कुलदैवत ओव्या - ओवी १
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
सोमवारा दिशी कोण पापीन न्हाली
देवा माझ्या शंकराची पूजा बेलाची ढासळली
देवाच्या देवळात उभी राहिली एका कोनी
देवशंकरा ईनविती नेत्र उघडा देवा दोनी
देवाच्या देवळात उभी राहिली सवळ्यानं
देवा माझ्या शंकराला करी इनंती जिव्हाळ्यानं
सोमवारा दिशी मी ग वार त्यो गायीयीला
बंधु महादेवाला गेला दुरडी बेलाची विसरला
ईश्वर पूजियीला कुणी पूजीला उनायाचा
कंत देवाच्या गुणायाचा
ईश्वराच्या पिंडीवरी बेल वाहिला कुणी ताजा
पुत्र मागूनी गेला राजा
ईश्वराच्या पिंडीवरी बेल वहाती मी जाता जाता
जोडा संचिता संगं हूता
वरतामधी वरतं वरतं ( व्रत ) सोमवार आवडीचं
शंकराच्या पिंडीवरी बेल वहाती मी तीकटीचं
सोमवार दिस मला सोन्याचा उगवला
देवा माझ्या शंकराला पूजा बेलाची महादेवाला
उन्हाळ्याचं ऊन पाणी मिळेना पाखराला
देवा माझ्या शंकराच्या झरा लागला डोंगराला
देश सारा धुंडीला सपनी गोसाव्याची जट
देवा माझ्या म्हादेवाचा उंच डोंगर पाच फूट
वर संभूचं शिखईर खाली बळीचं देवईळ
शंकराचे गिरजाबाई तुझं माहेर जवईळ
तेल्या भुत्याची कावईड चढती मुंगी घाट
शंकराची गिरजाबाई पाया पडाया बिगी ऊठ
चालल्या बारा मोटा शिंगणापूरच्या तळ्यायाला
देवा माझ्या शंकराचा दवणा आलाय कळ्यायाला
शिंगणापूरचा कुळस्वामी मला लागला कशापायी
देवा माझ्या शंकराला नवस केल्याती बाळापायी
शिंग वाजलं शिंगणापूरी कर्णा वाजला कोल्हापूरी
देव जोतिबा काळभैरी मुजरा करीतो किल्ल्यावरी
नवस करु गेली शंभू नवस तुला ठावं
देवा माज्या शंकरा बाळ दिल्याला सुखी ठेव
आठ दिसाच्या सोमवारी लई आनंद माझ्या घरी
देव माजा कुळस्वामी बेल फुलाच्या गादीवरी
आठ दिसाच्या सोमवारी देव शंकर नंदीवरी
टाकी नजर खेड्यावरी
आठ दिसाच्या सोमवारी माजी शिल्लक नव्हती सोजी
शंभू जेवाय झालं राजी माजी आवडीनं खाल्ली भाजी
कोरी ग सवाशीण मला मिळंना खेड्यापाड्या
शंकराच्या गिरजायीला चिट्ट्या धाडीती तिच्या वाड्या
शंकराच्या पिंडीवरी बेल वहाती मी तीकटीचा
पोटीच्या बाळायाला औक मागीती दुपटीचा
असलं ठावं असता लेकी जलमा आली नसती
शंकराच्या बागेमंदी झाड बेलाचं झाली असती
संभू देव ग म्हातायीरा गिरजा बोलती आईयीला
जोडा कुणी ग पाहीयीला
सोमवारा दिशी नगं पापीणी पाणी न्हावू
पोटी पुतर ( पुत्र ) पाठी भाऊ
सोन्याच्या करंडाला त्येला झाकणं चांदीयीची
हळदी कुंकवासाठी सेवा करीती शंकराची
बारा कोसांची प्रदक्षिणा बाई मी उभी ग ताठयीली
देवा माझ्या शंकराची भेट घेवूशी वाटयीली
म्हादेवाला गेले सया म्हणत्या काय केलं
बारा मोटांच्या तळ्यायात भांडं ध्यायीचं उजाळलं
सकाळी उठूयीनी माझी नजर खालयीती
देव शंकर कुळस्वामी ध्वज वार्यानं हालयीती
तेल्याभुत्याची कावईड मुंगी घाटाला थटईली
शंकराची गिरजाबाई पाया पडाया उठईली
कुळस्वामीच्या दरबारात बाई मी मुठीनं पेढे वाटी
नवस पोटीच्या बाळासाठी
सोमवारा दिशी नीट जाती मी म्हादेवाशी
हाती दुधायाचा तांब्या उभी राहिली नंदीपाशी
हातात बेलतांब्या कोण शिखरावरनं गेला
पाठीच्या बंधूजीनं देव शंकर गुरु केला
शिंगणापूरच्या वाटं आंबा लागला इसाव्याचा
देवा शंकराचा चढती डोंगर गोसाव्याचा
गिरजाबाईयीची तिची सदर सोन्यायाची
देवा माझ्या शंकराची येती कावड मानायाची
देवा संभूच्या देवळात सोन्यायाचं काटं
कुळस्वामीच्या पिंडीयीला बाळ नवसाचं घाली खेटं
कोण शंभूच्या पिंडीवरी बेल वहातीया एकयीली
माझी ग भैनाबाई माता पुत्राला भुक्याल्याली
संभूच्या शिखराला बया मालन माझी गेली
हळदी कुंकवाची रास खंडूनी मला दिली
सकाळी उठूयीनी धर्म करावा पीठायीचा
शंकर माझा देव साधू आलाय जटायीचा
संभूच्या शिखराला धज लावीली धोतराची
शंकर देवायाला जोडी मागीती पुतराची
N/A
References : N/A
Last Updated : October 17, 2012
TOP