केशवकुमार - धन्य ! धन्य ! आज धरा धवलर...
मराठी शब्दसंपत्ति
धन्य ! धन्य ! आज धरा धवलरूप झाली ॥ध्रु०॥
गगनांतुनि हिस न झरे, अमृताचे गळति झरे,
स्वर्गंगाआज सहज धरणीवर आली ! १
कौमुदींत शशि वितळे, रजतकांति कीं निथळे
तेजाच्या सागरांत अवनि कीं बुडाली ? २
दुग्धाचा झरत पूर, मोत्यांचा गलत चूर.
खाण हिर्याची फुटली काय अंतराळीं ? ३
नाचति सुरबालिका, फुटति म्हणुनि तारका ?
किरणांचे कण सांडति अविरत का खालीं ? ४
शुभ्र पारिजातका, बहर आज येत का ?
पुष्पांचा म्हणुनि सडा पडत भोवतालीं ५
धवलसृष्टि, धवल गगन, दशदिशाहि धवलवदन,
प्रकट मूर्त रूपें कीं धवलता जहाली ? ६
वृक्षवेलि शुभ्रपर्ण, फत्तरही स्फटिकवर्ण
संगमरवरी स्वरूप सदनें हीं ल्यालीं ! ७
सप्तरंग एकजीव, होति, त्यजुनि - भेदभाव,
शुभ्रकांति विलसे मृत कृष्णता कपोलीं ! ८
अंधकार आज मरे, नैराश्यहि सकल सरे,
पुण्याची कीं पहांट म्हणुनि ही उदेली ! ९
आशा, पावित्र्य, प्रेम, बांधिति हे धवल धाम
राहिल का सतत असें जग भविषकालीं ? १०
[ ता. २५ डिसेंबर १९२७ रोजी लंडन तेथें झालेल्या अपूर्व हिमवृष्टीस उद्देशून प्रस्तुत कविता लिहिलेली आहे. ]
N/A
References : N/A
Last Updated : January 22, 2018
TOP