मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|
सवाई दु:ख पुरे रमणीय पाह...

साधुदास - सवाई दु:ख पुरे रमणीय पाह...

मराठी शब्दसंपत्ति


सवाई
दु:ख पुरे रमणीय पाहुनि द्या हृदयासि विरामा
धीर धरा, क्षण शांति वरा, मनिं कांहिं विवेक करा गुणधामा ॥
रम्य तटी निकटीं बहु शोभत पात्र मनोहर कानन साजे
सैकत सुंदर त्यांत सुखावुनि सारस - हंस - कदंब विराजे ॥
वृक्ष तटीं घनदाट सभोंवति घाट, तयावरि थाट बकांचा
डोलत चंपक, बोलतसे शुक्र, चालत गानविलास पिकांचा ॥
सांचतसे मकरंद फ़ुलांतुनि, पाहतसे अलि त्यांत निवारा
नाचत एक नटूनि पदावरि मोर मदें पसरूनि पिसारा ॥
गंधभरें करि अंध अलींस असा अति - मंद सुगंधित वारा
वाहतसे, फ़ुलल्या लतिका वन - भाग सुरम्य विराजत सारा ॥
खेळतसे मृगशावक कौतुकदायक होत किती पितरांना
चंदन - संगत दंग भुजंगम वेष्टुनियां बसले विटपांना ॥
शंखकुलें दिसती पुलिनांतुनी वेतस वारिजवें नत झाले
त्यांत कुठें तृणकंद विराजति, शैवल वाढुनियां दृढ आलें ॥
उंचवटे विवरें सिकतांतुनि कैक, तयांतुनि दर्दुर बोले
त्यांत फ़ुलें तटपादप गाळिति, चित्रविचित्र तदा जल हाले ॥
गाहतसे गजराज सख्यांसह, वाहतसे जल येउनि लाटा
पाहतसे खगवृद तया भय - भीत निघे बहु काढुनि वाटा ॥
नाहतसे उडवोनि शिरीं जल, वाहत उच्च रवें स्वकुलाला
साहतसे नलिनी निज संकट, राहतसे मग पीडितमूला ॥
रम्य फ़ुले अरविंद, गळे मकरंद तयांतुनि मंद जलीं या
धुंद बनूनि मिलिंद तयावरि सुंदर गायन लागत गाया ॥
चित्रविचित्र - तरंग - तरंगित रंगत पुष्प - मरंद - रसें हें
चंचल - वंजुल - कुंज - तटावरि हापटुनी मग मंजुल वाहे ॥
विस्तृत सिंधुसमान सरोवर विस्मित हें करितें सकलांना
तीरलता प्रतिबिंबित होउनि तांडव या दिसती करितांना ॥
मंद - समीरण - कंपित - लोल तरंग किती उठती अजि नाना
निर्मल हे परि नील कुठें हिरवेंहि तसें जल ये अनुमाना ॥
धांवति मीन सभोंवति, दर्दुर सादर एक दिशा धरिताहे
आवरुनी निज पाय जलावरि कासव निश्चल येउनि राहे ॥
मारुनियां सलिलांत उड्या करि पाणबुडा बहु मीन धराया
यत्न, पहा ! उठत किति बुद्बुद सारसही निघती विचराया ॥

( स्रग्धरा )
लीला - मंदोर्मि - माला कलकल - बहला धावनाक्रांतकूला
तीरींच्या वृक्षमूला झगटुनि सरला येति मागें विलोला ॥
अंभोजामोद झाला चलमधुपकुला हेतु मोहावयाला
हंसा उत्साह आला परिमल भरला त्या गुणें जीव धाला ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP