मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
भक्त

प्रसंग अठरावा - भक्त

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


मनुष्‍यजन्मासारिखा देह सोंवळा । उन्मत्त दाटून करी ओंवळा । एकविध न भजे श्रीगोपाळा । सद्‌गुरुसंगें ॥१६९॥
विंचवाची नांगी विषें भरली । ढका लागतां ते घातातें पातली । तैसी जिव्हा न पाहिजे आळंगिली । अभ्तका पाखांड्याची ॥१७०॥
जैसी अबीरें भरलीं पेटारीं । सुगंध तारे तुटती बाहेरी । चतुर भोक्ते करितील हेरी । पोसिंदेपणें ॥१७१॥
तैसे साधूचे हृदयपेटारी । सुगंधता नाम द्रवे वैखरी । झांका तुटती अंतरीबाहेरी । बोधासंगें परियेसा ॥१७२॥
भाव पाहिजे जैसा टांकणखार । दोन कुटके जोडून करी एकाकार । शिष्‍यत्‍व गुरुत्‍वीं तदाकार । कुटकान्यायें भक्तिसंगें ॥१७३॥
सांगेन निजभक्तांची लीला । जैसी चढती बीजेची चंद्रकळा । तैसा दिवसेंदिवस हृदयीं सोंवळा । भक्तीलागीं सद्‌गुरूचे ॥१७४॥
दिवसेंदिवस सद्‌गुरूचें भूषण । अधिक अधिक वाढवी महिमान । तों तों तदाकार होय संपूर्ण । स्‍वयें सद्‌गुरू जैसा ॥१७५॥
सांगेन अभक्तांचें लक्षण । जैसा पौर्णिमेचा चंद्र संपूर्ण । नित्‍य कळा तुटोन संचरे अवगुण । हृदयीं त्‍याचें ॥१७६॥
दिवसेंदिवस र्‍हासे चंद्र । अमावास्‍या येतां पडे अंधार । तैसा अभक्तांस नाहीं धर । स्‍वयें अंधार करी भक्तीसी ॥१७७॥
सूर्य अंधारातें उमगूं गेला । परी अंधार न दिसे त्‍याला । तदन्यायें पहा साधूस जाला । पाप विटाळ न दिसे ॥१७८॥
पुढें पळे सूर्य मागें लागे अंधार । येरूनयेरांस देखिलें नाहीं अद्यापवर । सूर्य मावळल्‍या न वांचता अंधार । तरी साधूच्या तुका येता ॥१७९॥
तैसी न उपमा साधकास । मागें पुढें केला स्‍वयं प्रकाश । भासली आभासाची भास । प्रबोध करूनियां ॥१८०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP