प्रसंग अठरावा - वादिक
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
नाहीं भेदवादी वादिकाचे लक्षण । सांगेन ऐका संत श्रोतेजन । समस्यानें पाखांडी अवगुणी संपूर्ण । भाविक दिसती ॥१६०॥
सांगेन या चौघांची टीका । समस्त श्रोते सावध ऐका । ते जन्मोन विसरले जगदीश नायका । आपल्याला मतें ॥१६१॥
गर्वी नादी नादलुब्ध भले । जैसा नागसुर ऐकोनि नाग डोले । ऐसे एक मान तुकवितां मेले । अंतरीं बोध नेणती ॥१६२॥
भेदी उमगी भेदाच्या कोटी । तों तों पडें श्रीहरीशीं तुटी । म्हणोनि भेदवार्ता खोटी । भक्तिप्रेमाविण ॥१६३॥
सुगंध सांडूनियां माशी । जाय उमगीत अमंगळासी । तैसा अभक्त घेतो वादासी । अभावें पाखांडपणें ॥१६४॥
वादिकांसी कळे ना वळे । सुशब्द ऐकतांची पळे । जैसें हिरवें चर्म दरवळे । उदकीं पडतांचि पैं ॥१६५॥
आपले अवगुण न सांडी अघोरी । साधूचे सुगुण मनीं न धरी । आपुल्यांत आपण पिळ घेतो परोपरी । विष्ठेंत गांढुळ जैसा ॥१६६॥
वादिक वादपणें तळमळी । जैसें क्षेम देतां गांधिलाची पोळी । करवितसे एकचि नादाळी । महा शब्दाची ॥१६७॥
दुरून घाय करी पावकालागुनी । अंगावरी आदळल्या पळे जीव घेऊनी । तैसे आत्मज्ञात्यास देखोनि । वादिक पळे ॥१६८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP