कुलदैवत ओव्या - ओवी १९
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
कापराची जोत करते लाही लाही
चवर्याच्या गडावर मामाभाश्याची लढाई
कापराची जोत कवळी लस लस
गेला परिमळ दूर भोळा शंकर झाला खूस
उदाकापराचा परिमळ सुटला सुटला
चवर्याच्या गडावर देव गादीचा उठला
चवर्याच्या वाटीनं भले भले आजन
गिरजा करे ताट संभा करे भोजन
देव महादेव सालाचा नवरा होते
हळदी कुंकवाचे थापे पाहाडले देते
शिवरातीच्या राती जिवाले काचनी
सांगा सांगा भक्तजन संभाची बातनी
शिवरातीच्या दिशी गिरजाई उपासी
कशा सोडू मी बारशी
काळं काळं कुट समुदुराचं पानी
झ्यारी बुडवता थराळली गिरजा रानी
काशी काशी करता काशीत काम हाये
अत्मा सोधुनिया पाहे गंगा जटातुन वाहे
काशी काशी करे काशीतला गोटा
शंकरावाचून देव कोनी नाही मोठा
काशी काशी करे काशीत काळं पानी
शंकरावाचून देव नाही कोनी ग्यानी
तान्ह्या माह्या बाळा ये माह्या जवळी
तुले ठेवतो घरी मी जातो भवळागिरी
तान्या माह्या बाळा लडू लडू आला
गिरजा मातेनं तुले केला दूधपेढा
येतो देवा येतो संगं लेकरं लेकरं
चवर्याच्या गडावर तुह्या पायाचे चाकर
येतो देवा येतो अज्ञान लेकरु
चवर्याच्या गडावरी माही दैना नोको करु
येतो देवा येतो येतो तुह्यावरी
सोनियाची सुरी नोको ठेवू शातीवरी
सोनियाची सुरी मारली छातीत
आतड्याचे घोस गिरजाच्या वट्यात
गोंगलाची पाटी गिरजाच्या डोक्यावरी
रुप झाला होता थोर भारी नईवरी
गिरजाईचा मोती हारपला राती
घेते खार्याची झडती
गिरजाईचा मोती हारपला काल
घेते पोह्यावर जाल
तुझीया वाटेनं येळपाच्या रांज्या
आपल्या तलपीले मांगे भगताले गांजा
कलारनी बाई भट्टी लाव बेगी
दारुच्या पान्यासाठी आला कैलासाचा जोगी
कलारनी बाई भट्टीवर घोडा
दारुच्या पान्यासाठी संभू झाला येडा
चाला जाऊ पाहू मुलताई बजार
चुडा भरते वं तिथं भोळ्या शंकराची नार
पह्यल्या पायरीले शेंदराचं बोटं
येड्या तू भगताले रस्ता सांगजो नीट
बारा बारा कोस शंकराच्या जटा
गिरजाचा हिय्या मोठा जाऊन धरला आंगुठा
बारा बारा कोस वाघ आसुलीचं भेव
चौर्याच्या गडावर परभू नांदते महादेव
गडावरी गड असे गड बारा
दुरुन दिसे जशा तलवारीच्या धारा
गडावरी गड असे गड किती
दुरुन दिसते नदी नर्मदीच्या भिंती
खांद्यावरी खार्या घेतो वैतागानं
घरी हाये लेक सून भांडन करे रात्रंदिन
खांद्यावरी खार्या घे माह्या मुला
का असा कोमावला गुलाबाच्या फुला
खांद्यावरी खार्या घेतल्या घाईघुई
पाळन्यात तानी बाई तिची आशा मले नाही
खांद्यावरी खार्या घेतल्या का मून
घरचा वैताग पाहून
निंबानारळाच्या खार्या झाल्या जड
कशी चह्यडू चौर्यागड
निंबानारळाच्या खार्या झाल्या भारी
कशी चह्यडू पायरी
