भवानीशंकर पंडित
मराठी शब्दसंपत्ति
[ नराचिका - गज्जल ]
उठून एकदां तरी गडे ! जरा पहा बरें
दिशांदिशांतुनी कसें यथावकाश झांजरे
खुले निळ्या नभोंsगणीं सतेज शुक्रचांदनी
सुरम्य संधिकालिं या दिसे समस्त साजिरें
जमे अधांतरीं मुर्हें चिकाळ दाट पांढरें
तयांतुनी दंवांबुचा विशुद्ध स्त्रोत पाझरे
पुन्हां पुन्हां मघापुनी समित्र कुक्कुटाग्रणी
विराम घेत आरवे उदग्र कर्कश स्वरें
सुरालयीं पलीकडे सताल चौघडा झडे
सुरेल नाद वेणुचा कणांकणांतुनी शिरे
निनादणें जसें जसें भरास येइ जागरें
करून काकडारती महंत मंत्र गर्जती
पळांत वायुमंडलीं पवित्र घोष तो विरे
रचून संघ संगतीं नभांत मंडलाकृती
चरावयास शाद्वलीं निघे चतुष्पदावली
विगूढ घुंगरुध्वनी पथीं सभोंवतीं भरे
धरून नाचर्या करीं अभीर गोड पावरी
तियेस संथ वाजवी स्वकीय कंपिताधरें
शिरीं दुधाणि घेउनि पुरीस येति गौळिणी
सलील मंद नादती तदंघ्निं मंजु नूपुरें
प्रभातवात संचरे विनम्र रान त्या भरें,
फुलाफुलावरूनिया प्रसन्न चंचरी फिरे
उदे हिरण्यगर्भ हा प्रकाशती दिशा दहा
करूं तयास ऊठ गे ? नत प्रणाम आदरें
N/A
References : N/A
Last Updated : January 22, 2018
TOP