शब्दाचें असे कारण । शब्दु तयाचें साधन ।
तथापि भाषे येकीचें प्रमाण । काय तेथें ? ॥१॥
जिया भाषा जें अभिधान । तियाचि भाषा त्याचें ज्ञान ।
येर शब्द अप्रमाण । तये अर्थीं ॥२॥
जिया भाषा कळे क्रिया । तेचि कारण तेथ कर्तया ।
येरीं अपारा जालिया । व्यर्था होती ॥३॥
पसाराचें कांहीं घेणें । तें कळे शब्दें जेणें ।
तोचि शब्दु बोलणें । तये ठायीं ॥४॥
वस्तु आलिया हातां । मग नाना भाषीं ते वदतां ।
कांहीं प्रयोजनु ? कीं वक्ता । श्रमातें पावें ? ॥५॥
संस्कृत असती ग्रंथ । तयाचें जाणावें मत ।
ऐसें जैं आर्तं । उपजे जिवा ॥६॥
तरीचि तें अभ्यासावें । अभ्यासूनि तत्त्व जाणावें ।
मग शब्द अवघे सांडावे । न व्हावें आसक्त ॥७॥
कणु घेणुनि भूस । देईजे जैसें पश्वादिकांस ।
तत्त्व जाणौनि, शब्दास । तैसें सांडावें ॥८॥
अथवा उदरपूर्ती करणें । योग्यतेचेनि गुणें ।
मूर्खां लोकां ठकणें । ऐसें जैं ॥९॥
तैं शास्त्रें समग्रें शिकावीं । अपार वटवट करावी ।
नाना उपायीं आणावी । आपणा योग्यता ॥१०॥
नाना विद्या जाणोनी । नाना मतें शिकोनि ।
नानाविध जिंकोनि । वादीं लोक ॥११॥
आंगीं योग्यता आणावी । मग ते अभिमानें पोषावी ।
संसारिकांप्रति दावावी । साधावा रुका ॥१२॥
अर्थप्रयोजनु जया असे । तया क्रियेची चाडचि नसे ।
स्वहित स्वप्नीं न दिए । तेणें शास्त्रें ॥१३॥
अर्थांर्थीं जनु पंडितु । तोहि अर्थुं साधतां पाहतु ।
मग प्रसंगींचि आणितु । आपुलें संस्कृत ॥१४॥
आतां आला रुका पुरे । मग सांडी संस्कृतें उत्तरें ।
प्राकृता वाणी विचरे । संसारमार्गीं ॥१५॥
परंतु ते भाषाचि परम । ऐसें नमनी कव्हणी वर्म ।
प्रयोजनु मात्रचि काम । आपुलें संपादिती ॥१६॥
संसार नगरपेठे । नाना भाषांचें नाणवटें ।
येका खरें, तें खोटें । आना येकां ॥१७॥
येथें संस्कृतचि केवळ । न सरे नाणें सकळ ।
कोण्ही एक स्थळ । ऐसें आहे ॥१८॥
संस्कृतें घटु म्हणती । आतां तयाचे भेद किती ?
कवणा घटाची प्राप्ति । पावावी तेणें ? ॥१९॥
हारा, डेरा, रांजणु । मुढा, पडगा, आनु ।
सुगड, तौली, सुजाणु । कैसी बोलैल ? ॥२०॥
घडी, घागरी, घडौली, । अलंदें, बाचिकें, बौळी ।
चिटकी, मोरवा, पातली । सांजवणें तें ॥२१॥
ऐसे प्रतिभाषे वेगळाले । घट असती नामाथिले ।
एके संस्कृतें सर्व कळे । ऐसें कैसेन ? ॥२२॥
सनवट, चोपण, गव्हाळी । चिकणी, पन्हवट, मळी ।
चुनवट, माळवट, खळी । खळगा, खात ॥२३॥
उतें, गोटल, खडाळ । पांढरी, सेडू, मुरुबाळ ।
तांबट, काळी, करळ, । भेद मृत्तिकेचे ॥२४॥
नदु, नदी, ओहळ, । झोती, झिरपें, खळाळ ।
धार, घाळणी, पीळ । भंवरा, धोधें ॥२५॥
टांकें, बावी, पोखरणी, । बारव, विहिरी, अडु, धरणी, ॥
विहिरा, तळें, रानी, । हळता, घुमे ॥२६॥
ऐसे भेद जळस्थानांचे । एक एक बहुतां नामाचे ।
सारी प्रयोजन तयांचे । संस्कृत कैसें ? ॥२७॥