्यांचीं लक्षणें ॥ आणि तें उपायें कवणें ॥ पाविजे सांगा ॥६४॥

भीष्म ह्नणे गा भूपती ॥ सत्यधर्मे परमगती ॥ यज्ञयाग सुफळहोती ॥ तेंसत्य तेराप्रकारें ॥६५॥

समता दम अमात्सर्यता ॥ क्षमार्‍ही त्यागेच्छा अनसूयता ॥ त्याग ध्यान आर्यत्वता ॥ धृति दयाअहिंसा ॥६६॥

तरी सत्याहूनि धर्म ॥ दुसरा नाहीं उत्तम ॥ अनृत तो जाण अधर्म ॥ पापरुपी ॥६७॥

अश्वमेधसहस्त्रशत ॥ आणि येक सत्य यथार्थ ॥ हीं तोलितां अधिकतः ॥ होय सत्यची ॥६८॥

परदोषें क्रोधादि उपजती ॥ ते क्षमें दूरि करिजेती ॥ होय संकल्पें कामोत्पत्ती ॥ तो वैराग्यें दूरी कीजे ॥६९॥

निंदा तेचि परासूया ॥ दूरी कीजे दयें करुनियां ॥ शास्त्रागम पाहोनियां ॥ कुबुद्धीतें ठाकावें ॥१७०॥

प्रीतीनें वैर फेडिजे ॥ दर्शनें मद निवारिजे ॥ ज्ञानें कैवल्यपद पाविजे ॥ कीं साधुसेवेनें ॥७१॥

मात्सर्याची निवृत्ति नव्हती ॥ ह्नणोनि कौरवां जाहली शांती ॥ जेणें परद्रोह उपजती ॥ त्याचा प्रकाश न कीजे ॥७२॥

प्रथम ब्राह्मणालागुन ॥ देवोनियां अन्नदान ॥ मग सकुटुंबें करी भोजन ॥ तो पावे स्वर्गासी ॥७३॥

यज्ञार्थ देवपितरांसी ॥ जो इच्छी धान्यधनासी ॥ तो पावे स्वर्गलोकासी ॥ अंतकाळीं ॥७४॥

बाहुबळें क्षत्रियानें ॥ शूद्रें दास्यें वैश्यें धनें ॥ मंत्रें यज्ञकरणें ब्राह्मणें ॥ टाळावी आपत्ती ॥७५॥

पंचमहापातकीयांची ॥ संगती येकवर्षची ॥ तो होय तत्समानची ॥ ऐसें जाणिजे ॥७६॥

आतां असो हें प्रस्तुत ॥ सांगतां विस्तारेल ग्रंथ ॥ हें धर्मशास्त्रप्रणित ॥ सांगितलें काहीं ॥७७॥

युधिष्ठिरासि ह्नणे भीष्म ॥ ऐसे हे असती आपद्धर्म ॥ यांचीं उपाख्यानें उत्तम ॥ असती नानाविध ॥७८॥

आतां याचिये पुढील भाव ॥ आपद्धर्मकथा अपूर्व ॥ भीष्म सांगेल गौरव ॥ धर्मरायासी ॥७९॥

तेथें भीष्मासि बोलतां ॥ नकुळ पुसेल आड कथा ॥ ते आयकावी श्रोतां ॥ ह्नणे मधुकरकवी ॥१८०॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ त्रयोदशस्तबक मनोहरु ॥ उपाख्यानधर्मकथनप्रकारु ॥ अष्टमाऽध्यायीं कथियेला ॥१८१॥ ॥ शुभंभवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP