( चाल - पोवाड्याची )
महाराष्ट्राच्या मैदानावर नाच पुन्हां , कृष्णे !
तुझ्या माथिंचा चंद्र झळकुं दे झोंकदार रत्ने ! १
कडेकपारीं सह्याद्रीच्या वाजूं दे टाप
उतर झिंगल्या महाराष्ट्राच्या दास्याचा कैफ ! २
शिवनेरीच्या शिवरायानें दिल्या दिलासाला
अमीन टांचा छत्रपतीच्या दे महाराष्ट्राला ! ३
फुरफुरुनी तूं उडीव धुरळा दूर परवशतेचा
ठेंच खुरांनीं बारबार तूं साप फितूरीचा ! ४
पायगुणी तूं रायगडींच्या दौलतिची खाणी
तुझ्यामुळें गे अम्हां गवसला तो स्वराज्य - सुमणि ! ५
तुझ्या बळावर महाराष्ट्राचा कोट उभा झाल
दौलतजादी ! म्हणुनि एकदां वाजिव टापांला ! ६
शिवनेरीच्या करवंदींतुन सुटून बेछूत
सिंहगडाच्या सिंहा उठवुनि रायगडा भेट ! ७
धनी मिळाला धन्य तुला तो घेउनि ये तेथून
मावळचीं तीं रत्नें काढा महाराष्ट्र मंथून ! ८
घेउनि चंद्रा जगास सुखवी जशी कृष्ण रात्र,
आणुनि कृष्णे ! शिवा भूषवी तसें महाराष्ट्र ! ९
तुझ्या गळ्यांतिल खळाळुं दे ती पुतळ्यांची माळ
त्या नादानें वीरश्रीचे पुतळे हलतील ! १०
हलतां पुतळे परवशतेचें धावें हदरेल
वाजिव टापा ! - स्वातंत्र्याचे कान उघडतील ! ११
सह्याद्रीच्या माथ्यावर तट टापांचे नाल
गडस्वरूपें उमटुनि गेले, बुझले ना समुळ ! १२
टाक एकदां टाप तयावर ठळक ठसठशीत
कड्याकड्यांतिल पाउलवाटा फिरून उजळीत ! १३
चतुष्पादिं तव चतुर्वर्ग जणुं होता वसलेला
चतुर्वर्ण तो म्हणून तेव्हां एकदिलें लढला ! १४
ते पुण्यवंत तव पाय । शत्रुनाशाय । दास्यहरणाय ।
लाविं तूं महाराष्ट्राला
फिर त्यांवर सह्याद्रीला
जागीव तदात्मा निजला; -
पडतिल त्यांतुनि बाहिर भाले दडले अणिदार --
हां हां म्हणतां स्वदेशभूची फिरेल तखदीर ! १५
( २ )
फिरव तुझी ती स्वातंत्र्याची नजर पाणिदार
दास्य - सुदुर्बल देशिं होत तें पाणि जोमदार ! १६
तेजस्वी तव नेत्र तयांतिल तेजोमय झोत
ओत एकदां दास्यलुब्ध - जड स्वदेशनिष्ठेंत ! १७
गतासु ! निष्ठा - एकी रडते घेउनि शव तीचें,
अन्यायांचे भुंकति भालू, दुहि हर्षें नाचे ! १८
दौडत येई राष्ट्राविरचिनी ? तव कानोशानें
दडतिल भालू - दुहीहि, राहिल एकीचें रडणें ! १९
नकोच गिळुं तो गळता तुझिया तोंडीचा फेंस,
मृत निष्ठेला दे, कीं त्यांतचि संजीवनि वास ! २०
घाबरें न, कीं कठीण येथें कापुस बोंडाचा !
तुडीव तो बिन्धोक ! लाभ तुज होइल सरकीचा ! ! २१
घाबरें न, कीं पडले असती निखार पर - तेचे
जळतिल तेणें खूर आपुले खालीं सत्तेचे !
भाजतील निज खूर म्हणोनी घेइं न माघार -
रक्तवदन परपुष्ट मत्कुणा हरि नखिंचा धूर ! २२
म्हणशिल मनिं कीं आजि काम केलिस तूं विनति,
केलि तशी कीं “ स्वदेशभक्ता दु:खांची न क्षिती ! ” २३
उमगाया अससि समर्थ । यांतला अर्थ । देशकार्यार्थ ।
तूं दौडत येई खालीं
विपरीत अशा या कालीं,
जमवीत कांबळी काळी
शिवनेरीहुनि, खालीं जाई रायगडावरती,
भगवा झेंडा धरिल तेथें लगाम तव हातीं ! २४
दौलतजादि ! महाराष्ट्राचे सुयश - धर्म - खाणी !
अरविंदाची ऐक विनंती उभारल्या कानीं ! ! २५
N/A
References : N/A
Last Updated : January 22, 2018
TOP