दिवस सुगीचे सुरू जाहले
ओला चारा, बैल माजले
शेतकरी - मन प्रफुल्ल झालें
छन झुन, खळ झण - झण खळ्म झुन झिन, लेजिम चाले जोरांत !
चौघांनीं वर पाय उचलले
सिंहासनिं त्या उभे राहिले
शाहिर दोघे ते डफवाले
टप ढुम, ढुम ढुम, डफ तो बोले लेजिम चाले जोरांत !
दिवटी फुरफुर करूं लागली
पटक्यांचीं वर टोंकें डुललीं
रांग खेळण्या सज्ज जहाली
छन खळ, ढुम ढुम, छन छन, पट ढुम, लेजिम चाले जोरांत !
भरभर डफ तओ बोले घुमुनी
लेजिम चाले मंडळ धरुनी
बाजुस, मागें, पुढें वांकुनी
खळ खळ, छन छन, झण छन, खळ झन, लेजिम चाले जोरांत !
डफ तो बोले, लेजिम चाले
वेळाचें त्या भान न उरलें
नादभरानें गुंग नाचले
छननन, ढुम ढुम, खळ छन, ढुम ढुम, लेजिम गुंगे नादांत !
दिनभर शेतीं श्रमुनी खपले
रात्रीं साधी लेजिम चाले
गवई नलगे सतारवाले
छन छन, खळ खळ, झणणण, छ्न छन, रात्र संपली नादांत !
पहाट झाली, तारा थकल्या
डफवाला तो चंद्र उतरला
परी न थकला लेजिममेळा
ढुम झन, खळ खळ, लेजिम खालीं: - “ चला जाउं या शेतांत ”