मारुन झोडून घे माह परान
कलीजा काहाडून देवा बांधीन तोरन
पह्यला नमस्कार संभाले सांग जा
निजला उठव जा
महादेवी जातो खोबरं खायले
नारळाची बुची चौर्याच्या बाबाले
महादेवा जाता एक दिवस मोलाचा
चौर्याच्या गडावरी नाही देहाचा भरोसा
महादेवी जाता नाही पुसलं बापले
जातो संभाच्या तपाले
महादेवी जाता नाही पुसलं भावाले
जातो संभाच्या गावाले
महादेवी जाता नाही पुसलं भायले
जातो संभाच्या भेटीले
महादेवाच्या वाटीनं सांडला लसन
पोहा चालला ठेसून
महादेवाच्या वाटीनं भक्तिनी येलाच्या
शेंगा खाते वालाच्या नाही वाटीनं चालाच्या
महादेवाच्या वाटीनं भक्तिनी साध्याभोळ्या
बांधे कंबरीले चोळ्या
महादेवाच्या वाटीनं भक्तिनी डोंबड्या
खाते भाताव कोंबड्या
महादेवाच्या वाटीनं भक्त हाये ताने
धवळ्या नंद्यावर पाळने
महादेवाच्या वाटीनं भगत ठकले
रामाकोन्यावरी नंदी पाठवा आपले
महादेवाच्या वाटीनं भक्तिनी ठकल्या
रामाकोन्यावरी धाडा पालख्या आपल्या
महादेवाच्या वाटीनं मुंग्यांचं सैन चाले
लाडाची गिरजा बोले इतके भक्त कसे आले
महादेवाच्या वाटीनं येळवाच्या रांज्या
पारबती असून मांगे गिरजाले गांजा
महादेवाच्या वाटीनं दवन्याचं रोप
संभाचं नाव घेता हारपलं दुख
संभा संभा करे संभा नाही दिसे
भयान वनामंधी पोथी वाचत तो बसे
संभा संभा करे संभा नाही घरी
संभा गिरजाच्या माहेरी
संभाच्या पागुटीले पाहाडाचा येढा
अहेरी बसला माह्या नाजुक केवढा
संभाच्या लगनाच्या अक्षीदा आल्या मले
न्याचारी संवसार काय घेऊ अहीराले
देव महादेव सालाचा नवरा होते
हळदी पाहाडाले देते कुकवाचे थापे
चवर्याचा गड चहडता बिल्लण
उतरत्या पायरीले झाला दुसरा जलम
शाईचे तांदूळ अवघ्या देवाईले
उरले तांदूळ चवर्या बाबाले
गडावरी गड गड चवर्याचा भारी
उतरत्या पायरीले आली डोळ्याले अंधारी
गड चवर्याचा दिसे सोभिवंत
खाली उतरता लागे नाही त्याचा अंत
महादेवा जाता गा जानं नोह्यतं मनी
सपनी येऊनी कशी टाकली मोह्यनी
संग्राहक: प्रा. रु. पा. पाजणकर
महादेवाच्या वाटेनं देवा गा आडवी बेलगंगा
रामतीर्थावर भेट देजो पांडुरंगा
महादेवाच्या वाटेनं देवा गा आडवी बंधान
गीरजा माही माय तोडे पापाचे बंधन
महादेवाच्या वाटेनं देवा गा आडवी बेल नार
दुरुन दिसते नदी नर्मदेची धार
महादेवाच्या वाटेनं देवा गा आडवी भयसा
संबाच्या दर्शनाले जाऊ देसीन काइसा
माहा नमस्कार देवा गा निशान गडाले
नाही येनं झालं सीवरातीच्या पारन्याले
माहा नमस्कार देवा गा पाह्यरीला केला
कैलासीचा पोहा दरबारी गेला
देवामंधी देव देवा गा नागदुवर पावला
पाचा नारयाचा झेला तोरनी लावला
झाडी वर्हाडाची देवा गा जागा हे थोपची
चिंतामनापासी जोत जये कापुराची
