कुलदैवत ओव्या - ओवी ७
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
महादेव पारबती बसलेत गाडीत
वाट बेलाच्या झाडीत
चिंचेला आल्या चिंचा आंब्याला आले घोस
केला संबाला नवस गिरजा नारीला दिवस
महादेव पारबती जोडा दोहींचा संगीन
देवळाच्या पुढं भेट मोडिली नंदीनं
चला जाऊ पाह्या भोळ्या शंकराचा वाडा
त्याला नागीनीचा येढा
चला जाऊ पाह्या भोळ्या शंकराची खोली
शंकराला विडे देता पार्वती झोपी गेली
उजेड पडला हिंगनापुराच्या तळ्याला
गिरजा पुशिती माळ्याला आला दवना कळ्याला
उजेड पडला हिंगनापुर नगरात
चंद्रावळी महालात दिवा जळं सारी रात
संबूचं शिखर दिसतं आर पार
नवा रतनाचा हार संबू झोकी गिरजावर
संबूचं शिखर शेंड्याला वाकडं
मधी दवन्याचं झाड गिरजा नारीनं काढीलं
संबूच्या शिखरावरी दवना येली गेला
गिरीजानारीच्या पातळाला करारी रंग देला
संबाचं शिखर दिसतं पिवळं
वाळतं शिखरावरी गिरजा नारीचं सवळं
संभाच्या शिखरावरी चरताती ढवळ्या गाई
अंदान दिल्याल्या तुजला गिरजाबाई
जोड मोटेचं पानी संबू देवाच्या मळ्याला
गिरजा नार बोलती दवना कशानं वाळला
कोळी मनू कोळी कशानं हाय उना
शिकारी लावितो चुना संबू देवाचा मेव्हना
शिखराचा संबू भोळा मनू नाही
आयाशी गंगाबाई त्याच्या जटामधी हाई
भोळ्या महादेवा भोळ्या तुमच्या करामती
अर्ध्या अंगी पारबती जटामंदी गंगा र्हाती
अर्ध्या अंगी पारबती जटेत गंगा र्हाती
देवा शंकराचं कवतीक सांगू किती
शंकरानं धावा केला जसा पहाड कोरुन
देशात गंगाबाई आली कैलासावरुन
देवा या शंकरानं जटा कैलासी आपटिली
देशात प्रगटली गंगा माय
गंगाबाईचं पानी जशा दुधाच्या उकळ्या
देवा या शंकरानं जटा सोडिल्या मोकळ्या
भरली गंगामाय पानी ढवळं ग कशानं
आंघोळ केली सये जटेच्या गोसायानं
दोघी बायकांचं संबूदेवाला सुख
गिरजा नारीला दुख झालं या सवतीचं
गंगा ग गिरजा दोघी भांडती सवतीपन
संबाजी राजा माजा ऐकितो कवतीकानं
गंगा ग गिरजा भांडती सवती हेवा
गिरजाच्या शिरजोरपना ऐका तुम्ही महादेवा
गंगा ग गिरजा दोघी भांडती सवती
गंगाच्या पान्याला गिरजा वडील लवती
भयान्या वनामंदी शंकर मांडी डाव
पार्बती करी न्याव जितीला महादेव
महादेव पारबती खेळती येकी बेकी
गिरजा नार पक्की संबाचे डोळे झाकी
सोंगटी खेळताना पहिला डाव गिरजाचा
जिंतून नेला बाई ढवळा नंदी शंकराचा
हाक जी मारली शिकरीच्या संबाजीनं
कान देला बाई निरवाड्गीच्या नंदीनं
सोंगटी खेळताना सोंगटीला बारा फासे
भोळा महादेव गिरजा मनामधी हसे
सोंगटी खेळताना सोंगटीला बारा डावू
भोळ्या शंकराला नको गिरजा येड लावू
झाडाची सावली झाडाला अभिमान
भोळ्या माझ्या संभाजीला गिरजा घालती हुमान
रुसला संबूदेव वनी बांधिला मठ
याला समजाया चालली गिरजा गवळ्याची धट
भयान्या वनामंदी शंकर सोडी जटा
पार्बतीच्या मोटा जाऊन धरीला आंगोटा
महादेवा जाया भाला भाला वन
गिरजा गोंडनीनं संभा काढिला धुंडून
अरुन्या वनामंदी देव बसले जाऊन
भिल्लनीचं रुप गेली गिरजा घेऊन
बारा वर्स झाली संबूदेवाचं तप
इनविती देवाला गिरजा भिल्लनीचं रुप
संबूदेव या मनीती दम दम भिल्लिनी
तुझ्या केसाचे आकोडे मला वाटती गिरजावानी
संबूदेव गेला रागं गिरजा नार त्याच्या मागं
येका कपारीला दोघं
भोळ्या महादेवा भोळं तुझं देनं
सापडलं बाई मला बेलामंदी सोनं
N/A
References : N/A
Last Updated : October 17, 2012
TOP