पश्चमदार देवा गा पश्चम करजो
लाह्यार्या मोठ्यावर देवा किरपा ठेवजो
अगीन दार देवा गा अगनीचं दार
भोया भक्तिवाना तू गा दुरुन पाया पर
सुतायाची कांडी देवा गा उडे वरच्यावर
वडाची पारंबी चित्र शायेवर
पोहा गेला देवदरबारी देवा गा झाला पारोपारी
चित्र शायेवर भरली देवाची कचेरी
गडावरी गड देवा गा कितीक रचले
कैलासीचे राजे जाऊन सिखरी बैसले
गडामधी गड देवा गा चवर्याचा बाका
तोंडी आला थुका तुम्ही धुनी टाकू नका
चला जाऊ पाहू देवा गा गिरजाची रांधनी
तिच्या सयपाकाले आहे सुक्कीर चांदनी
चला जाऊ पाहू देवा गा गिरजाचा ईरोला
सव्वा खंडीचा रोठ केला अवघा कैलास जेवला
गडावरी गड देवा गा गडाखाली आड
रेसमाचा दोर पानी भरे गिरजा नार
सव्वा मनाची कुदयी देवा गा मनाचा वासला
अवधापर्यंत तासला वर चवर्या बसोला
मायची घेतली चोयी देवा गा बापाचा घेतला सेला
कैलासी राजा लेक तीर्थासी गेला
खांदावरी पडशी देवा गा घे माह्या चातुरा
घे माह्या चातुरा तुही पह्यली यातरा
निंबानारश्यानं देवा गा पडशी झाली जड
पडशी झाली जड कैसा येंगू चवर्या गड
महादेवाच्या वाटेनं देवा गा दवना मोठा दाट
भगत अरवट दवना मोडून केली वाट
महादेवाच्या वाटेनं देवा गा दवना आला फुला
दवना आला फुला बास शंकराले गेला
महादेवाच्या वाटेनं दवना आला गोंडा
कैलासीच्या राजा तुहा तिही लोकी झेंडा
नदीले आला पूर देवा गा जाब मारे थोप
भोया शंकुर टाके गयातला गोफ
पानी पडू पडू गा देवा हिरवं झालं रान
हिरवं झालं रान सुटलं गवयाचं धन
पानी पडू पडू गा देवा हिरवा झाला चारा
हिरवा झाला चारा सुटला गवयाचा गोर्हा
सकायच्या पाह्यरा देवा गा गिरजाले चेव येते
गिरजाले चेव येते चवदा भुवान झाडते
महादेवा राजा देवा गा जातीचा बनिया
सोन्याचा ताजवा त्यानं तोलली दुनिया
महादेवा जातो देवा गा आखीन येईन
तुह्या सतवानं चवदा भुवान पाहीन
येतो देवा येतो रे देवा गा येतो तुयावरी
सवर्नाची सुरी नको ठेवू गयावरी
भुईकुंडावरी देवा गाय चितीन पसरली
गिरजा आंगोईले गेली साडी चोयी इसरली
महादेवा़च्या वाटेनं देवा सांडलं खाखस
सांडलं खाखस पोहा चालला हासत
महादेवा जातो देवा गा संगं काय नेता
घरी माता पिता आहे सोन्याच्या मुदता
गिरजा मायेचा चुडा, देवा गा कोर्या कागदात
उजीड पडला त्याईचा चवदा भुवनात
गिरजा मायेचा चुडा देवा गा कशानं टिचला
चवसर खेलता हात दुमता पडला
गिरजा मायेचा चुडा देवा गा दुधाची उकयी
गिरजा माही माय मनाची मोकयी
सकायच्या पाह्यरी देवा गा कोमावला बाग
कोमावला बाग गिरजा पानी वलू लाग
पानी वलू वलू देवा गा हिरवा झाला बाग
केयीच्या पानावर लेहेरा मारे डोम्या नाग
N/A
References : N/A
Last Updated : October 17, 2012
TOP